अलविदा लंडन (अग्रलेख / अलविदा लंडन (अग्रलेख )

दिव्य मराठी

Aug 14,2012 04:03:05 AM IST

लंडनच्या ऑलिम्पिक स्टेडियमवर रविवारच्या रात्री रंगलेला ऑलिम्पिक स्पर्धेचा सांगता सोहळा हा केवळ ब्रिटनच्या नव्हे तर युरोपच्या नव्या वाटचालीसाठी एक आश्वासक पाऊल होते. कवायती करणारे कलावंत, त्यांच्या साथीला रंगकर्मी, फॅशन दुनियेतील देखण्या मॉडेल्स व ब्रिटनच्या संगीतविश्वातील दिग्गज यांच्या विविध अदाकारींमुळे हा सोहळा नयनरम्य झाला. गेली तीन-चार वर्षे आर्थिक मंदीच्या तडाख्यात युरोप पुरता पोळून गेल्याने त्यांच्यामध्ये आत्मविश्वास व ऊर्मी येण्याची गरज होती. ती ऊर्मी लंडन ऑलिम्पिकच्या यशस्वी संयोजनातून दिसून आली. गेले 17 दिवस संपूर्ण लंडन शहर जागते राहिले. 204 देशांमधून आलेले हजारो खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, जगभरातून आलेले लाखो क्रीडारसिक यांच्या उपस्थितीत हा सोहळा कोणताही अनुचित प्रकार न होता शांततेत पार पडला ही जमेची बाजू म्हटली पाहिजे. हे ऑलिम्पिक शांततेत जावे म्हणून ब्रिटन सरकारने आयोजनापेक्षा अधिक खर्च (सुमारे दीड अब्ज डॉलर) सुरक्षा व्यवस्थेवर केला होता. त्यावर टीकाही झाली होती. पण आंतरराष्ट्रीय दहशतवादाची झळ याअगोदर लंडनला अनेकदा बसल्याने एवढय़ा मोठय़ा क्रीडासोहळ्यासाठी सुरक्षेचा कडा पहारा असणे क्रमप्राप्त होते. या सुरक्षा उपाययोजनांचा ताप केवळ क्रीडा रसिकांना नव्हे तर खेळाडूंनाही झाला. तरी या अडचणी पार करत लंडनच्या जनतेने संयम पाळत आपल्या घरी आलेल्या या पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्यात कोणतीच कसूर ठेवली नाही. एरवी ब्रिटिश नागरिक हा शिष्ट म्हणून जगात ओळखला जातो. तो सामाजिक संकेत, शिष्टाचारांचे पालन करणारा असतो अशी त्याची ख्याती आहे. पण या ऑलिम्पिकच्या निमित्ताने ब्रिटिशांना आपले शिष्टाचार काही काळ बाजूला ठेवत पाहुण्यांपुढे कमरेत वाकावे लागले. लंडनवासीयांच्या या प्रेमाचे, त्यांच्या उत्साहाचे, खिलाडूवृत्तीचे प्रतिबिंब या स्पर्धेत जागोजागी दिसत होते. लोक स्टेडियम, रस्त्यांवर दुतर्फा खेळांना गर्दी करून खेळाडूंना प्रोत्साहन देत होते. पण महत्त्वाची आणखी एक बाब म्हणजे लंडन शहराचा कायापालट या स्पर्धेच्या निमित्ताने झाला. पूर्व लंडन हा पूर्वी दुर्लक्षित भाग होता. या भागात सुमारे 80 हजार प्रेक्षकांच्या क्षमतेचे ऑलिम्पिक पार्क उदयास आले व अनेक दिग्गज अँथलिटनी आपले स्वप्न येथे पूर्ण केले. लंडनमधील स्ट्रॅटफोर्ड हे नवे पर्यटनस्थळ या निमित्ताने जन्माला आले. ऑलिम्पिकच्या निमित्ताने ब्रिटनमध्ये अनेक नवे उद्योग जन्मास आले. या उद्योगांच्या माध्यमातून गेली पाच वर्षे तेथे मोठी गुंतवणूकही होत होती. क्रीडा उद्योग हा सध्या जगभरातील अनेक उगवत्या आणि विकसित देशांमधील कळीचा मुद्दा बनला आहे. लंडनला ऑलिम्पिक संयोजनाचा मान जेव्हा मिळाला तेव्हाच ब्रिटनमध्ये अनेक क्रीडा कंपन्यांची कार्यालये व खासगी क्रीडा प्रशिक्षण वर्ग सुरू झाले. त्यामुळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला गती मिळाली. ऑलिम्पिकमधील जाहिरात कंपन्यांच्या माध्यमातून, टीव्ही राइट्समधून ब्रिटनने खूप कमावले. हे ऑलिम्पिक सुरू होण्याअगोदरपासून जमैकाचा विश्वविक्रमवीर अँथलिट उसेन बोल्ट आणि अमेरिकेचा जलतरणपटू मायकेल फेल्प्स यांची चर्चा सुरू होती. या दोघांच्या शारीरिक क्षमता, त्यांनी केलेले विश्वविक्रमांचे उच्चांक यांना कोणी मोडीत काढतो का, असे प्रश्न उपस्थित