आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्लज्ज गिरिराज ! (अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोऱ्या रंगामुळे सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या, राजीव गांधींनी नायजेरियन मुलीशी लग्न केले असते आणि ती काळी असती तर काँग्रेसने त्यांना स्वीकारले असते का? हे केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांचे निर्लज्ज विधान, उन्हात उपोषण केल्यास तुम्ही काळ्या व्हाल आणि तुम्हाला लग्नासाठी मुलगा शोधण्यात अडथळे येतील, हा गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर यांनी आंदोलनकर्त्या नर्सेसना दिलेला सल्ला आणि दाक्षिणात्य महिलांची सावळी त्वचा अधिक सुंदर दिसते, हे जनता दलाचे ज्येष्ठ नेते शरद यादव यांचे काही दिवसांपूर्वीचे ‘वैचारिक’ विधान – ही तिन्ही विधाने वादग्रस्त तर आहेतच, पण आमच्या देशातील काही राजकीय नेत्यांची मने किती खुजी आहेत, याचा हा पुरावा आहे.
शरद यादव यांच्यासारखे राजकारणात ज्येष्ठ समजले जाणारे आणि पुरोगामित्वाचा आपण ठेका घेतला आहे, असे मानणाऱ्या जनता दल या पक्षाच्या नेत्याला राज्यसभेत अशी टिप्पणी करण्याची लाज वाटत नाही, तेथे भाजपचे उथळ नेते गिरिराज सिंह यांच्याकडून काय अपेक्षा करणार? आपण केलेल्या विधानाचा आपल्याला काही पश्चात्ताप होत नाही आणि आपण माफी मागणार नाही, असे यादव सभागृहात सांगत होते, तेव्हा स्मृती इराणी आणि रविशंकर प्रसाद त्यांच्या माफीची मागणी करत होते.

आता हे दोन मंत्री हिंदू संस्कृतीचा ठेका घेतल्याचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधित्व करतात आणि त्या पक्षाचे तोंडाळ नेते वाटेल तशी बडबड करताना दिसत आहेत. मोदींना विरोध करणाऱ्यांनी पाकिस्तानात निघून जावे, असे विधान याच गिरिराज महाशयांनी केले होते आणि त्यावरूनही बराच वाद झाला होता. भारतीय संस्कृतीचे आपण पाईक आहोत आणि आपल्यामुळेच ही संस्कृती टिकून आहे, असे मानणारे काही महाभाग अतिशय कुजकट आणि अश्लील टिप्पणी करण्याविषयी प्रसिद्ध आहेत. त्यातील काहींना तर त्याचा अभिमान वाटतो. सर्वसमावेशक असलेली ही भारतीय संस्कृती आपल्याला कळली नाही, याची खरे तर लाज वाटली पाहिजे. पण लाज वाटणे दूरच राहते आणि आपण देशात थट्टेचा विषय होतो, हेही त्यांच्या लक्षात येत नाही. गिरिराज सिंह नावाचा असा एक विकृत माणूसच अशी निर्लज्ज विधाने करू शकतो. सत्ता, संपत्ती मिळाल्यावर समोर काही उद्दिष्ट नसले की असे विदुषकी चाळे सुचतात. ते करून गिरिराज चर्चेचा विषय होतील खरे, मात्र देशात मोठा बदल घडवून आणण्याची भाषा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला त्याची जबर किंमत मोजावी लागेल.

भारतीय जनता पक्षाचे असलेले गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर यांचे नर्ससंबंधीचे वादग्रस्त विधान एका नर्सने माध्यमांना सांगितले होते आणि त्यानंतर हा वाद सुरू झाला होता, मात्र आपण असे विधान केले नसल्याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला असून आपण काय बोललो, याची टेप ऐकून निष्कर्ष काढावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्या विधानाबाबत घाईने काही ठरवणे चुकीचे ठरेल. एक मात्र नक्की की, काही राजकीय नेत्यांना महिलांचे रूप, रंग, सुरक्षितता, कपडे याविषयी फारच चिंता निर्माण झाली असून आपली सर्व जबाबदारीची कामे सोडून अशी विधाने करण्याचा मोह त्यांना काही केल्या टाळता येत नाही, असे दिसते. याचा दुसरा अर्थ; त्यांना पुरेसे काम नाही, असा निघतो.
विशेषतः सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला सत्तेवर आणणारे नरेंद्र मोदी हे सरकारला किती प्रचंड काम करायचे आहे, हे पुनःपुन्हा सांगत असताना आपलेच असे तोंडाळ सहकारी सहन करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. यातून सरकारचा आणि पर्यायाने या देशाचा अजेंडा पुढे जाणार नाही, याची जाणीव झाल्याने, अशा नेत्यांना हा तोंडाळपणा थांबवण्याचा इशारा त्यांनी दिला होता. मात्र, त्याचा काही परिणाम झाला नाही, असे आता म्हणावे लागेल. भारतीय राजकारणात स्थानिक राजकारणाचा भाग म्हणून काही नालायक नेत्यांना आणि गुंडपुंडांना पदांवर बसवण्याची पद्धत रूढ झाली आहे.

गिरिराज यांच्यासारखे नेते अशा पद्धतीने पदांवर बसले आहेत. त्यामुळेच असे नेते मोदी सरकारच्या गळ्यातील लोढणे होऊ शकते आणि त्याचा त्रास सर्व देशवासीयांना होऊ शकतो. ती वेळ येण्याआधीच अशा नेत्यांना पदावरून दूर केले पाहिजे. नरेंद्र मोदी हे धाडसी नेते आहेत, असे जे म्हटले जाते आहे, ते तेवढे अजून सिद्ध झालेले नाही. काही आर्थिक निर्णय म्हणजेच काही धाडस नव्हे, हे निर्णय घेण्यासाठी राजकीय निर्णयही तेवढ्याच धाडसाने घेण्याची गरज आहे. गिरिराज यांच्यासारख्या नेत्यांना त्यांची जागा दाखवली जाईल, अशा प्रकारची कृती आता पंतप्रधानांकडून अपेक्षित आहे. असली सडकी मनोवृत्ती जपणाऱ्यांना पक्षात स्थान असू नये. गिरिराज यांना खासदारकीचा राजीनामा द्यावा लागला तरच असल्या वक्तव्यांना काही प्रमाणात चाप बसेल.