आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खान्देशातील अभिनव फड सिंचन पद्धत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांकेतिक फोटो - Divya Marathi
सांकेतिक फोटो

खान्देशातील अभिनव जलसिंचन पद्धतीचा सर्वदृष्टीने अभ्यास केला असता या पद्धतीला जागतिक वारसा मिळवण्यासाठी प्रयत्न केल्यास त्यास जागतिक वारसा प्राप्त होईल. ही अभिनव जलसिंचन पद्धत जागतिक स्तरावर अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडण्याचे काम जागतिक जलतज्ज्ञ मा. डॉ. माधवराव  चितळे व त्यांच्या सहकाऱ्याने केले आहे.  या अभिनव सिंचन फड पद्धतीला जागतिक वारसा मिळण्यासाठी सर्व खान्देशवासीयांनी प्रयत्न करणे जरुरीचे आहे. 


महाराष्ट्रात प्राचीन काळापासून विहीर, तलाव, कालवे, पाट याद्वारे पाणीपुरवठा करण्याचे प्रयत्न त्यावेळच्या लोकांनी केलेले दिसतात. राज्यात प्राचीन काळात ज्या सिंचनाच्या पद्धती अस्तित्वात होत्या त्यापैकी खान्देशात तापी खोऱ्यातील उपनद्यांवर अभिनव जलसिंचन पद्धत (फड) आजही अस्तित्वात आहे. एखाद्या प्रदेशाच्या वस्तीच्या निर्मितीवर व वितरणावर पाण्याची उपलब्धता हा घटक फार महत्त्वाचा ठरतो. खान्देशातील एकूण ग्रामनामांपैकी सुमारे ५२% ग्रामनामे नैसर्गिक परिस्थितीशी, तर बाकीची ४८% ग्रामनामे सांस्कृतिक घटकांशी निगडित आहेत. यात पाण्याशी संबंधित असलेल्या ग्रामनामांचे प्रमाण जास्त आढळते. खान्देशातील एकूण ग्रामनामांपैकी सुमारे १३% च्या वर गावांची नावे पाण्याशी संबंधित आहेत. उदा. पाणी-अंबापाणी, गेरूपाणी, भांगरापाणी, मोगरापाणी इ. विहीर-अली विहीर, दगडी विहीर, खोल विहीर, वाण्या विहीर, धवळी विहीर इ. कुवा-अक्कलकुवा, मालकुवा, अमलकुवा, बोरीकुवा इ. तळे-निमतळे, जामतळे, खडकतळे, तळेगाव इ. कुंड-बोरकुंड, बेडाकुंड, माकडकुंड इ. या ग्रामनामांचा अभ्यास केल्यावर असे दिसते की, खान्देशच्या संस्कृतीला जलसंस्कृती असे संबोधले गेले.  


खान्देशातील पांझरा खोरे हे दख्खनच्या पठारावरील अति उत्तरेकडील अथवा वायव्येकडील पांझरा नदी पूर्व वाहिनी. दख्खनचे पठार हे लाव्हा रसापासून निर्माण झाले. दख्खनचे पठार अशा लाव्हारस महापूर प्रक्रियेतून तयार झाले, असे मत नासाचे शास्त्रज्ञ डॉ. मिखाइल रामपियो (१९९०) यांनी मांडले. भूशास्त्राच्या अनुमानानुसार दहा लाख वर्षांपूर्वी पांझरा नदी निर्माण झाली असावी, असा अंदाज आहे. 

 
पांझरा कान खोऱ्यातील अभिनव जलसिंचन (फड पद्धत) ः 
खान्देशातील पांझरा नदीचा उगम शेंदवडच्या डोंगरातून होतो. तो प्रदेश समुद्रसपाटीपासून चार हजार फुटांपेक्षा जास्त उंच आहे. तिचे उगमस्थान २०.५१. उत्तर अक्षांश व ७३.५५ पूर्व रेखांश यादरम्यान आहे. पांझरा नदी पूर्वेकडे ९९ किमी वाहत जाते. पिंपळनेरच्या पुढे जामखेली व पुढे साक्रीजवळ कान नदी तिला येऊन मिळते. धुळ्याच्या पूर्वेला तिला काटकोन वळण मिळते व ती तापीला मुडावद गावाजवळ मिळेपर्यंत तिचा प्रवाह दक्षिण-उत्तर असा होतो. साक्री तालुक्यात नदीचे १३८ किमी लांबीचे खोरे ३२५७ चौकिमी असून ते पाणी शेतीसाठी वापरण्याकरिता २ ते ५ मीटर उंचीचे दगडी बंधारे बांधून त्यावर फड पद्धतीने शेतीस पाणीपुरवठा आजतागायत केला जातो. या फड पद्धतीचा इतिहास अतिशय रोमहर्षक आहे.  


