आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचा मेळावा ‘महा’ झाला तरीही..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपचा ३८ वा पक्षस्थापना मेळावा ६ एप्रिलला मुंबईत पार पडल्यानंतर त्याविषयी उलटसुलट चर्चा झाली. ३८ वर्षांपूर्वी मुंबईत भाजपची स्थापना झाली त्यानिमित्ताने महाराष्ट्र भाजपने शक्तिप्रदर्शन केलं. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या मेळाव्यातली भाषणं वादग्रस्त ठरली.


सत्ताधारी पक्षानं खूप जबाबदारीनं वागलं पाहिजे. या जबाबदारीचा अभाव या मेळाव्यात दिसला, असं निरीक्षण माध्यमांनी आणि विरोधी पक्षांनी नोंदवलं आहे. या मेळाव्यात अमित शहा, देवेंद्र फडणवीस खूप आक्रमकपणे बोलले. एवढा आक्रमकपणा जनतेची कामं करण्यासाठी का वापरला जात नाही, असाही प्रश्न विचारला गेला. अलीकडच्या काळात मुंबईत आदिवासी शेतकऱ्यांचा मोर्चा आला होता. वनजमिनी व शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी तो होता. नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च कम्युनिस्ट पक्षाने काढला. सहा दिवस पायी चालत मोर्चेकरी मुंबईत धडकले. या मोर्चात शिस्त होती. रस्त्याने मोर्चेकऱ्यांनी कुणालाही त्रास होणार नाही, याची काळजी घेतली. वाहतुकीला अडथळा होणार नाही असं पाहिलं. त्यामुळे या मोर्चाविषयी शहरातल्या लोकांमध्ये सहानुभूती तयार झाली. मोर्चा मुंबईत आला तेव्हा दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू होत्या. परीक्षा देणाऱ्या मुलांना त्रास होऊ नये म्हणून मोर्चेकरी रात्रीचा प्रवास करून, झोप न घेता आझाद मैदानात दाखल झाले. मोर्चेकऱ्यांचं त्यामुळे शहरवासीयांनी खूप कौतुक केलं. लोकसंघटनांनी स्वखुशीनं मोर्चेकऱ्यांना पाणी, चहा, बिस्किटं, जेवण दिलं. शिवाय त्यांच्या प्रश्नांना पाठिंबा दिला. त्याचं माध्यमांनी वार्तांकन केलं. परिणामी मोर्चाचा सत्ताधाऱ्यांवर दबाव आला आणि मुख्यमंत्र्यांना मोर्चेकऱ्यांशी सकारात्मक चर्चा करावी लागली.

 

भाजपचा ६ एप्रिलचा महामेळावा आणि आदिवासी शेतकऱ्यांचा लाँग मार्च याची तुलना मुंबईकरांच्या मनात येणं स्वाभाविक होतं. लाँग मार्चला शहरवासीय मुंबईकर, ठाणेकर मदत करत होते, तर उलट महामेळाव्याला आलेल्या कार्यकर्त्यांविषयी मुंबईकर तक्रार करत होते. मुंबई लोकलमध्ये महामेळाव्यासाठी आलेल्या भाजप कार्यकर्त्यांवर प्रवासी उखडले. ट्रेनच्या डब्यातून भाजप कार्यकर्त्यांना प्रवाशांनी उतरवून दिलं. काही बेशिस्त भाजप कार्यकर्ते लोकांना त्रास होईल असं वागल्यामुळे हे घडलं. वांद्र्यात तर कामाला जाणाऱ्या मुंबईकरांना बेस्ट बस मिळेनात. दोन तास बसथांब्यावर थांबलेले चाकरमाने कामकरी मुंबईकर चिडले. त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधी, कॅमेऱ्यांसमोर भाजप कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे, वाहतुकीत अडथळा आल्याने आम्हाला त्रास होतोय, अशा तक्रारी केल्या.


