आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असा 'नवा भारत' कोणाला हवा?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकांना ठेचून मारण्यापासून ते मंत्रोच्चारानं पीक चांगलं येतं, याचं अप्रत्यक्ष समर्थन होण्यापर्यंतचे प्रकार २०१४ पूर्वी बघायला वा ऐकायला मिळत नसत. आज ते घडत आहेत. उघड घडत आहेत. वारंवार घडत आहेत. ...कारण भौतिक प्रगती करणारा, पण विषमता असणारा, हिंसा व विद्वेषानं भारलेलं नि:सत्त्व व निकृष्ट समाजमन असलेला, बहुसंख्याकांचं वर्चस्व असणारा समाज हेतुत: पद्धतशीरपणे निर्माण केला जात आहे. 


राणा अयुब या आहेत महिला पत्रकार आणि स्वाती चतुर्वेदी या आहेत काँग्रेसच्या प्रवक्त्या. या दोन्ही स्त्रियांना समाजमाध्यमांवरून अतिशय बीभत्स व किसळवाण्या पद्धतीनं 'ट्रोल' करण्यात आलं. 
या दोघींनीही पोलिसांत तक्रारी केल्या. त्यापैकी चतुर्वेदी यांच्या तक्रारीची दखल घेऊन मुंबई व दिल्ली पोलिसांनी अहमदाबाद येथून एका माणसाला पकडले. मात्र, राणा अयुब यांनी तक्रार करून दोन महिने उलटून गेले तरी दिल्ली पोलिसांनी काहीही कारवाई केलेली नाही. 


चतुर्वेदी यांच्या प्रकरणात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी हस्तक्षेप केला आणि पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडलं, असं सांगितलं जात आहे. मग राणा अयुब यांच्या विरोधातील 'ट्रोलिंग'वर कारवाई करण्याचा आदेश द्यायला राजनाथसिंह का तयार नाहीत? 


याचं कारण आहे, ते राणा अयुब यांची पत्रकारिता ही संघ परिवाराच्या मुळावरच घाव घालणारी जशी आहे तसंच त्या मुस्लिम आहेत. उलट चतुर्वेदी या हिंदू आहेत आणि काँग्रेसच्या प्रवक्त्या म्हणून त्या करत असलेली टीका 'राजकीय' असते. त्यातही 'ट्रोल सेना' त्यांच्या मुलीलाच लक्ष्य करू लागल्यावर त्याची प्रतिक्रिया समाजाच्या विविध थरांत-विशेषत: मोदी व भाजप यांचा ज्या समाज घटकांवर आता जास्त भरवसा आहे, त्या उच्च मध्यमवर्गीयांत-उमटण्याची शक्यता दिसू लागल्यावर राजनाथसिंह सरसावले. 


वेगळ्या पद्धतीनं असाच प्रकार सुषमा स्वराज व जयंत सिन्हा दोन मंत्र्यांबाबत घडताना दिसत आहे. 
एका हिंदू महिलेशी लग्न केलेल्या मुस्लिम व्यक्तीच्या पासपोर्टच्या अर्जाची छाननी करताना, लखनौच्या कार्यालयातील अधिकाऱ्यानं त्याला 'हिंदू हो' असा आग्रह धरला, तरच पासपोर्ट मिळेल, असं सुचवलं. त्यातून खूप मोठा गदारोळ झाला. या व्यक्तीच्या हिंदू पत्नीनं सुषमा स्वराज यांना 'टि्वटर'वर संदेश पाठवला. मग सुषमा स्वराज यांनी त्या अधिकाऱ्याची लखनऊ कार्यालयातून बदली केली. त्यानंतर 'ट्रोल सेना' सुषमा स्वराज यांच्यावर तुटून पडली. सुषमा स्वराज यांच्यावर दोन वर्षांपूर्वी मूत्रपिंड रोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तो संदर्भ घेऊन 'तुमची किडनी मुस्लिमांचीच असणार, म्हणून तुम्ही एका मुस्लिमाची कड घेतली आहे', असाही आरोप करणारे संदेश त्यांच्या 'टि्वटर हँडल'वर येत राहिले. 'घरी आली की तुमच्या पत्नीला चांगला लाथा-बुक्क्यांचा प्रसाद द्या', असा सल्ला स्वराज यांच्या पतीला दिला गेला. मात्र, जवळजवळ तीन आठवडे एकाही भाजप मंत्र्यानं वा पक्षाच्या नेत्यानं स्वराज यांची पाठराखण करण्याचं कटाक्षानं टाळलं. त्याची प्रतिक्रिया भाजपला पाठबळ देणाऱ्या उच्च मध्यमवर्गात उमटू लागल्यावर राजनाथसिंह, नितीन गडकरी व राम माधव या नेत्यांनी तोंड उघडलं. 


