Home | Editorial | Agralekh | agralekh

अपेक्षित विजय (अग्रलेख )

दिव्य मराठी | Update - Jul 23, 2012, 01:37 AM IST

भारतीय जनता पार्टीमध्ये ज्योतिषशास्त्रावर आणि चमत्कार, अवतार वा साक्षात्कार अशा गोष्टींवर विश्वास ठेवणारे बरेच जण आहेत

 • agralekh

  अखेर ‘चमत्कार’ वगैरे काही झाला नाही. बिचा-या पूर्णो संगमांना समर्थन देणारे ‘चमत्कारवादी’ तसे फारसे निराशही होणार नाहीत. कारण त्यांनाही मनोमन माहीत होते की, प्रणव मुखर्जींचा विजय निश्चित आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये ज्योतिषशास्त्रावर आणि चमत्कार, अवतार वा साक्षात्कार अशा गोष्टींवर विश्वास ठेवणारे बरेच जण आहेत. तसे पाहिले तर सर्वच पक्षांमध्ये तसे (अंध) श्रद्धाळू आहेत. सर्वसामान्य माणसे तर अतिशय हलाखीतही दिवस काढतात ते काही तरी चमत्कार घडेल आणि आपले जीवन एकदम सुधारेल या आशेवरच!
  लॉटरीची तिकिटे घेणारे लाखो जण वा ‘मटका’ खेळणारे हे अन्य ‘जुगारी’ चमत्कारावर श्रद्धा ठेवूनच व्यवहार करतात. अत्यल्प लोकांना ‘लॉटरी’ लागते हे तर आपण पाहतोच; पण त्यामुळे इतरांचा तशा शक्यतेवर विश्वास बसतो हेही खरे. मतमोजणीच्या आदल्या दिवसापर्यंत संगमा संभाव्य चमत्कारावर आशा ठेवून होते. चमत्कार आणि नशीब यांचे घनिष्ठ नाते आहे. त्यामुळे संगमा म्हणत असतील की, नशिबाने दगा दिला. त्याच चालीवर मग असे म्हणावे लागेल की, प्रणव मुखर्जींना नशिबाने हात दिला! परंतु प्रत्यक्षात ही निवडणूक नशिबावर विसंबून नव्हे, तर राजकारणातील डावपेच, गणित आणि प्रत्यक्ष प्रचार हे सर्व करून झाली. किंबहुना त्या गणिताच्या आधारेच असे निश्चितपणे सांगता येत होते की, चमत्कार वगैरे काही होणार नाही आणि प्रणव मुखर्जींची बहुमताने राष्ट्रपतिपदी निवड होईल. आपल्या राजकारणातील जे जे विद्रूप आहे त्याचे दर्शन या निवडणुकीमुळे झाले. दिल्लीतील जवळजवळ सर्व स्वयंसिद्ध शहाणे पत्रकार छातीठोकपणे सांगत असत की, सोनिया गांधींना प्रणव मुखर्जींबद्दल इतकी नफरत आहे की, त्या राष्ट्रपतिपदासाठी त्यांचे नाव कधीही सुचविणार नाहीत.
  नफरतीचे कारण असे सांगितले जात असे की, इंदिरा गांधींच्या हत्येनंतर, 1984 मध्ये प्रणव मुखर्जींनी पंतप्रधानपदाचा दावा केला होता; परंतु राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतर प्रणवदांनी पक्ष सोडला आणि एक वेगळा लहान पक्ष काढला हे खरे असले तरी त्यांनी काँग्रेसची विचारप्रणाली आणि इंदिरा गांधींचा राजकीय वारसा कधीच दूर केला नाही. म्हणूनच काही वर्षांनी राजीव गांधींनी त्यांना परत मंत्रिमंडळात घेतले. राजीव गांधींच्या सरकारचा 1989 मध्ये पराभव झाल्यानंतरसुद्धा प्रणव मुखर्जी काँग्रेसमध्येच होते आणि पंतप्रधान नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळातही त्यांनी महत्त्वाची खाती सांभाळली. त्याचप्रमाणे 1996 मध्ये काँग्रेसचा पराभव झाल्यानंतरही विरोधी पक्षात राहून प्रणवदांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होती. सोनिया गांधींचे सक्रिय राजकारणात पदार्पण 1998-99 मध्ये झाले. म्हणजे राजीव गांधींच्या हत्येनंतर सात-आठ वर्षांनी. त्या वेळेस शरद पवार काँग्रेसमध्येच होते. जे लोक काँग्रेसवर नेहरू-गांधी घराणेशाहीचा आरोप करतात त्यांनी हे विशेष करून लक्षात ठेवायला हवे. 1991 ते 1998-99 या दीर्घ काळात काँग्रेसच्या अग्रस्थानी कुणीही नेहरू-गांधी नव्हते.
