आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समन्वयाचा उदगार! (अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्राचा मूळ पिंड हा समन्वयवादी आहे. महाराष्ट्रभूमीने नवविचारांचे नेहमीच स्वागत केले. जुने विचार त्याज्य ठरविले. भागवत धर्माची पताका घेऊन संत नामदेव पंजाब येथील घुमान येथे गेले त्या वेळी त्यांनी महाराष्ट्राचे आराध्यदैवत विठ्ठल, आपले अभंग, पदे यांची ओळख शीख धर्मीयांना करून दिली होती. त्यामुळेच शिखांच्या गुरुग्रंथसाहिब या धर्मग्रंथात नामदेवांची काही पदे व विठ्ठल हा ‘बिठलु’ या नावाने आदरपूर्वक समाविष्ट झाला.
महाराष्ट्राच्या समन्वयवादी भूमिकेची नाळ तेव्हापासून पंजाबशी अशा प्रकारे जुळली आहे. त्याचाच पुनर्प्रत्यय घुमान येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने येत आहे. भागवत धर्म म्हणा की वारकरी प्रथा त्यांचा प्रचार-प्रसार संतांनी आंधळ्या भक्तिभावाने केलेला नव्हता, तर प्रांतोप्रांतीच्या समन्वयवादी सूत्रांना जोडण्याचे काम त्यातून त्यांना करायचे होते. हे उद्दिष्ट ज्ञानेश्वर, नामदेव, तुकारामांसहित अनेक संतांनी आपल्या साहित्यातून, भ्रमणातून कसे साध्य केले याचे मार्मिक विश्लेषण घुमान येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व ख्यातनाम विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले आहे. इतिहास हा नि:पक्षपातीपणे लिहिला जाणे अपेक्षित असते. काही महनीय इतिहासकार वगळता हे भान महाराष्ट्राचा इतिहास लिहिताना बाळगले गेले नाही. त्यामुळे निर्माण झालेल्या दुहीच्या बीजांना बाजूला सारून डॉ. सदानंद मोरे यांनी संतपरंपरेपासून ते आधुनिक काळापर्यंतचा महाराष्ट्र आपल्या लेखनातून मराठी माणसांना नव्याने समजावून सांगितला.
संमेलनाध्यक्ष म्हणून डॉ. मोरे यांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणाचे मुख्य सूत्रदेखील हेच आहे. साहित्य संमेलन व्हावे की होऊ नये, संमेलनाध्यक्ष निवडणुकीद्वारे की बिनविरोध निवडला जावा, अशा चर्चांना उकळी देण्यात काही घटकांना दरवर्षी आत्मतृप्ती मिळत असते. या बिनमहत्त्वाच्या मुद्द्यांना त्यांची जागा मोरे यांनी आपल्या भाषणाच्या प्रारंभीच दाखवून दिली आहे.
मराठी संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्यापैकी एक साहित्य संमेलन असल्याने त्याचे आयोजन करायचे किंवा नाही हा चर्चेचा विषयच होऊ शकत नाही, अशी नि:संदिग्ध भूमिका डॉ. सदानंद मोरे यांनी मांडली आहे. त्यामुळे विद्रोही साहित्यपरंपरेचे समर्थक मोरे यांना प्रस्थापितांच्या व्यवस्थेचे पाईक नक्कीच ठरवतील, पण ती टीका गंभीरपणे घेण्याचे कारण नाही. साहित्य संमेलन हा मराठी अस्मितेचा उत्सवी आविष्कार असल्याने त्यात साहित्याची चर्चा होणारच हे उघड आहे. मग अशा प्रकारच्या चर्चेला, ज्ञानव्यवहाराला उत्सवी वातावरण लाभण्यात गैर काय आहे, हा डॉ. सदानंद मोरे यांनी केलेला सवालही बिनतोड आहे. साहित्य संमेलनांची प्रथा बंद करा, अशी बेधडक मागणी करणाऱ्यांनी या संमेलनाला सशक्त पर्याय सुचवायला हवेत; पण नेमके तिथेच ते कमी पडतात.
डॉ. सदानंद मोरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महाराष्ट्रातील संतपरंपरा व त्यांच्या साहित्यामुळे समाजात झालेले मूल्य व संस्कारांचे आविष्करण यांचा ताळेबंद मांडलेला आहे. संत साहित्यातील सुयोग्य मूल्यांचा आदरभाव आधुनिक मराठी साहित्यातही कसा प्रतिबिंबित झाला, याचे डॉ. मोरे यांनी या भाषणात केलेले विश्लेषणही उद््बोधक आहे. संतांनी आपल्या साहित्यातून केवळ भक्तिभावच सांगितला नाही, तर कुप्रथांच्या विळख्यात अडकलेल्या समाजाला त्यातून बाहेर पडण्यासाठी खडबडून जागे केले.
संतसाहित्याच्या या प्रेरणेचे भान मोरे यांनी सर्वांना दिले आहे. महाराष्ट्रात विकसित झालेल्या संतसाहित्यादी परंपरांतून मराठी माणसांच्या विचारांचा, विचारपद्धतीचा आणि अभिव्यक्तीचा पाया बळकट झाला आहे. त्यातूनच मराठी भाषा शेतकऱ्याच्या शिवारापासून ते पंडित कवींच्या दालनापर्यंत सर्वत्र पोहोचू शकली व जगली. हा आटणारा प्रवाह नाही. त्यामुळे मराठी भाषा मरणपंथाला लागली आहे का, अशी वायफळ चर्चा करण्याची डॉ. मोरे यांना अजिबात गरज वाटलेली नाही. आधुनिक काळात जगण्याची अनेक परिमाणे बदलली आहेत. माणसाच्या जीवनावर साऱ्या जगभरातच भांडवलशाही व्यवस्थेचे सावट पडलेले आहे. त्यातच काही शक्तिधर्माचे हत्यार घेऊन पुढे सरसावल्या आहेत.
एक शक्ती पुढे ढकलणारी, तर दुसरी मागे खेचणारी, अशा पेचप्रसंगातून संपूर्ण मानवजातच चाललेली आहे, त्याला महाराष्ट्र किंवा मराठी साहित्य अपवाद असण्याचे कारण नाही, हे डॉ. सदानंद मोरे यांनी सांगितलेले सत्य डोळ्यांत अंजन घालणारे आहे. सध्याच्या या परिस्थितीत आपण अर्थांध किंवा धर्मांध होऊन कोणाच्या तरी मागे फरपटत जायचे की आपला विवेक शाबूत ठेवून आपल्यातील मनुष्यत्वही जपायचे, असा डॉ. मोरे यांनी उपस्थित केलेला प्रश्न संवेदनशील माणसाला अस्वस्थ करणारा आहे.
या प्रश्नाचे समर्पक उत्तर ज्याचे त्याने शोधायचे आहे. घुमानच्या साहित्य संमेलनातून सांस्कृतिक समन्वयाचा जो धागा अधिक बळकट झाला आहे त्यातूनही संमेलनाध्यक्षांनी उपस्थित केलेल्या उपरोक्त प्रश्नाचे उत्तर सापडू शकते!