आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडवाणीजी, तुमचे चुकलेच!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छे छे, यंदा निवडक पक्षपदांचा राजीनामा देऊन मोदींची वाट अडवणे तुम्हाला क्रमप्राप्तच होते. अडवाणीजी, त्यात नाहीत तुम्ही चुकलात. अहो, आधीच खूप उशीर झाला आहे. तुमचे वय आता 85 वर्षांचे. पंतप्रधानपद आता नाही तर कधीच हाती लागणार नाही. माणूस म्हटला की त्याला महत्त्वाकांक्षा असणे स्वाभाविक आहे. आपला जळफळाट अगदी समयोचित आहे.


तुमचे चुकले ते फार पूर्वी. तुम्ही मुस्लिमांच्या विरोधात आग ओकत होतात, ‘वहीं मंदिर बनायेंगे’चे नारे देत रथयात्रा काढत होतात, तो काळ आठवतोय? त्या काळात आणि त्याआधीही तुम्ही आणि अटलजी जवळपास एका पातळीवर होतात. तुम्ही दोघेही संघाच्या मुशीतून घडलेले. कधी ते तर कधी तुम्ही जनसंघ आणि नंतर भाजपचे अध्यक्ष झालात. गांधीवादी समाजवादाचा नारा देऊन पक्षाची प्रतिमा बदलायचा अटलजींनी प्रयत्न केला, पण खासदारांची संख्या दोनच्या पुढे गेली नाही. साधारण त्याच सुमारास ‘मंडलला कमंडल’चा शह देण्याचे सखोल चिंतन पक्षाच्या खलबतखान्यात संघ परिवाराच्या आशीर्वादाने तुम्हा दोघांच्याही उपस्थितीत नक्कीच झाले असेल. कोणी कोणते काम करायचे हे खेळीमेळीच्या आणि मुक्त वातावरणात ठरले असेल. बाबरी मशिदीवर हल्लाबोल हे काम भाजपची पक्ष-प्रतिमा बदलासाठी हिताचे असले, तरी ते पक्षातील पहिल्या पाच-दहा म्होरक्यांनी करणे ठीक नव्हते. तिस-या-चौथ्या फळीतील नेत्यांनी हे काम आपणहून स्वीकारले असते; परंतु अटलजींनी मवाळ, सर्वसमावेशक, ‘सेक्युलर’ मुखवटा चढवला आणि एक नंबरचे समजून दोन नंबरचे हे काम तुम्ही आपणहून निवडलेत. चेह-यावर कडव्या संघ स्वयंसेवकाचा मुखवटा सहजच चढला. तो तुम्हाला भावला. हीच ती घोडचूक होती.


नंतर सुमार टीव्ही सीरियलप्रमाणे न संपणारी चुकांची मालिकाच सुरू झाली. मुस्लिम लोक बहुसंख्य होतील, त्यांचे लांगूलचालन थांबले पाहिजे, अशा गरळ ओकून अवास्तव प्रचाराची राड केलीत. त्यात अटलजींनी नरो वा कुंज रोवा अशी भूमिका घेतली. अटलजी वॉज अँड इज नोन बाय युवर कंपनी ही केप्ट, तुम्ही काय करू पाहताय याची अटलजींना कल्पना असणे, त्यांनी तुम्हाला या कामापासून न रोखणे, हे सर्व खरे असेल, मान्य; परंतु ‘तुम्ही रामाच्या अयोध्येत जात आहात, रावणाच्या लंकेत नाही’, असा सल्ला अटलजींनी कारसेवकांना दिलाच ना? ‘पक्षासाठी बाबरी मशीद ही द्रौपदीच्या अक्षय थाळीतील न संपणारी रोटी आहे, ती पुरवून पुरवून खा. हावरटपणा करून थाळीसह उद्ध्वस्त करू नका.’ असा त्या पोक्त सूचनेचा अर्थ अटलजींना अभिप्रेत असेल. तो तुम्हा कोणाच्याच लक्षात आला नाही. नक्राश्रूही सही, तेव्हा डोळ्यातून पाणी तरी काढायचे, पण साधा खेदही व्यक्त केला नाहीत. उलट, बाबरी मशीद उद्ध्वस्त करून झाल्यावर श्रमपरिहारार्थ तुम्ही, मुरली मनोहरजी, उमा भारतीजी, साध्वी ऋतंभराजी आणि तुमच्या पक्षाचे मोठे नेते एकमेकांना आनंदाने मिठाई खिलवत राहिलात. नंतर उसळलेल्या दंगलींना अटलजींनी पाठिंबा नाही दिला. तुम्ही दिलात. नंबर एकवर असणा-या तुम्हा दोघांतील अंतर वेगाने वाढतच गेले. कदाचित बाबरी मशीद पाडल्यावर अटलजींनी ढाळले ते नक्राश्रू असतील, पण त्यामुळे अटलजी तुमच्याही मनात दशांगुळे वरच राहिले. तुमचा नाइलाज होता; ओरबाडूनदेखील न निघणारा मुखवटा हा तुमचा चेहरा बनला होता.


