आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवाज शरीफांचे शहाणपण (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना शांततेचे महत्त्व आता पटलेले दिसते आहे. शांततेसाठी कोणत्याही अटींशिवाय भारताशी चर्चा करण्यास पाकिस्तान तयार आहे, असे विधान त्यांनी केले आहे. हे विधान करण्यासाठी त्यांनी माल्टाची निवड का केली, हे कळण्यास मार्ग नाही, पण ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांच्याशी चर्चा करताना त्यांनी या अवघड विषयाची गाठ सोडण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. नरेंद्र मोदी यांनी आपल्या शपथविधीला शरीफसह सर्वच शेजारी देशांच्या प्रमुखांना निमंत्रित केले होते आणि शरीफ यांनी त्याला हजेरी लावली होती. तेव्हा उभय देशांत चांगले काही घडणार, असे अंदाज व्यक्त केले जात होते. पण गेल्या दीड वर्षात त्या दिशेने काही घडले नाही. उलट दोन्ही देशांतील तणावात भरच पडली आहे.
विशेषतः जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांची घुसखोरी आणि तिला पाकिस्तान लष्कराची असलेली फूस उघडकीस आल्याने आणि त्यावर चर्चेची पाकिस्तानची तयारी नसल्याने ऑगस्टमध्ये ठरलेली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची चर्चा रद्द करण्यात आली होती. काश्मीरसह सर्व विषयांवर चर्चा झाली पाहिजे, असा पाकिस्तानचा आग्रह होता. मात्र ही चर्चा दहशतवादापुरती मर्यादित असल्याचे भारताचे म्हणणे होते. शरीफ यांच्या नव्या भूमिकेत त्यांना काय अपेक्षित आहे, हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही. मात्र भारताशी बोलणी सुरू केल्याशिवाय जग आपल्या मदतीला येणार नाही, हे शरीफ यांना आता पटलेले दिसते. अमेरिकेने गेल्या वर्षभरात पाकला अनेकदा फटकारले आणि अनेक जागतिक व्यासपीठांवर पाकिस्तानच्या स्पष्ट भूमिकेची गरज व्यक्त केली जात असल्याने त्यांची कोंडी झाली आहे. पॅरिसमधील अतिरेकी हल्ल्यानंतर कोणत्याही स्वरूपातील दहशतवादाचे समर्थन हे महागात पडेल, याचीही जाणीव पाकिस्तानला झालेली दिसते. जागतिक नाणेनिधी, अमेरिका आणि चीनच्या मदतीवर इमले रचायचे असतील तर देशात शांतता प्रस्थापित करणे आणि आपण शांततेविषयी गंभीर आहोत, हे पटवून देण्यासाठी भारताशी चर्चेची सुरुवात करणे, त्यांची अपरिहार्यता आहे. ती शरीफ यांना पटली, त्यामुळे त्यांना बोलावे लागले आहे.
एक स्वतंत्र देश म्हणून पाकिस्तानची आजची स्थिती फार चांगली नाही. १९ कोटी जनता देशाच्या जलद विकासाची आतुरतेने वाट पाहते आहे. पाकिस्तानात महागाई प्रचंड वाढली आहे. वीज टंचाईमुळे काही भागांतील उद्योग बंद करावे लागत आहेत, विकासदर कसाबसा साडेतीन टक्क्यांवर पोहोचतो आहे, जीडीपी आणि कर यांचे प्रमाण कसेबसे १० टक्के असल्याने सरकारी खर्चाला सतत कात्री लावावी लागते आहे, अस्थिरतेच्या भीतीने परकीय गुंतवणूक आटली आहे, भारताला शह देण्यासाठी चीनशी शरीफ यांनी संबंध वाढवले आहेत, पण चिनी उद्योजक अजून धाडस करायला तयार नाहीत. शरीफ यांना बहुमत असूनही आर्थिक आघाडीवर फार काही घडू शकलेले नाही, अशा अनेक कारणांनी पाकिस्तानी नागरिकांचा रोष वाढत चालला आहे. शरीफ यांना सत्तेवर येऊन दोन वर्षे होऊन गेली आहेत. ते निवडून आले तेव्हा एक व्यावसायिक म्हणून त्यांना अर्थव्यवस्थेचे महत्त्व कळते, त्यामुळे त्यांच्या कारकीर्दीत पाकिस्तानच्या विकासाला गती मिळेल, असे मानले जात होते, पण त्या आघाडीवर जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे. राजकीय अस्थिरता आणि लष्कराचे प्राबल्य यामुळे मुळातच पाकिस्तान मागे पडला आहे. टोकाच्या आर्थिक विषमतेमुळे धर्मांध शक्तींना फूस मिळते आहे. अशा सर्व नकारांचे रूपांतर होकारांत करायचे असेल, तर आपल्या मोठ्या भावाशी वैर ठेवून चालणार नाही, किमान त्याच्याशी बोलले पाहिजे, असे शरीफ यांना या टप्प्यावर वाटत असेल तर भारतालाही ते हवे आहे. म्हणूनच भारतातही शरीफ यांच्या या तयारीचे लगेच स्वागत करण्यात आले आहे. भारतीय उपखंडात सतत असलेल्या अशांततेचे विपरीत परिणाम दोन्ही देशांनी गेले सहा दशके भोगले आहेत. तणावामुळे दोन्ही देशांच्या संरक्षण खर्चाने नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी लागणारे भांडवल हिसकावून घेतले आहे. आपल्या लोकसंख्येमुळे प्रचंड संधी बाळगून असलेले हे दोन देश आजही विकासापासून वंचित आहेत. अर्थात भारताने याही स्थितीत आपल्या विकासाचा वेग कायम राहील, यासाठी प्रयत्न करून जगात मानाचे स्थान मिळविले आहे. सर्वच आघाड्यांवर जगातील एक दखलपात्र आणि विश्वासार्ह देश म्हणून भारताला मिळत असलेली मान्यता नवाज शरीफ यांना टोचत असणार, हे उघडच आहे. त्या दिशेने जायचे असेल तर संघर्षाला चर्चेच्या पातळीवर आणणे, हे क्रमप्राप्त आहे. याची जाणीव शरीफ यांना कदाचित झाली असावी. शांततेचे महत्त्व भारताला पाकिस्तानने सांगण्याची गरज नाही. पाकिस्तान आपली भूमिका सतत बदलत असताना भारताने संयम ठेवून चर्चा सुरू राहील, असे प्रयत्न नेहमीच केले आहेत, पण पाकिस्तान बधत नसल्याने ती थांबविण्याची वेळ आली. ती सुरू ठेवली पाहिजे, हे उशिरा का होईना, पण पाकिस्तानला पटले, हे खूप चांगले झाले.