Home | Editorial | Columns | ajay kulkarni article in divyamarathi

नेहमीच नाही येत असा पावसाळा

अजय कुलकर्णी | Update - Oct 11, 2017, 02:38 AM IST

नैऋत्य मोसमी पाऊस. भारतीय उपखंडात दरवर्षी नेमाने घडणारी एक हवामानशास्त्रीय घडामोड. नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सून भारत

 • ajay kulkarni article in divyamarathi
  नैऋत्य मोसमी पाऊस. भारतीय उपखंडात दरवर्षी नेमाने घडणारी एक हवामानशास्त्रीय घडामोड. नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सून भारताच्या अर्थकारण, समाजकारण अाणि शेतवर परिणाम करणारा घटक. दरवर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळ त्याचा हक्काचा. या चार महिन्यात मान्सूनची वागणूक दरवर्षी वेगळी. यंदाचे वर्षही त्याला अपवाद नाही. यंदाचा मान्सून अनेक वैशिष्ट्यांनी दीर्घकाळ स्मरणात राहील. अपेक्षेपेक्षा लवकर अागमन, असमान वितरण, नेहमी हमखास बरसणाऱ्या ठिकाणी यंदा दांडी, तर नेहमी हात राखून माप देणाऱ्या दुष्काळी पट्ट्यात यथेच्छ बरसात, रेंगाळत वाटचाल, अंदाजांना गुंगारा आणि सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय म्हणजे कोरडा जुलै तसेच बंगालच्या उपसागरातील शाखेचे थंड वागणे. अलीकडच्या काही वर्षांत नव्याने आढळणारे कमी वेळेत जास्त पाऊस, हे वैशिष्ट्य ही यंदा मान्सूनने पाळले. आता त्याचा परतीचा प्रवासही रेंगाळतच चालला आहे. यंदा मान्सूनने सर्वाधिक त्रास दिला तो भारतीय हवामानशास्त्र विभागाला, हेही यंदाचे आगळेपण.
  मुंबईपासून साधारणपणे १४,५०० किलोमीटरवर मान्सूनची प्रक्रिया सुरू होते. डिसेंबरमध्ये नाताळाच्या आसपास दक्षिण प्रशांत महासागरात विषुववृत्तानजीक मान्सूनची दिशा ठरते. प्रशांत महासागरातील शीत-उष्ण प्रवाह, व्यापारी वारे, अल निनो-ला निना, प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान, हिंदी महासागर- बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्राचे तापमान, कमी दाबाचे क्षेत्र, समुद्रावर तयार होणारे बाष्प, समुद्रावरील वादळे, हवामानातील त्या त्या वेळी होणारे बदल अशा अनेक घटकांच्या चाचणीतून मान्सूनला दरवर्षी जावे लागते. या सर्व घटकांच्या चाचणीतून सहीसलामत उत्तीर्ण होत मान्सून कधी मेच्या शेवटच्या आठवड्यात तर कधी जूनच्या मध्यात भारतीय उपखंडात दाखल होतो. यंदा तो केरळात दाखल झाला नेहमीच्या वेळेच्या दोन दिवस आधी म्हणजे २९ मे रोजी. एवढे सारे सांगायचे कारण म्हणजे, मान्सूनचा प्रवास आपल्याला वाटतो, तसा सोपा नाही. वरीलपैकी एकही घटक चुकला तर मान्सूनचे सारे गणित बिघडते. यंदा तो लवकर केरळात दाखल होऊनही त्याची वाटचाल मंदगतीने झाली.

