आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामीण अनुभवांची संजीवनी ( कलाम)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताच्या ग्रामीण जीवनाचे चित्रण अब्दुल कलाम यांच्याच शब्दांत

गेली सहा दशके कार्यरत असताना मी विविध संस्थांमध्ये वेगवेगळ्या पदांवर काम केले आणि भारतभर प्रवास करण्याची सुसंधी मला प्राप्त झाली. २००२ ते २००७ या काळात मी राष्ट्रपतिपद भूषवले तेव्हाही मी ग्रामीण भागांना वेळोवेळी भेटी देऊन तिथल्या लोकांशी संवाद साधत राहिलो. भारताचे हृदय ग्रामीण भागी स्थित आहे आणि जशी एखाद्या डॉक्टरच्या रुग्णचिकित्सेची सुरुवात हृदयाच्या ठोक्यांच्या तपासणीपासून सुरू होते, तसे एक अब्जाहून अधिक लोकसंख्येच्या या देशातील एखाद्या धोरणाचे नियोजन आणि प्रत्यक्ष कार्यवाहीची सुरुवात इथल्या सहा लक्ष खेड्यांमून जे ज्ञान आणि माहिती प्राप्त होईल, तिथूनच होऊ शकते.
ऑक्टोबर २००२ मधली नागालँडला दिलेली भेट मला आठवते. हा प्रदेश तसा आकाराने लहान असला तरी जैवविविधता आणि सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण आहे. सुमारे पंचवीस लक्ष लोकसंख्येपैकी बहुतांश आदिवासी असून त्यांच्या अनेक टोळ्या, जमाती आहेत. स्थानिक भाषांची आणि संस्कृतींची अनेक निरनिराळी रूपे असून तिथल्या प्रत्येक जमातीची वेगळी ओळख आहे. मी तिथे तुएनसँगला भेट दिली. हा भाग भारत आणि म्यानमारच्या सीमारेषेवर आहे. मी तिथे असताना जवळपासच्या जमातींच्या प्रतिनिधी मंडळाच्या सभेला उपस्थित राहिलो. नागालँडमधील जमातप्रमुख या खास व्यक्ती असतात. ते राजकीय प्रतिनिधी तर असतातच, शिवाय आपल्या खास संस्कृतींचे जतन करण्याची जबाबदारी पार पाडतात. सर्व जमातप्रमुख आपापल्या परंपरागत खास रंगीत, वैशिष्ट्यपूर्ण वेशभूषेत आले होते. प्रत्येकाने सभेसाठी नीट पूर्वतयारी करून हस्तलिखितांच्या स्वरूपात टिपणे आणली होती. मला सांगण्यात आले की, अशा सभा सामान्यत: एखाद्या मोठ्या झाडाच्या सावलीत घेणे त्यांना पसंत असते; पण केवळ माझ्यासाठी त्यांनी एका मोठ्या खोलीत आयोजन केले होते. त्यांनी प्रथम मला आणि नंतर एकमेकांना अभिवादन केले आणि ते आपापल्या ठरलेल्या जागी जाऊन वर्तुळाकार बसले. नंतर गांभीर्यपूर्ण वातावरणात चर्चेला सुरुवात झाली. चर्चेचा विषय होता-जमातींच्या प्रतिनिधी मंडळाने घेतलेल्या पुढाकाराने स्थानिक भाजीपाला, फळफळावळ यांत वृद्धी कशी आणि किती झाली? कुणी एकाने मुद्दा मांडला, "मला सांगायला आनंद होतो, की प्रथमच मागणी-पुरवठ्यापेक्षा उत्पादन खूप अधिक झाले आहे.' सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. तेव्हा एक तरुण जमातप्रमुख उठून उभा राहिला आणि म्हणाला, ‘मान्यवर सभासदहो! उत्पादन आणि दर्जा दोन्ही वर गेले असले तरी आता प्रश्न उपस्थित झाला आहे, की या निसर्गदत्त दौलतीचे धनसंपदेत कसे रूपांतर करायचे आणि आर्थिक संपन्नता कशी प्राप्त करायची?’ कोप-यातल्या कुणा एकीला काही विचार सुचला. ती म्हणाली, ‘इथला माल विकता येईल अशा बाजारपेठा शोधायला हव्यात. आजूबाजूच्या खेड्यांमधल्या आणि शहरांमधल्या लोकांच्या विशेष गरजांचा अभ्यास करण्यासाठी माझ्याकडे एक छोटा चमू आहे. आपण या पर्यायाचा विचार करायला हवा.’ प्रत्येक जण तिच्याशी संमत झाला. नंतर एका ज्येष्ठ नेत्याने बोलायला सुरुवात केली आणि सर्व जण त्याचे बोलणे लक्षपूर्वक आणि आदरपूर्वक ऐकू लागले. तो म्हणाला, ‘या कार्यात प्रमुख अडथळा आहे तो रस्त्यांचा, इथली खेडी आणि शहरे यांना जोडणारे रस्ते नाहीत. याव्यतिरिक्त आपल्याकडे मालवाहतुकीसाठी वाहने नाहीत.’ नंतर यावर तासभर चर्चा झाली. अनेक सूचना- उपसूचनांचे मंथन झाल्यावर असा निर्णय घेण्यात आला की सहकारी संस्था स्थापन करून या संस्थेवर भाजी, फळे यांच्या विक्रीची आणि वाहतुकीची जबाबदारी सोपवण्यात यावी. ही संस्था वेगवान ट्रक्स भाड्याने घेऊन इथल्या दुर्गम प्रदेशातून दूरवर मालवाहतूक करू शकेल. नंतर इथल्या पर्यटन उद्योगाचा विकास कसा करावा, या विषयावर चर्चा झाली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी एक निवेदन करण्यात आले. पर्यटकांचा नागालँडपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुकर होण्यासाठी हेलिपॅड्स बांधली जावीत, तसेच कृषी उत्पादनाच्या वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यात यावा.
