Home | Editorial | Agralekh | agralekh on politics on irrigation sti

राजकारण ‘एसआयटी’चे ! (अग्रलेख)

दिव्‍य मराठी | Update - Jan 03, 2013, 12:15 AM IST

भारतीय जनता पक्ष हा भारतातील कुठल्याही राजकीय पक्षापेक्षा पूर्ण वेगळा आहे. त्यामुळेच ते स्वत:ला ‘पार्टी विथ डिफरन्स’ असे म्हणवतात.

  • agralekh on politics on irrigation sti

    भारतीय जनता पक्ष हा भारतातील कुठल्याही राजकीय पक्षापेक्षा पूर्ण वेगळा आहे. त्यामुळेच ते स्वत:ला ‘पार्टी विथ डिफरन्स’ असे म्हणवतात. स्वत:चे हे वेगळेपण जपण्यासाठी या पक्षातील नेता आपापली सर्जनशीलता इतकी पणाला लावतो की भारतीय रूढी-परंपरांवर विश्वास ठेवणारा व मनुस्मृती, वेद, उपनिषदांच्या काळात देशाला नेण्याची स्वप्ने उराशी बाळगणारा हा पक्ष, भारतीय राजकारणाला उत्तर आधुनिक परंपरेतील अ‍ॅब्सर्डिटीच्याच जवळ नेत असल्याचा दृश्य परिणाम समाजाला जाणवतो आहे! महाराष्ट्रातील सिंचनात भलामोठा घोटाळा झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षातील अभ्यासू नेत्यांनी काही महिन्यांपासून धसास लावला होता. संघाच्या शाखेत लाठी-काठी चालवण्याबरोबरच बौद्धिकेही होत असतात. त्यामुळे भाजपचे सर्व नेते आरंभापासूनच अभ्यासू असतात. या अभ्यासू-सर्जनशील नेत्यांमधील काही जणांनाच सिंचनात घोटाळा झाल्याचे लक्षात आले. सत्ताधारी आघाडीतील शक्तिशाली नेते अजित पवार हे या घोटाळ्यात आकंठ बुडालेले असून त्यांना नामोहरम करण्यासाठी मग हे अभ्यासू नेते कामाला लागले. खरे तर हे नेते कामाला लागण्यापूर्वीच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला! त्यामुळे या नेत्यांना आता काय काम करायचे हे कळत नव्हते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमधील बहुतांश आमदारांचा पाठिंबा असलेले अजित पवार हे पुन्हा मंत्रिमंडळात येण्याची घोषणा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर झाली आणि भाजप नेत्यांच्या डोक्यात विविध व्यूहरचना चमकल्या. मग ते विचारमंथनाला बसले. त्या मंथन बैठकीत झालेल्या घुसळणीनंतर सर्वानुमते सिंचनाच्या या सर्व घोटाळ्याची ‘एसआयटी’ (विशेष शोधपथक) मार्फत चौकशी करण्याची मागणी नक्की केली गेली. ‘एसआयटी’ हा शब्द महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वांनाच व्यवस्थित माहीत आहे. तेलगी प्रकरणात स्थापन झालेल्या ‘एसआयटी’ने किती मोठमोठ्या लोकांना धक्क्याला लावले होते व राष्ट्रवादीची मुलूखमैदान तोफ छगन भुजबळ यांनी ‘एसआयटी’चा कसा धसका घेतला होता, याचा इतिहास ताजा असल्यामुळे भाजपमधील सर्वात हुशार नेत्याने मांडलेल्या या कल्पनेवर सर्वांचे एकमत झाले. भाजपने या सर्व घोटाळ्याची ‘एसआयटी’मार्फत चौकशी झालीच पाहिजे, अशी घोषणा अधिवेशन सुरू होण्याच्या आधीच केली. तसेच ही चौकशी सरकार जोवर जाहीर करत नाही, तोवर आम्ही विधिमंडळाचे कामकाजच होऊ देणार नाही, असा निर्धार त्यांनी जाहीर केला. अजित पवारांसारखे नेते व त्यांचे चेले ‘एसआयटी’मुळे तुरुंगाची हवा खाणार, अशी खात्री या नेत्या-कार्यकर्त्यांना वाटू लागली. खेळ ठरल्याप्रमाणेच सुरू झाला. मात्र