होत होते. पण या दोघा खेळाडूंची स्पर्धा स्वत:शीच होती. मायकेल फेल्प्सने चार सुवर्ण व दोन रौप्यपदके मिळवत एकूण ऑलिम्पिक कारकिर्दीत 18 सुवर्ण व 4 रौप्यपदके मिळवून एक नवा विश्वविक्रम केला. त्याच्या विश्वविक्रमाची चर्चा होत असतानाच उसेन बोल्ट याने 9.63 अशी वेळ नोंदवत 100 मी. धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून फेल्प्सवर सुरू असलेली चर्चा आपल्याकडे वळवली. त्यानंतर 200 मी. व नंतर 4 गुणिले 100 मी. स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक मिळवून आपला अँथलेटिक्समधील दबदबा कायम ठेवला. बोल्टची किंवा फेल्प्सची शारीरिक क्षमता अचंबित करणारी होती. पण या दोन खेळाडूंबरोबर 800 मी. शर्यतीत केनियाच्या डेव्हिड रुडिशा याने केलेला विश्वविक्रम तेवढा चर्चेत आला नाही. पण पुरुष अँथलिट्सच्या शारीरिक सार्मथ्याबरोबर महिला खेळाडूंचीही कामगिरी सरसच दिसून आली. या स्पर्धेत पहिल्यांदा मोठय़ा प्रमाणावर महिला खेळाडू सामील झालेल्या होत्या. त्यामुळे प्रत्येक देशातून किमान एक महिला खेळाडू यामध्ये सामील झाली होती हे बदलत्या जगाचे चित्र होते. सौदी अरेबियाची 16 वर्षांच्या वोजदान शहेरखानी या मुलीने जगाचे लक्ष वेधून घेतले. सौदी अरेबियाच्या या निर्णयामुळे मुस्लिम जगतात आगामी जागतिक स्पर्धांसाठी महिलांसाठी दारे उघडण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या महिलांनी या स्पर्धेत स्वत:चा ठसा नेहमीप्रमाणे ठेवलाच. त्यांच्या रिले चमूने 4 गुणिले 100 स्पर्धेत विश्वविक्रम केला तसेच 4 गुणिले 400 रिलेचेही सुवर्णपदक कमावले. अमेरिकेच्या एकूण संघात यंदा पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक होती व महिलांनी पुरुषांपेक्षा अधिक सरस कामगिरी केली हे लक्षात घेतले पाहिजे. पण खरी प्रगती दिसून आली ती ब्रिटनच्या कामगिरीमध्ये. ब्रिटनने या स्पर्धेत 29 सुवर्णपदके मिळवून तिसरा क्रमांक पटकावला. स्वत:च्या घरात स्पर्धा होत असल्या तरी ब्रिटनची ही कामगिरी त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या र्जमनी, फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियाला निश्चितच चिंता करायला लावणारी होती. ब्रिटनच्या या झळाळत्या कामगिरीचा चीनवर परिणाम झाला. चीनने पहिल्यांदा सुवर्णपदकांमध्ये मुसंडी मारली होती, पण अँथलेटिक्स सामन्यानंतर चीनची घसरण झाली. चिनी वर्चस्वाला आव्हान देणे ही अमेरिका आणि युरोपपुढची कामगिरी होती. चीनची घोडदौड रोखण्यात ब्रिटनने अमेरिकेला मदत केली असे म्हणावे लागते. पण या स्पर्धेमुळे ब्रिटनमध्ये निर्माण झालेल्या ऊर्जेचे चित्र दिसू लागले. ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी ही स्पर्धा ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे, तर ब्रिटनच्या अनेक वर्तमानपत्रांनी ‘र्‍हासातून उदयाकडे’ अशा स्वरूपाचे मथळे देऊन या स्पर्धेला खरे तर धन्यवाद दिले आहेत. आगामी 2016चे ऑलिम्पिक ब्राझीलमधील रिओ द जानेरिओ या शहरात होत आहे. दक्षिण अमेरिकेत या निमित्ताने पहिल्यांदाच ऑलिम्पिक स्पर्धा होत आहे. ब्राझीलमध्ये फुटबॉलची विश्वचषक स्पर्धाही होत आहे. या दोन्ही स्पर्धांच्या निमित्ताने दक्षिण अमेरिका जगाचे लक्ष वेधून घेणार आहे. ऊर्जा ही जशी विध्वंसक असते तशी ती जीवनदायीही असते. संपूर्ण जगाला आर्थिक अरिष्टाने वेढले असता युरोपला लंडन ऑलिम्पिकने ऊर्जा दिली. ही सकारात्मक ऊर्जाच रिओ ऑलिम्पिकसाठी साहाय्यकारी ठरणार आहे.

X
COMMENT