आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवाई दलाची क्षमता वाढवणारे सी-17

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सी-17 ग्लोबमास्टर 3 हे अवजड मालवाहू विमान येत्या 2 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीजवळच्या हिंडन तळावर भारतीय हवाई दलात औपचारीकरीत्या सामील होत आहे. भारतीय हवाई दलाची मालवाहन क्षमता आणि व्यूहात्मक पोहोच मोठ्या प्रमाणात वाढवणारे हे विमान असून युद्धक्षेत्राच्या अगदी जवळ अवजड सामग्री पोहोचवण्याची याची क्षमता आहे. दोन आघाड्यांवर एकाच वेळी दोन शत्रूंशी लढावे लागण्याची शक्यता गृहीत धरून त्या दृष्टीने हवाई दल तयारी करत आहे. त्या पार्श्वभूमीवर सी-17 विमान सामील होण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.


सी-17 ही अवजड युद्धसामग्रीची वाहतूक करणारी विमाने असून अमेरिकेच्या फॉरेन मिलिटरी सेल कार्यक्रमांतर्गत त्यांची भारताला विक्री करण्यात येत आहे. हा खरेदी व्यवहार 4.1 अब्ज डॉलर किमतीचा असून भारतीय हवाई दलात 2014 पर्यंत अशी दहा विमाने सामील करण्यात येणार आहेत. त्यामुळे बोइंग कंपनीच्या सी-17 विमानाचा भारत अमेरिकेनंतरचा सर्वात मोठा ग्राहक ठरला आहे. शेजारील देशांकडून सातत्याने भारताच्या सुरक्षेसमोर आव्हाने निर्माण केली जात आहेत.


अशा परिस्थितीत अवजड साधनसामग्री आणि सशस्त्र जवानांना कमीत कमी वेळेत सीमेवरील आघाडीच्या ठाण्यांबरोबरच हिंदी महासागरातील दूरवरच्या ठिकाणी पोहोचवण्याची क्षमता मिळवणे हवाई दलाला आवश्यक वाटत होते. सामग्री पोहोचवताना सीमेवर असलेल्या छोट्या किंवा तात्पुरत्या धावपट्ट्यांवरूनही उडू वा उतरू शकतील अशी अवजड मालवाहू विमाने सामील करण्यावर हवाई दलाचा भर होता. या गरजा लक्षात घेऊनच मागवण्यात आलेल्या जागतिक निविदांमधून सी-17 ग्लोबमास्टर-3 ची निवड करण्यात आली आहे.


सी-17 हे भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील सर्वात मोठे विमान असून ते तब्बल 75 टन वजनाची साधनसामग्री सुमारे 3800 किलोमीटर दूर असलेल्या ठिकाणी एका दमात पोहोचवू शकते. हवेत उडत असतानाच या विमानात इंधन भरण्याची सोय करण्यात आली असल्याने याचा पल्ला दुपटीने वाढू शकतो. फक्त सशस्त्र जवानांना घेऊन उड्डाण करत असल्यास या विमानाचा पल्ला 9 हजार किलोमीटरपेक्षाही जास्त होतो. आज भारताच्या सामरिक हितांचे क्षेत्र त्याच्या सीमांच्याही बरेच दूरवर विस्तारलेले आहे. अशा विस्तृत प्रदेशातील आपल्या हितसंबंधांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक साधनसामग्री लवकरात लवकर पोहोचवण्यात सी-17 महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. युद्धप्रसंगी कमीत कमी वेळेत ही विमाने उड्डाणासाठी सज्ज करता येतात. यातून इन्फंट्रीचा एक रणगाडा, तोफा किंवा काहीशे जवानांना आघाडीच्या ठाण्यांवर त्वरित पोहोचवता येते. इतकेच नव्हे तर आवश्यकता भासल्यास अगदी एक हेलिकॉप्टरही यातून वाहून नेता येते. अशा प्रकारे अवजड वाहतूक करणारे आणि अजस्र विमान असूनही उतरण्यासाठी याला केवळ तीन हजार फूट लांबीची धावपट्टी पुरेशी ठरते. अशा वैशिष्ट्यांमुळेच या विमानाच्या भारतीय हवाई दलात सामील होण्याला महत्त्व आले आहे.


सध्या चीनकडून लडाख आणि अरुणाचल प्रदेशातील नियंत्रण रेषेचे वरचेवर उल्लंघन होत आहे. त्यामुळे भविष्यात चीनकडून आगळीक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेऊनच भारत-चीन दरम्यानच्या सुमारे चार हजार किलोमीटरच्या सीमेच्या अगदी जवळ भारतीय हवाई दलाने विविध ठिकाणी छोट्या धावपट्ट्या उभारल्या आहेत. त्या धावपट्ट्यांना अ‍ॅडव्हान्स्ड लँडिंग ग्राउंड म्हणून ओळखले जाते. चाकांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे त्या धावपट्ट्यांवरही सी-17 विमान उतरवता येऊ शकणार आहे. हे विमान हिमालयातील अतिउंचावरील लष्करी ठाण्यांवरूनही रणगाड्यांची ने-आण करू शकणार आहे. याच्या चार शक्तिशाली पीडब्ल्यू 2040 या इंजिनांच्या मदतीनेच याला अशी कामगिरी पार पाडणे शक्य झाले आहे.


युद्धाच्या वेळी आघाडीवरील जखमी जवानांवर तातडीने उपचार करण्याची गरज भासू शकते. अशा वेळी सी-17 मध्ये विविध यंत्रणा बसवून जखमी जवानांना उपचार पुरवता येऊ शकतात. याच्या कॉकपिटमध्ये अत्याधुनिक दळणवळण आणि संचालन यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत. डिजिटल इलेक्ट्रॉनिक संचालन यंत्रणेमुळे वैमानिकांना विमानाच्या विविध यंत्रणांमध्ये योग्य समन्वय राखण्यास मदत होते. या सर्व यंत्रणा संगणकीकृत असून त्यांच्या मदतीने हे विमान दिवसाइतकेच रात्रीच्या काळोखातही कोणत्याही ठिकाणी उडू वा उतरू शकते. सुमारे 164 मीटर लांबीचे हे अजस्र विमान समुद्रसपाटीपासून साडेतेरा किलोमीटर उंचीवरूनही उडू शकते. सी-17 च्या सामिलीकरणामुळे भारतीय हवाई दलाची व्यूहात्मक पोहोच आणखी वाढली आहेच; शिवाय यामुळे अतिशय प्रतिकूल प्रदेशातील जवानांपर्यंत वेळेत रसद पोहोचवण्याची क्षमताही मोठ्या प्रमाणात वाढल्याचे हवाई दल प्रमुख एअरचीफ मार्शल एन.ए.के. ब्राऊन यांनी नुकतेच नमूद केले आहे.