आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अफझल गुरू आणि महाकुंभानंतर. . .

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


संसदेवरील हल्ल्याचा गुन्हेगार अफझल गुरू यास 10 फेब्रुवारी 2013 रोजी सकाळी फाशी दिल्याची बातमी आली आणि काही घटक वगळता संपूर्ण देशाला आनंद वाटला. पुढच्याच दिवशी देशातला नव्हे, जगातला सर्वात मोठा महोत्सव असलेल्या व तीन कोटींपेक्षा अधिक भाविकांची उपस्थिती असलेल्या महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी होऊन त्यात 36 लोक मरण पावले. देशाला धक्के देणा-या या बातम्यांच्या निमित्ताने काही प्रश्न व काही उत्तरं समोर येतात. दर 12 वर्षांनी होणारा हा महाकुंभमेळा. अनेकांच्या नजरेतून हा एक भव्य समारोह आहे. श्रद्धाळूंच्या भावनांबद्दल व विश्वासाबद्दल दुमत असायचे कारण नाही. परंतु जेव्हा जनसमूह इतक्या मोठ्या संख्येने एकत्र येतो; तेव्हा निश्चितच त्यामागे काही गोष्टी असतात. तीन कोटी ही लोकसंख्या मुंबई व ठाणे या विराट महानगरीय प्रदेशाहून अधिक आहे. इतक्या मोठ्या संख्येने इतक्या लोकांनी एका जागी येणं मुळातच काहीसं अनैसर्गिक आहे. साहजिकच जेव्हा संसाधनांवर इतक्या मोठ्या प्रमाणात ताण पडतो; तेव्हा अपघात हा अपवाद नसून नियम बनतो.

मुद्दा श्रद्धेचा नाही तर श्रद्धेच्या अतिरेकाचा आहे. श्रद्धेमधल्या डोळसपणाच्या अभावाचा आहे. अफझल गुरूच्या फाशीवरून येणा-या प्रतिक्रियांमध्येही काहीसं असंच दिसतं. काश्मीरच्या (लडाख व जम्मू हे विभाग वगळता) लोकांची त्याबद्दल टोकाची भावना येणं एका दृष्टीने स्वाभाविकसुद्धा आहे. कारण तिथला पूर्वेतिहास उर्वरित काश्मीर व उर्वरित भारतापेक्षा वेगळाच राहिलेला आहे. त्याबद्दल तिथल्या सामान्य माणसास दोषही देणं योग्य नाही. मुळात काश्मीर प्रश्न किंवा भारत- पाकिस्तान तणाव यांच्यातील मूलभूत दोष समजून घेतला पाहिजे. एक प्रकारे हासुद्धा प्रतीकांना प्रचितीपेक्षा अधिक महत्त्व देण्यामुळे पसरलेला रोग आहे. या संदर्भात गुरू नानकांची एक कथा विचारात घेण्यासारखी आहे. गुरू नानकांनी मक्केत जाऊन हजची पवित्र यात्रा पूर्ण केली होती. त्या वेळचा एक प्रसंग.

मक्केमध्ये असताना एके दिवशी झोपताना गुरू नानकांचे पाय पवित्र काबाच्या दिशेने होते. तिथल्या धर्मगुरूंनी आक्षेप घेतला व अल्लातालाच्या दिशेने पाय करू नका, असं सांगितलं. गुरू नानकांनी माफी मागितली आणि पाय दुसरीकडे वळवले. परंतु आश्चर्य! त्यांनी ज्या दिशेने पाया केले, त्या दिशेस काबाचा चौकोनी पत्थर दिसू लागला! मग गुरू नानकांनीच विचारलं, ‘जिथे अल्लाताला नाही, अशी एक तरी जागा मला दाखवा, तिथे मी पाय ठेवेन.’
कथा प्रतीकात्मक आहे. परंतु तरीही सूचक आहे. ज्याचा भाव खरा असतो, जो मनाने सच्चा असतो, तो वरवरच्या वादांमध्ये किंवा प्रतीकांमध्ये पडत नाही. खरा धर्म प्रतीकांच्या पुढे असतो आणि वर्तनाच्या आतमध्ये असतो. पण आततायी लोकांना हे समजू शकत नाही. . .त्यामुळे अशा जमावांच्या झुंडी अशाच फिरत राहणार आणि त्यातून असेच लहान- मोठे अपघात होत राहणार.

