आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्करच्या स्वप्नभूमीत प्रेमाचे संगीतसूर?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फेब्रुवारी महिन्यात इकडे अमेरिकेत तीन जंगी सोहळे रंगतात. खेळांमधला एनएफएल सुपर-बाॅल, संगीतातला ग्रॅमी अवाॅर्डस आणि सिनेमातला अॅकॅडमी अवाॅर्डस ऊर्फ आॅस्कर!! या तीन सोहळ्यांमधलं माझं पूर्वीपासूनचं प्रेम म्हणजे आॅस्करच. अगदी शाळेत असताना मायकल डग्लस ‘वाॅल स्ट्रीट’साठी ऑस्कर जिंकला तेव्हापासूनचं. 
 
या वर्षीसुद्धा एकाहून एक सरस सिनेमे स्पर्धेत आहेत, पण प्रत्येक सिनेमाचा विषय वेगळा, त्या विषयाला दिलेली ट्रिटमेंट वेगळी. त्यामुळे त्यातनं एकच सिनेमा निवडायचा, म्हणजे महाकठीण काम! यातले विशेष उल्लेख करण्याजोगे सिनेमे अधोरेखित करायचे तर १९६० च्या अमेरिकेत वर्णद्वेष आणि पुरुषी अहंकारावर मात करून ‘नासा’मध्ये कर्तृत्व गाजवणाऱ्या तीन आफ्रिकन-अमेरिकन महिलांचा ‘हिडन फिगर्स’. 
 
मायामी शहरात वाढताना जन्माने कृष्णवर्णीय, त्यात समलिंगी असलेल्या व्यक्तीच्या संघर्षाचा ‘मूनलाइट’. जपान विरुद्ध लढताना अमेरिकेच्या एका डॉक्टरने बिनशस्त्राने गाजवलेल्या पराक्रमाचा मेल गिब्सनचा ‘हॅकसॉ रिज्ड’ सिनेमा. डेनिस विलेनव्हूचा परग्रहवासीयांवर आधारित पण विचार करायला लावणारा ‘अरायव्हल’. ऑस्ट्रेलियामध्ये दत्तक म्हणून वाढलेला, पण लहानपणीच्या आठवणींवरून भारतातले आपले घर शोधायला निघालेला ‘लायन’. टेक्सासमधल्या ज्या बँकेने घरावर जप्ती आणली, ती बँक लुटून त्याच बँकेत पैसे जमा करणाऱ्या अवलियांचा ‘हेल ऑर हाय वॉटर’ आणि डेनियन शाझेलाचा लाॅस एंजलिसमधल्या प्रेमकहाणीचा संगीतमय ‘ला ला लँड’!  
 
वर उल्लेखलेल्या यादीमध्ये काही दिग्दर्शकांची नावे आवर्जुन घेतली आहेत, कारण माझ्या मते, दिग्दर्शक हा सिनेमाचा कर्ताधर्ता आहे, जो एखाद्या चांगल्या कथानकाचे सोनं करू शकतो किंवा खोबरंसुद्धा! म्हणून तर पोलान्स्की, स्पिलबर्ग, कोएन ब्रदर्स, टॅरॅन्टिनो आदींचा एक ठसा असतो (चांगला/वाईट हे सब्जेक्टिव्ह), जो ‘छान’ आणि ‘अप्रतिम’मधलं अंतर आपल्या नकळत पार करतो. डेनियन शाझेल पण असाच एक अफाट प्रतिभा असलेला दिग्दर्शक आहे, ज्याने तरुण वयातच अलौकिक कल्पनाशक्तीने प्रेक्षकांना आश्चर्यचकित केलं आहे. मागच्या वर्षीच्या ‘व्हिप्लॅश’ या पहिल्याच सिनेमाने त्यांच्या दिग्दर्शकीय गुणांची झलक दाखवली होती. 
 
 
पण त्यानंतर त्याचा पुढचा सिनेमा ‘ला ला लँड’ हा संगीतपट आहे, हे ऐकल्यावर मात्र  मनात शंकेची पाल चुकचुकली, की बाबा रे, याचाही ‘राम गोपाल वर्मा की आग’ होणार की काय! अर्थात, ‘म्युझिकल’शी माझं कसलंही वाकडं नाही. किंबहुना, माझ्या लहानपणीच्या सुखद आठवणींमध्ये ‘साऊंड ऑफ म्युझिक’चा एक मोठा वाटा आहे, पण वर्तमानकाळातील म्युझिकल लव्हस्टोरीची कल्पना जरा पचनी पडायला अवघड होती.
 