खरं तर कामाच्या दिवशी एवढी गर्दी मुंबईत जमा करण्याची काही गरज नव्हती, असा सूर सगळीकडे उमटला. पण भाजप नेते-कार्यकर्ते याविषयी बेफिकीर दिसले. कार्यकर्त्यांच्या बसेस, खासगी कार यांनी वाहतुकीत अडथळा आणला की, ६ एप्रिलला सकाळी मुंबईत ट्रेन, बसेसचा बोजवारा उडाला. त्यातून सर्वसामान्य मुंबईकर, ठाणेकरांना मनस्ताप झाला. शाळा-कॉलेजांच्या परीक्षेच्या दिवसांत हे घडलं. त्यामुळे विद्यार्थी-शिक्षक-पालकही हैराण झाले, नाराजी पसरली.  
लाँग मार्चनंतर मुंबईत प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली दलित-बहुजन कार्यकर्त्यांचा एल्गार मोर्चा निघाला होता. हे कार्यकर्ते शिस्तीने आझाद मैदानात जमले होते. या मोर्चात कार्यकर्त्यांची संख्या पन्नासेक हजारांच्या आसपास होती. पण कार्यकर्त्यांनी शिस्त पाळल्याने कुणाला त्रास झाला नाही. हे मोर्चे शिस्तीने पार पडले. तर मग भाजप मेळाव्याला आलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी शिस्त पाळायला काय हरकत होती, असा प्रश्न विचारला गेला.  

 

भाजप मेळावा त्या पक्षानं नियोजन केल्याप्रमाणे ‘महा’ झाला. शक्तिप्रदर्शन झालं. पण या मेळाव्यानं नेमकं काय साधलं? या मेळाव्यातून कोणता विचार नेत्यांनी दिला? पक्षानं कार्यकर्त्यांना काय कार्यक्रम दिला? शिवसेनेची या मेळाव्यावरची प्रतिक्रिया बोलकी आहे. शिवसेनेनं म्हटलं की, हा मेळावा ‘महा’ झाला, पण ‘महा’ विचार काही मेळाव्यात दिसला नाही. काँग्रेसनं म्हटलं की, विरोधक संघटित होत असल्यानं भाजपाई घाबरलेत. त्यामुळे ते निराशेतून आक्रमक झालेत. त्यामुळे नेत्यांच्या भाषणाची पातळी घसरली.  


या मेळाव्यातलं अमित शहा यांचं भाषण शिवसेनेसह सर्व विरोधी पक्षांना खटकलं. शहा यांनी विरोधकांना साप, मुंगूस, कोल्हे, लांडगे, कुत्रे अशा प्राण्यांची उपमा दिली. विरोधकांचे आरोप सभ्य भाषेत खोडता येतात. सभ्य भाषेत त्यांना उत्तरं देता येतात, हे वाजपेयी यांच्याकडून अमित शहा शिकले नसावेत. शहा यांनी वाजपेयींचं स्मरण या मेळाव्यात केलं. वाजपेयींनी ३८ वर्षांपूर्वी मुंबईत भाजप स्थापना मेळाव्यात म्हटलं होतं, ‘अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा.’ ही घोषणा भाजप कार्यकर्त्यांत तेव्हापासून आजपर्यंत गाजते आहे. तिचा उल्लेख अमित शहा यांनी केला. पण वाजपेयी पक्षाध्यक्ष होते किंवा पक्षाचे नेते होते तेव्हा विरोधकांना कसे सुसंस्कृत भाषेत उत्तरं देत, कार्यकर्त्यांना कसं पुढे जायचं याची दिशा ज्या शालीनतेनं सांगत, गळी उतरवत ते अमित शहा विसरले. शहांचं या मेळाव्यातलं भाषण विरोधकांना प्राण्यांच्या उपमा देणारं, त्यांना कस्पटासमान लेखणारं होतं. देशातले सर्व विरोधी पक्ष एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या सर्वांनी ‘मोदी हटाव’ची घोषणा दिलेली आहे, हे शहांच्या जिव्हारी लागलेलं दिसलं. त्या वेदनेतून त्यांचं भाषण विखारी झालं. तो विखार त्यांच्या बोलण्यात वाक्यावाक्यात दिसत होता.  

