आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्बेनियन साहित्यातील प्रबळ आवाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फ्रान्समधील वाङ्मयीन वातावरण नेहमीच समृद्ध राहिले आहे. तिथे उत्तमोत्तम साहित्यिक जन्मास आले, शिवाय विविध देशांतील, विविध भाषांमध्ये लिहिणार्‍या अनेक साहित्यिकांना तिथे आश्रय मिळाला आहे. आपल्याच देशातून हद्दपार करण्यात आलेल्या लेखकांना फ्रान्सने आपले मानले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घातलेल्या सक्तीमुळे ज्या लेखकांना कोंडल्यासारखे वाटले, प्रतिभासंकोच होतो असे वाटले, अशा लेखकांनी फ्रान्सला येऊन आपली वाङ्मयीन प्रतिभा मुक्तपणे व्यक्त केली आणि जागतिक साहित्यात मोलाची भर पाडली.

1970 मध्ये पॅरिसमध्ये जेव्हा ‘द जनरल ऑफ अ डेड आर्मी’ या मूळ अल्बेनियन पुस्तकाचा फ्रेंच अनुवाद प्रसिद्ध झाला, तेव्हा तेथील साहित्यिक विश्वात वादळ आल्यासारखे झाले. या कादंबरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. एका इटालियन जनरलची ती गोष्ट! दुसरे महायुद्ध संपल्यानंतर त्यात सद्गती प्राप्त झालेल्या सैनिकांची पार्थिवं अंत्यसंस्कारांसाठी परत घेऊन जाण्यासाठी तो अल्बेनियाला आलेला असतो. एक ‘मास्टरपीस’ म्हणून या कादंबरीचा गौरव करण्यात आला. पुढे इंग्रजीसहित डझनभर भाषांमध्ये कादंबरीचा अनुवाद झाला आणि एक अतिशय दर्जेदार वाङ्मयीन कृती म्हणून तिचे स्वागत सर्वच भाषांमध्ये झाले. कादंबरीचे लेखक इस्माईल कादारे यांचे नाव तत्पूर्वी तितके चर्चिले गेले नव्हते. मुळात अल्बेनियामध्येच त्यांच्या लेखनावर बंदी घालण्यात आली होती. मात्र, आता सार्‍या जगाचे लक्ष त्यांनी आकर्षित करून घेतले होते यात शंका नव्हती.

इस्माईल कादारे यांचा जन्म 1936 मध्ये अल्बेनियातील एका छोट्याशा गावात झाला. ते अगदी लहान असतानाच दुसरे महायुद्ध सुरू झाले होते. ग्रीक व इटालियन सैन्याच्या हालचाली अल्बेनियामध्ये चालू होत्या. अशातच अल्बेनियावर अगोदर जर्मनीने व नंतर इंग्रजांनी आक्रमण केले. लहान वयातील मुलाला हे सर्व कुतूहलपूर्वक पाहावे वाटले. मानवी-अमानवी गोष्टींचा त्यांच्यावर प्रभाव पडला. कादारे यांच्या कुटुंबाची रचनादेखील विलक्षण होती. वडिलांकडील नातेवाईक गरीब होते, तर आईकडील श्रीमंत. वडिलांकडचे नातेवाईक सनातनी, रूढिवादी, तर आईकडील कम्युनिस्ट होते. अशा परस्परभिन्न वातावरणात लहानपण गेल्यामुळे त्यांचे पुढे राजकीय-सामाजिक-आर्थिक विचार परिपक्व झाले. ते मॉस्कोतील गॉर्की इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षणाकरिता गेले. स्टॅलिननंतरचा तो काळ. कलात्मक सर्जनशीलता मर्यादित ठेवण्याकरिता राजकीय मंडळी काथ्याकूट करत होती. मात्र, ग्रीक व अल्बेनियन साहित्य, शेक्सपियरचे मॅकबेथ, काफ्का, जॉइस, ऑरवेल यांच्या प्रभावाखाली घडलेली कादारे यांची प्रतिभा कुंठित राहिली नाही. अशा परिस्थितीमध्ये राहिल्याने त्यांची वाङ्मयीन प्रतिभा अधिक समृद्ध झाली. शिक्षण संपवून ते पुन्हा अल्बेनियाला आले तेव्हा तिथे एन्व्हर होक्साची हुकूमशाही राजवट होती. अशा काळात ‘द जनरल...’ प्रसिद्ध करणे धाडसाचे होते. या कादंबरीमध्ये कादारे यांनी त्यांचे राजकीय विचार स्पष्ट व धडाडीने मांडले.

