आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सत्य शोधणे आपल्या हाती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजकाल आपण माध्यमांवर एवढे अवलंबून राहायला लागलो की त्यांची तुलना न्यायालयाशीच करतो. काही जण तर मीडिया ट्रायल म्हणतात. पत्रकारितेचा दर्जा दिवसेंदिवस खालावत चालला आहे. यात प्रेक्षकांची भूमिकाही महत्त्वाची आहे. अनेक न्यूज चॅनल्स सनसनाटी बातम्या मिळवण्यात आणि टीआरपी खेचण्यात मग्न आहेत. एखाद्या मुद्द्यावरून सुरू झालेले चर्चेचे गुऱ्हाळ भलत्याच मुद्द्यावर संपते. दिल्लीत बसलेले एखाद्या पक्षाचे प्रवक्ते देशभरातील स्थितीवर बोलतात, हे पाहून आश्चर्य वाटते.
आता तर देशभक्तीची व्याख्या नव्याने लिहिली जात आहे. कोण देशभक्त आहे आणि कोण देशद्रोही हेदेखील सरकार आणि माध्यमेच ठरवत आहेत. काही न्यूज चॅनल्स तर सर्रास सरकारची तळी उचलत आहेत, हे पाहून डीडी न्यूजलाही लाज वाटेल. माध्यमांच्या या खेळात सोशल मीडियावरील अफवा आणि ढोलबडव्यांचीही कमी नाही. हे संदेश कुठून कुठे जातात, यावर काही अंकुशच नाही.
डॉ. आंबेडकरांच्या मते, माध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. माध्यमे हा लोकांचा आवाज असतो. हाच स्तंभ दुभंगला आहे म्हणजेच जनतेतही भेद आहेत. सगळीकडेच जातीयवाद, धर्मवाद, गोरक्षा, लव्ह जिहाद, गटागटांचे राजकारण दिसते. द्वेषाची भाषा आणि द्वेष करणेच आपल्याला आवडते. न्यूज चॅनल्सवरही तेच दाखवतात. आर्थिक धोरण, महागाई, बेरोजगारी, न्यायिक पुनर्रचना, गरिबी, प्रदूषण यावर फार चर्चाच होत नाही.
आता जबाबदारी आपली आहे. आपण कोणते वर्तमानपत्र वाचतो किंवा न्यूज चॅनल पाहतो, याबद्दल एकदा आत्मपरीक्षण करावे. कारण सत्य काय आहे हे ठरवणे सरकारचे किंवा माध्यमांचे काम नव्हे, तर सत्य शोधणे जनतेचा अधिकार आहे. केवळ एकच भूमिका घेणाऱ्या माध्यमांचा पाठलाग न करता वेगळ्या भूमिकांवरही विचार करावा.
बातम्या आणखी आहेत...