 

अमित शहा हे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जगातल्या सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांचा पक्ष केंद्रात आणि देशातल्या वीस राज्यांत सत्तेवर आहे. एवढी प्रचंड सत्ता हातात असताना ते आतून एवढे घाबरलेत का? त्यांनी याप्रसंगी खरं तर पक्षानं गेल्या चार वर्षांत काय कामं केली ते सांगायला हवं होतं. पण त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि विरोधकांना लांडगे, कोल्हे, कुत्रे संबोधण्यात भाषण वाया का घालवलं? भाजपला श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी, रामभाऊ म्हाळगी अशा सुसंस्कृत नेत्यांची मोठी परंपरा आहे. त्यांची भाषणं विरोधकही सहानुभूतीनं ऐकत. या नेत्यांना जनमनात स्थान होतं. भाजपची जननी जनसंघ आहे. या जनसंघात नेत्यांकडे असलेला साधेपणा, प्रामाणिकपणा लोकांना भावत असे. आता भाजपने जनसंघाच्या संस्कृतीपासून घटस्फोट घेतलाय की काय, असा प्रश्न विचारला जातोय. दीनदयाळ उपाध्याय-वाजपेयी यांची राजकीय संस्कृती भाजप हरवून बसलाय की काय? हा प्रश्न या मेळाव्यानंतर पुढे येतोय. अमित शहा यांच्या भाषणानंतर तो अधिक टोकदार बनतोय.  

 

हा मेळावा कार्यकर्त्यांना समर्पित आहे, असं भाजप नेते सांगत होते. पण कार्यकर्त्यांना मेळाव्यातून काय विचार मिळाला? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मेळाव्यातलं भाषण हे जरा जास्तच चिडचिड व्यक्त करणारं ठरलं. एक तर ते कारण नसताना चढ्या आवाजात बोलले. त्यामुळे त्यांचा घामाघूम होऊन दम निघाला. भाषणात फडणवीस विरोधकांवर टीका करताना त्यांना ‘नालायकांनो’ असं म्हणाले. हा शब्द राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या तोंडी शोभतो का, असाही प्रश्न विरोधक विचारत आहेत. फडणवीसांचा हा अतिआक्रमकपणा आतून घाबरल्यामुळे आला की काय? चहा घोटाळा, उंदीर घोटाळ्यामुळे झालेले आरोप फडणवीसांना जिव्हारी लागलेले असावेत. कदाचित म्हणूनच असे आरोप करणारे विरोधक ‘नालायक’ आहेत, असं म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली असावी. फडणवीसांना या मेळाव्यात मुख्यमंत्री म्हणून साडेतीन वर्षांत केलेल्या कामांवर सुसंस्कृत भाषेत बोलता आलं असतं. कार्यकर्त्यांशी संवाद साधता आला असता, पण विरोधकांना दूषणं देण्यात त्यांनी ही संधी दवडली की काय?  

 

भाजपच्या स्थापनादिनी कार्यकर्त्यांना भावी काळासाठी अजेंडा देता आला असता. पण अधिक सत्ता मिळवायची याचा पाढा वाचण्यापलीकडे या मेळाव्यात नवा विचार नेत्यांनी दिला नाही, असं दिसलं. कार्यकर्त्यांविषयीच्या तक्रारीमुळे सामान्य लोक भाजपवर नाराज झाले आणि नेत्यांच्या भाषणांनी निराशा केली. या पलीकडे या मेळाव्याचं वेगळं फलित दिसलं नाही, हे खेदानं म्हणावं लागतं.

 

rajak2008@gmail.com

 

बातम्या आणखी आहेत...