आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Abhilash Khandekar Article About Srinivasan, Divya Marathi

गेले एकदाचे श्रीनिवासन...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार व सचिन तेंडुलकरच्या आधी भारताला जागतिक क्रिकेटच्या नकाशावर महत्त्वपूर्ण जागा मिळवून देणारे सुनील गावसकर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष होणार, ही बातमी मराठी मनाला आनंदित करणारीच ठरावी. अर्थातच सुनील हा काही महाराष्ट्राचाच लाडका नाही, तर तो एक जागतिक दर्जाचा खेळाडू व क्रिकेट जाणकार आहे.

परंतु ज्या परिस्थितीत गावसकरला बोर्डाचे अध्यक्षपद स्वीकारावे लागत आहे, ती नक्कीच एक आदर्श वस्तुस्थिती नाही. मागील वर्षी आयपीएल मॅचमध्ये झालेला एकूणच कारभार व भ्रष्टाचार हा बोर्डाचे निगरगट्ट अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्यामुळेच झाला, हे आता मुद्गल समितीमुळे जगासमोर आले आहे. सिमेंट कंपनी चालवणारे श्रीनिवासन सिमेंटसारखेच क्रिकेटच्या खुर्चीला घट्ट चिकटून राहिले; परंतु या सिमेंट किंगला हे लक्षात आले नाही की, भूकंपासारख्या मोठ्या धक्क्याने सिमेंटच्या इमारतीही कोसळून पडतात.
सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी व शुक्रवारी सुनावलेल्या निर्णयामुळे क्रिकेटमधील घाण आता थोडी तरी कमी होईल व क्रिकेटमध्ये साफसफाई होण्यास सुरुवात होईल, अशी आशा करायला हरकत नाही.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ 1928 मध्ये अस्तित्वात आले. पहिले अध्यक्ष आर. ई. ग्रँट गोव्हन हे इंग्रजी गृहस्थ होते. त्यानंतर भोपाळ राज्याचे नवाब हमिदुल्ला खान, एथाली डिमेलो, विजयनगरमचे महाराज, बडोद्याचे फतेसिंहराव गायकवाड, शेषराव वानखेडे (त्यांनी पुढे मुंबईत मोठे स्टेडियम बनवून दिले), एनकेपी साळवे, ग्वाल्हेर संस्थानचे माधवराव शिंदे अशा अनेक दिग्गजांनी बोर्डाचे अध्यक्षपद भूषविले व क्रिकेटची चांगली परंपरा पुढे चालवत ठेवली.

क्रिकेट हा खेळ जसजसा लोकप्रिय होत गेला तसतशी बोर्डाकडे किंवा राज्यातील क्रिकेट संघटनांकडे विविध लोकांचा ओढा वाढत गेला. त्यात शरद पवार, लालू यादव, राजीव शुक्ला किंवा नरेंद्र मोदी यांच्यासारखी मंडळीही खेचली गेली. क्रिकेटशी या लोकांचा काय संबंध, हा प्रश्न कोणी कोणालाच कधी विचारला नाही.

सत्ता व पैसा यांच्या कधी न संपणार्‍या आकर्षणापोटी क्रिकेटला राजकारणी मंडळी व श्रीनिवासनसारखे उद्योगपती यांची कीड लागली. क्रिकेट कमी, परंतु पैसा व प्रसिद्धी सातत्याने पुरवणारी एक खाण, अशी मंडळाची ओळख झाली. प्रचंड हितसंबंध व त्यातून मॅच फिक्सिंगसारखी किळसणारी परंपरा हळूहळू क्रिकेटमध्ये रूढ होऊ लागली.

क्रिकेट नियामक मंडळ कोण व कसे चालवणार हे सांगणे खरे म्हणजे सर्वाेच्च न्यायालयाचें काम नाही; परंतु श्रीनिवासन यांची कंपनी व श्रीनिवासनचा कॅम्प यांनी बोर्डाला स्वत:ची खासगी कंपनी बनवण्यास कुठलीच कसर सोडली नव्हती. एक काळ असा होता की, क्रिकेट हा सभ्य लोकांचा खेळ होता, असे मानले जायचे; परंतु श्रीनिवासन यांनी राजकारणी लोकांच्याही अनेक पावले पुढे जात क्रिकेटमध्ये भ्रष्टाचार व बाकी अनेक अनैतिक प्रकार सुरू केले व चालवत ठेवले.