मी आजवर अनेकदा निरीक्षण केले आहे की भारतातील दुर्गम आणि आदिवासींच्या प्रदेशांत दळणवळणाची सुविधा उपलब्ध नसल्याने आर्थिक विकास होऊ शकत नव्हता. जानेवारी २००५ मध्ये म्हणजे डिसेंबर २००४ च्या त्सुनामी प्रलयानंतर लगेच मी निकोबार बेटाला भेट दिली होती. तिथे मी स्थानिक जमातप्रमुखांना भेटलो. मी त्यांना विचारले की तिथे उपलब्ध असलेल्या सागरसंपत्तीचा ते लोक उपयोग का करून घेत नाहीत? मी म्हणालो, ‘इथे इतकी विलक्षण सागरसंपत्ती तुमच्यासाठी उपलब्ध आहे आणि शेजारच्या राष्ट्रांमधले लोक बेकायदेशीरपणे आपल्या सागरसंपत्तीचा मनमानी उपभोग घेत आहेत. या राष्ट्रीय संपत्तीचा लाभ तुम्ही का घेत नाही?’ जमातप्रमुखांनी विचारविनिमय करून मला उत्तर दिले. त्यात एकवाक्यता होती. त्यांच्या मते तिथल्या लोकांना मासेमारीबद्दल परंपरागत सखोल ज्ञान होते. परंतु समस्या अशी होती की खेड्याच्या गरजा पूर्ण झाल्यानंतर अतिरिक्त मत्स्योत्पादन खेड्याबाहेर कुठे विकायचे याबद्दल काहीच माहिती नव्हती. माशांवर अन्नप्रक्रिया करण्याच्या तंत्रज्ञाबद्दल शिकण्याची उत्सुकता होती. पण केवळ या बाबतीतील अज्ञानापायी त्यांची आर्थिक प्रगती होऊ शकली नव्हती.
निकोबार बेटावर सुनामीनंतर मदतकार्य चालू असताना अनाथ झालेल्या मुलांसाठी मला कुठेच अनाथाश्रम आढळला नाही. त्यावर तिथल्या जमातप्रमुखांकडून मिळालेली माहिती ऐकून मला आनंदही झाला आणि आश्चर्यही वाटले. मी जेव्हा नवी दिल्लीमध्ये होतो, तेव्हा मला समजले होते की सुनामीत पालक मृत्युमुखी पडल्यामुळे अनेक मुले पोरकी झाली आहेत. मी त्यांना विचारले, ‘मी अंदमानला भेट दिली तेव्हा सुनामीनंतर तीन अनाथाश्रम बांधले गेल्याचे पाहिले. निकोबारमध्ये काय परिस्थिती आहे?’ निकोबारच्या जमातप्रमुखांनी नवलपूर्ण माहिती दिली. सुनामीच्या प्रलयालाही एक चंदेरी सुंदर किनार होती ती म्हणजे, तिथे अनाथ मुलेच नव्हती. एक ज्येष्ठ पण उत्साही नेते विचारपूर्वक म्हणाले, ‘ज्या मुलांचे आई-वडील सुनामीत गेले ती मुले आमच्या प्रत्येक घराच्या कुटुंबाचा हिस्सा झाली आहेत. आम्हाला अनाथाश्रमाची गरजच नाही. आमच्या घरी या मुलांची देखभाल होत आहे. काही झाले तरी या छोट्या बेटावर आम्ही सर्व रहिवासी एका मोठ्या कुटुंबाप्रमाणे राहतो.’ प्रेम, ममत्व आणि आपुलकी जपणारी ही परंपरा खरोखरच आदर्श होती. या भावनेची जोपासना व्हायला हवीच आणि भारतात, जगभरात पोहोचायला हवी. विकासाचा विचार करताना हा पैलू ध्यानात ठेवायला हवा.
> मनोविकास प्रकाशनच्या 'उद्दिष्ट तीन अब्ज' या पुस्तकातून साभार