  एरव्ही केरळात दाखल झाल्यानंतर तळकोकणात दाखल होण्यात त्याला पाच ते सहा दिवस पुरेसे ठरतात. यंदा मात्र तो त्याने चांगले १० ते १२ दिवस घेतले. जूनमध्ये आगमनानंतर आठ दिवस तो महाराष्ट्रात मुक्कामाला होता, म्हणजे मान्सूनची उत्तर सीमा मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात नाशिकपर्यंत होती, विदर्भाला गुंगारा दिला तो पावसाळा संपेपर्यंत कायम राहिला. विदर्भात जून ते सप्टेंबर या काळात ९५४.६ मिमी पाऊस पडणे अपेक्षीत होते, प्रत्यक्षात नोंद झाली ७३१.५ मिमीची. याचाच अर्थ हमखास पावसाच्या विदर्भात यंदा २३ टक्के तूट पडली. त्यावेळी मराठवाड्यात ६८२.९ मिमी पाऊस अपेक्षीत होता, तो पडला ६४२.४ मिमी. त्यातही लातूर, उस्मानाबाद, बीड सारख्या दुष्काळी जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली.
  पावसाळ्यात जुलै महिना महत्त्वाचा. जुलै म्हणजे हमखास पाऊस हे आजवरचे समीकरण यंदाच्या मान्सूनने खोटे ठरवले. कोरडा जुलै यंदा अनेक ठिकाणी दिसून आला. जुलै हा खरीप पिकांच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचा महिना. याच काळात यंदा मान्सूनने खंड दिला. केवळ जुलैच नव्हे तर ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यावर हा खंड लांबला. त्यामुळे मूग, उडीद, सोयाबीनच्या उत्पादनात २० ते ३० टक्के घट आली. परिणामी खरीपाचा पेरा जास्त होऊनही उत्पादनाला फटका बसला. मात्र,ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या चांगल्या पावसामुळे या परिणामाची दाहकता थोडी कमी झाली. कापूस आणि तुरीच्या पिकाला या पावसाने जीवदान मिळाले. रब्बीचा पेरा वाढणार हेही निश्चित झाले. हेही यंदाचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल.
  भारतात मान्सून येतो तो दोन वाटेने, एक अरबी समुद्रातून तर दुसरी वाट बंगालच्या उपसागरातील. यंदा सुरूवातीच्या काळात बंगालच्या उपसागरातील शाखा सक्रीय होती, ती नंतरच्या काळात (जुलै ते सप्टेंबर) निष्क्रीय राहिली त्याचा फटका विदर्भ, तेलंगण, ओरिसा, मध्य प्रदेश,छत्तीसगडला जास्त बसला. याउलट यंदा अरबी समुद्रातील शाखा चारही महिने चांगली सक्रीय राहिली. परिणामी, सौराष्ट्र, कच्छ, कोकण, मध्य महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटक मध्ये चांगला पाऊस झाला. यंदा मान्सूनच्या अनेक प्रणालीचे केंद्र महाराष्ट्र होते. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात तीन प्रणालीचे केंद्र महाराष्ट्रात त्यातल्या त्यात मराठवाड्यात होते. त्यामुळे जुलैमधील खंडाचा फारसा परिणाम जाणवला नाही.
  यंदा मान्सूनपेक्षा जास्त चर्चेत राहिले ते भारतीय हवामानशास्त्र खाते आणि त्यांनी वर्तवलेले अंदाज. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हवामान खात्याच्या अंदाजांवर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. एवढेच नव्हे तर मराठवाड्यातील माजलगावच्या शेतकऱ्याने अंदाज चुकतात त्यामुळे नुकसान होते अशी तक्रारच पोलीस ठाण्यात दिली. अर्थात शरद पवार यांचा अंदाज चुकला म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी एक पोते साखर हवामान खात्याला दिली. तर मुख्यमंत्र्यांनी मुंबईबाबतचा अतिवृष्टीचा अंदाज चुकल्याने केंद्राकडे तक्रार केली. हेही यंदाच्या मान्सूनचे आगळे वैशिष्टयच ठरले.
  भारतीय हवामानशास्त्र खात्याचा अंदाज खरा ठरवत आता मान्सून परतीला लागला आहे. आपल्या एप्रिलमधील दीर्घकालीन अंदाजात देशात सरासरी ९६ टक्के पाऊस होईल असे म्हटले होते. तर जूनमध्ये सरासरी ९८ टक्के पाव साचा अंदाज वर्तवला होता. एक जून ते ३० सप्टेंबर या काळात देशात ८८७.५ मिमी पाऊस अपेक्षीत होता प्रत्यक्षात ८४१.३ मिमी पाऊस झाला (जवळपास ९५ टक्के) याचाच अर्थ हवामानशास्त्र विभागाचा अंदाज खरा ठरला. स्थानीक अंदाज वर्तवण्यात हवामानशास्त्र विभाग अाणखी सक्षम व्हायचा आहे, हेही यंदा अनेकदा सिध्द झाले. महाराष्ट्रापुरते सांगायचे झाले तर यंदा १० जिल्ह्यात सरासरीहून जास्त पाऊस, १० जिल्ह्यांत सरासरीइतका पाऊस तर १६ जिल्ह्यांत सरासरीहून कमी पाऊस असे प्रमाण राहिले. एकूणच नेहमीची हमखास वैशिष्ट्यांसह मान्सूनची अनेक अागळी रुपे यंदा दिसून आली. अल निनोचा फारसा परिणाम नसताना भारतीय उपखंडात चांगला पाऊस पडतो, हेही यंदाच्या मान्सूनवरून पुन्हा एकदा दिसले. अनेक आग‌‌ळी व यापूर्वी क्वचित दिसलेल्या वैशिष्ट्यांसह परतीच्या मार्गावर असलेला यंदाचा मान्सून म्हणूनच वेगळा राहिला. त्यामुळेच वाटते, हा नेमिची येणारा पावसाळा नव्हता.

Trending