आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aashay Gune Article About Social Media In Amrathi

बिल गेट्सची दुर्लक्षित भविष्यवाणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही वर्षांत देशात सोशल मीडियाचा उदय कमालीच्या तेजीने झाला आहे. देशातील जनतेने त्याचे मनापासून स्वागतदेखील केले आहे. अगदी चार-पाच वर्षांपूर्वी इंटरनेट म्हणजे ‘माहितीचा साठा’ अशीच ओळख होती. ती बदललेली नाही; परंतु आता हा प्रचंड साठा इतरांना सहभागी करून घेऊन पसरवता येतो. अर्थात ‘शेअर’ करून! ही इंटरनेटची एक मोठी झेप म्हणता येईल. कारण इतक्या कमी वेळात एवढ्या प्रचंड लोकसंख्येपर्यंत पोहोचणे याआधी तरी शक्य झाले नव्हते. त्यामुळे सोशल मीडिया वापरणार्‍या लोकांकडून किमान पातळीवरचे ज्ञान आणि साधारण आजूबाजूला सुरू असणार्‍या घडामोडी यांचे किमान भान असणे याची आपण अपेक्षा करायला काही हरकत नाही.

शिवाय सोशल मीडिया वापरणार्‍यांमध्ये तरुण पिढीचे प्रमाण बहुतांश आहे आणि हे तरुण शहरातील अधिक आहेत. वाढती शहरे आणि त्यामुळे तिथल्या तरुणांमध्ये सोशल मीडियाची व्याप्तीसुद्धा वाढत चाललेली आहे. त्यामुळे जगातील घडामोडी या सर्वांना निदान अपेक्षित पातळीवर माहिती असतील असा विचार आपण करू शकतो. तरीही एक महत्त्वाची बातमी मात्र या ‘नवनिर्मित लोकशाहीच्या स्तंभाकडून’ दुर्लक्षिली गेली. त्यावर साधकबाधक चर्चा झाली नाही.

गेल्या महिन्यात मायक्रोसॉफ्ट या जगप्रसिद्ध कंपनीचे संस्थापक आणि सामाजिक पातळीवर बरीच वर्षे काम करणार्‍या बिल गेट्स यांचे भारताच्या गरिबीसंदर्भातील भाष्य बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या वार्षिक अहवालात प्रसिद्ध झाले होते आणि हे भाष्य पुढे त्यांनी ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’साठी लिहिलेल्या लेखातही पुन्हा आवर्जून लिहिले. त्यांच्या मते, भारत देश हा गरिबीशी करीत असलेल्या संघर्षात हळूहळू विजयी होत असून त्याचे श्रेय आजपर्यंत देशात राबवलेल्या भारत सरकारच्या विविध गरिबी निर्मूलन योजनांना दिले पाहिजे. ते पुढे म्हणतात की, सरकारी पातळीवर गरिबांपर्यंत पोहोचण्याचे अनेक कार्यक्रम आखले गेले असल्याने या योजनांचे यश-अपयश आता दिसू लागले आहे. अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन, अन्न सुरक्षा योजना, शेतकर्‍यांना कर्जमाफी किंवा त्यांना विविध बँकांमार्फत केला जाणारा पतपुरवठा, कृषी तंत्रातील सुधारणा आणि शिक्षणाचा प्रसार यामुळे भारत अंतर्बाह्य बदलत चालला आहे. अशा योजनांमुळे कुपोषणात आणि दुष्काळाच्या परिस्थितीत लक्षणीय घट दिसू लागली आहे. त्यामुळे गरिबीचे प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे. ते म्हणतात की, सध्या तंत्रज्ञानाच्या विकासामुळे देशातील गरीब जनतेपर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे. आरोग्य क्षेत्रातील सुधारणांमुळे मुलांमधील ( पाच वर्षांच्या खालील) डायरिया आणि न्यूमोनिया या आजारांचे प्रमाण खूप कमी झाले आहे आणि आरोग्य क्षेत्रातील सुधारणांचे महत्त्व पटवून देत ते म्हणतात की, भारतात गेल्या दहा वर्षात एड्सच्या रुग्णांमध्ये तब्बल 56% घट झालेली आहे आणि गेल्या तीन वर्षात भारतात एकही पोलिओची केस उघडकीस आलेली नाही.

