आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाहिरातीच्या विश्वाचे आव्हान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाहिरात विश्वासारख्या अत्यंत क्रिएटिव्ह असलेल्या क्षेत्रात पाऊल ठेवू पाहणार्‍या विद्यार्थ्यांच्या मनात गुणात्मकतेशी निगडित अनेक न्यूनगंड असतात. जाहिरात क्षेत्रात अशाच प्रकारे जाहिरातीचा गंधही नसलेला मराठी मुलगा भारतातील टॉप टेन जाहिरातकर्त्यांमध्ये गणला जाऊ शकतो, हे संजय खरेंच्या उदाहरणाने सिद्ध झाले आहे. आजच्या जाहिरात क्षेत्रात अनेक अशा अनेक व्यक्ती आहेत ज्या त्यांच्या सुरुवातीच्या काळात धडपड्या होत्या. जे. जे. मधील कलेच्या विद्यार्थ्यांना शिकवताना आजही मी गळ्यात एलची पाटी अडकवून शिकवतो. एल- फॉर र्लनिंग आणि लाइव्ह म्हणजेच वर्तमानात जगणं. या दोन्ही गोष्टी जितक्या विद्यार्थ्यांसाठी तितक्याच जाहिरात क्षेत्रातील प्रत्येकासाठी महत्त्वाच्या आहेत. विद्यार्थ्यांनी त्या नेहमीच लक्षात ठेवाव्यात,असं ते म्हणतात.
याच विषयाला धरून मंथनचे प्रा. शशिकांत गवळी यांनी 30 मार्चपासून डूडल 2013 च्या निमित्ताने मुंबईत जाहिरात प्रदर्शन आणि कार्यशाळेचे आयोजन केले आहे. एवढ्या मोठ्या स्तरावर विद्यार्थ्यांसाठीचे महाराष्ट्रातील हे पहिलेच जाहिरात प्रदर्शन आणि कार्यशाळा असेल. या निमित्ताने या जाहिरात क्षेत्रात येणार्‍या अनेक विद्यार्थ्यांना संजय खरेंशी संवादाची संधी मिळणार आहे. या कार्यक्रमाचे उद््घाटन अ‍ॅड गुरू गोपी कुकडे करणार आहेत. जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे डीन विश्वनाथ साबळे हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील. मुंबईतील दोनशे बी.एम.एम. कॉलेज या कार्यक्रमात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या सहभागी होत आहेत.
विलेपार्ल्यातला मध्यमवर्गीय संस्कृतीत वाढलेल्या संजय खरेंनी जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या आवारात पाऊल ठेवलं. समोर इंग्रजाळलेल्या ‘सो कॉल्ड कल्चर्ड मॉड’ मुलं-मुली... त्यांचे हाव-भाव, वागण्या-बोलण्याच्या पद्धती आणि बोल्डनेस बघितल्यावर पार्ल्याचा मध्यमवर्गीय सांस्कृतिक प्रतिनिधी असल्या कारणाने पावलं वळवून अ‍ॅडमिशन न घेताच ते तडक घरी परतले. जे.जे. मधल्या मुला-मुलींनी त्यांची पाठमोरी कुचेष्टाही केली असेल, परंतु आणखी काही वर्षांनी सुमारे 51 राष्ट्रीय आणि तीन आंतरराष्ट्रीय अवॉर्ड्स पटकावून संजय याच कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना जाहिरात कलेचे धडे देतील याची त्या कुचेष्टाकारांना सुतराम कल्पनाही नव्हती, परंतु एका वर्षानंतर पुन्हा संजय खरेंनी ताठ मानेने जेजेमध्ये प्रवेश घेतला, तो इंग्रजी शिकूनच.
