आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टिपू सुलतानचे ‘खरे\' रूप!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक्स-रे - मुस्लिम समाजाकडे कायमच संशयाने बघितले जाते.
टिपू सुलतानच्या युद्धकौशल्यामुळे त्याला मिळालेल्या क्षेत्रीय किंवा राष्ट्रीय यशाकडे लोक डोळेझाक करतात याचे मला वाईट वाटते. त्याने किती हिंदू लोकांना मारले किंवा धर्मांतर केले याचीच माहिती लोकांकडे आहे. त्यावर हे लोक खूप चर्चा करीत असतात.

पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बशीर हे काही आठवड्यांपूर्वी एका कार्यक्रमासाठी बंगळुरू येथे आले होते. मीही त्याच कार्यक्रमाला गेलो होतो. मी त्यांना यापूर्वीदेखील भेटलो होतो. त्यांना विचारले होते, दक्षिण भारतात त्यांचा काय बेत आहे? माझ्या माहितीप्रमाणे बंगळुरूला भेट देण्याची परवानगी मिळालेले पाकिस्तानचे ते एकमेव किंवा दुसरे उच्चायुक्त असावेत. ते म्हणाले, ‘मी शहरात काही टेक्नो पार्क पाहणार आहे. शिवाय मला म्हैसूरलादेखील जायला आवडेल.’ तिथून ते २ तासांवर आहे. म्हैसूरला जाऊन त्यांना श्रीरंगपट्टणम इथला टिपू सुलतानाचा राजवाडा पाहायचा होता. म्हैसूरच्या बाहेर असलेला. बशीर यांना वाटत होते की सर्वच भारतीयांना टिपू सुलतानबद्दल अभिमान असणार. पण अर्थातच अलीकडच्या घटना पाहता लक्षात येते की त्यांचा हा समज खोटा होता.

कर्नाटकमध्ये टिपू सुलतानचा वाढदिवस साजरा करण्यास काही संघटनांनी जोरदार विरोध केला होता. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना बळाचा वापर करून पांगवले. पोलिसांनी गोळीबारही केला. त्याचे पर्यवसान दोन माणसांचा मृत्यू ओढवण्यात झाले. अलीकडे भारतात अनेक गोष्टी अकारण हिंदू-मुस्लिम वादाचे रूप घेतात. भारतामध्ये राजेरजवाड्यांना चांगले आणि वाईट अशा दोनच वर्गीकरणांत विभागले जाते. म्हणजे अशोक, अकबर हे चांगले आणि औरंगजेब, टिपू सुलतान हे वाईट. समाजाने तयार केलेला हा एक मापदंड आहे. त्यावरून लक्षात येते की आपला देश हा इतिहासाकडे तथ्यांनुसार किंवा तर्काने पाहत नाही, तर भावनेने पाहत असतो. असा विचार करणाऱ्या नागरिकांपैकी अनेक जण अशिक्षित आहेत किंवा थोडेफार शिकलेले आहेत हेही सत्य त्यातून ठाशीवपणे समोर येते. टिपू सुलतान आणि त्याच्या सेनापतीविषयी असे काही बोलण्यात येते की, जणू काही त्यांनी हिंदूंच्या विरोधात जिहादच अारंभला होता. मुळात अशा प्रकारच्या माहितीत व त्याआधारे होणाऱ्या वक्तव्यात काहीच तथ्य नाही. खरे सत्य काय याचे विवेचन करणे स्थळाअभावी इथे शक्य नाही. मात्र, टिपू सुलतानबद्दल नुसतीच चर्चा करत राहण्यापेक्षा इतिहासाची पुस्तके वाचून कोणाही व्यक्तीने अंतिम निष्कर्ष काढला पाहिजे. मुख्य प्रश्न हा आहे, भारतामध्ये यासंदर्भात फार कमी पुस्तके लिहिली गेली आहेत. जगातील इतर सुसंस्कृत भागात अशी परिस्थिती नाही. आपल्याकडे चरित्र लिहिण्याची किंवा डायरी ठेवण्याची परंपरा नाही. भूतकाळाबद्दल नवनवे संशोधन करून नवीन पुस्तके लिहावीत असे प्रयत्न आपल्याकडे फार होताना दिसत नाहीत. त्यामुळे टिपू सुलतानवर भारतीयांनी लिहिलेली पुस्तके फारशी नाहीत. प्रत्येकाला १९ व्या शतकात हैदर अलीसारख्यांनी लिहिलेली टिपू सुलतान व मुस्लिम साम्राज्याचा दक्षिणेकडचा संघर्ष (Tipu Sultan and the struggle of the Mussulman powers of the south', by Lewis Bowring) यांसारख्या पुस्तकांवर भर द्यावा लागतो. बोरिंगचे नाव बंगळुरूमधील सेंट मार्क रोडवरील बोरिंगमुळे अनेकांना माहीत आहे. आपल्या देशातील सुजाण लोकांनी अशी पुस्तके मिळवून ती आवर्जून वाचली पाहिजेत. मला टिपूबद्दल दोन-तीन गोष्टी महत्त्वाच्या वाटतात. पहिली गोष्ट म्हणजे इंग्रजांना त्याचा पराभव करणे फार जड गेले. जेव्हा आपण त्या काळाबाबत इतिहासकाराचे लेखन वाचतो (उदा. जदुनाथ सरकार) तेव्हा लक्षात येते की मराठ्यांप्रमाणे टिपू सुलतान हा योद्धा होता. मात्र, तो काही बाबतीत मराठ्यांसारखा नव्हता. मराठ्यांचे सैन्य पानिपत युद्धात पराभूत झाले व नंतर मराठेशाही कोसळली. ते सारे पाहता टिपू सुलतानाने दिलेला लढा हा तुलनेने अधिकच मोठा वाटतो. या साऱ्या गोष्टी ४० वर्षांच्या आत घडल्या. म्हणजे १७६१ मध्ये जेव्हा मोहंमद अब्दालीने पानिपत जिंकले तेथपासून १७९९ मध्ये टिपूचा मृत्यू होईपर्यंतच्या घटनांचा विचार इथे अपेक्षित आहे. या मोजक्या वर्षांत इंग्रजांनी आपल्या शत्रूंना संपवले, पण टिपू आणि पंजाब यांना ते पराभूत करू शकले नाहीत. पंजाब मात्र रणजितसिंगच्या मृत्यूनंतर काही दशकांत आपोआप शरण गेला. टिपूनेच काय तो त्यांच्याशी प्रबळ लढा दिला. त्याला भूगोल, इतिहासाची उत्तम जाण होती. त्याआधारे राजकारणात टाकले जाणारे डावपेच त्याला अचूक माहिती असत. याला जिओपॉलिटिक्स म्हणतात. फ्रेंचांना तो ब्रिटिशांविरुद्ध खेळवू शकायचा. त्याचा लढाईबद्दलचा दृष्टिकोन आधुनिक होता.

