आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या अश्वमेधाला अडवाणींचा अपशकुन! ( अग्रलेख )

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवारी सकाळी लालकृष्ण अडवाणींनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आणि त्यांच्या पक्षातीलच नव्हे तर काही प्रमाणात भारतातील राजकारणाचीच समीकरणे एकदम बदलून गेली. अडवाणींना त्यांच्या पक्षात फारसा पाठिंबा उरलेला नाही, त्यांच्यासारख्या वृद्धांनी आता निवृत्त होऊन आपल्या अनुभवाच्या आधारे युक्तीच्या चार गोष्टी सांगाव्यात आणि नरेंद्र मोदींचा अश्वमेध दिल्लीत कसा पोहोचेल हेच मुख्यत: पाहावे, असा पोक्त सल्ला मोदींचे समर्थक अडवाणींना देत होते. ‘अडवाणींची उपयुक्तता आता संपली आहे,’ असा सूर थेट नागपूरहूनच निघू लागला होता. त्याच ‘मापना’चा आधार घेऊन काहीशा ‘दांडगाई’ पद्धतीने, पक्षनेतृत्वावर दबाव आणून आणि ज्यांचा मतभेद आहे त्यांना बाजूला सारून नरेंद्र मोदींची निवडणूक प्रचार समितीचा अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली गेली. अडवाणी, यशवंत सिन्हा, उमा भारती प्रभृती गोव्याला गेलेही नाहीत. परंतु ‘ते गेले उडत’ असा पवित्रा मोदी समर्थकांनी घेतला होता.

दिल्लीत अडवाणींच्या घरावर मोदी गटाने मोर्चा काढून ज्या असभ्य घोषणा दिल्या, त्यातूनही ती ‘दांडगाई’ दिसली होती. जिवंतपणीच आपले श्राद्ध घालण्याच्या योजना आखल्या जात आहेत, हे दिसल्यावर सुमारे 65 वर्षे राजकारणात व्यतीत केलेल्या अडवाणींनी त्यांच्या ‘अनुभवी’ राजकारणाचा तडाखा मोदीवाद्यांना दिला. आपण ज्या संघ-जनसंघ-भाजप परंपरेमध्ये गेली 65 वर्षे काम करत आहोत त्या परंपरेला, संस्कृतीला आणि पक्षशिस्तीला तिलांजली दिली जात आहे आणि एक प्रकारची हिटलरशाही पक्षात रुजवली जात आहे, असे अडवाणींनी जाहीरपणे म्हटले आहे. भाजपमधील ब-याच मध्यमवयीन कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना एकदम महाभारताचे स्मरण होऊ लागले होते. या मंडळींनी लालकृष्ण अडवाणींना टोकदार बाणांच्या महाशय्येवर आडवे करून उत्तरायणाची वाट बघत मनन करायला सांगितले होते. परंतु अडवाणी स्वत: मात्र त्या पितामहाची भूमिका बजावायला तयार नाहीत. जमिनीत रुतलेले बाण ते पुन्हा भात्यात भरू लागले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांचे नाव ‘मोहन’ (म्हणजे कृष्ण) असले आणि आडनाव ‘भागवत’ असले तरी तो कृष्ण वेगळा आणि ती भागवती परंपराही वेगळी! तिकडे अटलबिहारी वाजपेयीसुद्धा बिचारे उत्तरायणाचीच वाट पाहत आहेत. त्यांना संघाने केव्हाच राजकारणातून अंतर्धान करून टाकले आहे.

संघाचा इरादा 2004 मध्ये अडवाणींना पंतप्रधान करायचा होता. तो सोनिया गांधींच्या ‘सेक्युलर’ आघाडीने उधळून लावला. मग पुन्हा 2009 मध्ये अडवाणी पंतप्रधान व्हावेत म्हणून संघाने जंगी प्रयत्न केला. तेव्हा तर काँग्रेसला 2004 पेक्षाही 61 जागा अधिक मिळाल्या आणि भाजपच्या 20 जागा कमी झाल्या. याच सुमाराला एका नव्या नरेंद्राचा सूर्य मध्यान्ही तळपू लागला होता.