  शरद पवारांपासून ते नरसिंह राव वा अर्जुन सिंग यांच्यापासून ते चिदंबरमपर्यंत कुणीही काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारून संघटनेला दिशा दाखवू शकले असते. सीताराम केसरी तेव्हा अध्यक्ष होतेच. पण 1996 नंतर काँग्रेसचा सातत्याने पराभव होत होता आणि त्या पार्श्वभूमीवर सर्व श्रेष्ठ नेत्यांनी सोनियांना सक्रिय राजकारणात येण्याची विनंती केली. सोनिया गांधींनीही त्वरित मान्यता दिली नाही; पण 1996चा पराभव, त्यानंतर वाजपेयींचे 13 दिवसांचे सरकार, त्यापाठोपाठ देवेगौडांचे अल्पायुषी सरकार आणि त्यानंतर काही महिन्यांसाठी आलेली इंद्रकुमार गुजराल यांची राजवट असे अस्थैर्य माजले होते. या अस्थैर्याला काँग्रेसच आळा घालू शकेल, या भावनेतून काँग्रेस नेत्यांनी सोनियांना आर्जव केले होते. भाजप आघाडी 1998मध्ये निवडून आली खरी; पण 13 महिन्यांनी त्यांचेही सरकार पडले. या परिस्थितीत आपले नाव पंतप्रधानपदासाठी पुढे येईल, असे शरद पवार यांना तेव्हा वाटले होते. ते आले नाही आणि म्हणून त्यांनी सोनिया गांधींच्या विदेशी जन्माचा मुद्दा पुढे करून पक्षात बंड केले. जर प्रणवदांना दगाबाजी करायचीच असती तर ते 1999 मध्येच पवारांच्या तंबूत दाखल झाले असते; परंतु विरोधात असूनही प्रणवदा पक्षातच राहिले. त्यामुळे ज्यांना प्रणव मुखर्जी ‘विश्वासार्ह’ वाटत नाहीत त्यांनी या बाबीचा विचार करायला हवा की, प्रणवदांनी कधीही ‘पवारगिरी’ केलेली नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल सोनिया गांधींना नफरत होती या म्हणण्याला अजिबात पुरावा नव्हता.
  प्रणव मुखर्जींना उमेदवार केले जाणार नाही याची भाजपला इतकी खात्री होती की, त्यांनी बराच काळ त्यांचा उमेदवारच जाहीर केला नाही. मध्येच समाजवादी पक्षाने एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव सुचविले तेव्हा भाजपने त्या नावाला पाठिंबा देऊ केला. मधल्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य पी. ए. संगमा यांनी स्वत:ची उमेदवारी जाहीर करून ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे समर्थन मिळवले. भाजपने त्याही नावाला अनुकूलता दर्शविली; पण प्रत्यक्ष कोणाचेच अधिकृत समर्थन केले नाही. अनपेक्षितपणे मुलायमसिंह आणि ममता यांनी एक नवीन आघाडी स्थापन करून एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावाची घोषणा केली; परंतु काँग्रेस राजी असेल तर त्यांनी डॉ. मनमोहन सिंग यांचे नाव जाहीर करावे, त्या नावाला समाजवादी व तृणमूल पाठिंबा देईल, असे म्हटले. त्यांचा तिसरा पर्याय होता लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी. या मुलायम-ममतांच्या आकस्मिक खेळीमुळे राष्ट्रपतिपदाची निवडणूक चुरशीची होणार, असे चित्र निर्माण झाले. इतके की, काँग्रेसने प्रणव मुखर्जींचे नाव निश्चित केले तरीही निवडणूक अटीतटीची होणार, असा मीडियाचा होरा होता; परंतु या सर्व गोंधळाच्या वातावरणाला सोनिया गांधींनी यूपीएच्या वतीने सुरुंग लावला. त्यांनी प्रणव मुखर्जींचे नाव घोषित केले आणि काही तासांतच समाजवादी पक्ष, युनायटेड जनता दल यांनी प्रणवदांना पाठिंबा जाहीर केला. आपण उभे राहिलो तरी निवडून येणार नाही हे दिसताच कलाम यांनी नाव मागे घेतले आणि ममता बॅनर्जींप्रमाणेच भाजपलाही उताणे पाडले. आता संगमांना पाठिंबा देऊन स्वत:ची राजकीय अब्रू वाचविण्याखेरीज दुसरा पर्याय भाजपला उरला नव्हता; पण ‘पडलो तरी टांग उपर’ या म्हणीप्रमाणे ‘चमत्कार होईल, सद्सद्विवेक बुद्धीने मतदान होऊन संगमा निवडून येतील’ असा प्रचार भाजपने चालू ठेवला.
  अखेर त्यांना अभिप्रेत असलेला चमत्कार झाला नाही. लोकांनी खरोखरच सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून मतदान केले आणि प्रणवदा अपेक्षेपेक्षा किती तरी अधिक मतांनी राष्ट्रपतिपदासाठी निवडून आले. त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!

Trending