आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक वर्ष व पालकांची जबाबदारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शैक्षणिक वर्षाची सुरुवात जूनमध्ये होते आणि त्याच्या प्रारंभाची तिथीदेखील जाहीर होते. उन्हाळी सुटीचा आळस झटकून सर्वत्र कार्यमग्नता संचारते. शेतकरीवर्गापासून चाकरमान्यांपर्यंत अन् व्यापारी जगतापासून सफाई कर्मचा-यांपर्यंत सर्वांना लागू होते. यातून पामर विद्यार्थी सुटणार कसा?


विशेषत: ज्या पालकांची मुले-मुली पहिल्यांदा शैक्षणिक चक्रव्यूहात प्रवेशत असतात त्यांच्यासाठी हे शिवधनुष्य आणखीच भारमान वाटते. चांगल्या (?) शाळेमध्ये प्रवेश मिळवणे हे दिव्य सा-याच पालकांच्या पाचवीला पुजलेले असते. (शाळा प्रवेशाचे वय 5 का आहे ते पाचवीवरून कळते) या प्रवेशासाठी भक्कम (?) वशिल्यासाठी उंबरे झिजवल्यानंतर प्रवेशाचे अग्निदिव्य पार पडते; केवळ शाळा प्रवेश एवढ्याने ते भागत नाही.


पालकांना आणखी महत्त्वाचा वाटणारा प्रकार म्हणजे खासगी शिकवणी वर्ग. एक वेळ वर-वधू पसंती सोपी भासते; परंतु अल्पखर्ची मंगल कार्यालय मिळणे केवळ अशक्य. तद्वत शिकवणी वर्गासाठीसुद्धा अनेक सोपस्कार पार पाडावे लागतात आणि एकदा का या दोन्ही बाबी जुळून आल्या की पालकास मोक्ष मिळल्याचा आनंद होतो. या प्रवेश प्रक्रियांबरोबरच विद्यार्थी वाहतूक सुविधा, शालेय साहित्य खरेदी, धावपळ,आटोपता जुलै उजाडतो.


शाळा प्रवेशाबरोबरच पालकांच्या जबाबदा-यांची जाणीव होणे, पालकांनी सजग होणे अत्यंत आवश्यक आहे. थोड्याशा दुर्लक्षाने क्षमता असणा-या मुलामुलींना अपयश येते अणि अपेक्षित ध्येयापर्यंत न पोहोचलेल्या मुलामुलींच्या माथी खापर फोडून एकूण शिक्षण व्यवस्थेविरुद्ध पालक आणि मुले यांची कडवट मते होतात. विशेषत: शालेय साहित्य खरेदीप्रसंगी आपण गणवेश वा अन्य साहित्य खरेदीमध्ये सर्वोत्तम ध्यास घेतो. मात्र, पुस्तके संचावर मागवतो आणि विक्रेता न मागता पुस्तकांच्या संचाबरोबर उत्तर पुस्तिकांचा (गाइड्स), संच समोर ठेवतो. कोणतेही सयुक्तिक कारण नसताना आम्ही (पालक) तो गाइड््सचा संच खरेदी करतो आणि मुलांना कुबड्या घेऊन शिक्षणाच्या स्पर्धेत उतरवतो.


आजही अनेक शाळांमधून मुलांना घरचा अभ्यास स्वाध्याय, गृहपाठ करावयास सांगण्याची प्रथा आहे. हा स्वाध्याय वा गृहपाठ मुलांनी क्रमिक पुस्तकांमधील उत्तर शोधून करावा, अशी अपेक्षा असतं. मात्र, गाइडच्या कुबड्या घेऊन अभ्यास करणारी मुले उत्तरे गाइडमधूनच उतरवतात. याला पालकांचा आक्षेप असावयास हवा. शिक्षकांनासुद्धा गृहपाठाच्या वह्या तपासताना (?) एकसारख्या उत्तरांचा संशय यायला हवा, मात्र यातील काहीच होताना दिसत नाही.


प्रत्येक वर्षी अनेक विषयांची पाठ्यपुस्तके बाजारात विक्रीसाठी वेळेत उपलब्ध होत नाहीत, हा अनुभव आहे. त्या विषयांची गाइड्स मात्र बाजारात दिमाखात उपलब्ध होतात, हे कसे? हा प्रश्न ना शासनास ना शिक्षण संस्थांना आहे. पालकांनी किमान आपला पाल्य पुस्तकातून उत्तर शोधतो आहे, एवढी दक्षता घेतली तरी विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या चौकसतेमध्ये, शोधकतेमध्ये आमूलाग्र बदल होताना दिसेल. अलीकडे पाठांतर हा पूर्ण दुर्लक्षित विषय आहे. किमान पाढे, दरवर्षी 8-10, कविता काही संस्कृत, हिंदी, मराठी, इंग्रजी सुभाषिते पाठ करून घेतल्यास मुलांचे सर्वांगीण व्यक्तिमत्त्व खुलून दिसेल यासाठी कोणत्याही क्रीम, लोशनची गरज भासणार नाही.


शालेय वेळेव्यतिरिक्त वेळापत्रक हेही तयार हवे. आपल्या पाल्याने नव्याने काय वाचले? दैनिकातील ठळक बातम्या तरी वाचल्या आहेत काय? चित्रपट परीक्षण, क्रीडा वृत्त याबरोबरच दुष्काळ, शेती, उद्योग, सहकार आदी विषयांवरील वाचन पाल्य करताहेत काय? हे पाहणे गरजेचे आहे. गेल्या 10-20 वर्षांपासून वाढती पटसंख्या हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे मुलांकडे वैयक्तिक लक्ष हा प्रकार उरलेला नाही. मात्र, कुटुंबामध्ये हा प्रश्न नाही. त्यामुळे मूल घरी आल्यावर किंवा मूल झोपण्यापूर्वी त्यास विश्वासात घेऊन आज वर्गात काय शिकवले? आणि त्यातले त्याला काय नाही समजले? हे प्रश्न पालकांनी आवर्जून विचारावयास हवेत. अधूनमधून मुलांच्या वह्यासुद्धा पालकांनी चाळणे आवश्यक आहे.


ज्या मुलामुलींना पालकांनी गरज म्हणून वा हौस म्हणून मोबाइल खरेदी करून दिले आहेत, त्या मोबाइलचा वापर योग्य होतो आहे हे तपासणे अत्यंत गरजेचे आहे. लहान मुलांच्या हाती ब्लेड, सुरी, विळी जाणार नाही याची दक्षता घेणारे आम्ही पालक मोबाइल इंटरनेटसारख्या सुविधा हाती देताना डोळेझाक का करतो, हा अनुत्तरित प्रश्न आहे.