आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदी महासागरावर हवाई दलाचे वर्चस्व

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तामिळनाडूतील तंजावर येथे भारतीय हवाई दलाचा तळ नुकताच पुनरुज्जीवित करण्यात आला आहे. हा तळ हिंदी महासागरावरील भारतीय हवाई दलाचे वर्चस्व आणखी बळकट करण्यात आणि भारताच्या राष्‍ट्रहिताचे संरक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. म्हणूनच सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या या तळावर हवाई दलाच्या आक्रमणाची धार असलेल्या सुखोई-30 एमकेआय लढाऊ विमानांची तुकडी तैनात करण्यात येणार आहे.


तंजावरचा हा तळ दुस-या महायुद्धाच्या काळात रॉयल इंडियन एअरफोर्सने उभारला होता. स्वातंत्र्यानंतर त्याचा वापर नागरी वाहतुकीसाठीही होऊ लागला. पुढे हवाई दलाकडून याचा वापर कमी होत गेला. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये भारताच्या भोवतालच्या परिसरात झपाट्याने परिस्थिती बदलत गेली आहे. चीनच्या वाढत्या लष्करी हालचालींमुळे हिंदी महासागरातील भारताच्या हितसंबंधांना आव्हान मिळू लागले आहे. त्यातच दहशतवाद आणि चाचेगिरीच्या प्रसारामुळे भारताच्या सुरक्षाविषयक चिंता वाढल्या आहेत. त्या आव्हानांचा सामना करण्यासाठी तंजावर येथील हवाई तळाचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या हवाई तळाचे अलीकडेच संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांच्या हस्ते उद्घाटन झाले.


जागतिक अर्थव्यवस्थेत आशियाचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यातच जगाची 60 टक्के ऊर्जेची गरजही याच महासागराच्या परिसरातून भागत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेला दिशा देणारा सागरी मार्ग हिंदी महासागरातूनच जातो. भारताच्या आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीनेही हा मार्ग महत्त्वाचा असून तो भारताच्या अगदी जवळून जातो. अशा परिस्थितीत त्या मार्गाचे रक्षण करण्याची जबाबदारी भारतीय नौदल आणि हवाई दलावर आहे. या पार्श्वभूमीवर तंजावरच्या तळामुळे हवाई दलाच्या विमानांना अंदमान-निकोबार बेटे, मलाक्काची खाडी आणि एकूणच हिंदी महासागरावर कोठेही तातडीने पोहोचून आपल्या राष्‍ट्रहिताचे रक्षण करणे शक्य होणार आहे. तंजावरच्या तळाच्या कार्यक्षेत्राचा विस्तार लक्षात घेऊन तेथे दीर्घ पल्ल्याची बहुउद्देशीय सुखोई-30 विमाने तैनात करण्यात येणार आहेत. त्यामुळे ख-या अर्थाने भारतीय हवाई दलाची पोहोच संपूर्ण हिंदी महासागरावर निर्माण होणार आहे. सुखोईबरोबरच येथे मध्यम क्षमतेची मालवाहू तसेच वैमानिकरहित विमाने आणि हेलिकॉप्टर्सही तैनात केली जाणार आहेत. लढाऊ तसेच मालवाहू विमानांचा पल्ला वाढवण्यासाठी येथे इंधनवाहू विमानेही तैनात करण्यात येणार आहेत.


तंजावरच्या तळाच्या मदतीने शेजारील देशांनाही भारतीय हवाई दल सुरक्षा आणि आणीबाणीच्या काळात मदत पुरवू शकेल. अलीकडील काळात चीनच्या हिंदी महासागरातील हालचालींच्या पार्श्वभूमीवर भारतीय आणि इंडोनेशियाच्या हवाई दलांमध्ये सहकार्य वाढत आहे. मलाक्काच्या खाडीवर वसलेल्या इंडोनेशियाचे भौगोलिक स्थान महत्त्वाचे आहे. त्यामुळे सागरी मार्गाच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही हे सहकार्य महत्त्वाचे आहे. अलीकडील काळात भारताचा आग्नेय तसेच पूर्व आशियाई देशांशी मोठ्या प्रमाणात व्यापार होत आहे. हा व्यापार अव्याहतपणे चालू राहण्यासाठी मलाक्काच्या खाडीतून जाणारा मार्ग निर्धोक असणे आवश्यक आहे. दुसरीकडे अंदमान-निकोबार बेटांचे भारताच्या राष्‍ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे.

भारताच्या हिंदी महासागरातील विशेष आर्थिक क्षेत्रापैकी सुमारे 30 टक्के क्षेत्र अंदमान-निकोबार बेटांच्या आसपासच्या परिसरात आहे. त्याचबरोबर आग्नेय आशियात चालणा-या अमली पदार्थांच्या व्यापाराचा ‘सुवर्ण त्रिकोण’ अंदमान-निकोबार बेटांच्या अगदी शेजारीच वसलेला आहे. त्याचा विपरीत परिणाम अंदमान-निकोबार बेटांच्या आणि एकूणच भारताच्या सुरक्षेवर होत आहे. त्या दृष्टीनेही अंदमान-निकोबारचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. म्हणूनच या द्वीपसमूहाचे कोणत्याही बाह्यशक्तींपासून संरक्षण करणे अतिशय आवश्यक आहे. आज भारतीय नौदलाकडे मलाक्काची खाडी चोक करण्याची क्षमता आहे. त्यामुळे भारतावर दबाव ठेवण्याच्या हेतूने अंदमान बेटांच्या उत्तरेला म्यानमारच्या कोको बेटावर चीनने टेहळणी केंद्र सुरू केले आहे. अशा परिस्थितीत अंदमान बेटांच्या तसेच मलाक्काच्या खाडीच्या सुरक्षेसाठी हवाई छत्र पुरवण्याची जबाबदारी तंजावरचा हा तळ पार पाडणार आहे. तंजावरच्या हवाई तळाच्या उद्घाटनाच्या वेळी संरक्षणमंत्र्यांनी या तळाचे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने असलेले महत्त्व विशद केले आहे. ते म्हणाले की, दक्षिण भारतात नजीकच्या काळात सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे, संवेदनशील, तसेच औद्योगिक आणि अवकाश संशोधनासाठीचे विविध प्रकल्प येऊ घातले आहेत.