खेळात प्रत्येक वेळी हुशारीने डावपेच आखलेल्याच चमूला विजय प्राप्त होतो असे नाही. भाजपच्या या नेत्यांमध्ये एकजूट नव्हती किंवा परस्परांबद्दल असूया होती. परंतु नागपूरचे अधिवेशन सुरू असतानाच दिल्लीहून भाजप श्रेष्ठींकडून आदेश आले की विधिमंडळातील गोंधळ आवरा आणि अजित पवारांबरोबर चर्चा करा! मग नागपूरच्या थंडीत एका रात्री एका खासदाराच्या घरी बैठक झाली. त्यात सिंचनाबाबत असलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी ‘एसआयटी’ बसवण्याचे मान्य करण्यात आले. त्यानुसार दुसºया दिवशी सरकारने विधिमंडळात घोषणाही केली. भाजपमधील कर्तबगार नेते लागलीच हा आमच्या मागणीचा विजय असून रस्त्यावर तसेच विधिमंडळात केलेल्या संघर्षाचे हे फलित आहे, असे वृत्तवाहिन्यांवरून सांगू लागले.आता हे सगळे प्राचीन काळी नव्हे तर महिनाभरापूर्वी घडलेले असताना आता अचानक पुन्हा भाजपमधील नेत्यांची हुशारी व सर्जनशीलता जागी झाली आहे. त्यांना अचानक ही एसआयटी काहीच कामाची नाही, असे वाटू लागले आहे! या ‘एसआयटी’त पोलिसच नाहीत; मग काय फायदा, असे भाजपचे नेते बोलत आहेत. आता सिंचन किती झाले, त्यात काही काळेबेरे झाले किंवा नाही, याचा शोध पोलिस कसे काय घेऊ शकतात? महाराष्ट्रात जी विभागवार सिंचन महामंडळे स्थापन करण्यात आली तीदेखील सेना-भाजप युतीच्या काळात, हे आता सिद्ध झाले आहे. ज्या उपसा सिंचन योजनांवर घणाघाती टीका विधिमंडळात व पक्ष कार्यालयातून या नेत्यांनी केली आहे, त्या उपसा सिंचन योजनांचा 1995 पासूनचा आढावा ‘एसआयटी’ने घेतला तर अविनाश भोसल्यांचे उद्योजक घराणे कसे उभे राहिले त्याचा लेखाजोखाही महाराष्ट्राच्या जनतेसमोर येऊ शकतो. खरे तर भाजपमधील एक नेत्यांचा गट दुसºया गटाच्या नेत्यांना धक्क्याला लावावे यासाठी प्रयत्नशील होता. एसआयटीने 1995 पासूनच्या योजनांचा तपास करावा असे दुसºया गटाचे मत आहे. त्यामुळेच या गटाला आता अचानक एसआयटी नकोशी वाटू लागली आहे. ‘एसआयटी’ म्हणजे केवळ अभ्यास मंडळ आहे, असे आता भाजपचे राज्यातील नव्याने उदयास आलेले नेते बोलू लागले आहेत. अभ्यास ही केवळ संघाच्या बौद्धिक परंपरेतून आलेल्यांचीच मक्तेदारी असल्यामुळे माधव चितळे यांच्या अध्यक्षतेखालील विशेष शोधपथक कसला अभ्यास करणार; कारण सिंचनाचा सर्व अभ्यास भाजपच्या अभ्यासू नेत्यांनी आधीच करून ठेवलेला आहे! या एसआयटीत पोलिस नाहीत, त्यामुळे कुणालाही पोलिस ठाण्यात नेले जाणार नाही, त्यांना तत्काळ अटक होणार नाही, तो सर्व फार्स चोवीस तास वृत्तवाहिन्या दाखवणार नाहीत आणि त्यावर ज्ञानामृताचे डोस पाजायला मग स्वयंभू विद्वानांना वाव मिळणार नाही, असे हे तोट्याचे गणित त्यांच्या लक्षात आले आहे! या पार्श्वभूमीवर ‘द थिएटर ऑफ द अ‍ॅब्सर्ड’च्या धाटणीतील अनाकलनीय असा ‘एसआयटी हवी-एसआयटी नको’ हा नवा तमाशा सुरू झाला आहे. सत्य आणि आभास यातील दरी ‘एसआयटी’ दूर करू शकेल, अशी खात्री विरोधकांना होती म्हणूनच ते शोधपथक नेमले गेले. आता त्यावरच भाजपमधील घनघोर यादवीला तोंड फुटले आहे. त्या ‘अ‍ॅब्सर्ड थिएटर’ची ब्लॅक कॉमेडी होते की कसे, इतके पाहणेच आता आपल्या हाती आहे.

Trending