 मात्र, सिनेमा सुरू  झाल्या झाल्या ‘एलए’च्या ट्रॅफिक जॅममधलं अतिशय सुंदररीत्या चित्रित झालेलं गाणं सुरू झाल्यावर ‘ये कुछ आैर ही बात है’ हे लक्षात आलं. जगण्यातलं जडत्व, रटाळपणा, गुंतागुंत यात अडकलेल्या प्रत्येकाला ताजंतवानं करण्याची विलक्षण क्षमता या गाण्यामध्ये आणि गाण्याच्या पडद्यावरच्या सादरीकरणात आहे. 

मुळात, ही गोष्ट आहे, एका जाझ प्रेमी स्ट्रगलर वादकाची (रायन गॉस्लिंग) आणि सतत ऑडिशन देत सिनेसृष्टीत प्रवेश मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या बरिस्टा (एमा स्टोन) यांच्या आगळ्यावेगळ्या प्रेमकहाणीची.
 
सिनेमा म्युझिकल आहे म्हणून उगीच ‘दिसला सीन, घाल गाणं’ असं कुठेही होत नाही, उलट तुमच्या नकळत ही गाणीच सिनेमाचा एक अविभाज्य भाग बनून जातात. स्वत: रायन गॉस्लिंग आणि एमा स्टोननी ही गाणी म्हटली आहेत. 
 
प्रेक्षकांची फसवणूक करण्यासाठी कसलेही क्लोज कट्स न वापरता गाणी चित्रित केल्यामुळे एक वास्तववादी वातावरण निर्माण झाले आहे. गॉस्लिंंगने नेहमीप्रमाणे समरस होणे आणि देखणे दिसणे, या दोन्ही भूमिका अचूक पार पाडल्या आहेत आणि ‘एमा स्टोन इज ए ट्रू रिवेलेशन!!’
 
आतापर्यंत तिने इझी ए, बर्डमॅन, झॉम्बिलँड इत्यादी सिनेमांमध्ये लक्षवेधी भूमिका साकारल्या होत्या, पण इथे करिअरची धडपड, वाट्याला येणारी निराशा आणि वैयक्तिक जीवनातले चढउतार, या सर्व गोष्टींशी झगडणाऱ्या ‘मिया’मध्ये तिने अक्षरश: जीव ओतला आहे.
 
 विशेषत: ऑडिशन्सच्या सीन्समध्ये इन-कॅरेक्टर आणि आऊट कॅरेक्टरमधल्या बदलाचा जो काही लाजवाब अभिनय केला आहे, त्याला तर तोड नाही! पण या सिनेमाचा खरा हीरो आहे, दिग्दर्शक डेनियल शाझेल आणि प्रेक्षकाला खिळवून ठेवणारी शेवटची २० मिनिटं! त्या शेवटच्या २० मिनिटांत लक्षात येते की, जसा एखादा जिनिअस चित्रकार कुंचल्याच्या फटकाऱ्यांनी अभिजात चित्र रंगवतो, तशाच प्रकारे शाझेलने आपल्या कलाकारांना घेऊन एक थोडी हळवी, थोडी विक्षिप्त, शेवटपर्यंत रमवणारी, पण जाता जाता अस्वस्थ करणारी... अशा वेगवेगळ्या धाग्यांनी गुंफलेली एक सुंदर कविता पडद्यावर साकारली आहे. 
 
ही कवितारूपी प्रेमकहाणी केवळ समजून घेण्याची नव्हे, तर शरीर-मनाने जगण्याची गोष्ट आहे. अर्थातच ‘ला ला लँड’ इतकाच प्रभाव देव पटेल अभिनित ‘लायन’ सिनेमाने ‘गोल्डन ग्लोब’, ‘बाफ्टा’ आदी प्रतिष्ठेच्या पुरस्कार सोहळ्यांत राखला आहे.
 
समाजभान जागवणाऱ्या ‘हिडन फिगर्स’ आणि ‘मूनलाइट’सारख्या दर्जेदार सिनेमांचंही ऑस्करला वावडे नाही. पण माझ्या जशा ‘ला ला लँड’बद्दलच्या भावना आणि विचार आहे, तसंच काहीसं ज्युरींचंही असेल, तर यंदाच्या ऑस्कर विजेत्यांमध्ये कोण छाप सोडणार हे उघड गुपित आहे. 
 
(लेखक अमेरिकास्थित आयटी तज्ज्ञ तसेच कला आस्वादक आहेत.)
बातम्या आणखी आहेत...