आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांधीजींचे माहात्म्य आजही कायम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतातल्या एका महान व्यक्तीचा खून झाल्याच्या घटनेला काल, ३० जानेवारी रोजी ६७ वर्षे पूर्ण झाली. नेमक्या कोणत्या कारणाने नथुराम गोडसे याने गांधीजींचा खून केला? गांधीजींचा मुलगा देवदास हा ‘हिंदुस्तान टाइम्स’चा संपादक होता. गांधीजींच्या खुनानंतर नथुराम गोडसे आणि देवदास यांची भेट झाली. त्याप्रसंगी तिथे हजर असलेला नथुरामचा भाऊ आणि कटातील साथीदार गोपाळ गोडसे यांनी गांधीजींचा खून आणि त्यानंतरच्या घडामोडी यावर एक पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकात गोपाळ गोडसे यांनी या भेटीबद्दल सांगितले आहे. गांधीजींचा सर्वात लहान मुलगा पार्लमेंट स्ट्रीटमधल्या पोलिस स्टेशनमध्ये वडिलांच्या खुन्याला भेटायला आला.
गोपाळ गोडसे लिहितात की, ‘देवदास यांच्या डोक्यात कदाचित आपण रक्तपिपासू, भयंकर दिसणाऱ्या माणसाला भेटू, अशी अपेक्षा असणार; पण प्रत्यक्षात त्यांना नथुराम याचे सौम्य आणि शांत रूप पाहायला मिळाले, ज्याची त्यांनी अपेक्षाच केली नव्हती. त्याप्रसंगी नथुराम देवदासला सांगतो, ‘मी नथुराम विनायक गोडसे आहे. मी हिंदू राष्ट्र या दैनिकाचा संपादक असून मीही तेथे हजर होतो (गांधीजींच्या खुनाच्या वेळी). आज तुम्ही आपल्या पित्याला गमावले आणि या शोकांतिकेचे कारण मीच आहे. तुमच्यावर आणि कुटुंबीयांवर कोसळलेल्या दु:खाने मला खरंच दु:ख होत आहे; पण माझ्यावर विश्वास ठेवा, मी हे कृत्य कुठल्याही व्यक्तिगत द्वेषाने केलेले नाही किंवा तुमच्यावरील रागाच्या किंवा द्वेषाच्या भावनेने केलेले नाही.' त्यावर देवदास विचारतात, ‘मग तुम्ही हे का केले?’ त्यावर नथुराम सांगतो, ‘याचे कारण केवळ राजकीय आणि राजकीयच आहे.’ पुढे स्पष्टीकरण देण्यासाठी ते काही वेळ मागतात; पण पोलिस त्याला परवानगी देत नाहीत. न्यायालयामध्ये नथुराम आपली बाजू मांडणारे निवेदन देतो; पण न्यायालय त्यावर बंदी घालते. याच पुस्तकाच्या परिशिष्टामध्ये गोपाळ गोडसे यांनी नथुरामचे मृत्युपत्र छापले आहे. या मृत्युपत्रात काय आहे? नथुराम गोडसे याने त्यामध्ये पुढील मुद्दे उपस्थित केले आहेत.

नथुराम गोडसेने म्हटले आहे की, ‘गांधीजींबद्दल मला अतीव आदर आहे. गांधीजींनी लिहिलेल्या आणि बोललेल्या प्रत्येक शब्दाचा मी नीट अभ्यास केला आहे. गेल्या ३० वर्षांत भारतीय समाजमनावर गांधीवादी विचारसरणीने सर्वाधिक परिणाम केला आहे आणि भारतीय समाजमनाला आकार दिला आहे. इतर कुठलीही विचारधारा इतकी परिणामकारक ठरली नाही.’ गोडसे याने गांधीजींबद्दल काय वाटते, ते या शब्दांत मांडले आहे. गोडसे पुढे म्हणतो "गेली ३२ वर्षे सतत लोकांना प्रोत्साहित करणाऱ्या गांधीवादी विचारसरणीचा शेवट मुस्लिमांचा अनुनय करणाऱ्या गांधीजींच्या अलीकडच्या उपोषणात झाला आणि त्याच वेळेस मी निष्कर्ष काढला की आता गांधीजींचे अस्तित्व ताबडतोब संपवले पाहिजे. गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत तेथील भारतीय समुदायाच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या हितासाठी बरेच काही केले; पण जेव्हा ते भारतात आले, तेव्हापासून गांधीजींनी एक स्वतंत्र विचारसरणी सर्वांवर लादायला सुरुवात केली. यामध्ये त्यांनी अशा मनोवृत्तीने काम सुरू केले आहे की भल्याबुऱ्याचा ते जो काही निकाल देतील, तोच खरा आणि देशाला जर त्यांचे नेतृत्व हवे असेल, तर देशाने त्यांचा लहरीपणाही स्वीकारायला हवा. जर हे चालणार नसेल तर गांधीजी काँग्रेसपासून दूर जाऊन आपल्याला हव्या त्याच मार्गाने चालत राहतील.’