फड पद्धतीचे ऐतिहासिक संदर्भ- 
‘थळकरी’ हा शब्द मनुस्मृतीत आढळतो. हल्ली ‘थळकरी’ हा शब्द थळात जमीन असणाऱ्यांसाठी वापरतात. यामुळे ही फड पद्धत मनुस्मृती काळापासून अस्तित्वात असावी असेही म्हटले जाते.  सिंधू संस्कृतीच्या काळापासून बंधाऱ्यांची परंपरा आहे. जोर्वे संस्कृतीच्या काळातही बंधारे बांधल्याची माहिती मिळते. मौर्यांनीही सिंचनाची कामे व त्यांची दुरुस्ती करण्याकरिता स्वतंत्र शेतकी खाते निर्माण केले होते. त्या काळात कालवे, तलाव यासारख्या सिंचन पद्धती सरकारी प्रयत्नातून, लोकसहभागातून निर्माण  होत. 


सुमारे एक हजार वर्षांपूर्वी यादवांची सत्ता आली. सेऊणचंद्र हा यादवांचा प्रारंभीचा राजा. त्याच्या नावावरूनच या भागाला नाव पडले सेऊणदेश व पुढे कालौघात त्याचे रूपांतर खान्देशात झाले असावे. यादव राजांनीही बंधारा सिंचनास प्रोत्साहन दिले. फड पद्धत त्यांच्या काळापासून अस्तित्वात असल्याची जास्त शक्यता वाटते.  प्राचीन काळापासून उत्तर व पश्चिमेकडे जाणारे सार्थवाह पथ (महामार्ग) खान्देशातून जात. तेव्हापासून या प्रदेशाचे व्यापारी, राजकीय, सांस्कृतिक व आर्थिक महत्त्व वाढीस लागले. इब्नबतुता हा अाफ्रिकन प्रवासी सन १३४२-४३ च्या सुमारास खान्देशातून गेला. हा अतिशय संपन्न प्रदेश आहे, असे त्याने प्रवासात लिहून ठेवले आहे.  लोकहितवादींच्या पत्रे १५० व १७५ नंबरच्या पत्रात थळ पद्धतीचा उल्लेख येतो. ते म्हणतात, वेगवेगळ्या गावी थळे असतात. त्या थळांची नावे गावांच्या नावाप्रमाणे विलक्षण असतात. उदा. म्हसाेबाचे फड, पळसाचे फड, एडबाईचा फड इ. यावरून असा निष्कर्ष निघतो की, गावांच्या अस्तित्वाबरोबरच थळे अस्तित्वात आली असावीत. हा इतिहास पाहत असताना खान्देशातील ही पद्धत प्राचीन काळापासून अस्तित्वात असण्याची शक्यता आहे.  


खान्देशातील दगडी बंधाऱ्यांची माहिती चौदाव्या शतकापासून मिळते. त्याअगोदर वाळूचे कच्चे बंधारे असावेत. त्यांच्या साहाय्याने थळांना पाणी दिले जात असावे. सन १८१८ मध्ये इंग्रजांनी खान्देश ताब्यात घेतल्यानंतर येथील पहिले कलेक्टर जॉन ब्रिग्ज यांनी शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यांची पाहणी केली असता त्यांना १८७ बंधारे असल्याचे आढळले. पण आज दुर्दैवाने ती यादी उपलब्ध नाही.  


फड पद्धतीचा अर्थ-  
नदी ते पार यातील सिंचनास योग्य अशा जमिनीला थळ म्हणतात. त्याचे तीन ते चार भाग पाडलेले असतात. त्या प्रत्येक भागास फड असे म्हणतात. त्यांना प्रत्येक गावी वेगवेगळी नावे असत. प्रत्येक फड सारख्या आकाराचा नसे. थळात तीन किंवा चार फड असत. एकात ऊस, दुसऱ्यात भात, तिसऱ्यात गहू अशी पिके घेतली जात. एकाच वेळी एका फडात एकच पीक घेत. या पद्धतीचे वैशिष्ट्य असे की, फडातील पिकांची पेरणी, कापणी एकाच वेळी करत. पाणीवाटपासाठी पाटकरी हा स्वतंत्र कर्मचारी असे. त्यामुळे शिस्तबद्ध व सामंजस्याने सर्व क्षेत्राला पाणी ठरल्याप्रमाणे दिले जाई.