नाव विवेकानंदांचे; पण खरे तर हा नरेंद्र म्हणजे संघाचा ‘अविवेकानंद’. त्या नरेंद्राला म्हणजे स्वामी विवेकानंदांना हिंदू धर्माची वैश्विकता, मानवता आणि सहिष्णुता ही वैशिष्ट्ये अभिप्रेत होती. या नव्या नरेंद्राला मानवता, सहिष्णुता यांचे काहीच देणेघेणे नाही. नरसंहार हे या नरेंद्राच्या हिंदुत्वाचे माध्यम आहे. म्हणूनच खुद्द लालकृष्ण अडवाणींनी मोदींच्या पदोन्नतीबद्दल बोलताना नाझी जर्मनीचा संदर्भ दिला आहे. त्याचप्रमाणे यशवंत सिन्हांनी मोदींच्या नव्या नियुक्तीची पद्धत कपटी-कारस्थानी असल्याचे म्हटले आहे. संघ परिवाराला बुजुर्गांबद्दल आदराची भावना असल्याचे शहाजोगपणे सांगितले जाते. प्रत्यक्षात कित्येक सन्माननीय वृद्धांना संघाने क्रूरपणे देशोधडीला लावलेले आहे. भारतीय जनसंघाचे ज्येष्ठ नेते (सध्या वय 97) बलराज मधोक अजूनही तो पक्ष चालवतात - पण ते कसे फेकून दिले गेले, हे लोकांना कळलेही नाही. मा. गो. वैद्य असोत वा बिंदुमाधव, केशुभाई पटेल असोत वा अलीकडेच दिवंगत झालेले ब्रिजेश मिश्रा - अशा अनेक लोकांना मांदियाळीतून काढून फेकून द्यायचे संघाने एक तंत्रच बनवले आहे. वाजपेयी तर हयात आहेत याचेही स्मरण देणे मोदीप्रणीत भाजप नेत्यांना अस्वस्थ करते. म्हणून त्यांचे नामस्मरण केल्याचा आविर्भाव आणतानाच त्यांना इतिहासजमा करायचे, अशी ती नेपथ्यरचना असते. आता मोदी हे वाजपेयींपेक्षाही करिश्मासंपन्न, कर्तबगार आणि कर्तव्यतत्पर नेते आहेत, असा सूर लावला जात आहे. नरेंद्र मोदी हे 1990 मध्ये अडवाणींच्या रथाचे सारथी होते. आता त्या सारथ्याने आपणच भाजपची (व पर्यायाने लवकरच संघाचीही!) सूत्रे हाती घ्यायचे ठरवलेले आहे.

संघ परिवाराने बाळासाहेब देवरसांनाही सफाईने दूर केले होते, तर अडवाणींची काय कथा? अडवाणींचा ‘मधोक’ करायचा त्यांचा डाव होता. अडवाणींनी तो उडवून आपण कसलेले व संघाच्या तालमीत तयार झालेले पैलवान आहोत, हे दाखवले आहे. पण नियतीच्या मनात काय आहे, हे अजून या संघ परिवाराच्या ध्यानात आलेले नाही. ते कोणाच्याच ध्यानात येत नाही. परंतु लोकशाहीत नियती म्हणजे मतदार. आपल्या देशात सुमारे 85 कोटी मतदार आहेत. त्यापैकी फक्त सहा कोटी गुजरातमध्ये आहेत. (आणि गुजरातमध्येही मोदींना मागील खेपेपेक्षा दोन जागा कमी मिळाल्या होत्या.) अडवाणींचे पंतप्रधान व्हायचे मनसुबे याच मतदार नामक नियतीने दोनदा उधळून लावले आहेत. याच मतदारांनी ‘शायनिंग इंडिया’चा शाइन उतरवला. याच मतदार नामक नियतीने 1977 मध्ये खुद्द इंदिरा गांधींचा पराभव केला आणि तीनच वर्षांनी जनता पक्षाला जमीनदोस्त केले. त्यामुळे ही नियती 2014 च्या लोकसभा निवडणुकीत कुणाला काय धडा शिकवेल, हे कुणीही सांगू शकत नाही.

गेली दोन वर्षे देशातील सामना जणू नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असा आहे, असे चित्र मीडियाने आणि संघ परिवाराने निर्माण केले होते. परंतु तो सामना नरेंद्र मोदी विरुद्ध लालकृष्ण अडवाणी असेल, असे कुणाला वाटले होते? कुणी सांगावे, मोदी विरुद्ध अडवाणी या सामन्याची ही फक्त रंगीत तालीम आहे आणि कदाचित अडवाणी (म्हणजे साक्षात पितामह) बाणांच्या आभासी शय्येवरून उठून लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ‘फायनल’ शरसंधान स्पर्धेत उतरू शकतील. लोकसभा निवडणुकीत यूपीए वा एनडीए यापैकी कुणालाच बहुमत मिळणार नाही. त्याचप्रमाणे काँग्रेस व भाजप, दोन्ही पक्षांना प्रत्येकी दीडशेच्या आत जागा मिळाल्या तर काँग्रेस वा भाजपचा पंतप्रधान होणे शक्य नाही. म्हणजे मोदींचा पतंग हवेतच काटला जाऊ शकेल. त्या स्थितीत भाजपच्या पाठिंब्यावर वा काँग्रेसच्या पाठिंब्यावर बहुमत प्रस्थापित करण्यासाठी तिसरी, चौथी वा पाचवी आघाडी प्रयत्नशील होईल. तेव्हा भाजपप्रणीत आघाडीतर्फे सरकार स्थापून काँग्रेसला दूर ठेवावे, असे अडवाणींचे मत होते. तर मोदींना दांडगाई करून पक्षात व जमल्यास केंद्रात सत्ता हस्तगत करायची होती. वस्तुत: दोघेही कट्टर हिंदुत्ववादी. आज जो मोदींचा उग्र हिंदुत्वाचा चेहरा आहे तो 1990च्या दशकात अडवाणींचा होता. वाजपेयी तर रथयात्रेत एक मिनिटही सामील झाले नव्हते. त्यांचा रथयात्रेला व उग्र हिंदुत्ववादालाच विरोध होता. गेल्या 22 वर्षांत अडवाणी वाजपेयींकडून काही शिकले की त्यांची महत्त्वाकांक्षा अधिक प्रभावी ठरली, हे सांगणे कठीण आहे. एक मात्र खरे की त्यांनी मोदींचा अश्वमेध अडवला आहे.