एकेकाळी भारतात कुठल्याच खेळात विशेष असा पैसा नव्हता. निखळ आनंदासाठी लोक विविध खेळ, मग तो हॉकी असो की बॅडमिंटन, खोखो - कबड्डी असो वा फुटबॉल-बास्केटबॉल असो, त्यांच्याकडे आकृष्ट व्हायचे व संघटना चालवायचे.

भारतीय अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण झाल्यावर सगळीकडे पैशाचे स्तोम वाढत गेले. यामुळे काही खेळांना निश्चितच सुदिन प्राप्त झाले व वेगवेगळ्या लीग (हॉकी प्रीमियर लीग, बॅडमिंटन लीग) वगैरे सुरू झाल्या व खेळाडूना थोडाफार पैसा मिळू लागला.
क्रिकेट नियामक मंडळ बाकी खेळांच्या तुलनेत थोडे श्रीमंत, सुखासीन होते; परंतु आयपीएल व अशा स्पर्धांमुळे त्याच्याकडे अमाप पैसा आला. पैशाबरोबर अनेक गैरव्यवहार व अनैतिकताही क्रिकेटमध्ये घर करू लागली.

गतवर्षी मेमध्ये जेव्हा आयपीएल मॅच फिक्सिंग प्रकरण पहिल्यांदा बाहेर आले, तेव्हा सचोटीसाठी ओळखले जाणारे मंडळाचे सचिव संजय जगदाळे (इंदूर) व खजिनदार अजय शिर्के (पुणे) यांनी लगेचच विरोधात आपले राजीनामे दिले व बोर्डाच्या गलिच्छ राजकारण व भ्रष्टाचारापासून स्वत:ला लांब ठेवले. परंतु श्रीनिवासन यांना कुठल्याही प्रकारची नैतिकतेची चाड नव्हती. ते एका अभद्र युतीचे म्होरके होते व बोर्डाला एका हुकूमशहासारखे चालवत राहिले ते सर्वोच्च न्यायालयाने कोरडे ओढेपर्यंत. श्रीनिवासन, सुरेश कलमाडी, किंगफिशर एअरलाइन्सचे विजय मल्ल्या व सहारा समूहाचे मॅनेजिंग वर्कर या सगळ्यांमध्ये एक साम्य बघायला मिळते. त्यांनी केलेल्या गुन्ह्यांचे प्रकार जरी थोडे वेगळे दिसत असतील तरी पद-प्रतिष्ठा-पैसा या तिन्ही गोष्टींसाठी जणू ते आपापले व्यवसाय करत होते, असे वाटते. नियमांची पायमल्ली करणे, पैशाने सरकारी यंत्रणेला विकत घेणे व अजून खूप-खूप पैसा, मिळेल त्या मार्गाने कमावणे हे या लोकांचे जणू एकमात्र लक्ष्य होते. परंतु क्रिकेट हा खेळ तरी यापासून वाचायला हवा होता. इंडिया सिमेंट्सचा उपाध्यक्ष म्हणून भारतीय क्रिकेटचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीही या सगळ्यात जाळ्यात अडकलेला दिसतोय, हे क्रिकेटचे दुर्दैवच म्हणावे लागेल.

अर्थात आता गावसकर किती दिवस अध्यक्ष राहू शकतील व ते मंडळात किती बदल करू शकतील हे बघावे लागेल. क्रिकेट बोर्डाचे तीस सदस्य असतात. त्यात राज्ये, तीन संस्था (भारतीय रेल्वे, भारतीय सैन्य व भारतीय विद्यापीठ) व दोन क्लब्ज- मुंबईचा सीसीआय व कोलकात्याचा नॅशनल क्रिकेट क्लब. बोर्डात बसणारे प्रतिनिधी या 30 संस्थांचे प्रतिनिधी असतात.

सुनील गावसकर यापैकी कुठल्याही संस्थेचे प्रतिनिधी सध्या तरी नाहीत. अनेक वर्षांपूर्वी मला त्यांनी स्वत: सांगितले होते की, देशातले क्रिकेट प्रशासक त्यांना मंडळात कधीच येऊ देणार नाहीत. तसेच झाले. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे शरद पवार व काँग्रेसच्या स्व. विलासराव देशमुखांनी एकत्र येऊन खेळाडू दिलीप वेंगसरकर यांना पराभूत केल्याची घटना काही खूप जुनी नाही, तर आता सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या मंडळाच्या अध्यक्षांना भारतीय क्रिकेटचा कचरा साफ करण्याच्या मोठ्या आव्हानाला सामोरे जायचे आहे. गावसकर कॉमेंट्री सोडून हे काम कसे करतील, याकडे आता देशाचे लक्ष लागून राहील.