आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुंज प्रकाशाचा संशोधक : जॉर्ज सुदर्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात ई. सी. जी. सुदर्शन यांच्यासारखे अतिशय गाढे अभ्यासक, सैद्धांतिक, वैज्ञानिक जन्माला येतात; पण त्यांची आणि त्यांच्या वैज्ञानिक कार्याची प्रेरक माहिती सर्वांपर्यंत पोहोचत नाही. आपले कर्तृत्व दाखवायला अशा थोर व्यक्तींना भारताबाहेर जावे लागते. विज्ञान म्हणजे काही तरी वस्तूचे मॉडेल करून दाखवणे अशी धारणा शालेय जीवनापासून मांडली जाते. त्या मर्यादेत आपल्याकडे केवळ कारागीर बनतील. खरे तर आहे त्या विज्ञानापलीकडच्या शोधांची प्रेरणा मिळाली तर आपण विज्ञानात प्रगती करू शकू.

 

पुंज प्रकाश वैज्ञानिक ई. सी. जी. सुदर्शन यांचे सोमवारी १४ मे २०१८ला अमेरिकेत टेक्सास येथे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. त्यांचे एकूण नऊ वेळा नोबेल पारितोषिकासाठी नामांकन झाले होते. सुदर्शन आणि ग्लोबर या दोघांनी मिळून पुंज प्रकाशविज्ञानात मोठे सैद्धांतिक कार्य केले. सुसंगत प्रकाशाचे पुंजकीय प्रतिनिधित्व मांडण्यात त्यांना यश आले. २००५ मध्ये ग्लौबर यांना नोबेल पारितोषिक मिळाले, मात्र ई. सी. जी. सुदर्शन यांना डावलले गेले. प्रकाशाच्या सुसंगततेप्रमाणेच टॅकिऑन्स, पुंजकीय झेनो परिणाम, मुक्त पुंजकीय रचना, परिवलनाचा सांख्यिकी सिद्धांत, निश्चरता नसणारे गट, घनता सारिण्यांचे धनात्मक नकाशे, पुंजकीय संगणन अशा अनेक विषयांमध्ये सुदर्शन यांनी कार्य केले होते. 


सुदर्शन यांचे पूर्ण नाव - एनक्कल चांडी जॉर्ज सुदर्शन. केरळातील पालम येथे १६ सप्टेंबर १९३१ रोजी ई. आय. चांडी व अचाम्मा यांच्या पोटी सुदर्शन यांचा जन्म झाला. त्यांचे कुटुंब सिरियन ख्रिस्ती होते. त्रावणकोर संस्थानातील कोट्टायम येथील इंग्लंड चर्च मिशन सोसायटीच्या मद्रास ख्रिश्चन महाविद्यालयातून १९५१ मध्ये त्यांनी पदवी प्राप्त केली आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी ते मद्रास विद्यापीठात गेले. तेथे ललता या विद्यार्थिनीशी १९५४ मध्ये जॉर्ज सुदर्शन यांचा विवाह झाला. सुदर्शन दांपत्याला तीन मुलगे झाले. अलेक्झांडर, अरविंद आणि अशोक. अरविंद आता हयात नाही. जॉर्ज सुदर्शन स्वत:ला वेदांती म्हणून घेत. चर्चच्या देव आणि जग यांच्या संकल्पनांबद्दल ते शंका घेत असत. त्यामुळे त्यांचे आणि चर्च संचालकांचे खटकेही उडत असत. ख्रिस्ती धर्मात आत्मानुभवाला स्थान नाही, या कारणांनी त्यांनी ख्रिस्ती धर्म पाळणे सोडून दिले. 


१९५२ व नंतर काही काळ मुंबईत टाटा मूलभूत संशोधन संस्थेत जॉर्ज सुदर्शन यांनी भारतीय अणुऊर्जेचे जनक होमी भाभा यांच्याबरोबर संशोधन केले. त्यानंतर १९५८ मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क स्थित रोचेस्टर विद्यापीठात प्रसिद्ध अमेरिकी भौतिक शास्त्रज्ञ रॉबर्ट मार्शंक यांच्यासोबत संशोधन केले. सुदर्शन यांचा सर्वात महत्त्वाचा सिद्धांत म्हणजे डावऱ्या(लेफ्ट पार्टीकल्स)कणांचा सदिश अक्षीय सिद्धांत (व्ही. ए. थेअरी) त्यातून सौम्य बलाच्या सिद्धांताचे स्पष्टीकरण करण्याची वाट प्रशस्त झाली. 


