प्रणवदांचे निरूपण / प्रणवदांचे निरूपण (अग्रलेख )

दिव्य मराठी

Jul 26,2012 04:24:30 AM IST

प्रणव मुखर्जी यांनी भारताचे तेरावे राष्ट्रपती म्हणून बुधवारी शपथ घेतली आणि एका अर्थाने देशातील नव्या पर्वाला सुरुवात केली. वयाच्या 77व्या वर्षी या सर्वोच्च पदाची सूत्रे हाती घेताना त्यांना गहिवरून आले ते कृतज्ञतेच्या भावनेतून आणि आपल्यावर देशाने एवढा विश्वास दाखवल्याबद्दल त्यांना वाटणार्‍या ऐतिहासिक जबाबदारीच्या भावनेतून.
एका सामान्य भद्रलोकी-ब्राह्मणी कुटुंबात आणि तेही बंगालच्या एका खेड्यात 1935मध्ये (11 डिसेंबर) जन्माला आलेल्या मुलाला आपण एक दिवस या देशाचे राष्ट्रपती होऊ, असे वाटणे शक्यच नव्हते. खरे म्हणजे, तेव्हा तर देशाला स्वातंत्र्यही मिळाले नव्हते. भारताला 1947मध्ये स्वातंत्र्य मिळेल, हेसुद्धा ठरलेले नव्हते. स्वातंत्र्य चळवळ पूर्ण जोशात होती. प्रणवबाबूंचे वडील काँग्रेसचे कार्यकर्ते होते आणि विविध सत्याग्रहांमध्ये भाग घेतल्यामुळे त्यांना एकूण 10 वर्षे कारावासही भोगावा लागला होता. म्हणजे स्वातंत्र्यचळवळीतील मूल्यांचा आणि काँग्रेसचा वारसा घरातूनच आला होता; पण एवढय़ा भांडवलावर कुणी सुमारे 40 वर्षे मंत्रिपदावर आणि नंतर राष्ट्रपतिपदापर्यंत पोहोचत नाही. किंबहुना कुणी पंतप्रधान वा राष्ट्रपती होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली म्हणजे ते पद प्राप्त करू शकेल, असेही नाही. डॉ. मनमोहन सिंग हे तर राजकारणातही नव्हते. (काही जण आजही छद्मीपणे म्हणतात की, आता तरी ते कुठे राजकारणात आहेत?) ते 1991मध्ये अर्थमंत्री झाले तेही आकस्मिकपणे. तसे पाहिले तर डॉ. मनमोहन सिंग यांना प्रणव मुखर्जींच्या सल्ल्यानेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर केले गेले होते. पुढे त्याच प्रणवदांना डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री म्हणून काम पाहावे लागले. (कित्येक व्यक्ती अशा प्रसंगांनी हाय खातात, तणतण-चिडचिड करतात; पण प्रणवदांनी तसे काही न करता आपल्याकडे दिल्या गेलेल्या सर्व जबाबदार्‍या तत्परतेने पार पाडल्या.) जरी ते अर्थमंत्री असले तरी त्यापूर्वी त्यांनी संरक्षण, गृह, परराष्ट्र, व्यापार अशी अनेक खाती सांभाळली होती. त्यांच्याएवढा प्रशासकीय व राजकीय अनुभव असलेली दुसरी कोणतीही व्यक्ती आज सत्तेत नाही. प्रणवदांइतका अनुभव असलेल्या दुसर्‍या एखाद्या व्यक्तीला सत्तेचा दर्प आला असता किंवा इतका काळ सत्तेत राहिल्यामुळे औद्धत्य आले असते. प्रणवदांनी त्यांच्या जीवनाची सुरुवात गरीब खेड्यात आणि शाळेत असताना तेव्हा पडलेल्या महाभयंकर दुष्काळात केली होती.
राष्ट्रपतिपदाची शपथ घेतल्यानंतर केलेल्या भाषणात प्रणवदांनी त्या दुष्काळात बळी पडलेल्या लाखो लोकांचा संदर्भ देऊन म्हटले की, ती हलाखी, ते दु:ख, ते दारिद्रय़ आपण कधीही विसरू शकणार नाही. तो संदर्भ देऊन ते म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या 65 वर्षांत भारताने खूप काही साध्य केले आहे. आता तसे दुष्काळ आणि तसे भूकबळी दिसत नाहीत; पण म्हणून आपण एकूण दारिद्रय़, अन्याय, विषमता आणि अपमान दूर करू शकलेलो नाही, याचेही भान ठेवायला हवे. अजून बरेच काही साध्य करायचे आहे. गांधीजींना अभिप्रेत असलेला करुणा व न्याय या मूल्यांवर र्शद्धा असलेला देश निर्माण करायचा आहे. स्वामी विवेकानंदांच्या उद्गारांना उद्धृत करून प्रणवदा म्हणाले, ‘सार्मथ्य ऐहिकतेतून प्राप्त होत नाही, तर चैतन्यदायी ऊर्जेतून प्राप्त होते.
