Home | Editorial | Agralekh | agralekh

पवारांची सेंच्युरी! (अग्रलेख )

दिव्य मराठी | Update - Jul 27, 2012, 12:44 AM IST

राजकारणात तुम्ही काय करता यापेक्षा तुमची जनमानसात प्रतिमा कशी तयार केली जाते याला खूप महत्त्व आहे

 • agralekh

  आदरणीय शरद पवारसाहेब अखेर जिंकले! खरे म्हणजे शरद पवार हे कधीच हरत नाहीत, त्यामुळे ते शून्यावर आऊट झाले तरीदेखील शून्याच्या आधी दहाचा आकडा लावून त्यांनी सेंच्युरी मारली आहे, असा प्रचार करणारे अनेक जण आहेत. आधुनिक व सध्याच्या उत्तर आधुनिक युगात प्रचारालाच तर सर्वाधिक महत्त्व आहे. राजकारणात तुम्ही काय करता यापेक्षा तुमची जनमानसात प्रतिमा कशी तयार केली जाते याला खूप महत्त्व आहे. नेमके हेच महत्त्व ओळखून तर ‘थर्ड राईश’मध्ये गोबेल्सला हिटलरने प्रचारमंत्री बनवले होते.
  बिचा-या हिटलरकडे मात्र एकच गोबेल्स होता. आदरणीय पवारसाहेबांकडे असे ढिगांनी गोबेल्स पडले आहेत. त्यामुळे ते शून्यावर क्लीन बोल्ड झाले तरी स्कोर बोर्डवर मात्र त्यांच्या नावे सेंच्युरीच झळकलेली असते. समोर सामना बघणारे प्रेक्षक मात्र त्यामुळे अवाक् होतात. शून्यावर आऊट होऊनही या खेळाडूच्या नावे सेंच्युरी कशी काय बुवा झळकली, असले सामान्य प्रश्न पडलेली जनता तोंडात बोटे घालून याविषयी काही चर्चा करणार, तोच पवारसाहेब दुसरा सामना खेळायला मैदानात पुन्हा उतरलेलेदेखील असतात. त्या नियमानुसारच आठवडाभर आधी आदरणीय पवारसाहेब केंद्रातील ज्या यूपीए आघाडी सरकारवर रागावले होते, त्याच सरकारवर त्यांचा आता कोणताही राग नसल्याचे त्यांचे शिलेदार प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केले आहे. पवारसाहेब नक्की रागावले किंवा नाही, रागावले असलेच तर कशामुळे रागावले, त्यांचा राग नक्की काय केल्यास शमेल, या गोष्टी तशा फुटकळ असल्याचे पवारसाहेबांच्या गोबेल्सना वाटत असल्याने त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले व पवारसाहेब रागावले, पवारसाहेब रागावले, असा डंका वाजवायला सुरुवात केली.
  पवारसाहेबांची ताकद किती प्रचंड आहे, हे आपल्याला माहीतच आहे. देशातील 28 राज्यांमधील केवळ महाराष्ट्रात त्यांचे 62 आमदार निवडून आले आहेत. गुजरात, गोवा या राज्यांतही त्यांचे एक-दोन आमदार नावाला आहेत म्हणा. मेघालयातील राष्ट्रवादी पवारांची नसून संगमांची असल्याने त्याबाबत न बोललेलेच बरे. महाराष्ट्रात त्यांच्या खासदारांची संख्या आठ. अर्थात संसदीय लोकशाही हा संख्येचा खेळ असला तरी पवारसाहेबांचा एकेक शिलेदार कोट्यवधींच्या बरोबरीचा आहे. त्यामुळे पवारसाहेब केंद्रावर रागावल्यानंतर देशभरातील प्रसारमाध्यमांमधील अनेक गोबेल्सना मोठी स्वप्ने पडू लागली. आता काही तरी मसाला मिळणार, केंद्रात मोठीच उलथापालथ होणार, सोनिया गांधींपासून ते राहुल गांधींपर्यंत सर्वांनाच पळता भुई थोडी होणार, बातम्यांचा नुसता खच पडणार आणि साहेबांशी आपले सौहार्दाचे संबंध असल्याने आपल्याकडेच ब्रेकिंग न्यूज येणार, या स्वप्नरंजनात असलेल्या गोबेल्सनी दे दणादण तीन-चार दिवस बातम्या पसरवल्या.
