आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युद्धाचाही कंटाळा आला तर...?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याचा दूरगामी परिणाम काय होईल? एक म्हणजे कदाचित दोन्ही देशांमध्ये युद्ध होऊ शकेल जे अधिकृतरीत्या तिसरे युद्ध मानायला हवे. अर्थात, हे युद्ध मोठे असेल तर तिसरे आणि लहान असेल तर पाचवे. १९४७-४८ मध्ये मोहंमद अली जिना यांनी पठाणांची ट्रायबल आर्मी काश्मीर जिंकण्यासाठी पाठवली, ते झाले पहिले युद्ध. ज्याला पाकव्याप्त काश्मीर म्हटले जाते आणि पाकिस्तान ज्याला आझाद काश्मीर म्हणतो तो भाग पाकिस्तानने घेतला. त्यानंतर १९६५ मध्ये पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल अय्युब खान यांना त्यांचे परराष्ट्रमंत्री भुत्तो यांनी उचकवले आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानने हल्ला केला.

या हल्ल्याला भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी आंतरराष्ट्रीय सीमेवर लाहोरच्या दिशेने रणगाडे पाठवून उत्तर दिले. या युद्धाचा शेवट शांतपणे झाला. सोव्हिएत युनियनने तेव्हा मध्यस्थी केली त्यातून ताश्कंद करार झाला. (आज ताश्कंद उझबेकिस्तानमध्ये आहे) १९६५ चे युद्ध संपण्याचे एक कारण म्हणजे दोन्ही देशांची फौजेची राखीव कुमक उरलीच नव्हती. लढाऊ विमान वापरणे हे प्रचंड खर्चिक पण अपरिहार्य असते. त्यामुळेच गरीब राष्ट्रांना दहा दिवसांच्या वर युद्ध परवडू शकत नाही. आजचा भारत हा पाकिस्तानपेक्षा कितीतरी ताकदवान आणि श्रीमंत आहे. त्यामुळे ही परिस्थिती बदलली आहे पण दोघांकडेही अशी महासंहारक शस्त्रे आहेत, जी शास्त्रीजींच्या काळात नव्हती. ताश्कंद करारानंतर सहा वर्षांनी १९७१ मध्ये आपण पाकिस्तानची फाळणी करून बांगलादेश निर्माण केला. १९९९ मध्ये पाकिस्तानच्या नॉर्दर्न लाइट इन्फ्रंटी जवानांनी कारगिलवर हल्ला केला. त्यात लढाईत दोन्ही बाजूंचे मिळून हजार सैनिक मरण पावले, पण तरीही कारगिलच्या लढ्याला युद्ध म्हणता येत नाही, कारण दोन्हींपैकी एकाही देशाने हे युद्ध आहे अशी अधिकृतपणे घोषणा केली नव्हती.
पण उरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिहल्ल्याचा दिलेला इशारा पाहता तो हल्ला सीमित होता असे दिसतेय.

भारताने सर्जिकल स्ट्राइकची घोषणा करताना अत्यंत सावधगिरीची भाषा वापरली आहे. आपण पाकिस्तानला आणि जगाला असेही सांगितले की यापुढे आपण कृती करणार नाही. तरीही दोन्ही देशांनी अनेक वेळा एकमेकांवर हल्ले-प्रतिहल्ले केल्यामुळे युद्ध भडकण्याची शक्यता राहते. युद्धाबाबत सर्वात मोठी अडचण अशी की, लोक या घटनांना कंटाळतात. युद्धभूमीवर धारातीर्थी पडणारे जवान अन् अर्थव्यवस्थेवरील प्रचंड ताण हे तेच ते विषय त्यांना कंटाळवाणे होतात. पहिले महायुद्ध हे खंदकात लढले गेले. बेल्जियमच्या भूमीतून लांबलचक खंदक खणण्यास सुरुवात झाली. (या देशाचे दुर्दैव असे की, त्याला या युद्धामध्ये कोणताही रस नव्हता, परंतु दोन्ही बाजूंच्या सैन्यामध्ये हा देश अडकला व त्याला युद्धभूमीचे स्वरूप आले) या युद्धाचा शेवट स्वित्झर्लंडमध्ये झाला. हे खणलेले खंदक कित्येक वर्षे तिथेच राहिले. १९१४ ते १९१८ या काळात जर्मन सैन्य फ्रेंच आणि ब्रिटिशांच्या विरोधात या खंदकातून लढत होते. पण या खंदकांपलीकडे काय घडत होते? काहीच नाही. लोक शांतपणे रेस्टॉरंटमध्ये पबमध्ये जात होते. कामावर जात होते, फॅक्टरीत जात होते, शेती करत होते. मुले शाळेत जात होती. कौटुंबिक सहली होत होत्या. चार वर्षांत सारे काही घडत होते. फ्रान्स आणि बेल्जियमच्या शहरांपासून दूर हजारो मैलावर हे घडत होते. त्याच वेळी लाखो माणसे गोळ्या आणि बॉम्बवर्षावांनी परस्परांवर हल्ले करत होते.

या युद्धात किती माणसे मरण पावली? जवळपास दीड कोटीच्या वर. या युद्धाचा निकाल काय? तर तो सांगणे कठीण आहे. अनेक देशांच्या सीमा बहुतकरून तशाच राहिल्या. सर्व देशांच्या अर्थव्यवस्थेची वाट लागली. काहींचे शासनकर्ते बदलले. रशियन राजसत्ता कोलमडली. कम्युनिस्ट सत्तेवर आले. अॅस्ट्रो-हंगेरियन राज्यसत्तादेखील संपली. जर्मन राजसत्ताही लयास गेली; पण हे सारे बदल आतून घडून आले. इतकी माणसे मारून कोणाचाच फायदा झाला नाही.

आपला पाकविरुद्धचा संघर्षही तसाच असेल का? सर्जिकल स्ट्राइकने दहशतवाद संपेल का? जर तो संपणार नसेल तर पुढच्या हल्ल्याच्या वेळी आपण काय करणार? अजून एक सर्जिकल हल्ला चढवणार का? की पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद थांबण्यासाठी मोठा हल्ला करावा लागेल? आपण पाकिस्तानचे पूर्वीच दोन तुकडे केले, पण अजूनही त्याने त्यातून धडा घेतलेला नाही. मग आणखी दोन तुकडे केले तरी फरक पडेल का? पण त्यामुळे पुन्हा मृत्यूचे थैमान माजेल. नंतर अशा घटनांचाही कंटाळा येईल. त्याच त्या मृत्यूच्या बातम्यांध्ये नावीन्य उरणार नाही. काही दिवसांनी आपले आयुष्य पूर्वपदावर येईल. आपण पुन्हा इंद्राणीसारख्या चविष्ट बातम्यांकडे वळू. कारण तो मानवी स्वभाव आहे. युद्धाचा त्यावर फार प्रभाव पडणार नाही. अनुवाद - शशिकांत सावंत
आकार पटेल,
राजकीय विश्लेषक
बातम्या आणखी आहेत...