आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रथयात्रेनंतर आता शोभायात्रा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील दोन आठवड्यांतील घटनाक्रमाने भारतीय जनता पक्षाची स्थिती ‘अति झाले आणि हसू आले’ अशी झाली आहे. देशातील जनतेने नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी नियुक्त केलेलेच आहे, या आवेगात सुसाट सुटलेल्या भाजपचे वारू पंधरवड्याच्या आत पूर्णपणे भरकटल्याच्या अवस्थेत पोहोचले आहे. ‘दुर्घटनासे देर भली’ या देशभर मैलोन्मैल लावलेल्या सरकारी सूचनेचा पक्षातील आततायी नेत्यांना पूर्णपणे विसर पडला आणि भाजपनेच तयार केलेल्या दलदलीत ‘नमोरथ’ फसला. देशाला ‘सशक्त नेतृत्व’ देण्यासाठी आतुर झालेले नरेंद्र मोदी भाजपचे आणि राष्‍ट्रीय लोकशाही आघाडीचे नेतृत्व करण्यासाठी अद्याप पुरेसे परिपक्व झाले नसल्याचे या महिन्यातील घडामोडींवरून स्पष्ट झाले. भाजपला पेचात पकडणारी परिस्थिती निर्माण करण्यासाठी ‘नमोसेवकांच्या’ बालिश ‘मोदीहट्टा’एवढेच भाजप नेत्यांचे अविचारी वर्तन जबाबदार आहे.

पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या नाराजीचे आणि रालोआतील सहयोगी पक्षांच्या आक्षेपाचे संकेत वारंवार मिळाल्यावरदेखील भाजप नेत्यांनी, विशेषत: पक्षाध्यक्ष राजनाथ सिंग यांनी मोदींच्या हाती निवडणूक प्रचाराच्या चाव्या सोपवण्याबाबत केलेली घाई अत्यंत बोलकी आहे. जर राजनाथ सिंग यांनी याबाबत पुढाकार घेतला नसता, तर अडवाणी यांच्या घरासमोर मोदी-आर्मीने केलेले प्रदर्शन भाजपच्या दिल्लीतील अशोक रोडवरील मुख्यालयापुढे झाले असते आणि ते अधिक मोठे व हिंसक असते. या धास्तीमुळे ‘निवडणूक प्रचारप्रमुखाचे’ पद म्हणजे पंतप्रधानपदाची उमेदवारी नसून यापूर्वी सन 2004 आणि 2009 मध्ये अनुक्रमे प्रमोद महाजन आणि अरुण जेटली निवडणूक प्रचारप्रमुख होते, पण पंतप्रधानपदाचे उमेदवार नव्हते, अशी स्पष्टोक्ती देण्याचा प्रयत्नही भाजपने केला नाही. त्यात ब्रिटिश राजकीय पद्धतीप्रमाणे राजकीय पक्षांनी पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करावा, हे भाजपने सातत्याने आपल्या कार्यकर्त्यांवर बिंबवले असल्याने यापेक्षा वेगळी काही ‘भारतीय पद्धती’ विकसित करण्याचा विचारही या पक्षाला मानवत नाही.


भाजपच्या गोवा कार्यकारिणीच्या काही दिवस आधीच लालकृष्ण अडवाणी यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची विकासाच्या बाबतीतील कामगिरी नरेंद्र मोदींपेक्षा सरस असल्याचे प्रतिपादन केले होते. पक्षाची कमान लगेच मोदींच्या हाती देऊ नये यासाठी अडवाणींनी केलेली ती सूचक सूचना होती. अडवाणी यांनी अजून आपले हे विधान परत घेतलेले नाही, तर मोदींनी यावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. स्वत: मोदींनी शिवराजसिंह चौहान व रमण सिंग यांनी मागासलेल्या राज्यांमध्ये विकासाची उत्तम कामे केल्याचे मान्य करण्याचा मोठेपणा दाखवला असता तर संपूर्ण भाजपचीच प्रतिमा उजळून निघाली असती. मात्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या भाजपशासित राज्यांची प्रशंसा केली असती, तर तोच न्याय मोदींना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनासुद्धा द्यावा लागला असता. गुजरातमधील 10 वर्षांचा मुख्यमंत्रिपदाचा अनुभव देश चालवण्यासाठी पुरेसा असल्याच्या अविर्भावात असलेल्या मोदींना ‘स्व’त्त्वाची बाधा झाली असल्याचे हे लक्षण आहे.


