आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोरक्षकांना मोदी सरकार रोखेल का?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोदी आणि भाजप गोरक्षेचे समर्थन करत आहेत. त्याचा उदो उदो करताहेत. जोपर्यंत हे सरकार गोमांसाचा मुद्दा रेटत राहील तोपर्यंत भारतात गोरक्षक तयार होत राहतील. दुसरा प्रश्न हा आहे की, मोदी आणि भाजपवाले हे स्वीकारतच नाहीत की, या साऱ्या घटनांमागे धर्मांधतेचा पाया आहे. 
 
 
गोरक्षकांचा हिंसाचार म्हणजेच गोमांस खाण्यावरून एखाद्याला ठार मारणे. हा प्रकार भारतात एक नव्याने समस्या म्हणून पुढे आला आहे. हा प्रकार संपुष्टात आणण्यासाठी काय करता येईल? विना नफा-तोटा तत्त्वावर चालणारी ‘इंडिया स्पेंड’ नावाची एक वेबसाइट आहे. या वेबसाइटचे म्हणणे आहे की, नरेंद्र मोदी यांचे सरकार २०१४मध्ये केंद्रात आल्यानंतर गोमांसावरून ९७ % हिंसाचार झालेले आहेत. जेव्हा हरियाणा व महाराष्ट्रात भाजपचे सरकार आले आणि त्यांनी गोमांसावर बंदी घातली, त्यानंतर गोमांस खाण्याच्या मुद्द्यावरून हत्येचे प्रकार वाढू लागले आहेत.  
 
गेल्या काही आठवड्यांतच हा हिंसाचार भारतभर कसा वाढतो आहे, याची काही उदाहरणे व बातम्या पाहूया.  
झारखंड राज्यातील रांचीजवळील रामबाग येथे २९ जून रोजी हैमुद्दीन हन्सारी या व्यापाऱ्याला ठेचून ठार मारण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोमांसावरून हिंसाचारावर विरोधपर भाषण केल्यानंतरच ही घटना घडली.  
त्या अगोदर झारखंडमध्येच २७ जूनला उस्मान अन्सारी या दुधाचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्याला शंभर जणांच्या जमावाने मिळून मारहाण केली. त्याच्या घराला या जमावाने आगही लावली. त्या आगीत अन्सारीच्या घराचा काही भाग भस्मसात झाला. अन्सारीवर हल्ला करण्यामागचे कारण असे की, त्याच्या घराजवळ मेलेली गाय सापडली. या घटनेबाबत पोलिसांनी पत्रकारांना सांगितले की, हल्लेखोरांनी पोलिसांवर दगडफेक केली, यात ५० पोलिस जखमी झाले.  
 
पश्चिम बंगालमध्ये २४ जून रोजी नसीरुद्दीन हक, मोहंमद समीरुद्दीन, मोहंमद नसीद या तीन बांधकाम मजुरांना मरेपर्यंत मारण्यात आले. त्यांच्यावर गाय चोरल्याचा आरोप होता. या घटनेनंतर पोलिसांनी तिघा जणांना अटक करून त्यांच्यावर खुनाचा आरोप ठेवला.  
२२ जूनला हरियाणामध्ये जुनैद खान या १५ वर्षांच्या मुलाला रेल्वे डब्यात एका टोळक्याने ठार मारले. या टोळक्याने जुनैद हा गोमांस खात असल्याचा कांगावा केला व त्याला भोसकले. नंतर त्याच्या कवटीचा भाग तोडण्यात आला. या मारामारीत जुनैदचा भाऊदेखील गंभीर जखमी झाला. ज्यांनी हे दृश्य पाहिले ते सांगतात की, सुमारे २० जणांचे टोळके जुनैदवर हल्ला करण्यासाठी सरसावले होते. या प्रकरणात हरियाणा पोलिसांनी केवळ एका जणाला अटक केली.  
त्या अगोदर २६ मे रोजी महाराष्ट्रात मालेगावमध्ये मटणाचा व्यवसाय करणाऱ्या दोघांना गोरक्षकांनी पकडले. या दोघांकडे गोमांस असल्याचा त्यांचा संशय होता. याची व्हिडिओ क्लिप नंतर सर्वत्र पसरवण्यात आली. तथाकथित गोरक्षकांनी एकाला शिवीगाळ केली व त्याला ‘जय श्रीराम’ म्हणायला सांगितले. या घटनेनंतर पोलिसांनी नऊ जणांना अटक केली, पण त्याचबरोबर या दोन मटणाच्या व्यापाऱ्यांवर धार्मिक भावना दुखावल्याबद्दल खटला दाखल करण्यात आला.  
 
