आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक: नाशिकचे ब्रँडिंग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकरवी दत्तकविधान होऊनही पदरात काहीच पडत नाही म्हटल्यावर नाशिककरांच्याच पुढाकाराने देशाची आर्थिक राजधानी अन्् जागतिक पातळीवरील काही प्रमुख व मोजक्या व्हायब्रंट केंद्रांतील एक असलेल्या मुंबईमध्ये नाशिकचे ब्रँडिंग करण्याचा स्तुत्य उपक्रम नुकताच पार पडला. परिसरातील शेकडो उद्योजकांचे नेतृत्व करणाऱ्या नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी टाकलेल्या या धाडसी पावलांमुळे मुंबानगरीत सलग तीन दिवस उद्योग-व्यवसायाशी संबंधित सकारात्मक बाबी प्रभावीपणे प्रदर्शित करण्यात आल्या.

 

लोकसभा, विधानसभा, महापालिका, नगरपालिकांची सार्वत्रिक असो की गल्लीबोळातील, निवडणूक प्रचारासाठी विविध पक्षांच्या नेतेमंडळींकडून आश्वासनांची खैरात केली जाते. समजूतदार मतदारही मोठ्या अपेक्षेने आश्वासनांवर भरोसा ठेवत म्हणा की नेत्यांच्या शब्दांची भुरळ पडल्यामुळे उमेदवारांना निवडून देतात. विजयी मिरवणूक संपली, अंगावरचा गुलाल धुतला अन्् निवडून आलेली मंडळी इच्छितस्थळी आसनस्थ झाली की मतदारांकडे पाठ फिरवतात. यात नवीन काहीच नाही. पण त्यातून मतदारराजा काहीच शिकत नाही. नाशिकही याला अपवाद नाही. येथील भौगोलिक स्थिती, हवामान, आरोग्यदायी वातावरण, पुरेसे मनुष्यबळ, मुंबईचे सान्निध्य या उद्योग- व्यवसायाच्या भरभराटीसाठी पूरक ठरणाऱ्या सुविधा सुदैवाने नाशिकला उपलब्ध आहेत.

 

त्याउपरही नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राची दखल घेण्याइतपत भरभराट आजवर होऊ शकलेली नाही. जागतिक पातळीवरचे ब्रँड निर्माण करणारे उद्योग येथे आहेत, पण त्यांचाही फारसा बोलबाला नाही.  


मुंबई-पुण्याला जोडणाऱ्या राज्य वा राष्ट्रीय मार्गांची स्थिती अलीकडे बऱ्यापैकी सुधारली. त्यामुळेच नाशिक-मुंबई हे अंतर अडीच ते तीन तासांवर आले. मुंबई हाकेच्या अंतरावर आल्याचा आनंद एकीकडे असला तरी हवाईमार्गे नाशिक अजूनही कोसो दूरच आहे. केंद्र सरकारच्या ‘उडान’चाही प्रयोग येथे झाला. सुरुवातीचे काही दिवस नाशिककर मनातल्या मनात हवाई भराऱ्या घेऊ लागले खरे, पण अल्पावधीतच त्यांना जमिनीवर यावे लागले.

 

कारण, नाशिक विमानतळावरून सुरू झालेली मुंबई- पुणे सेवा हेलकावे खाऊ लागली. आता तर अशी स्थिती आहे की, ही सेवा पुन्हा केव्हा पूर्ववत होऊ शकेल तसेच तिच्यात सातत्य राहू शकेल याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही. वाइन टुरिझम, अॅग्रो टुरिझम, हेल्थ टुरिझम असे एक ना अनेक मुद्दे नाशिकच्या विकासाला चालना देण्यास पूरक आहेत. येथील तीर्थक्षेत्र पर्यटन हा विषयदेखील आहेच. केवळ राजकीय इच्छाशक्तीमुळे ते लांबणीवर पडले आहेत. 

 
असो, निमाच्या पदाधिकाऱ्यांनी निर्धारपूर्वक नाशिकचे ब्रँडिंग करण्याचे ठरवले आणि तो प्रयोग यंदा व्यापक प्रमाणात यशस्वी करून दाखवला. त्यांचे मन:पूर्वक कौतुक करायला हवे. आपण उत्पादित केलेल्या मालाचे मार्केटिंग आपणच बाजारात उत्तम क्षमतेने करू शकतो याचे उदाहरण निमाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यातील अन्य व्यावसायिकांसमोर ठेवले आहे.

 

गतवर्षी ‘मेक इन नाशिक’ अन् यंदा ‘निमा इंडेक्स २०१८’ या नावाने मुंबईत प्रदर्शन भरवून देशविदेशातील उद्योजकांच्या पुढ्यात नाशिकशी संबंधित व्यावसायिक क्षमता, आकर्षक उत्पादने, व्यावसायिक मैत्री करार असो की भागीदारीचे करार घडवून आणण्याचे काम या निमित्ताने होऊ शकले ही बाब निश्चितच भूषणावह म्हणावी लागेल.

 

गेल्या वर्षी साधारणपणे १९०० कोटींची, तर या वेळी त्यापेक्षा अधिक गुंतवणूक होण्याची अपेक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आहे. सरकारी अनास्थेचा कडवट अनुभव या वेळीही आला. उद्योग विकास खात्याच्या निर्णय प्रक्रियेत मूल्यवान भूमिका निभावणाऱ्या वरिष्ठांनी प्रदर्शनाकडे पाठ फिरवली. पण, म्हणतात ना, नाणं खणखणीत असेल तर बाजारात त्याला किंमत मिळतेच. . देशविदेशातील साधारणत २५हून अधिक मोठ्या उद्योगांसह भारतीय रेल्वेने या प्रदर्शनात सहभाग घेतला होता. त्या व्यतिरिक्त १५ देशांच्या वकिलातींचे प्रतिनिधी वा वाणिज्य प्रतिनिधींनी प्रदर्शनाला आवर्जून भेट देत गुंतवणुकीची वा व्यवसायात भागीदारी करण्याची इच्छा प्रदर्शित केली.

 

यातच खरं तर या प्रदर्शनाच्या यशाचं तसेच ‘निमा’च्या पदाधिकाऱ्यांनी सहा महिन्यांहून अधिककाळ घेतलेल्या कष्टाचं गमक आहे. निमाच्या पुढाकाराने अशा प्रकारचे प्रदर्शन नाशिक मुक्कामी दर वर्षी भरविले जायचे, पण ते जेव्हापासून आर्थिक राजधानीत भरविले जाऊ लागले .


तेव्हा त्याला वेगळीच झळाळी प्राप्त झाली. प्रदर्शनाला मि‌ळणारा प्रतिसाद 
लक्षात घेता भविष्यात ‘मेक इन नाशिक’ हा यशस्वी प्रयोग ठरावा.  
जयप्रकाश पवार

निवासी संपादक, नाशिक

बातम्या आणखी आहेत...