आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
संभ्रमावस्था म्हणजे काय, याची प्रचिती सध्या टीम अण्णामधील धुरीणांपासून हातात तिरंगा आणि पायात ‘रिबॉक-नायके’चे जोडे घालून देश भ्रष्टाचारमुक्त करण्यास निघालेल्या उच्चभ्रू तरुण कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनाच येत असेल. भारतमातेला भ्रष्टाचाराची कीड पोखरून काढत आहे. ही कीड नामशेष करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील अण्णा नामक देशमुख गडी वर्षभरापूर्वी भीमथडीची तट्टे घेऊन दिल्लीवर चालून गेला आणि हा हा म्हणता त्याचे झेंडे प्रसारमाध्यमांनी अटकेपार लावून टाकले. परिस्थितीमुळे म्हणा, अर्धशिक्षित राहिलेल्या या देशमुख गड्याने म्हणे, एकेकाळी लष्करात मर्दुमकी गाजवली होती. लष्कराच्या ट्रकचे सारथ्य करणारा हा गडी नक्की लढाईत कोणती मर्दुमकी गाजवत होता, असले फुटकळ प्रश्न विचारणा-यांना कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णसुद्धा सारथी होता, याची आठवण करून देण्यात येत होती. प्रसारमाध्यमे स्वत:हून, खरे तर आपमतलबासाठीच या सारथ्याचे झेंडे अटकेपार लावू लागल्यावर त्यालाही मग भ्रष्टाचाराविरोधातील लढाईच्या कुरुक्षेत्रावर भगवद्गीतेप्रमाणे तत्त्वज्ञान स्फुरणे अपरिहार्यच होते. त्याच आवेशात मग तो संसदीय लोकशाहीचे नवनवे अर्थ समजावून सांगू लागला. टिपेचा स्वर लावत समोर उपस्थित असलेल्या हजारो उन्मादी तरुणांना मग ‘अरेंऽऽऽ लोकसभा और विधानसभा से ग्रामसभा श्रेष्ठ है, आदमी अठारा साल का हो जाने पर ही ग्रामसभा का मेंबर हो जाता है..’ असे काहीबाही सांगितले जाऊ लागले. भ्रष्टाचारविरोधी उत्सवात जमलेल्या उन्मादी तरुणांना तर काहीही ऐकले की बेंबीच्या देठापासून ‘भारतमाता की...’, ‘वंदे...’, ‘इन्किलाब...’ या घोषणा द्यायच्या, इतकेच ठाऊक होते. देशाला पांढ-याधोप चारित्र्याचा नेता, श्रीकृष्णाच्या तोडीस तोड तत्त्वज्ञ, प्रत्यक्ष लढाईचा किंवा लढाईत ट्रक चालवण्याचा अनुभव असलेला लढवय्या असे सगळे ‘टू मिनिट्स नुडल्स’प्रमाणे तत्काळ मिळाले. या चालकाच्या आजूबाजूला जमलेले अर्जुन, भीम, नकुल, सहदेवरूपी केजरीवाल, सिसोदिया, भूषण पिता-पुत्र, किरण बेदीबाई आपल्या स्वच्छतेच्या तपातून साक्षात देवादिकांकडून प्राप्त झालेली महासंहारक अस्त्रे समोरील कौरवरूपी सरकारवर सोडू लागले. या महाभारताचा निकालही हजारो वर्षांपूर्वीच्या महाभारताच्या निकालाप्रमाणे स्पष्ट होता. पांडवांचा विजय व कौरवांचा दारुण पराभव पक्का होता. मात्र या दशावताराच्या खेळाचे मध्यंतर झाले. पडदा काही काळासाठी पडला आणि मग त्या मध्यंतरात पडद्यामागे या पात्रांमध्ये जबरदस्त हाणामारी होऊ लागली. प्रसारमाध्यमांना केवळ या देशाला सुधारायला निघालेल्या या चालकाचे झेंडे लावण्यातच रस नव्हता, त्यांनी या सगळ्या पांडवांची लक्तरेही अटकेपारच्या वेशीपासून टांगायला सुरुवात केली. म्हणजे झाले असे की ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ ही संस्था सन्माननीय केजरीवाल यांच्या अधिपत्याखाली आहे. देशभरात भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणा-या या लढवय्यांना ज्यांना ज्यांना म्हणून मदत द्यायची होती, त्यांनी ती मदत या ‘आयएसी’ नामक संस्थेत जमा केली. ही मदत दिली जाते ती अण्णा हजारे यांच्या चेह-याकडे पाहून, त्यामुळे ती खरे तर अण्णा हजारे यांच्या अधिपत्याखाली असलेल्या भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यास या संस्थेकडे यायला हवी, अशी जोरदार मागणी