आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासुनील गंगोपाध्याय यांचा जन्म सध्याच्या बांग्लादेशमधील फरिदपूरमध्ये 1934 मध्ये झाला. लहानपणापासूनच त्यांना साहित्याचे आकर्षण होते. अर्थात तत्कालीन बंगालवर टागोरांचा मोठा प्रभाव होता. छोट्या सुनीलने सुटीच्या काळात उनाडक्या करू नये म्हणून त्यांचे वडील त्यांना रोजच्या रोज टेनिसनच्या कविता अनुवादित करण्याचा गृहपाठ देत. गंगोपाध्याय यांना हे काम अतिशय क्लेशदायक वाटत होते, म्हणून त्यांनी त्यातून पळ काढण्याचा मार्ग शोधला. टेनिसनच्या कवितेचे शीर्षक घेऊन ते चक्क नवनव्या कविता लिहू लागले. स्वतंत्र काव्य लिहिणे त्यांना अनुवादाइतके अवघड जात नव्हते. इथेच गंगोपाध्याय यांचे कवितेशी नाते जोडले गेले. पुढे कधीतरी एका मित्राच्या बहिणीबद्दल निर्माण झालेल्या प्रेमभावना त्यांनी ‘एको चिट्टी’ या कवितेद्वारे शब्दबद्ध केल्या आणि लुईस एरॅगॉनसारख्या प्रतिभावंताच्या पावलावर पावले टाकण्याची तयारी सुरू केली.
पुढील एक-दोन दशकाच्या काळात पाब्लो नेरुदा त्यांच्या प्रेम-काव्याद्वारे विश्व साहित्यावर भुरळ पाडणार होते. अर्थात नेरुदा आणि गंगोपाध्याय या समकालीन कवींनी प्रेम या भावनेभोवती काव्य रचले, तरी त्यांच्या कवितांची तुलना होऊ शकत नाही, इतक्या त्या वेगळ्या आहेत. प्रेमकवितांना या दोघांनी अक्षरवाङ्मयात अव्वल व प्रतिष्ठेचे स्थान दिले आहे. गंगोपाध्याय यांनी ‘निरा’ या काल्पनिक पात्रासाठी लिहिलेल्या कविता बंगालमध्ये लोकप्रिय आहेत. त्यात करुणरस आहे, त्या भावनोत्कट आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांना कमालीची वाङ्मयीन उंची आहे.
1953 मध्ये सुनील गंगोपाध्याय यांनी आपल्या काही मित्रांसमवेत ‘प्रीतीबाश’ या केवळ कवितेला समर्पित असलेल्या नियतकालिकाचे प्रकाशन सुरू केले. या नियतकालिकातून केवळ नवोदित कवींच्याच कविता प्रसिद्ध करण्याचे त्यांनी ठरवले होते. या नियतकालिकामुळे बंगाली साहित्याला नवे कवी, नवी प्रतिभा, नवे प्रवाह, नवी शैली मिळाली. ‘प्रीतीबाश’ हे बंगाली साहित्यव्यवहारात मैलाचा दगड मानले जाते. या नियतकालिकाच्या एक वाचक स्वाती, या त्यांच्या इतक्या चाहत्या होत्या की पुढे त्यांचा प्रेमविवाह झाला. ‘प्रीतीबाश’ अद्यापही चालू आहे. गंगोपाध्याय यांच्यानंतर त्यांच्या पत्नी स्वाती गंगोपाध्याय हे नियतकालिक चालवत आहे.
गंगोपाध्याय यांचे गद्यलेखनही वैशिष्ट्यपूर्ण आहे. लहान वयातच आजूबाजूला घडलेल्या घटनांमुळे मनात निर्माण झालेले भावनांचे काहूर यातून दिसते. जोम पकडणारे स्वातंत्र्यसंग्राम, चाळीसच्या दशकात आलेल्या मानवी व नैसर्गिक आपत्ती, दुसरे महायुद्ध, बंगालची फाळणी यामुळे निर्माण झालेला क्षोभ, व्याकूळता, निराशा त्यांच्या कादंबरीतून दिसते.