१९५८ मध्ये त्यांनी आपले संशोधन पूर्ण करून पीएच. डी. मिळवली आणि पुढील संशोधनासाठी ज्युलियन सेमॉर श्विंगर या नोबेल पारितोषिकप्राप्त वैज्ञानिकाकडे आपले संशोधन सुरू केले. पुढील दशकात त्यांनी अतिशय मूलभूत असे सैद्धांतिक शोध लावले. मेरी क्युरी यांनी रेडियमचा शोध लावला आणि अणूपेक्षाही छोट्या कणांचे एक नवे दालन जगाला उघडे झाले. अणूपेक्षा लहान, हलक्या आणि जराशा ऊर्जेने कुठल्या कुठे फेकल्या जाणाऱ्या कणांना नेहमीचे भौतिक विज्ञानाचे नियम लागू करता येत नव्हते. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन याही पलीकडे असणाऱ्या सूक्ष्म कणांचे अस्तित्व स्पष्ट करण्यासाठी एका नव्या मांडणीची गरज होती. पुंज सिद्धांत समोर आला. रूढ विज्ञानानुसार ऊर्जा एकसलग वाहते, अशी समजूत होती; पण पुंजकीय सिद्धांतानुसार ऊर्जा सलग नव्हे, तर पुंजक्यापुंजक्याने वाहते. प्रकाश तरंगरूपातही असतो आणि कणरूपातही असतो, अशी वेगळी मांडणी होऊ लागली.

 

किरणोत्साराचेही सिद्धांत मांडले जाऊ लागले. किरणोत्सार होताना सौम्य परस्परक्रिया होऊन त्यातून बीटा कण बाहेर येतात, असे २६ वर्षांच्या जॉर्ज सुदर्शन यांचे मत पडले. निष्णात सिद्धांतशास्त्री ‘पावली’ याने इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रिनो यांचा सहसंबंध सांगितला, तर ‘फर्मी’च्या मते न्यूट्रॉनच प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि प्रतिन्यूट्रॉन बनवतात. दरम्यान, शे श्युंग वू या चिनी तरुणीने उत्सर्जित कणांवर प्रयोग केले आणि त्या कणांच्या प्रक्रिया भौतिक नियमांना धरून होत नाहीत, त्यात प्रतिबिंबात्मक हालचाली न होता त्या सम्यकतेचा भंग करणाऱ्या होतात, असे दाखवले.

 

जॉर्ज सुदर्शन यांनी या हालचालींचे स्पष्टीकरण करणारा सदिश अक्षीय सिद्धांत (व्ही. ए. थेअरी) मांडला. या सिद्धांताचा वापर पुढे अनेक वैज्ञानिकांनी केला. त्यात स्टिफन हॉकिंग, रॉजर पेनरोज, पीटर हिग्ज, रिचर्ड फेनमन, मुरे गेलमन, स्टिव्हन वैनबर्ग, शेल्डन ग्लॅशे, अब्दुस सलाम अशा नोबेल सन्मानकऱ्यांचा समावेश आहे. मात्र, जॉर्ज सुदर्शन यांच्या मूळ सिद्धांतावर आधारित इमारत रचणाऱ्यांना नोबेल सन्मान मिळाला तसा पाया रचणाऱ्या जॉर्ज सुदर्शन यांनी मिळाला नाही. १९७९ ते २००५ या काळात त्यांना नोबेल पुरस्कारासाठी नऊ वेळा नामांकने मिळाली. एकदा तर जॉर्ज सुदर्शन यांच्याकडील माहितीचा वापर करून त्यात थोडासा बदल करून वेगळे समीकरण मांडणाऱ्या ग्लोबर यांना पुरस्कार मिळाला, पण जॉर्ज सुदर्शन यांना नाही. 
जॉर्ज सुदर्शन यांना देश-विदेशातून इतर अनेक पुरस्कार मिळाले. पद्मविभूषण, पद्मभूषण, मजोरना, बोस अवॉर्ड, सी. व्ही. रमण अवॉर्ड अशी मोठी यादी आहे. 