या पुस्तकावर तत्काळ बंदी घालण्यात आली. कादारे यांच्या सर्वच लेखनात अल्बेनियन संस्कृती, इतिहास आणि आजूबाजूचे सामाजिक पर्यावरण आहे आणि ते सर्वच हुकूमशाही विरोधी आणि बंडखोर आहे. ‘द पिरॅमिड’, ‘द कॉन्सर्ट’, ‘द सीज’, ‘ब्रोकन एप्रिल’, ‘द अ‍ॅक्सिडेंट’सारख्या कादंबर्‍यांनी जगभर वाहवा मिळवली, मात्र अल्बेनियामध्ये या सर्व पुस्तकांवर बंदी घालण्यात आली. कादारे यांची अशी धारणा आहे की, जेव्हा जेव्हा ते लेखन करतात, तेव्हा तेव्हा ते ‘हुकूमशाही’ नावाच्या ब्रह्मराक्षसावर प्रहार करतात, लोकांमध्ये साहस निर्माण करतात. साहित्याचे खरेपण यातच आहे, या मनोभूमिकेतूनच त्यांनी सातत्याने लेखन केले व लोकशाहीविषयी अनुकूल मतही सांगत राहिले. अखेर त्यांना फ्रान्समध्ये राजकीय आश्रय घ्यावा लागला. एव्हाना कादारे यांची ख्याती सर्वदूर पसरली होती. ‘अल्बेनियन साहित्यातील दमदार आवाज’ म्हणून ते ओळखले जाऊ लागले. त्यांच्या शब्दाचे वजन इतके होते की, जेव्हा त्यांनी ‘अल्बेनियामध्ये लोकशाही सरकार आल्याशिवाय परत येणार नाही,’ अशी घोषणा केली, तेव्हा अल्बेनियामध्ये लोकशाही लागू करण्यासाठी अटीतटीचे प्रयत्न झाले. इतकेच नव्हे, तर राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी त्यांना विनंतीपूर्वक आग्रह झाला होता. मात्र, कादारे यांनी फक्त साहित्याशी एकनिष्ठ राहायचे ठरवले.

आज कादारे यांची प्रतिभा मान-सन्मानांच्या मोजदादीपलीकडे गेली आहे. त्यांनी केवळ अल्बेनियन साहित्य नव्हे, तर कितीतरी भाषांतील साहित्यात मोलाची भर टाकली आहे. त्यांचे लेखन कमी-अधिक प्रमाणात आत्मचरित्रात्मक आहे. अल्बेनिया, तेथील संस्कृती, राजकारण, समाजकारण यांचे चित्रण त्यातून घडते. हे सर्वच लेखन धाडसी, विद्रोही व बंडखोर आहे. सौंदर्यवाद, वास्तवता आणि अतिवास्तववाद या वाङ्मयीन मूलतत्त्वांनी समृद्ध असे त्यांचे लेखन आहे. पारंपरिक पद्धतीला छेद देऊन त्यांनी नवसाहित्याची वाट निर्माण केली. विलक्षण परंतु वास्तववादी भूमिकेमुळे त्यांचे नाव मार्क्वेझसारख्यांच्या बरोबर घेतले जाते.