आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेगुमान बडोले ! ( अग्रलेख )

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या मुलीची निवड त्यांच्याच खात्याच्या परदेश शिष्यवृत्ती योजनेत होते, याच खात्याचे सचिव दिनेश वाघमारे यांच्या मुलाची वर्णी याच शिष्यवृत्तीसाठी लागते, या यादीत तंत्रशिक्षण सहसंचालक दयानंद मेश्राम यांच्याही पाल्याचा समावेश होतो हे उघड झाल्यावर कुंपणच शेत खात असल्याची प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक आहे. ‘माझ्या वडिलांच्या मंत्रिपदामुळे माझी गुणवत्ता कमी होते का,’ असा भावनिक प्रश्न करत सरकारी शिष्यवृत्ती नाकारल्याचे बडोले यांच्या मुलीने म्हटल्याचीही बातमी पाठोपाठ आली आहे. एकूणच याप्रकरणी निकष ‘पूर्ण’ झाल्याचे सांगणे हेच शहाजोगपणाचे आहे. शिष्यवृत्ती योजनेचा गाभा समजून घेण्याची तुमची मुळातच तयारी नसल्याचे यातून दिसते. सरकारी शिष्यवृत्तीचा लाभ उच्चपदस्थांना घेता यावा, असे अनुकूल बदल निकषांमध्ये नुकतेच केल्याचीही कुजबूज मंत्रालयात सुरू आहे.
 
शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी निवडण्याच्या समितीचे अध्यक्षपद सोडल्याचे सांगत बडोलेंनी स्वतःची पाठ थोपटून घेतली आहे. मंत्र्यांच्या मुलीचे नाव वगळण्याइतपत पोलादी कण्याचे अधिकारी महादुर्मिळ असल्याचे जणू लोक जाणतच नाहीत. शिवाय त्याच खात्याच्या सचिवांच्या पाल्यालाही शिष्यवृत्ती मिळते तेव्हा आपलेच खाते आपल्याच मुलांसाठी चालवण्याचा मंत्री-सचिवांचा उद्योग इतिहासात नोंदवण्यासारखाच ठरतो. दुसऱ्यांदा आमदार झालेल्या बडोलेंचे निवडणूक प्रतिज्ञापत्र पाहता त्यांना कोणी गरीब म्हणणार नाही.
बातम्या आणखी आहेत...