‘आत्मप्रकाश’ या त्यांच्या पहिल्याच कादंबरीने त्यांनी वाचकांचे लक्ष वेधून घेतले. पूरब-पश्चिम, प्रथम अलो, सेई सोमोय (सेई समय या कादंबरीवरून दूरदर्शन मालिकाही निघाली होती.) या त्यांच्या काही महत्त्वाच्या कादंबर्या. सुनील गंगोपाध्याय यांनी नील लोहित, सनातन पाठक, नील उपाध्याय या टोपणनावाने बंगाली भाषेत बरेच लेखन केले. ‘प्रथम अलो’ ही साहित्यकृती तीन खंडांत असून त्यापैकी दोन खंड साहित्य अकादमीतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. त्रिपुराच्या कलाप्रेमी राजापासून टागोर युगापर्यंतचा प्रदीर्घ कालखंड त्यांनी घेतला असून त्यात बंगालचे सामाजिक व सांस्कृतिक जीवन रेखाटले आहे. बंगालमध्ये आपल्या दिवाळी अंकाप्रमाणे पूजा विशेषांक निघतात. नवरात्रात ‘देश’ नावाचा पूजा विशेषांक दरवर्षी प्रकाशित होत असतो. या पूजा विशेषांकाचे संपादन व त्यात गंगोपाध्याय यांनी सातत्याने लेखन केले. ‘देश’मधून प्रसिद्ध झालेली ‘राणू आणि भानु’ कादंबरी बंगाली साहित्य जगतात खूप गाजली. रवींद्रनाथांच्या जीवनातील काही प्रसंगांवर आधारित ही कादंबरी असल्याचा गौप्यस्फोट काहींनी केल्याने ‘राणू-भानु’ बहुचर्चित झाली. ‘राणू-भानु’ आता मराठीतही पद्मगंधा प्रकाशनतर्फे प्रसिद्ध होत आहे.
बंगाली कथा टागोर व त्या काळच्या इतर श्रेष्ठ समकालीन साहित्यिकांच्या प्रभावामुळे पूर्वीपासूनच समृद्ध होती; परंतु टागोरांच्या प्रभावाचा आदर करूनही त्या कक्षा व मर्यादा सांभाळत व वेळप्रसंगी त्या ओलांडत त्यांनी सर्जनशील कथालेखन केले आहे. लहान मुलांसाठी त्यांनी ‘काकाबाबू’ नावाचे एक काल्पनिक पात्र रचले, ते आज लहान मुलांमध्ये लोकप्रिय आहे.
गंगोपाध्याय यांच्या साहित्याने समाजातील विविध वयोगटातील साहित्यप्रेमींवर छाप पाडली. त्यांचे साहित्य अनेक भाषांमध्ये अनुवादित झाले व त्याला जगभर मोठी मान्यता मिळाली. विविध भाषांतील सिने-दिग्दर्शकांना ते खुणावत राहिले. सत्यजित रे, श्यामप्रसाद यांसारख्या जागतिक कीर्तीच्या दिग्दर्शकांनी त्यांच्या साहित्यकृतीवर सिनेमे बनविले. 23 ऑक्टोबर 2012 रोजी गंगोपाध्याय यांनी जगाचा निरोप घेतला.
गंगोपाध्याय यांची अखेरपर्यंत अशी भावना होती की, आजही साहित्य हे ‘इलिटिस्ट’ आहे - समाजातील फार छोट्या घटकापुरते मर्यादित आहे. ते सर्वसमावेशक करणे गरजेचे आहे व यासाठी केवळ ‘प्रिंट’ साहित्यावर अवलंबून राहता येणार नाही. गंगोपाध्याय यांना विविध मानसन्मान मिळाले. ते साहित्य अकादमीचे अध्यक्षही होते; परंतु वाचकांची त्यांना असलेली पसंत हाच त्यांचा मोठा सन्मान आहे. आपल्या आक्रमक शैलीमुळे प्रसिद्ध असलेले गंगोपाध्याय सतत प्रक्षुब्ध व सडेतोड लेखन करत आले, त्यामुळेच अँग्री मॅन ऑफ इंडियन लेटर्स म्हणून त्यांना ओळखले जाते.
(abhishek@padmagandha.com)
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.