३० एप्रिलला आसाममधील नागाव येथे जमावाने अबू अलिफा आणि रेमुद्दीन अली या दोन मुस्लिमांना ठेचून मारले. त्यांच्यावर तथाकथित गोरक्षकांचा गाय चोरल्याचा संशय होता. पोलिसांनी या गोरक्षकांवर खुनाचा आरोप दाखल केला आहे. पण कोणालाच अटक केलेली नाही.  
१ एप्रिलला राजस्थानमधील अलवार येथे ५५ वर्षांच्या पेहलू खान या दुधाचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्याला व इतर चार मुस्लिमांना हायवेजवळ एका जमावाने घेरले आणि मारले. दोन दिवसांनंतर पेहलू खान मरण पावला. जमावाने त्यांच्यावर गाय इकडून तिकडे नेल्याचा आरोप केला होता. राजस्थानच्या गृहमंत्र्यांनी या खुनाचा समर्थन करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, खान हा गाईचे स्मगलिंग करणाऱ्या कुटुंबाचा भाग होता. त्यानंतर तीन जणांना याबद्दल अटक करण्यात आली आहे.  
 
२७ जूनच्या झारखंडमधील घटनेनंतर अनेक नागरिकांनी देशभर या गोरक्षकांच्या केलेल्या हत्येच्या विरोधात सरकारविरुद्ध निदर्शने केली. आणि हे सारे थांबवायला पाहिजे असे सांगितले. काही दिवसांनी मोदी यांनी ट्विट केले की ‘हिंसाचाराला भारतात स्थान नाही. आपण असा भारत बनवूया ज्याचा गांधीजींना अभिमान वाटेल.’ या ट्विटला जोडून दोन मिनिटे आणि सोळा सेकंदांची भाषणाची फीत आहे. २९ रोजी गुजरातमध्ये दिलेले भाषण आहे. त्यात मोदी गाईंच्या हत्येबद्दल बोलत आहेत. एक मिनिट पंचेचाळीस सेकंद मोदी गाईच्या सुरक्षेबद्दल बोलत आहेत. शेवटच्या तीस सेकंदांत ते हिंसाचाराबद्दल बोलतात. पण पुढे म्हणतात की, खूनबाजी खपवून घेतली जाणार नाही. अर्थातच हे सांगण्यासाठी काही पंतप्रधानांची गरज नाही. त्यांनी आपल्याला हे सांगायला हवे की, हे खून कधी थांबतील आणि पंतप्रधान हे थांबवण्यासाठी काय करणार आहेत? नेमका प्रश्न काय आहे तो दोन मिनिटे सोळा सेकंदांची चित्रफित पाहिल्यानंतर कळतो. मोदी आणि भाजप गोरक्षेचे समर्थन करत आहेत. त्याचा उदो उदो करताहेत. जोपर्यंत हे सरकार गोमांसाचा मुद्दा रेटत राहील तोपर्यंत भारतात गोरक्षक तयार होत राहतील. दुसरा प्रश्न हा आहे की, मोदी आणि भाजपवाले हे स्वीकारतच नाहीत की, या साऱ्या घटनांमागे धर्मांधतेचा पाया आहे. गोमांस खाणे, गोमांस विक्री आणि कातडे कमावणे या गोष्टी मुस्लिम आणि दलितांच्या व्यवसायाचा भाग आहे. त्यात आता गोरक्षणामुळे हे दोन्ही समाज हिंसेचे बळी ठरतील, अशी परिस्थिती नाकारणे म्हणजेच दांभिकपणा होईल. देशात गोमांसावरून झालेल्या हत्येसंदर्भात केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू म्हणतात की, या हत्यांचा संबंध धर्माशी लावणे चुकीचे आहे. पण ‘इंडिया स्पेंड’ने पुरवलेली सर्व माहिती नायडू किती चुकीचे आहेत ते स्पष्ट करते. हा प्रश्न मुस्लिमांशी निगडित आहे, कारण हा समाजच गोरक्षकांच्या अत्याचाराला बळी पडताना दिसतो आहे.  
 
काँग्रेसला या प्रश्नावर कोणतीही बाजू नाही आणि गुजरातमध्ये तर त्यांनी गोरक्षकांच्या बाजूने विधाने केलेली आहेत. व्यक्तिगतरीत्या काँग्रेसमधील काही जण सरकारवर हल्ला चढवताना दिसतात. उदा : माजी केंद्रीय मंत्री चिदंबरम यांनी मोदींच्या भाषणानंतर असे मत व्यक्त केले की, ज्या दिवशी मोदींनी गोरक्षकांना इशारा दिला त्या दिवशी मोहंमद हैमुद्दीनला झारखंडमध्ये ठेचून मारण्यात आले. साहजिकच असे दिसते की, ठेचून मारणारा समूह पंतप्रधानांना इशाऱ्यांना घाबरत नाही. पुढे चिदंबरम म्हणतात की, ‘पंतप्रधानांनी गोरक्षकांना आणि ठेचणाऱ्या मंडळींना इशारा दिला ही चांगली बाब आहे, पण पंतप्रधान आपले शब्द कृतीत कसे आणणार? देश त्यांच्या कृतीची वाट पाहतो आहे.’  
 
‘इंडिया स्पेंड’ म्हणतो की, २०१६ मध्ये २५ हल्ले झाले, तर २०१७ मध्ये केवळ सहा महिन्यांत २१  हल्ले झाले आहेत. हा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चालला आहे आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी मोदी काय करून दाखवतात याकडे जगाचे लक्ष लागले आहे.  
 
(अनु. शशिकांत सावंत)
बातम्या आणखी आहेत...