गोवा बैठकीतील अडवाणींची अनुपस्थिती मोदींच्या नावाला विरोध करण्यासाठी असल्याचे स्पष्ट होते. तरीसुद्धा, ‘तब्येत खराब असल्याकारणाने आपणच अडवाणींना येण्याची तसदी घेऊ नका, असा सल्ला दिला आहे’ असे राजनाथ सिंह यांनी तासागणिक प्रसार माध्यमांना सांगत ते ‘भारतीय झुठी पार्टीचे’ अध्यक्ष असल्याचीच प्रचिती दिली. मोदींनी यावर मात करत अडवाणी यांनी आपणास फोन वरून आशीर्वाद दिला असल्याचे जाहीर केले. मोदींना नेमका काय आशीर्वाद मिळाला ते त्यांनाच ठाऊक, पण अडवाणी यांच्या राजीनामा नाट्याने भाजपला जो प्रसाद दिला; त्याने भाजपसह राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघाचेसुद्धा धाबे दणाणले. अडवाणींना भाजपमध्ये राखणे संघासाठी अत्यंत महत्त्वाचे होते, कारण पक्षाच्या बाहेर मोकाट सुटलेले अडवाणी म्हणजे दिशाहीन क्षेपणास्त्र ठरले असते. पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत त्यांनी आपल्या ब्लॉगवर विविध गौप्यस्फोट करत भाजप आणि संघाला जेरीस आणले असते. काँग्रेसवर हल्ले करायचे सोडून भाजपची आपल्या बचावासाठी त्रेधा तिरपीट उडाली असती. ‘घर का भेदी लंका ढाये’ या रामायणातील उक्तीला प्रमाण मानत संघप्रमुख मोहन भागवत यांनी संघाच्या अडवाणी यांच्यावरील राग-लोभाला बाजूस सारत त्यांची समजूत काढण्यासाठी पुढाकार घेतला. अडवाणीसुद्धा ‘अगं अगं म्हशी मला कुठे नेशी’ या भावात निमूटपणे नमलेत. दुसरीकडे गोवा कार्यकारिणीच्या शेवटच्या दिवसापर्यंत ‘भाजपच्या कारभारात संघाचा कुठलाही हस्तक्षेप नसल्याचा छातीठोक दावा करणारे पक्षाचे आणि संघाचे प्रवक्ते’ खरे की, ‘संघप्रमुखांनी पेच सोडवला’ हे सर्वांसमोर अभिमानाने सांगणारे राजनाथ सिंग खरे, असा प्रश्न उभा राहतो. भाजपसारख्या स्वत:ला शिस्तशीर म्हणवणा-या पक्षामध्ये निर्णय संघाकडून म्हणजे पक्ष यंत्रणेच्या बाहेरून घेतले जातात हे सूर्यप्रकाशाएवढे स्पष्ट झाले आहे. अडवाणी यांनी आपल्या राजीनामा पत्रात केलेला, ‘भाजपमध्ये अनेक नेते पक्ष आणि देशाला प्राधान्य देण्याऐवजी आपल्या स्वार्थासाठी राजकारण करत आहेत’ हा गंभीर आरोप अद्याप मागे घेतलेला नाही, तर या आरोपाची शहानिशा करण्याबाबत भाजप काय कारवाई करणार हे पक्षाने स्पष्ट केलेले नाही. भाजपने या आरोपाबाबत ‘वाळूत डोके खुपसणा-या शहामृगाची’ भूमिका घेतली असली, तरी अडवाणींच्या पत्राची इतिहासात नोंद झालेली आहे, ज्याचा दाखला ढोंगी नैतिकतेचे हरण करण्यासाठी वेळोवेळी देण्यात येईल. या काळात अडवाणींनी स्वत:ची महाभारतातील भीष्म पितामहांशी केलेली तुलना भाजप कार्यकर्त्यांना अधिकच गोंधळून टाकणारी आहे. भीष्माचे महात्म मोठे असले तरी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत ते कौरवांच्याच बाजूने लढले होते. भाजप हा भारतीय राजकारणातील कौरव-पक्ष असल्याचा साक्षात्कार आता अडवाणींना झाला आहे आणि ‘अयोग्य पक्षातील योग्य व्यक्ती’ या सन्मानाच्या यादीत भीष्माचार्य आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत आपले नावदेखील कोरले जावे ही त्यांची प्रामाणिक इच्छा उरली आहे. या महाभारतात अडवाणी यांच्या मते ‘दुर्योधन’ कोण आहे, हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही!


अडवाणींच्या राजीनाम्यावर मोदींनी जवळपास ‘नरो वा कुंजरो वा’ भूमिका घेत आपण पक्षापेक्षा खूप मोठे झालो आहोत, हेच जणू दाखवून दिले. ‘आपणच पंतप्रधानपदाचे उमेदवार असून ज्यांना थांबायचे आहे त्यांनी थांबावे अन्यथा आपली वाट धरावी’ हे मोदींनी पुरते स्पष्ट केले आहे. मोदी-समर्थकांना हा त्यांच्यातील देदीप्यमान गुण वाटतो, तर यामुळे अनेकांना त्यांच्यात हुकूमशाही प्रवृत्ती दिसते. संयुक्त जनता दलाने मोदींच्या या स्वभाव-प्रकृतीला विकृती म्हणत त्यांच्यावर घेतलेल्या आक्षेपानंतरदेखील ते नितीशकुमार आणि शरद यादव यांच्या ‘गैरसमजुती’बाबत समजूत काढण्याच्या फंदात पडले नाहीत. मोदींच्या या स्वभावधर्माची जाणीव असल्यामुळे इतर प्रादेशिक नेत्यांनीसुद्धा रालोआचा पदर धरण्याऐवजी तिस-या आघाडीचा राग आवळण्यास पसंती दिली आहे. मागील दोन आठवड्यांतील नरेंद्र मोदींचे राजकारण बेरजेऐवजी वजाबाकीचेच ठरले आहे. आता भाजपच्या संघटनात्मक शक्तीला मतदारांच्या गुणाकाराने कित्येक पट वाढवण्याचे आव्हान मोदींच्या खांद्यावर आले आहे. मात्र, सध्या तरी नरेंद्र मोदींचा थाटात राज्याभिषेक करावयास निघालेल्या भाजपची पुरती शोभा निघाली आहे.