मात्र, झारखंडमध्ये २०१५ मध्ये गोवंश हत्याबंदीच्या मुद्द्यावरून घडलेल्या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयानं ज्यांना दोषी ठरवलं आणि जे आता उच्च न्यायालयात अपील केल्यावर जामिनावर सुटलेले आहेत, त्यांचा फुलांचे हार घालून सत्कार करण्याचा खटाटोप केंद्रीय राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी करूनही भाजप गप्प आहे. भाजप ज्यांनी आता सोडून दिला आहे, त्या केंद्रीय अर्थ व परराष्ट्र खात्याचे माजी मंत्री यशवंत सिन्हा यांचे जयंत सिन्हा हे चिरंजीव आहेत. अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठाचे ते पदवीधर आहेत. या प्रकरणाचा गवगवा झाल्यावर 'आपला मुलगा नालायक निघाल्याची' टीका यशवंत सिन्हा यांनी केली आहे. 


पंतप्रधानांनी तर नेहमीप्रमाणेच अशा प्रकरणांबाबत मौनच धारण केलं आहे. ना ते सुषमा स्वराज यांच्या मागे उभे राहिले आहेत, ना त्यांनी जयंत सिन्हा यांना समज दिली आहे. विशेष म्हणजे अलीकडेच राजस्थानातील एका सभेत बोलताना मोदी यांनी आपल्या खाक्याप्रमाणे शब्दांचा खेळ केला आणि काँग्रेसचे अनेक नेते न्यायालयाकडून 'बेल' मिळवून तुरुंगाबाहेर आहेत, त्यामुळे या पक्षाला 'बेलगाडी' म्हणायला हवं, अशी कोटी केली. मागे असंच अमर्त्य सेन यांना कोपरखळी मारताना मोदी यांनी 'हार्वर्ड' आणि 'हार्डवर्क', अशी तुलना केली होती. नियतीचा खेळ असा मजेशीर आहे की, आता मोदी मंत्रिमंडळातील 'हार्वर्ड'ला शिकलेले एक मंत्री 'बेल मिळालेल्यां'चा सत्कार करत आहेत. 


अर्थात आपण काय बोलतो, कसं बोलतो, याचं मोदी यांना काहीच सोयरसुतक कधीच नव्हतं व आजही नाही. गेल्या चार वर्षांत मोदी यांनी इतके असे 'विनोदी' प्रकार केले आहेत की, त्याची यादीच खूप मोठी होईल. मोहंजदडो-हडप्पा पंजाबात असल्यापासून ते अगदी अलीकडे कबीराच्या ५०० व्या जयंतीच्या निमित्तानं झालेल्या समारंभात बोलताना मोदी म्हणाले होते की, 'गुरुनानक, संत कबीर व गोरखनाथ हे याच ठिकाणी एकत्र बसून चर्चा करत असत.' या तिन्ही ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांच्या कालखंडात काही शतकांचा फरक आहे. हा 'विनोद' केल्यावर दोनच दिवसांनी मोदी यांनी जाहीरपणे ग्वाही दिली की, 'भारतातील १२० कोटी कुटुंबांना स्वयंपाकाचा गॅस आता मिळू लागला आहे.' एका कुटुंबात सरासरी चार माणसं धरली तरी १२० कोटी कुटुंबं म्हणजे ६०० कोटी माणसं होतात. भारताची लोकसंख्या आहे १३२ कोटींच्या आसपास. म्हणजे भारताच्या लोकसंख्येपेक्षा जास्त माणसांना मोदी सरकार स्वयंपाकाच्या गॅसचा फायदा मिळवून देत आहे. 