मग या मानसिकतेवर उपाय काय? आजवर मतभिन्नतेमुळे झालेले जे तणाव आहेत; त्या सर्वांवर एक वेगळा पर्याय विचारात घेऊन बघायची गरज आहे. ‘आम्ही’ आणि ‘ते’ असा भेद मानत राहिलो तर शेवटपर्यंत ही दुफळी मिटणार नाही. त्यातून निर्माण होणारा ताण संपणार नाही. यावरचा उपाय हाच असू शकतो, वरवरची लेबलं किंवा प्रतीकं ह्यांच्याकडे दुर्लक्ष करून त्याच्या आतमध्ये असलेल्या अर्थाला जाणून घेणं व अंगीकारणं. हा बौद्ध, हा हिंदू, हा ख्रिश्चन, हा मुस्लिम, हे पुरुष, या स्त्रिया असा तुकड्यांमध्ये विचार न करता आधी आणि नंतरही एक माणूस म्हणून आणि याच तत्त्वाला समोर ठेवून विचार करणं, हे यावरचं उत्तर असू शकतं. ‘आम्ही (पुरुष किंवा हिंदू/ मुस्लिम)‘किंवा ‘ते’ असा विचार करण्याऐवजी जरी ‘ते’ किंवा समोरची व्यक्ती माझ्या प्रतीकांशी निगडित झालेली नसली; तरीसुद्धा ती सन्माननीय आहे; समान आहे, हा भाव आला पाहिजे. म्हणजे अमुक व्यक्ती मुस्लिम नाही; तरीही ती व्यक्ती सुफी परंपरेचा अभ्यास करू शकते; त्यातून स्वत:ची प्रगती करू शकते; असा उन्नत व व्यापक भाव. निव्वळ बाहेरून असा भाव येऊन उपयोग नाही. स्त्रीने पुरुषासारखं किंवा पुरुषाने स्त्रीसारखं बनूनही उपयोग नाही. तर अशी प्रगल्भता यावी की पुरुष आहे का स्त्री आहे, ही बाबच गौण राहून एक व्यापक आणि विशाल अखंड व्यक्तित्व निर्माण व्हावं, स्त्रीपुरुष असमानतेमुळे आणि विषमतेमुळे निर्माण झालेल्या ताणाचा निचरा होऊन भिन्नत्वातही समांतर असलेली सहअस्तित्वाची भावना निर्माण व्हावी. एकदा मुस्लिम, ख्रिश्चन का हिंदू किंवा स्त्री/ पुरुष यापेक्षा माणूसपणाला महत्त्व मिळालं की ताण उरणारच नाही.

पण अर्थातच हे इतकं सोपं नाही. कारण तथाकथित धर्मसत्ता आणि राजकीय सत्ता हे प्रत्यक्षात येऊ देणार नाहीत. कारण असं झालं तर त्यांची दुकानं बंद होतील. त्यांना अफझल गुरू आणि महाकुंभासारख्या घटनांचा राजकीय फायदा घेता येणार नाही. ते बेकार होतील आणि नष्टसुद्धा होतील. म्हणून हे विचार प्रत्यक्षात आणण्यासाठीचा संघर्ष तुमच्या-माझ्यासारख्या सामान्य माणसांनाच करावा लागेल; ज्यामुळे आपण माणूसपण परत प्राप्त करू शकू.

niranjanwelankar@gmail.com