आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Abhishek Jakhade Article Arthur Clark, Divya Marathi

वाङ्मयीन अवकाशपुरुष !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयझॅक आसिमोव्ह, रॉबर्ट हाइनलीम व आर्थर क्लार्क ‘साय-फाय’ किंवा सायन्स फिक्शन प्रकारातील सर्वोत्कृष्ट लेखक म्हणून जगप्रसिद्ध आहेत. ‘साय-फाय’मधील ‘बिग थ्री’ म्हणून त्यांना संबोधले जाते. एकाच विषयातील या तीन समकालीन लेखकांमध्ये कमालीची चढाओढ होतीच. आसिमोव्ह आणि क्लार्क यांमधील तर एक किस्सा मजेशीर आहे. दोघांतील सर्वोत्कृष्ट कोण? या जटिल प्रश्नाचे उत्तर ते असे देतात की, ‘क्लार्क हे सर्वोत्कृष्ट ‘साय-फाय’ लेखक, तर आसिमोव्ह हे सर्वोत्कृष्ट विज्ञान लेखक आहेत.’ त्यांनी चक्क तसा करारच आपसात स्वीकारला होता. ‘क्लार्क-आसिमोव्ह ट्रीटी’ नावाने हा ठराव प्रसिद्ध आहे.

साहित्य हे मानवी संशोधनांचे, अभिनव संकल्पनांचे, नवनिर्मितीचे भांडार आहे. कित्येक वेळा लेखकाच्या मनातील कल्पना किंवा स्वप्ने ही भविष्यकाळात शास्त्रज्ञांचे संशोधन व वास्तवातील सत्य झाल्याचे आपण पाहिले आहे. क्लार्क यांनी त्यांच्या साहित्यातून अशा अनेक कल्पना मांडल्या. त्यातील कितीतरी कल्पनांचे परावर्तन प्रत्यक्ष वस्तुस्थितीत झाले आहे. विज्ञानाबद्दल क्लार्क यांना लहानपणापासूनच आकर्षण होते. कितीतरी वेळ ते आकाश निरीक्षण करण्यात घालवत. महायुद्धातील घडामोडींचा त्यांना पुढील लेखनात बराच उपयोग झाला. काही दिवस त्यांनी ‘सायन्स अ‍ॅबस्टॅक्टस’ नावाच्या मासिकाचे संपादकपद भूषवले. आता विज्ञानातील विविध मूलतत्त्वे व संकल्पना यावर त्यांनी चांगलीच पकड मिळवली होती. बर्‍यापैकी लेखन प्रसिद्ध झाले होते व विज्ञान आणि वाङ्मय या दोन शाखांमधील जाणकारांचे लक्ष त्यांच्याकडे जाऊ लागले. ‘स्पेस एलिव्हेटर’ ही त्यांची एक अशीच अभिवन कल्पना! पृथ्वीवरून कोणत्याही ग्रहावर वा उपग्रहावर जाण्यासाठी त्यांच्या एका कथेमध्ये स्पेस एलिव्हेटर वापरली जाते. आपण रोजच्या रोज एका मजल्यावरून दुसर्‍या मजल्यावर जाताना लिफ्ट वापरतो, तसा हिचा वापर करून दुसर्‍याच कुठल्यातरी ग्रहावर किंवा उपग्रहावर जाता येईल.

1938 मध्ये त्यांनी लिहिलेल्या 'How we went to mars' या कथेमध्ये एका ब्रिटिश शास्त्रज्ञाने रॉकेटमधून मंगळावर केलेला प्रवास,
तेथील जीवन व या शास्त्रज्ञाला तेथे आलेले अनुभव यांचे मजेशीर वर्णन त्यांनी केले आहे. विशेष नोंद करण्याची गोष्ट अशी की ‘नासा’ची स्थापना 1958 मध्ये झाली, तर अवकाशामध्ये पहिले यान साधारण 60च्या दशकात यशस्वीपणे उड्डाण घेऊ शकले आणि नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पहिले पाऊल टाकले ते 1969 मध्ये ! म्हणजे अवकाश सहलीबद्दल काही ठोस पावले या जगाने घेतली. त्याच्या दोन दशके अगोदरच मंगळावर, जीव-जीवन असू शकण्याची शक्यता क्लार्क यांच्या मनात आली. अशा ग्रहावर रॉकेटसारखे काहीतरी वापरून पोहोचू शकतो हे तर अकल्पितच होते. क्लार्क यांनी मात्र यावर चक्क कथाच लिहून टाकली.

