पराभवानंतरचे कवित्व (अग्रलेख / पराभवानंतरचे कवित्व (अग्रलेख )

दिव्य मराठी

Jul 24,2012 05:00:06 AM IST

पूर्णो संगमांचा दारुण पराभव होणे अटळ होते, जितका प्रणव मुखर्जींचा विजय निश्चित होता; परंतु काही लोकांची ‘जेनेटिकल डिसऑर्डर’ म्हणजे मूळ प्राकृतिक गुणसूत्रांमध्येच गडबड वा विकृती असते. त्यात संगमा आहेत की काय, असा संशय घ्यायला जागा आहे. तशीच ‘डिसऑर्डर’ अण्णा हजारेंच्या चळवळीतील केजरीवाल आणि कंपनीतही असावी. प्रणव मुखर्जींचा विजय घोषित होऊन अजून पुरे 24 तासही उलटून गेलेले नाहीत तोच संगमांनी त्या निवडणूक प्रक्रियेबद्दलच शंका व्यक्त करून प्रणवदांच्या निवडीला न्यायालयात आव्हान द्यायचे ठरवले आहे.
गंमत म्हणजे, तशी खळखळ व्यक्त करण्याअगोदर त्यांनी प्रणवबाबूंचे अभिनंदनही केले. अण्णांचे सहकारी केजरीवाल यांची पोटदुखी थोडीशी वेगळी आहे. प्रणव मुखर्जी हे भ्रष्ट गृहस्थ असून त्यांना राष्ट्रपती होण्याचा नैतिक अधिकारच नाही, असे त्यांनी म्हटले आहे. केजरीवाल यांच्या मते पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हेसुद्धा भ्रष्ट आहेत, म्हणून त्यांनाही त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही! म्हणजे आपल्या देशात 100 टक्के चारित्र्यसंपन्न व्यक्ती फक्त पाचच आहेत. सर्वात जास्त चारित्र्यसंपन्न अर्थातच सुपर-महात्मा अण्णा. त्यानंतर केजरीवाल, प्रशांत भूषण आणि किरण बेदी. पाचवे चारित्र्यवान गृहस्थ म्हणजे योगी रामदेवबाबा! पण रामदेवबाबांना केजरीवाल कंपनीचा विरोध आहे.
त्यामुळे पाचवी पवित्र जागा प्रशांत भूषण यांचे पिताश्री शांती भूषण यांना प्रदान करता येईल. त्यांच्यापैकी कुणीही पूर्णो संगमांना चारित्र्याचे प्रशस्तिपत्र दिलेले नाही. यावरून ‘जेनेटिक डिसऑर्डर’ असलेल्या सर्वांची एकजूट होतेच, असेही नाही. या चारित्र्यवान मंडळींपैकी केजरीवाल यांनी भारतीय महसूल सेवेत असताना सेवाशर्तींचा भंग केला होता. त्यामुळे त्यांना भरघोस दंड भरावा लागला. किरण बेदींनी एकाच विमान प्रवासासाठी अनेकांकडून प्रवासभत्ता घेतला. प्रशांत व शांती भूषण यांनी काही कोटी रुपयांची जमीन आपला सामाजिक प्रभाव वापरून स्वस्तात प्राप्त करून घेतली. संगमा व अण्णांचे सूर जुळणार नाहीत, कारण अण्णा हे कट्टर दारूबंदीवाले. ‘दारू पिणा-याला झाडाला उलटे टांगा, बांधा व फटके मारा’, असे हुकूम अण्णा काढत असत. गांधीजीसुद्धा दारूबंदीचा प्रचार करायचे; पण ते हिंसेच्याही विरोधात होते. त्यामुळे दारू पिणा-याला व्यसनमुक्त करण्यासाठी त्यांचा मार्ग ‘मन परिवर्तन’ करण्याचा होता. संगमांच्या मते ईशान्य भारतात मद्य व मांसाहार त्यांच्या संस्कृतीचा भाग आहे. त्यांच्या सांस्कृतिक अस्मितेत बीफ ऊर्फ गोमांसही चालते, असे ते मानतात. (तरीही त्यांना भाजपने पाठिंबा कसा दिला कळत नाही. असो.)