 

जॉर्ज सुदर्शन यांना विज्ञानाबरोबरच योग, प्राणायाम, कर्नाटक संगीत, बागकाम यातही मोठी गती होती. पौर्वात्य आणि पाश्चात्त्य विज्ञान, तत्त्वज्ञान आणि धर्म यांचा सखोल अभ्यास त्यांनी केला होता.  सेंटर फॉर हाय एनर्जी फिजिक्स, सेंटर फॉर अॅटमॉस्फेरिक अँड ओशनिक सायन्स तसेच सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्स या संस्थांची वाढ झाली. १९६९ पासून ते ऑस्टिन अमेरिका येथे टेक्सास विद्यापीठाचे विभागप्रमुख होते. १९८० च्या दशकात चेन्नई येथील इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्स येथे पाच वर्षे संचालक होते. त्या काळात त्यांच्या विषयात तर अनेक विद्यार्थी चमकलेच, पण पूर्ण संस्थेचाच लौकिक दुणावत गेला. 


भारतात आल्यावर थोर तत्त्वज्ञ जे. कृष्णमूर्ती आणि जॉर्ज सुदर्शन यांच्यातला संवाद ऐकणे ही मोठी बौद्धिक मेजवानी असे. त्यांची विद्यापीठातील आणि सामान्य लोकांसाठी असणारी भाषणे अतिशय सुगम भाषेत असायची. असे म्हणतात की, ज्यांना खरे ज्ञान झाले आहे त्यांना ते सर्वांना समजेल अशा शब्दांत मांडता येते. 


त्यांनी मूळ कणांचे भौतिक विज्ञान, रूढ प्रकाशकी आणि पुंज प्रकाशकी, कणांचे प्रतिरूपण, गतिकीय मानचित्रे, आकारवाद, मुक्त पुंज प्रणाली, पुंज झेन परिणाम, पुंज माहिती, पुंज संज्ञान सिद्धांत, सुसंगत अवस्था अशा अनेक विषयांमध्ये आपले योगदान दिले आहे. टॅकिऑन नावाचे कण असतात आणि ते प्रकाशाच्या वेगापेक्षाही अधिक वेगाने जातात हा त्यांचा सिद्धांत मोठ्या चर्चेचा भाग झाला. तो सिद्ध करता आला तर आइन्स्टाइनच्या – प्रकाशाच्या वेगापेक्षा अधिक वेगाने काही जाऊ शकत नाही या मूळ धारणेलाच आव्हान मिळेल. टॅकिऑनच्या अस्तित्वावर आधारून अनेक विज्ञान कथा प्रस्तुत झाल्या आहेत. गमतीने असेही म्हणता येईल की, जॉर्ज सुदर्शन यांनी टॅकिऑन या आपल्या कल्पनेचे पेटंट घेतले असते तर ते आतापर्यंत कोट्यधीश झाले असते. 


भारतात ई. सी. जी. सुदर्शन यांच्यासारखे अतिशय गाढे अभ्यासक, सैद्धांतिक, वैज्ञानिक जन्माला येतात; पण त्यांची आणि त्यांच्या वैज्ञानिक कार्याची प्रेरक माहिती सर्वांपर्यंत पोहोचत नाही. आपले कर्तृत्व दाखवायला अशा थोर व्यक्तींना भारताबाहेर जावे लागते. विज्ञान म्हणजे काही तरी वस्तूचे मॉडेल करून दाखवणे अशी धारणा शालेय जीवनापासून मांडली जाते. त्या मर्यादेत आपल्याकडे केवळ कारागीर बनतील. खरे तर आहे त्या विज्ञानापलीकडच्या शोधांची प्रेरणा मिळाली तर आपण विज्ञानात प्रगती करू शकू. ई. सी. जॉर्ज सुदर्शन यांची आणि त्यांच्यासारख्या अनेकांच्या कार्याची प्रेरक आठवण आपण जागी ठेवायला हवी.

 

- विनय र. र.
कार्याध्यक्ष, मराठी विज्ञान परिषद, पुणे.
Vinay.ramaraghunath@gmail.com

बातम्या आणखी आहेत...