Can Rocket Stations Give World Wide Radio Coverage या लेखात त्यांनी पृथ्वीभोवती फिरणार्‍या उपग्रहाच्या विशिष्ट कक्षेविषयी भाष्य केले आहे. पृथ्वीच्या भोवती विशिष्ट कोनामध्ये, विशिष्ट अंतरावर व विशिष्ट वेगाने उपग्रह फिरले तर पृथ्वीवरील कोणत्याही जागेवर ते स्थिर वाटेल. या कक्षेला त्यांनी ‘जिओ स्टेशनरी ऑर्बिट’ असे नाव दिले. अशा उपग्रहाबरोबर पृथ्वीवरून संपर्क केल्यास त्यांचा प्रतिसाद मिळवण्यासाठी पृथ्वीवरील रिसिव्हरची जागा वा दिशा बदलण्याची गरज नाही. आज मोबाइलवरून चाललेले आपले बोलणे या तत्त्वावरच चालले आहे. या कक्षांना क्लार्क यांच्या योगदानाप्रीत्यर्थ ‘क्लार्क्स ऑर्बिट’ असे म्हटले जाते. पुढील दशकभरात क्लार्क यांच्या कथा, कादंबर्‍यांनी अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेतले. आसिमोव्ह व हाइनलीम यांच्याबरोबर ते वाङ्मय विश्वाला एका वेगळ्याच जगाचे दर्शन घडवत होते व इथून पुढे त्यांच्या कारकीर्दीचा आलेख सतत उंचावत राहिला. ‘द फॉल ऑफ मूनडस्ट’ ही त्यांच्या साहित्यकृतींपैकी सर्वोत्कृष्ट समजली जाणारी कादंबरी 1961 मध्ये प्रसिद्ध झाली. 1962 पासून ‘2001 : स्पेस ओडिसी’चे लेखन सुरू झाले. ही कादंबरी 1968 मध्ये प्रसिद्ध झाली. स्टॅनले कुब्रिकने या कादंबरीवर आधारित सिनेमा प्रसिद्ध केला. क्लार्क व कुब्रिक या दोघांनी त्या वर्षी याच सिनेमासाठी ऑस्कर नामांकनही मिळवले. 1979 मध्ये ‘द फाउंटन ऑफ पॅराडाइज’ प्रसिद्ध झाली. यातूनच त्यांनी ‘स्पेस एलिव्हेटर’ची ओळख करून दिली. आर्थर क्लार्क त्यांच्या कारकीर्दीच्या व वाचकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचले.

या शिखरावरूनच त्यांनी वाचकांच्या मनावर व कल्पनाशक्तीवर पुढील तीन दशके अधिराज्य गाजवले. वाङ्मयीन सर्जनशीलता व तंत्रवैज्ञानिक दृष्टिकोन यांच्या पायावर उभारलेले त्यांचे साहित्यिक विश्व इतरांपेक्षा वेगळे आहे. हे विश्व त्यांनी अतिशय सकारात्मक दृष्टीने, प्रेमभावनेने निर्माण केले आहे. भविष्यातील जग व त्यातील अजब कल्पनांचे दर्शन त्यांच्या साहित्यातून वाचकांना घडते. आपल्या लेखनाने त्यांनी विज्ञान व साहित्य या दोन्ही शाखांना समृद्ध केले आहे. महत्त्वाचे म्हणजे मानवी संस्कृतीने कोणत्या दिशेने मार्गक्रमण करावे हाच उपदेश जणू त्यांनी त्यांच्या लेखनातून संपूर्ण जगाला दिला. तसे झाले तर मानवी संस्कृतीचा उद्धार होईल यावर त्यांचा शेवटपर्यंत दृढ विश्वास होता.