अण्णांचे स्वीय सचिव पठारे यांनी नांदेडच्या बैठकीत केली व टीम अण्णा विरुद्ध टीम केजरीवाल अशी पहिली ठिणगी पडली, हे सर्वप्रथम ‘दिव्य मराठी’नेच उजेडात आणले. मग ‘टीम केजरीवाल’ने दिल्लीतून पुड्या सोडायला सुरुवात केली की अण्णांच्या जागी तेव्हा निवृत्तीच्या मार्गावर असलेले लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांना बसवायचे. याची कुणकुण अण्णांना लागताच त्यांनीच सिंग यांना आमंत्रण देऊन टाकले म्हणतात. अण्णांना धोबीपछाड देण्यासाठी मग ‘टीम केजरीवाल’ने थेट पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनाच आरोपीच्या पिंज-यात उभे केले. त्यावर अण्णा कळवळले. अण्णांनी असे करताच, त्यांना साहेबांची भाषा अवगत नसल्याचा साक्षात्कार भूषण यांना झाला व त्यांनी अण्णांना इंग्रजी येत नसल्याने ते असे बोलले, हा अजब तर्क मांडला. हे कमी म्हणून की काय, रविवारी पुन्हा एकदा ‘जंतरमंतर’रूपी कलियुगातील कुरुक्षेत्रावर अण्णा आणि थोर तपस्वी, कपालभाती सिद्धपुरुष बाबा रामदेव यांची ‘गंगा-जमुना’ युती झाली. संघ परिवार जसा दहा तोंडे दाखवून शत्रूला संभ्रमात टाकतो, ज्याला मोदी हवे त्याने मोदी घ्या, ज्याला गडकरी हवे त्याने गडकरी घ्या, ‘हर मर्ज की दवा’ पोतडीत घेऊन परिवाराचे नेते फिरतात, तीच क्लृप्ती इथेही सुरू झाली. पण घडले भलतेच. बाबांच्या मंचावर जाऊन केजरीवाल यांनी मनमोहन सिंग ते मायावती व मुलायम सिंग ते लालूप्रसाद सर्वांवरच ब्रह्मास्त्र सोडायला सुरुवात केल्यावर रामदेव यादवबाबांनी त्यांना नावे घेण्यापासून रोखले. बाबांच्या हजारो कोटी रुपयांच्या इस्टेटींची यादी सध्या अर्थ खात्यातील अधिकारी तयार करत असल्याने बाबा सध्या गॅसवर आहेत, असेही कुणी म्हणतात. पण त्याचा राग येऊन केजरीवाल तरातरा निघून गेले. संभ्रम अधिकच वाढला. अण्णांनी जमवून आणलेल्या सर्कशीत नक्की कोण कुणाबरोबर आणि कोण कुणाच्या विरोधी हेच समजेनासे झाल्याने पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांनी झेंडे लावण्याऐवजी लक्तरे वेशीवर टांगण्यास सुरुवात केली. त्यातच बेदीबार्इंमधला पोलिसी खाक्या जागा झाला. त्या म्हणाल्या, अरबस्तानात ज्याप्रमाणे मध्ययुगीन शिक्षा दिल्या जातात, चोरी करणा-याचे हात तोडले जातात, तशीच भीती लोकपालामुळे वाटायला हवी. बेदीबार्इंच्या म्हणण्याप्रमाणे जर खरोखरच अशा शिक्षा येथे देणे सुरू झाले असते तर विमानाच्या तिकिटांची चिंधी चोरी करणे, सरकारी लॅपटॉप ढापणे, नगर जिल्ह्यातील वाळू माफियांच्या धंद्यात गुंतवणूक करणे, आदी गुन्ह्यांसाठी नक्की कोणत्या शिक्षा मिळाल्या असत्या? म्हणजे हे अपराध करणा-यांचे हात तोडले गेले असते की आणखी कोणते अवयव, हे आपणास सांगता येणे कठीण आहे. मात्र हा देश गांधी-नेहरूंच्या तत्त्वांनुसारच चालावा, अशी या देशातील उच्च मध्यमवर्गाची इच्छा नसली तरीही अर्धपोटी दिवस काढणा-या सर्वसामान्यांना गांधी-नेहरूंचा बुद्धिप्रामाण्यवाद, मानवतावाद हाच मोठा आधार वाटतो. त्यामुळेच ‘टीम अण्णा’, ‘टीम केजरीवाल’, ‘टीम बेदीबाई’, ‘टीम भूषण’ व ‘टीम बाबा’ या सर्वांनी सुरू केलेल्या दशावताराचा शो मध्यंतरानंतर रंगारंग ‘आयपीएल’मध्ये परावर्तित होत असताना यांची वक्तव्ये अराजकसदृश परिस्थिती निर्माण करण्याआधी यांच्यावर कारवाई करण्याचे धारिष्ट काँग्रेसमधील गप्प बसलेल्या भीष्माचार्यांनी दाखवून गेल्या एक वर्षापासून सुरू असलेला हा लाफ्टर शो ‘आॅफ एअर’ करून टाकावा!
Sponsored By
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.