इतकी तद्दन खोटी विधानं बिनदिक्कतपणे देशाचा प्रमुख नेता करत असूनही, ती एक तर हसण्यावारी नेली जात आहेत किवा त्याकडे कानाडोळा केला जात आहे. मात्र, एकीकडे ही अशी खोटी विधानं, शाब्दिक कोट्या आणि दुसऱ्या बाजूला समाजमाध्यमांवरून वा इतर प्रकारे विरोधकांवर राळ उडवणं, बिगर हिंदू समाजातील लोकांना ठेचून मारणं, अफवा पसरवून झुंडी तयार करून त्यांच्यामार्फत विशिष्ट समाजगटांना लक्ष्य बनवणं, असे जे प्रकार आजकाल सर्रास होत आहेत, त्याकडे सुटं सुटं बघणं म्हणजे 'जंगलाऐवजी त्यातील झाडंच फक्त बघणं' ठरेल. 


या साऱ्यामागे एक विशिष्ट पद्धत आहे. 
समाज मनात हिंसा व विद्वेष रुजवून मुरवण्याचा हा पद्धतशीर प्रयत्न आहे. दुसऱ्या बाजूला 'परंपरां'चा पगडा असलेल्या समाजातील धार्मिकतेला धर्मवादाचे रूप देण्याचाही नियोजित असा प्रयत्न केला जात आहे. शिवाय याच 'परंपरा'- मग त्या धार्मिक, सामाजिक वा सांस्कृतिक यापैकी कोणत्याही असू देत - त्यांना अवास्तव महत्त्व देण्याचाही बेत आखला गेला आहे. त्यामुळे शिक्षण व सांस्कृतिक क्षेत्रांत या 'परंपरां'च्या आधारे पुराणमतवादी विचार रुजवण्यात येत आहेत. हे सारं हसण्यावारी नेण्याऐवजी याचा परिणाम कसा होत आहे, ते बघणं उल्लेखनीय ठरेल. मध्यंतरी गोव्यातील भाजपच्या नेतृत्वाखाली आघाडीच्या सरकारातील एका मंत्र्यानं असं जाहीर केलं आहे की, 'वैदिक मंत्रोच्चार केल्यानं पीक चांगलं येतं.' त्यावर प्रसारमाध्यमांतून टीकेची झोड उठवली गेल्यावर, दुसरीकडे 'हे असं घडतं की नाही, याची शास्त्रीयदृष्ट्या तपासणी करायला काय हरकत आहे', असाही पाठिंबा देण्याचा सूर निघू लागला आहे.. 
असं लोकांना ठेचून मारण्यापासून ते मंत्रोच्चारानं पीक चांगलं येतं, याचं अप्रत्यक्ष समर्थन होण्यापर्यंतचे प्रकार २०१४ पूर्वी बघायला वा ऐकायला मिळत नसत. 


आज ते घडत आहेत. उघड घडत आहेत. वारंवार घडत आहेत. 
...कारण भौतिक प्रगती करणारा, पण विषमता असणारा, हिंसा व विद्वेषानं भारलेलं नि:सत्त्व व निकृष्ट समाजमन असलेला, बहुसंख्याकांचं वर्चस्व असणारा समाज हेतुत: पद्धतशीरपणे निर्माण केला जात आहे. 
मोदी ज्याला 'नवा भारत' म्हणतात, तो हाच आहे. तेच 'हिंदूराष्ट्र' असणार आहे. 
'ट्रोलिंग'पासून ते ठेचून मारण्यापर्यंतच्या घटना वारंवार घडणं, हे अशा या भारतातील 'नवं वास्तव' असणार आहे. 

असा 'नवा भारत' खरोखरच कोणाला हवा आहे? 

 

- प्रकाश बाळ, ज्येष्ठ पत्रकार
prakaaaa@gmail.com 

बातम्या आणखी आहेत...