नंतरच्या निवडणुकीत दोन नंबरच्या कामामुळे पक्ष खासदारांची संख्या खूप वाढली. ते श्रेय संपवलेल्या बाबरी मशिदीला आणि पर्यायाने तुम्हाला जाते, तरीही सरकार स्थापनेसाठी इतर काही मित्रपक्षांच्या मदतीची गरज होती. आधीच तुमचा नंबर दोन, त्यात तुम्ही कडवे मुस्लिमविरोधक. काँग्रेसला विरोध करणा-या इतर पक्षांना तुम्ही चालणे अशक्य होते. अडवाणीजी, तुम्ही स्वत:हून उपपंतप्रधान बनलात. तुमच्या मुस्लिमविरोधी यशाने दिपून गेल्याने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनीही तसा प्रयोग 2002 मध्ये गुजरातेत केला. तेव्हा तरी तुम्ही नरेंद्र मोदींना ‘राजधर्म’ सांगून राजीनामा मागणा-या अटलजींना मनसोक्त पाठिंबा द्यायचा. उलट, तुम्ही मोदींना पाठीशी घातलेत. तुम्ही नंबर दोनची कामे करत वाजपेयींच्या चरणी स्वामिनिष्ठा वाहत राहिलात. भारतीय लोकशाहीत स्वामिनिष्ठेला कळीचे महत्त्व आहे हे मान्य; परंतु अडवाणीजी, खरोखरच्या स्वामिनिष्ठेपेक्षा तिचा अभिनय स्वत:साठी जास्त कळीदार असतो हे तुमच्या फार उशिरा लक्षात आले. आधीच फार उशीर झालेला, त्यात इस्लामाबादेची घाईगर्दी, ओरबाडूनदेखील न निघणारा कडवा हिंदुत्ववादी मुखवटा तुमचा चेहराच बनल्याचे तुम्ही बहुधा विसरलात. वाजपेयींप्रमाणे सेक्युलर आणि तुमच्याप्रमाणे कडवा धर्मांध मुखवटा धारण करणा-या मोहंमद अली जिनांच्या मजारवर चादर चढवून त्यांच्या धर्मनिरपेक्ष मूल्यांचे वारेमाप कौतुक केलेत आणि पक्षांतर्गत टीकेचे धनी झालात. त्यापायी पक्षीय पदांचा राजीनामाही दिलात. जिनांचे कौतुक करताना जिना आणि तुम्ही यातील महत्त्वाचा फरक तरी लक्षात घ्यायचा. नेहरूंप्रमाणे पाश्चिमात्य मूल्यव्यवस्थेने जिना भारावलेले होते. ते बराच काळ काँग्रेस पक्षाचे मोठे नेते होते. स्वातंत्र्य नजरेच्या टप्प्यात येऊ लागले, तसे हिंदूंच्या मनातील मुस्लिमांची प्रतिमा त्यांना अस्वस्थ करू लागली. मुस्लिमांना आणि स्वत:च्याही कामाला हिंदुबहुल देशात योग्य न्याय मिळणे त्यांना कठीण वाटू लागले. जो धर्म त्यांनाही नीट माहीत नव्हता, त्या इस्लामचा कडवा मुखवटा जिनांनी चढवला. पाकिस्तानची निर्मिती झाल्यावर मात्र त्यांची धर्मनिरपेक्ष मूल्ये पाकिस्तानच्या पहिल्या घटनेत प्रतिबिंबित झाली. अडवाणीजी, तुमची जीभ घसरली, पावलं वाकडी पडली.


तुमचा शिष्योत्तम नरेंद्र मोदी, त्यांनीही तुमच्याचसारखी घोडचूक केली. पक्ष आणि स्वहितासाठी धर्मांध दहशतवादी कारवाया कितीही आवश्यक असल्या आणि त्या मार्गाने मिळालेली सत्ता वर्ज्य नसली, तरी ही दोन नंबरची कामे पक्ष फळीतील पाचव्या-सहाव्या क्रमांकावरील नेत्यांकडून मोदींनी करवून घेतली नाहीत. मनोमन आशीर्वाद देताना उघडपणे वाजपेयींप्रमाणे उच्च मूल्यांच्या चार सूचना देणे मोदींच्या गावीच नव्हते. या घोडचुकेपायी मोदीही पंतप्रधानपदासाठी तुमच्याच पक्षात आता दोन नंबरचे नेते बनत आहेत, हे उमगल्यावर मोदींनी सद्भावना यात्रा काढल्या. ज्यांचा द्वेष केला त्यांना उराउरी भेटले, कडवा हिंदुत्ववादी मुखवटा काढून विकासपुरुषी मुखवटा चढवायचा आटोकाट प्रयत्न केला; परंतु सुरुवातीला दोन नंबरची कामे केलेल्या व्यक्तींना एक नंबरवर जाणे फार अवघड असते. हा लोकशाही व्यवस्थेचा नियम तोडल्याने त्यांना तर चक्क तुमचाही विरोध सहन करावा लागतोय. त्या मानाने तुम्ही खूप नशीबवान आहात. तब्येतीमुळे वाजपेयीजी राजकारणाबाहेर इतके गेले आहेत, की मनात आणले तरी ते तुम्हाला विरोध करू शकण्याच्या स्थितीत नाहीत आणि अडवाणीजी, मोदीही चांगलेच इरेला पेटले आहेत. त्यामुळे राजीनामा मागे घेतल्याने फार काही साधणार नाही. आता त्या बाबरी मशिदीच्या जागी असणा-या रामाला मनात लाखोली वाहा आणि नशिबी आलेल्या वानप्रस्थाश्रमाला खुल्या दिलाने सामोरे जा. वानप्रस्थाश्रमासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!