पाटस्थळातील कर्मचारी ः 
पाटकरी-प्रत्येक फडास पाण्याचे वाटप, पाटचारीवर लक्ष देणे ही कामे त्याची होती.  बारेकरी-फडामागे दोन बारेकरी असत. रोज प्रत्येक फडाच्या तुकड्यास पाणी भरणे तसेच पिकाचे रक्षण करणे हे काम तो करी.  हवालदार-नदीवरील बंधाऱ्यांपासून पाणीवाटप चाऱ्यांपर्यंत तो पाणी योग्य रीतीने जाते की नाही ते पाहत असे. प्रत्येक तुकड्यास पाणी मिळते की नाही ते पाहणे, संपूर्ण फड भरल्याची खात्री करणे इ. पंच व अन्य  कर्मचाऱ्यांतील  दुवा म्हणूनही कामे हवालदारास  करावी  लागत.  


या कामाच्या मोबदल्यात वरील कर्मचाऱ्यांना धान्याचा भारा किंवा पैसे  मिळत असत.  या सर्व पाण्याचे नियोजन करण्यासाठी गावातील पंचमंडळ असे. या पंचमंडळातील प्रमुख व त्याचे सहकारी पाण्याचे योग्य पद्धतीने आयोजन, नियोजन होते की नाही ते पाहत. कोणत्या फडात कोणते पीक घ्यावे हे ते गावसभेत ठरवत असत. पंचमंडळ हे गाव निवडत असे.   


फड पद्धतीचे फायदे ः  
पाण्याची गरज लक्षात घेऊन पाणीवाटप, सर्व जमिनीस सारखे पाणी मिळे. त्यामुळे पाणी वाया जात नसे,  पिकांच्या क्रम पद्धतीने जमिनीस विश्रांती मिळे. ही पद्धत शेकडो वर्षांपासून चालू असूनही येथील जमीन कधीही खराब किंवा क्षारयुक्त झाली नाही. सर्व शेतकऱ्यांचे हितसंबंध एकच असत. त्यामुळे पाण्याचा अवास्तव व अनधिकृत वापर होत नसे. सर्वांना समान पाणीवाटप केले जाई. फळ पद्धतीमुळे गावात एकोपा व सहकार्य वाढीस लागे.  नदीतील वाहते पाणी सहकारी तत्त्वावर वाटण्याची ही आदर्श पद्धत होती. थळकरी कुटुंबाच्या स्वावलंबनाच्या दृष्टीने ती महत्त्वपूर्ण होती.  यात पाणीवाटप, पीक राखणे हे फड कर्मचारी करत. त्यामुळे वृद्ध, विधवा, नोकरी करणाऱ्यांना उत्पन्नाची निश्चिती होती.  पाटचारीत व बांधाच्या बाजूस सतत पाणी असल्याने गवत उगवत असे. त्या गावातील मोलमजुरी करणारे पंधरा-वीस जण गवत कापून ते विकत व आपला चरितार्थ चालवत. जनावरांना रोज हिरवा  चारा मिळाल्याने त्या-त्या खेड्यात मोठ्या प्रमाणात जनावरांना (शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी) यांना हिरवा चारा मिळे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुधाच्या उत्पन्नात वाढ झाली.   


धुळ्यात वास्तव्यास असलेल्या (सन १८८४) भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांची नेमणूक प्रथम धुळे जिल्ह्यात झाली. त्या वेळी त्यांना या अभिनव जलसिंचन पद्धतीतील योग्य व सुसूत्र पाणीवाटप पद्धतीने मोहून टाकले. पुढे ते म्हैसूरचे दिवाण झाल्यानंतर त्यांनी या फड पद्धतीचा आदर्श समोर ठेवून म्हैसूर संस्थानात ३६ हजार बंधारे बांधलेत. हे या फड पद्धतीच्या नियोजनाचे मोठे यशच म्हटले पाहिजे.  आपल्या पूर्वजांनी शोधलेली, आपसात सहकार्य वृद्धिंगत करणारी, पाण्याचे योग्य व न्याय्य वाटप करणारी ही आदर्शवत फड पद्धत पुनरुज्जीवित करून ती टिकवण्यासाठी अर्थात आपले राष्ट्रहित जोपासण्यासाठी तन, मन, धनाने प्रयत्न करण्याची नितांत आवश्यकता आहे.  


अशाच प्रकारच्या जलसंधारणाच्या पद्धतीला चीन व इराण या देशांनी जागतिक वारसा म्हणून मान्यता मिळवली. हा आदर्श आपण समोर ठेवून जगाला सिंचनाच्या नियोजनाचा आदर्श घालून देण्यासाठी प्रयत्न करावेत.


- प्राचार्य डॉ. सर्जेराव भामरे, मुख्य सचिव
राजवाडे इतिहास संशोधन मंडळ, धुळे

बातम्या आणखी आहेत...