शिल्पी, इंटरपब, त्रिकाया ग्रे, एंटरप्राईज, काँट्रॅक्ट अशा नामवंत अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीमधून काम करताना कोटक महिंद्रा, ब्लू बझार, थम्स अप, एचसीएल, सिटी बँक, आयसीआयसीआय बँक, सफारी लगेज अशा ब्रॅण्ड्सवर त्यांनी काम केलंय. ब्लू बझार या डेनिमचं कापड विकणार्‍या स्टोअरची जाहिरात करताना डेनिम म्हणजे जीन्स हे समीकरणच त्यांनी आणि त्यांच्या टीमने बदलून टाकलं होतं. पँटऐवजी इतर कितीतरी गोष्टींसाठी तुम्ही डेनिम वापरू शकतात, हे दर्शवताना सूर्याला अर्घ्य देणार्‍या उघड्या दाक्षिणात्य माणसाच्या कमरेला डेनिमचं पाऊच, बौद्ध भिख्खूच्या खांद्यावर डेनिमची सॅक, नऊवारी नेसलेल्या नथ घातलेल्या महाराष्ट्रीयन मुलीच्या हातात डेनिमची छत्री आणि धोतर घातलेल्या अस्सल बंगाली माणसाच्या पायात डेनिमचे शूज दाखवून तयार केलेल्या कॅम्पेन्सला तुफान प्रसिद्धी मिळाली. विरोधाभासातून एखाद्या प्रॉडक्टचं ग्राहकांच्या मनावर ठसवण्याची क्रिएटिव्हिटी डेनिमच्या जाहिरातींसाठी खरेंनी वापरली होती.
आयसीसी चॅम्पियन क्रिकेट स्पर्धेच्या वेळी सोनी मॅक्स चॅनलवरून क्रिकेट स्पर्धेचं थेट प्रक्षेपण होणार होतं. त्यासाठी सोनी मॅक्स-दीवाना बना दे या जाहिराती त्यांनी बनवल्या ज्या नंतर गाजल्या होत्या. या जाहिरातीच्या थीम इंटरेस्टिंग होत्या. सोनी मॅक्समुळे सर्वत्र क्रिकेट फीव्हर उसळला आहे. गणेशमूर्ती असलेल्या कारखान्यात गणपतीच्या हातात मोदकाऐवजी सीझन बॉल, वजन काट्यावर वजनाऐवजी क्रिकेटचा बॉल ठेवणारा दुकानदार आणि ड्यूटीवर हातात काठीऐवजी चक्क स्टंप घेऊन झोपलेला पोलिस शिपाई अशा थीम्स ठेवून जाहिराती त्यांनी बनवल्या होत्या. वेगळेपणामुळे त्या प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. अ‍ॅड कॅम्पेनबद्दल बोलताना संजय खरे म्हणतात की, एखाद्या प्रॉडक्टचं कॅम्पेन बनवताना त्यात स्वत:ला झोकून देऊन काम करणं हे खूप गरजेचं आहे. अ‍ॅडव्हर्टायझिंग म्हणजे प्रॉब्लेम्स अँड सोल्युशन्सचं एक गणित आहे. त्यातला प्रॉब्लेम कळला की त्याचं सोल्युशन काढणं जमू शकतं. यासाठी तिसरा डोळा उघडा असणं महत्त्वाचं असतं. हा तिसरा डोळा सगळ्यांकडेच असतो. मात्र तो उघडण्यासाठी आणि त्यातून बघण्यासाठी ‘पॅशनेट’ असावं लागतं. जाहिरात क्षेत्रासारख्या प्रचंड बिझी क्षेत्रात वरिष्ठ पदावर काम करत असूनदेखील संजय खरेंनी धार्मिक ग्रंथांचा अभ्यास, योगसाधना, विपश्यना, जीवनविद्येच्या अभ्यासवर्गाला वेळ काढण्याची कलादेखील अंगीकारली आहे. जीवनविद्या एक मिशन हे तत्त्व मानणारे संजय खरे आयुष्यात येणार्‍या प्रत्येक क्षणापासून काहीतरी शिकायचा सतत प्रयत्न करीत असतात.