तर मुद्दा हा की, आता दारुण पराभव झाल्यानंतर ब-याच मंडळींना कवित्व स्फुरू लागले आहे. फक्त संगमा व केजरीवालच नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्माननीय साहेब शरद पवार यांनाही. मतदान होता होताच प्रणवदांचा विजय निश्चित झाला होता. पवारांनी प्रणवदांना शिवसेनेची व इतरही काही विरोधी पक्षांची मते मिळावीत म्हणून कसून प्रयत्न केले होते. अनेकांना पवारांच्या त्या ‘नि:स्पृह’पणे केलेल्या प्रचाराबद्दल कौतुकही वाटले होते; पण मतदान संपता संपताच पवारांनी ‘यूपीए’ला एक आव्हान दिले. प्रणवदा कॅबिनेटमध्ये क्रमांक दोनवरचे मंत्री म्हणून ओळखले जात. प्रणवदांची राष्ट्रपतिपदावर पदोन्नती झाली की त्यांची क्रमांक दोनची खुर्ची खाली होईल, हा हिशेब करून पवारांनी तो ‘नि:स्पृह’ पाठिंबा दिला होता, हे सर्वांच्या नंतर लक्षात आले; परंतु प्रत्यक्षात क्रमांक दोनचा मुद्दा नाही, तर आपल्या पक्षाची दखल घेतली जात नाही, आपल्याशी (एकूणच मित्रपक्षांशी) सल्लामसलत केली जात नाही आणि आपल्याला सन्मानाने वागवले जात नाही, असे ‘मूलभूत’ मुद्दे असल्याचे पवारांनी सांगितले.
पवारांचे हे तसे पहिले बंड नाही. बरोबर 35 वर्षांपूर्वी त्यांनी काँग्रेसमध्ये बंड करून स्वत:चा काँग्रेस (समाजवादी) हा पक्ष काढला. मग त्या पक्षाच्या सूत्रसंचालनाखाली पुरोगामी लोकशाही दल ऊर्फ ‘पुलोद’ची स्थापना केली. या ‘पुलोद’ला खुद्द यशवंतराव चव्हाणांचा आशीर्वाद होता, असे ते म्हणतात; परंतु स्वत: यशवंतरावांनी मात्र 1980मध्ये पुन्हा ‘स्वगृही’ म्हणजे काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि इंदिरा गांधींचे नेतृत्व स्वीकारले. शरद पवारांनी मात्र यशवंतरावांचे ते ‘मानसपुत्र’ असूनही ‘स्वगृही’ जायला नकार दिला. परिणामी 1980मध्ये ‘पुलोद’चे सरकार बरखास्त केले गेले. त्यानंतर 1980 ते 1986 अशी सहा वर्षे पवारांनी राजकीय वनवासात काढली. सत्तेपासून सहा वर्षे दूर राहिल्याचे चटके सहन होईनात तेव्हा त्यांनी परत राजीव गांधींच्या काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आपल्याला आल्या-आल्या मुख्यमंत्रिपद मिळेल, असे त्यांना वाटले होते. ते मिळाले नाही म्हणून त्यांनी पक्षात बरीच धांदल-गडबड केली.
अखेर ते 1988मध्ये मुख्यमंत्री झाले; परंतु 1989मध्ये केंद्रातील राजीव गांधींचे सरकार पडून व्ही. पी. सिंग यांचे सरकार आले. व्ही. पी. सिंग यांनी पवारांच्या ‘पुलोद’ची राष्ट्रीय कॉपी करून देशात ‘नॅशनल फ्रंट’चे सरकार प्रस्थापित केले. राजीव गांधी तेव्हा विरोधात होते. व्ही. पी. सिंग सरकार वर्षभरही टिकले नाही. मग चंद्रशेखर पंतप्रधान झाले. पवार व चंद्रशेखर यांचे घनिष्ठ राजकीय संबंध; पण चंद्रशेखर यांचे सरकारही गडगडले. नंतर झालेल्या निवडणुकांच्या काळात राजीव गांधींची हत्या झाली. त्यानंतर आलेल्या नरसिंह राव सरकारमध्ये पवार संरक्षणमंत्री झाले. मुंबईत त्यांचेच पिट्टू सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री झाले; परंतु सुधाकररावांनी पवारांवरच शरसंधान केल्यावर नरसिंह रावांनी पवारांना राज्यात मुख्यमंत्री म्हणून पाठवले. या सर्व काळात सोनिया गांधी राजकारणात नव्हत्या. सोनियांनी राजकारणात यावे म्हणून पवार यांनीही प्रयत्न केला; पण पुढे त्यांच्याच ‘विदेशी’ मुळाचा मुद्दा उपस्थित करून पुन्हा बंड केले.
आता त्यांनी फडकावलेले बंडाचे निशाण असेच 2014च्या निवडणुका जवळ आल्यावरच्या पार्श्वभूमीवर आहे. तेव्हा म्हणजे 1999मध्येही निवडणुका जवळ आल्यावरच पवारांनी बंड केले होते. म्हणजेच त्यांच्या बंडांना एक तर्कपरंपरा आहे; परंतु आजवरची त्यांची सर्व बंडाळी त्यांना लाभदायक ठरलेली नाही - नव्हे, आत्मघातकीच ठरली आहे. संगमांच्या दारुण पराभवानंतरच पवारांना हे ‘बंडकाव्य’ स्फुरले आहे. त्याची गत काय होते हे लवकर दिसेलच!X