टिपूच्या युद्धकौशल्यामुळे त्याला मिळालेल्या क्षेत्रीय किंवा राष्ट्रीय यशाकडे लोक डोळेझाक करतात याचे मला वाईट वाटते. त्याने किती हिंदू लोकांना मारले किंवा धर्मांतर केले याचीच माहिती लोकांकडे आहे. मग ती माहिती खरी असो वा खोटी. अशोकासारख्या राजाने काही विदेशी नागरिक किंवा मुस्लिमांना ठार मारले नाही तर त्याने आपलेच लोक ठार मारले. ओरिया भाषा बोलणाऱ्या हिंदूंनाच लाखोंच्या संख्येने त्याने ठार केले. म्हणजेच आपला इतिहास कथांच्या साहाय्याने जाणून घेतला तर हे समजेल. तरीही आपण अशोकाला ‘सर्वश्रेष्ठ’ मानतो. त्याचे सिंहस्तंभाचे प्रतीक हे भारताचे अधिकृत चिन्ह आहे. भारतीय झेंड्यातील गोल चक्राला आपण अशोकचक्र मानतो. मग प्रश्न असा येतो, अशोकाला एवढा मान देतो तर टिपूला का देत नाही? या दोघांनीही एकाच तऱ्हेचा गुन्हा केलेला असला तरीही. याचे उत्तर सोपे आहे. हिंदू राजाने जे केले तेच मुस्लिम राजाने केलेले चालत नाही. महाराजा अलासिंगने पतियाळात मोठा राजवाडा बांधला. त्याने आयुष्यात युद्धात कधीच मोठा विजय मिळवला नाही तरीही तो प्रसिद्ध झाला. कारण त्याने मराठ्यांना पराभूत करायला अब्दालीला मदत केली. आता अलासिंगला किंवा त्यांच्या वंशजांना कुणी घरभेदे म्हणते का? पतियाळाच्या या राजाने महाराजा रणजितसिंगला सतत विरोध केला. पण कुणीही त्यांना देशद्रोही मानत नाही. मुस्लिम राजाने मात्र हे केले की त्याच्याबद्दल वाईट बोलणे सुरू होते. आपल्याकडच्या या मुस्लिम मंडळींबद्दल काही आपल्याला वाचायला नको किंवा लिहायला नको असते. तरीही दोष द्यायची वेळ आलीच की पहिल्याप्रथम मुस्लिम समाजाकडे संशयाने बघितले जाते.ज्यांना अशा गोष्टींबाबत थोडीशीच माहिती असते. त्याबाबत ते लगेच निषेधाचा सूर काढतात. यातूनच देशात असहिष्णुता वाढते आहे.