हिंसा आणि विनाशी वृत्ती बाळगून काहीही साध्य होत नाही, तर प्रेम आणि शांतता या मूल्यातून जीवन समृद्ध होते.’ या विचारांची देशाला आज खरोखरच गरज आहे. हिंसेचे तत्त्वज्ञान जाहीरपणे मांडणारे राजकारणी आपल्यात आहेत. मानवता नव्हे, तर धर्मवाद सांगून राजकारण करणारे लोक आपल्यात आहेत. प्रेमापेक्षा विद्वेष आणि शांततेपेक्षा युद्धखोरीचे तत्त्वज्ञान सांगणारे आणि धर्मा-धर्मात वा जाती-जातीत विष पसरवून सत्ताकारण करणारे लोक आपल्यात आहेत. कित्येक स्वयंघोषित हिंदुत्ववाद्यांनी स्वामी विवेकानंद म्हणजे जणू त्यांच्या पक्षाचे संस्थापक आहेत, असा आविर्भाव आणलेला असतो. अशा महाभागांना विवेकानंदांचे हे विचार बहुधा माहीतही नसावेत. प्रणव मुखर्जींनी आपल्या भाषणात ‘वैविध्यातून एकता’ हे पंडित नेहरूप्रणीत सूत्र गुंफले होते. भारत हा वैविध्याने नटलेला देश आहे. कित्येक भाषा, शेकडो बोलीभाषा, अनेक धर्म, अनेक पंथ, कित्येक जीवनशैली, अनेक लोककला व सांस्कृतिक आविष्कार असलेल्या या देशाला एकाच धर्माच्या, भाषेच्या, संस्कृतीच्या चौकटीत बांधून ठेवणे हे या देशाच्या स्वाभाविक प्रकृतीशी प्रतारणा करणारे आहे. वंश वा त्वचेचा रंग, जातीय उतरंड, उच्चवर्ण वा नीच या भेदांमुळे भारत आणि त्याचे महानपण पोखरले जाते, याचे भान ठेवण्याचे आवाहन प्रणवदांनी आपल्या भाषणात केले.
मुख्य भान ठेवायला हवे ते दारिद्रय़ाचे, उपेक्षेचे आणि हलाखीचे, हे त्यांनी आवर्जून सांगितले. अप्रत्यक्षपणे त्यांनी म्हटले की, सेन्सेक्सवर देशाची समृद्धी अवलंबून नसते. किती लोक कोट्यधीश आहेत यावर देशाची दारिद्रय़रेषा ठरत नाही. किती लोकांना चैन-चंगळवाद करण्यासाठी पैसे आहेत त्यावरून देशाचे उत्पन्न ठरत नाही. अप्रत्यक्षपणेच त्यांनी या उद्गारातून अन्नसुरक्षा विधेयकाचा आणि रोजगार हमीच्या धोरणाचा पाठपुरावा केला आहे. आज याच मुद्दय़ांवरून देशात रणकंदन चालू आहे. प्रणवदांनी त्यांच्या भाषणातून देश कोणत्या धोरणांचा व भूमिकांचा पाठपुरावा करेल, हे सुस्पष्टपणे मांडले आहे. एका बाजूने उग्र धर्मवादाने आपल्या राजकारणाला घेरले आहे, तर दुसर्‍या बाजूने लोभवादाच्या वृत्तीने अर्थकारणाला घेरलेले आहे. काही ठिकाणी ‘विकासा’च्या नावाखाली उग्र धर्मवाद आणि दर्पयुक्त लोभवाद यांचे विकृत मिर्शण करून एक नवीन हिंस्र विचारसरणी पसरवली जात आहे. प्रणवदांनी भारताच्या समाजकारण व राजकारणाला असलेली गांधीजी-डॉ. आंबेडकर यांची मूल्यपरंपरा अधोरेखित करून देशाचे तेजस्वीपण कशात आहे हे सांगितले आहे. पुढील पाच वर्षांच्या काळात प्रणवदांना बर्‍याच वेळा अनेक प्रकारच्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल. ते तोंड देताना ज्या विचारांच्या आधारे ते ती आव्हाने झेलतील, याचेच निरूपण त्यांनी भाषणात केले आहे!X
COMMENT