  राजीनामा दिला, राजीनामा देणार आहेत, राजीनामा लिहून ठेवलाय, राजीनामा बंद पाकिटात पंतप्रधानांकडे देऊन आलेत, सोनिया गांधींना भेटून त्यांनी या सत्तेत आता जीव रमत नाही, वगैरे सांगितले आहे, अशा तर्क-वितर्कांनी दिल्ली ते गल्ली जणू दणाणून गेली. जणू काही देशासमोरील बेकारी, महागाई, दुष्काळ, गरिबी, विकास, धर्मांधता हे सर्व प्रश्न संपून पवारसाहेब मंत्रिमंडळात राहणार की नाही, यावरच पाच हजार वर्षांपेक्षाही अधिक मोठी परंपरा असलेल्या या महान देशाचे भवितव्य अवलंबून होते. मात्र, प्रत्यक्षात झाले भलतेच. पवारसाहेबांनी नेहमीप्रमाणे आपल्या सर्व गोबेल्सना तोंडावर पाडले आणि निमूटपणे मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी लावण्याचे मान्य केले. यामुळे पवारसाहेबांच्या गोबेल्सनी खरे तर आदरणीय साहेबांना याचा जाब विचारायला हवा होता. मात्र, नेत्याने दाखवलेली दिशा ही कायम योग्यच असते, हे या गोबेल्स मंडळींना व्यवस्थित माहीत असल्यामुळेच त्यांनी पवारसाहेब जिंकले, पवारसाहेबांनी दिल्लीला नमवले, आता केंद्रात समन्वय समिती होणार, याआधी हे कुणालाही जमले नव्हते, असा प्रचार सुरू केला आहे.
  खरे तर पवारसाहेबांचा अपमान केला जातो, असे त्यांचे शिलेदार प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले होते. पवार यांच्यासारख्या ज्येष्ठाचा अपमान झाला असल्यास त्यांनी अशी नांगी टाकणे बिलकूलच योग्य नव्हते. आम्ही यापूर्वीच छत्रपती शिवरायांचा दिल्लीने अपमान केल्यावर त्यांनी ताठ मानेने बादशहासमोर झुकायला नकार दिल्याची आठवण करून दिली होती. शिवरायांना त्या बदल्यात दिल्लीने नजरकैदेत टाकल्यावर महाराजांनी तेव्हाच्या दिल्लीतील अधिका-यांना पेटारे पाठवून गाफील केले व रयतेच्या भल्यासाठी ते शत्रूच्या हातावर तुरी देऊन कैदेतून निसटले होते. मात्र, हा इतिहास झाला. तेव्हा रयतेच्या भल्यासाठी पेटारे पाठवून त्याद्वारे निसटण्याचा विचार केला जात होता. आता पेटारे देण्याचा नाही, घेण्याचा जमाना आहे. त्यामुळे अपमान झाला तर काय मोठेसे? पुन्हा एकदा अपमान करून घेण्यासाठी पवारसाहेबांनी राग गिळला आहे. पवारसाहेबांनी आजवर जितक्या वेळा असेच रागावून बंड करण्याचा प्रयत्न केला, तितक्या वेळा त्यांनी घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात जाऊन त्यांनी त्यांच्या समर्थकांची व त्यांची प्रचारयंत्रणा सांभाळणा-या शेकडो गोबेल्सची पंचाईत केलेली आहे.
  सोनिया गांधी या विदेशात जन्मल्याचा त्यांना जणू 1999मध्ये साक्षात्कार झाला. त्यावरून त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती केली. मग त्याच सोनिया गांधींच्या काँग्रेसबरोबर राज्यातील सत्तेत सहभागी झाले. पवारसाहेबांचे हे असेच असते; पण त्यालाच राजकीय मुत्सद्दीपणा वगैरे म्हणतात, असे त्यांच्या गोबेल्सचे म्हणणे असते. या वेळीही खरे तर शरद पवार यांना केंद्रात व राज्यात स्वत:ची ताकद आजमावायची असावी. त्यांच्या रागावण्याला भुलून केंद्रातील किती पक्ष त्यांची विचारपूस करतात व राज्यातील त्यांच्या पक्षात काय उलथापालथ होते, हे त्यांना पाहायचे होते. ते त्यांनी नीट आजमावले असावे. केंद्रात त्यांच्या या रागावण्याने कुणाच्या मनाला फारसा पाझर फुटल्याचे ऐकिवात नाही, तर राज्यातील सगळे राष्ट्रवादी नेते अजितदादांकडे जाऊन भलतेसलते करून वड्याचे तेल वांग्यावर काढू नका, आपण साहेबांना समजवा, अशा विनंत्या करत होते, असे समजते. त्यामुळेच शेवटी हाती धुपाटणे घेऊन फिरण्यापेक्षा समन्वय समितीचे कारण चेहरा लपवण्यासाठी काँग्रेस नेत्यांना देण्याची आर्जवे करावी लागली.
  असो, 2014मध्ये पंतप्रधानपदाच्या शर्यतीत धावणारे प्रमुख स्पर्धक म्हणून ज्यांच्याकडे देशातील अनेकांचे लक्ष होते, त्यांनी कारण नसताना राजकीय कारकीर्दीच्या शेवटच्या काळात अशी शोभा करून घेणे ही त्यांच्यासाठीच नव्हे, तर महाराष्ट्रासाठीही दुर्दैवाचीच गोष्ट आहे, हे मान्य करावेच लागेल.

Trending