या सा-यांची परिणती गांधीजींच्या विरोधात कृती करण्यात झाली. कारण नथुरामचा दृष्टिकोन असा होता की ‘गांधीजींसमोर कोणतीही अर्धवट कृती उपयोगाची नाही. एक तर काँग्रेसला त्यांच्यासमोर सतत झुकलं पाहिजे किंवा त्यांचा लहरीपणा, बेफिकिरी, त्यांचं तत्त्वज्ञान आणि त्यांची जुनाट विचारसरणी याच्यासमोर नमतं घेतलं पाहिजे किंवा त्यांच्याशिवाय मार्गक्रमण केले पाहिजे.’
गांधीजींवरचा दुसरा आरोप असा आहे की, त्यांनी पाकिस्तानच्या निर्मितीला मदत केली. ‘ज्या देशाची आम्ही पूजा करतो त्याची काँग्रेसचे मोठे नेते गांधीजींच्या संमतीने विभागणी करून देशाचे तुकडे करतात, तेव्हा साहजिकच यामुळे माझे मन प्रचंड रागाने भरून गेले आहे. व्यक्तिगत स्तरावर वाईट उद््गार काढायचे नाहीत; पण मी हे नक्की स्पष्ट शब्दांत म्हणेन की, मला मुस्लिमांच्या पारड्यात सतत झुकतं माप टाकणाऱ्या सध्याच्या सरकारबद्दल यत्किंचितही आदर नाही. पण त्याच वेळी स्पष्ट करायचे आहे की ही सारी धोरणे म्हणजे गांधीजींच्या मतांचा परिपाक आहे.’

गोडसे याच्या विधानाबद्दल इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो. त्याला असे वाटते की, गांधीजी हे देशाची विभागणी करायला उत्सुक होते; पण प्रत्यक्ष इतिहास असे सांगतो की परिस्थिती नेमकी याच्या उलट होती. नथुराम गांधीजींच्या शेवटच्या उपोषणाला आक्षेप घेतो. हे उपोषण त्यांनी भारताने पाकिस्तानला पैसे द्यायला नकार दिल्यामुळे सुरू केले होते; पण प्रत्यक्षात भारत आपले पैसे देण्याचे वचन मोडत होता. गांधीजींनी भारताला योग्य दिशेने नेले आणि देशाची चूक सुधारायचा प्रयत्न केला. नथुराम जे काही सांगतो, त्याच्यातून तर्कशुद्धता शोधणे कठीण जाते. देवदास गांधींसमोर नथुरामने जे काही विधान केले त्याच्या नेमके विरोधातील हे विधान आहे. नथुरामची कृती काही राजकारणामुळे नव्हती. गांधीजींच्या सर्वधर्मसमभाव विचारसरणीचा नथुराम तिरस्कार करत होता. मूळ हिंदू चैतन्य म्हणून जे काही आहे, त्यालाच त्याचा विरोध होता. तोही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्याचा बुद्धिभेद केल्यामुळे. प्रत्यक्षात वस्तुस्थिती अशी आहे की, ‘गांधीजींची कुठलीही विचारसरणी किंवा कृती बाजूला काढण्यासारखी नाही आणि म्हणूनच आज इतक्या दशकांनंतरही राजकारणी म्हणून गांधीजींचे वैश्विक महत्त्व कायम आहे. १९४९ मध्ये जॉर्ज आॅरवेल यांनी लिहिले आहे, ‘एखाद्याला माझ्याप्रमाणेच गांधीजींच्या सौंदर्यदृष्टीचा तिटकारा वाटू शकतो किंवा त्यांच्या तर्काबद्दलच्या दाव्यातही मतभेद असू शकतात (असा दावा त्यांनी स्वत: केलेला नाही हे लक्षात घेतलेले बरे). गांधीजींचे संतत्वच आदर्शवादी आहे ही गोष्ट नाकारल्यानंतर त्यांचा मूलभूत हेतू अमानवी आणि प्रतिक्रियात्मक वाटू शकतो; पण साध्या विचारसरणीचे राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले आणि त्या काळातील राजकीय नेत्यांशी त्यांची तुलना केली तर लक्षात येते की गांधीजींनी खूप नितळ असा वारसा मागे ठेवला आहे.' आज 2015 मध्येही ही वस्तुस्थिती कायम आहे आणि नथुराम गोडसे याचे आक्षेप, अारोप मात्र काळाच्या धुक्यात नाहीसे झाले आहेत.

नथुरामचे समर्थन घृणास्पद
महात्मा गांधी यांचा खून नथुराम गोडसे याने ३० जानेवारी १९४८ या दिवशी केला. त्यामुळे ३० जानेवारी हा दिवस शौर्य दिवस म्हणून पाळण्याचा कुविचार अखिल भारतीय हिंदू महासभेने काही महिन्यांपूर्वी प्रकट केला. उत्तर प्रदेशमध्ये मीरत शहरात नथुराम गोडसेचा पुतळा उभारण्याचीही या संघटनेची योजना आहे. या घडामोडींमुळे मीरतमध्ये वातावरण तंग होणे स्वाभाविक होते. नथुरामचे अखिल भारतीय हिंदू महासभेने चालवलेले समर्थन हे अत्यंत घृणास्पद आहे. १९४७ मध्ये भारताची फाळणी झाल्यानंतर पाकिस्तान निर्माण झाले. त्यामुळे पूर्वीचा अखंड भारत पुन्हा आकाराला येईपर्यंत नथुराम गोडसेच्या अस्थींचे विसर्जन न करण्याचा निर्धार त्याला मानणाऱ्या अनुयायांनी केला. तो अस्थिकलश पुण्यात ठेवलेला आहे. नथुरामचे पुतळे देशभरात उभारले गेले पाहिजेत, अशी भाषा अखिल भारतीय हिंदू महासभेचे नेते चंद्रप्रकाश कौशिक यांनी केली आहे.