आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक: चुटपूट लावणारी निवृत्ती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

३४ वर्षाचे वय हे क्रिकेटमधून निवृत्त होण्याचे नव्हे, फलंदाजाच्या बाबतीत तर नाहीच. त्यातही तो ए बी डिव्हिलीयर्स इतका यशस्वी असेल तर अजिबातच नाही. ‘एबीडी’ या नावाने लोकप्रिय डिव्हिलीयर्स गेली १४ वर्षे दक्षिण अाफ्रिकेसाठी खेळला. भारतातल्या आयपीएलमध्ये तो ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू’चा अविभाज्य घटक होता. गेल्याच आठवड्यात   ‘एबीडी’ने आयपीएल सामन्यात अशक्यप्राय वाटणारा सीमारेषेवरचा झेल इतक्या सहजतेने टिपला, की चाहत्यांनी त्याला ‘स्पायडरमॅन’ म्हणायला सुरुवात केली.

 

याच आयपीएलमध्ये सर्वात लांब अंतरावरचा षटकारही त्यानेच ठोकला. एबीडीपेक्षा निम्म्या वयाच्या खेळाडूंनाही अशी कामगिरी जमत नाही. एबीडी समोर गोलंदाज टप्पा आणि दिशा विसरुन जात असल्याचे गेल्या आठवड्यापर्यंत दिसले. पुढच्या वर्षीची इंग्लंडमधली एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धा होईपर्यंत तरी एबीडीच्या निवृत्तीचा विचार कोणीच केला नसता. स्वतः एबीडी मात्र थेट निवृत्ती जाहीर करुन मोकळाही झाला. शिखरावर असताना स्वतःहून बाजूला होण्याचा हा निर्लेपपणा अजिबात सोपा नाही.

 

‘इतक्यात का?’ अशी चुटपूट लावणारी ‘एक्झीट’ घेण्यासाठी फार मोठा प्रामाणिकपणा आणि धाडस लागते. १९७५ ते १९८१ या सहा वर्षात सलग पाचवेळा ‘विम्बल्डन’ आणि सहावेळा ‘फ्रेंच ओपन’ जिंकणाऱ्या बियॉं बोर्गनेही अवघ्या २६ व्या वर्षी टेनिसमधून निवृत्ती पत्करली होती. तेव्हाच्या टेनिस विश्वातून जशी हळहळ व्यक्त झाली तशीच हळहळ आताच्या क्रिकेट विश्वातून व्यक्त होत आहे. भारतीय मनाला हे समजून घेणे थोडे अवघड आहे. नको इतक्या भावनिकतेतून व्यक्तीपुजा आणि व्यक्तीस्तोम वाढवण्याची भारतीयांची वृत्ती आहे. त्यामुळेच कपिल देव, सचिन तेंडूलकर हे दिग्गज ‘रेकॉर्डस्’च्या मोहापायी विझत आलेली त्यांची कारकिर्द अट्टाहासाने लांबवत असल्याचे कोणाला गैर वाटले नाही.

 

फार कशाला आशिष नेहरासारख्या सामान्य गोलंदाजाचीही ‘फेअरवेल’ची हौस भारतीय क्रिकेट मंडळाने भागवली होती. पूर्ण भरात असताना स्वतःहून मैदान सोडणारे सुनील गावस्करसारखे सन्माननीय अपवाद भारतासाठी दुर्मिळ असतात. कर्म, मोक्ष, निर्मोह वगैरे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या भारतात क्षेत्र कोणतेही असो, पैसा, प्रसिद्धी, सत्तेचा मोह सुटत नाही. या पार्श्वभूमीवर कामगिरी आणि शारीरिक क्षमता जराही उणावली नसतानाही एबीडीने पॅड कायमचे उतरवावे ही भारतीयांसाठी आश्चर्याचीच बाब.

 

वनडे आणि टी-ट्वेन्टीच्या वेगवान जगात एबीडीने फार उच्च दर्जाचा धुमाकूळ घातला. रिकी पॉंटींग, विरेंद्र सेहवाग, ख्रिस गेल, डेव्हीड वॉर्नर, विराट कोहली, रोहीत शर्मा अशा गोलंदाजांची कत्तल करणाऱ्या फलंदाजांच्या दर्जेदार युगात एबीडीने स्वतंत्र स्थान निर्माण केले. वनडेतले सर्वात वेगवान अर्धशतक, शतक आणि दीडशतक हे विक्रम एबीडीच्या नावावर आहेत. कोणत्याही शैलीच्या गोलंदाजाला, मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात, कितीही लांबवर भिरकावण्याची एबीडीसारखी क्षमता कोणाकडे नव्हती.

 

चेंडूला मन मानेल तिकडे टोलवण्याच्या अचाट कौशल्यामुळेच एबीडीला ‘मि. ३६०’ म्हणू लागले. एबीडी क्रीसवर असेपर्यंत कोणत्याच धावसंख्येचे लक्ष्य अशक्य नसायचे. पण एबीडीचे वैशिष्ट्य एवढेच नव्हे. विक्रम मोडले जातात. क्रिकेटविश्वावर एबीडीने उमटवलेली मोहोर मात्र अमीट असेल. एबीडीच्या फटक्यांचे अनुकरण पुढच्या कैक पिढ्या करतील ही त्याची थोरवी आहे. अंगावर येणाऱ्या चेंडूला एबीडी कस्पटासमान वागवायचा पण चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजाबद्दल आदर बाळगायचा. या खिलाडू वृत्तीने आणि हसतमुख स्वभावाने देशोदेशीच्या चाहत्यांची मने त्याने जिंकली. आक्रमक हावभाव किंवा स्लेजिंगच्या उथळपणाची गरज त्याला कधी वाटली नाही. प्रतिस्पर्ध्याला लोळवायचे ते फक्त बॅटनेच यावर एबीडीचा पूर्ण विश्वास होता.

 

एबीडीने मनात आणले असते तर हॉकी, रग्बी, फुटबॉल अशा कोणत्याही खेळात आंतरराष्ट्रीय कारकिर्द घडवली असती. या खेळांच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याची क्षमता त्याने शालेय जीवनात सिद्ध केली. तरी त्याने क्रिकेट निवडले हे क्रिकेटचे भाग्य. आफ्रिकी जंगलातल्या उमद्या चित्त्याप्रमाणे अंगात जन्मजात लय, वेग, चापल्य आणि कलात्मकता असणारे एबीडीच्या जातकुळीतले खेळाडू फार दुर्मिळ असतात. सावजावरची (गोलंदाज) पकड आणि दहशत मजबूत असतानाच त्याला सोडून देणाऱ्या एबीडीची क्रिकेटमधली छाप दीर्घकाळ पुसली जाणार नाही.

 

सुकृत करंदीकर

 

बातम्या आणखी आहेत...