बिल गेट्स यांचे हे निरीक्षण राजकीय दृष्टिकोनातून नाही कारण ते कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाहीत. ते त्यांचे फाउंडेशन चालवतात आणि त्यामुळे जागतिक पातळीवर काम करतात. शिवाय त्यांनी हे मत फक्त भारताबद्दल नोंदवलेले नाही तर चीन आणि काही आफ्रिकन देशांबाबतही नोंदवले आहे. पुढे ते असेदेखील म्हणतात की, 2035 पर्यंत जगातील भीषण दारिद्र्य संपुष्टात येईल आणि सारे देश समृद्धीकडे वाटचाल सुरू करतील.

आपल्या देशातील मीडियाने बदलत्या भारताबद्दल मात्र उदासीनता पत्करलेली आहे असेच म्हणावे लागेल. कोणत्याही न्यूज चॅनलने भारतातील गरिबी गेल्या दहा वर्षांत खाली आली आहे याचे स्वागत केलेले नाही. वर्तमानपत्रांतूनही या विषयावर फारशी चर्चा झाली नाही. ही उदासीनता सोशल मीडियावरही दिसून आली. एरवी हा सोशल मीडिया सरकारवर टीका करण्यात अग्रेसर असतो. पण आपल्या आसपास काहीतरी सकारात्मक बदल होताना दिसतोय त्यावर हे व्यासपीठ एवढे शांत कसे?

या सोशल मीडियावर एरवी नजर टाकली तर बहुतांश लोक सरकारने काहीच काम केले नाही आणि ते भ्रष्टाचारात आकंठ बुडाले आहे असा त्यांचा सूर असतो. त्याचबरोबर गेल्या साठ वर्षात देशात काडीमात्र प्रगती झाली नाही हा पाढा जोडीने येतो. नेत्यांची टर उडवणे, त्यांच्या वाक्यांवर वारंवार विनोद करणे आणि याचा परमबिंदू म्हणजे त्या विनोदाचे रूपांतर अश्लील वाक्यांमध्ये होणे हे सारे नित्याचे होऊ लागले आहे. ही अस्वस्थता तपासणे हा जरी एक स्वतंत्र विषय असला तरीही अशा नकारार्थी वातावरणात अशी एखादी चांगली बातमी आली तर ती पचवणे आणि पसरवणे एवढे का जड जाते? शिवाय देशातील आरोग्य क्षेत्रात होणारे हे सकारात्मक बदल आणि गरिबी कमी करण्यासाठी उचलली गेलेली ही सकारात्मक पावले हे सरकारने केलेले काम नाही का? की सरकार म्हणजे काम न होणे हे समीकरण आता घर करू लागलेय?

त्यामुळे सुरुवातीला शहरातील मुलामुलींचा केलेला उल्लेख पुन्हा एकदा करावासा वाटतो. आधी सांगितल्याप्रमाणे सोशल मीडियावर या पिढीची पकड अधिक आहे; परंतु प्रगतीची स्वघोषित परिभाषा या पिढीच्या मनात आहे का? शहरातील हा तरुणवर्ग सुविधा मिळण्यात सतत अग्रेसर आहे. गेल्या आठ ते दहा वर्षात झपाट्याने बदललेली शहरे या गोष्टीला नक्कीच साक्ष आहेत. पण मग आपल्या घरातून दुसरीकडे जाण्यासाठी वापरला जाणारा रस्ता व्यवस्थित झाला किंवा शहरात एक मोठा पूल बांधला गेला म्हणजे आणि म्हणजेच प्रगती झाली असे या मुलांना वाटते का? तसे नसेल तर देशातील आपले इतर बांधव हळूहळू प्रगतीची वाट धरत आहेत या गोष्टीची आणि या सर्वसमावेशक प्रगतीची दखल या पिढीने घेतली असती! गेल्या साधारण दोन वर्षात सोशल मीडियावर नजर टाकली (आणि एकंदर मीडियावर ) तर हेच दिसून येते की, हा तरुणवर्ग दिवसेंदिवस स्वकेंद्रित होत चालला आहे. त्याला सतत व्यक्त व्हावेसे वाटते; परंतु तसे व्यक्त होताना केवळ नकारार्थी भावना समोर येते आणि या पार्श्वभूमीवर जर कुणी सरकारचे चांगले काम समोर आणले तर त्याला त्या पक्षाचा ‘चमचा’, ‘भाट’ म्हणून टर उडवली जाते. अमर्त्य सेन यांच्याबाबत असेच झाले होते; परंतु प्रगती म्हटली तर ती सर्वसमावेशक असते व बिल गेट्स निरीक्षण मांडत आहेत त्यानुसार आपण प्रगती करत आहोत यावर विश्वास ठेवायला हरकत नाही!