आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान नावाचा "सिनेमा'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जे मुंबईच्या वांद्रे उपनगरात राहतात (मीही अनेक वर्षं त्या भागात राहत होतो) त्यांना सलमानच्या लोकप्रियतेबद्दल वेगळे काही सांगायला नको. बॉलीवूडमधील तिन्ही प्रसिद्ध खान हे वांद्र्याला राहतात; पण सलमान काही वेगळाच आहे. शाहरुखचा बंगला मन्नत हा खूप मोठा आहे. डोळ्यात भरण्याजोगा आहे आणि त्याचे गेट मुख्य रस्त्यावरच आहे. त्याचे चाहते नेहमीच तिथे छोट्या- मोठ्या संख्येने घोटाळताना दिसतात. आमिर खानच्या घरासमोर तुलनेने खूपच कमी चाहते असतात किंवा नसतात. हे मुद्दामच झाले असावे याचे कारण दोन्ही खानांपेक्षा तो अधिक खासगीपणा जपणारा आहे. सलमानच्या घरासमोर नेहमीच गर्दी असते. सुट्या असो, वीकेंड असो किंवा काही सण असो, सतत त्याच्या घरासमोर चाहते जमलेले असतात. खर्‍या अर्थाने स्टारची ताकद असलेला तो अभिनेता आहे, असे म्हणता येईल.

वांद्र्याचे पोस्ट ऑफिसदेखील माझ्या या निरीक्षणाला दुजोरा देते. मी एका वर्तमानपत्रात काम करत होतो. त्यात म्हटले होते की, सलमानसाठी जी पत्रे यायची (अर्थात ई- मेल यायच्या आधीची ही गोष्ट आहे. माणसे तेव्हा हाताने पत्रे लिहीत असत.) त्यांची संख्या आमिर खान व शाहरुख खान या दोघांनाही येणार्‍या पत्रांच्या संख्येच्या बेरजेपेक्षा अधिक असतात. मला आठवतंय की, आमिर किंवा शाहरुखपेक्षा तिप्पट-चौपट पत्रे सलमानला येत असत.

काही वर्षांपूर्वी सलमानला ज्या अपघातासाठी पकडण्यात आले त्याच्या काही महिने आधी ऐश्वर्या राॅयच्या वडिलांनी आमच्या वर्तमानपत्राकडे एक तक्रार केली होती. त्यांना आपल्या मुलीची काळजी वाटत होती. ती तेव्हा सलमान खानच्या प्रेमात होती आणि त्याचं वागणं त्या वृद्ध व्यक्तीला घाबरवणारं होतं. सलमान कधीही मध्यरात्री यायचा आणि जर आत घेतले नाही तर दार ठोठावत बसायचा, असं त्यांनी सांगितलं. नंतर घडलं असं की, ऐश्वर्याला या नात्यातून बाहेर पडायचं होतं आणि ती बाहेर पडलीसुद्धा; पण सलमान यासाठी काही तयार नव्हता.

अझीझ मिर्झाच्या एका सिनेमाच्या सेटवर ज्या सिनेमात शाहरुख आणि ऐश्वर्या काम करत होते तिथे सलमान अचानक गेला आणि रस्त्यावर लोळू लागला. त्याने पूर्ण शूटिंग थांबवून टाकले. यामुळे शाहरुख खान चिडला. त्यामुळेच नंतर दोघांमधल्या गोष्टी बिघडत गेल्या. त्याच काळात सलमान खानने फार्म हाऊसवर काही वन्य जनावरांना पाळले असल्याची बातमी आली. त्याही अगोदर सलमान खानने हरणांना मारल्याची तक्रार आली होती. त्यामुळे हे सगळं पाहिल्यावर असे दिसते की, हा माणूस तसा थोडासा प्रॉब्लेम असलेलाच आहे आणि त्याला समुपदेशन किंवा वैद्यकीय उपचाराची गरज आहे. पण असे असले तरी बॉलीवूडमधल्या मंडळींनी मात्र त्याच्या सगळ्या वाह्यात गोष्टींना थारा दिला. इतकंच नाही तर त्याला उत्तेजनही दिले आहे. त्याला शिक्षा झाल्यावर अभिजितसारख्या गायकांनी रस्त्यावर झोपणार्‍यांना दोष दिला (जे खरं तर झोपलेच नव्हते) आणि झोपल्यामुळे त्यांनीच मृत्यूला आमंत्रण दिले, असे म्हटले होते.

हे सारे ही मंडळी का करतात? ते करणारच. सलमानने काही वेडंवाकडं करो वा न करो, तरी ते त्याला पाठिंबा देणारच. बॉलीवूड ही नेहमीच यशस्वी लोकांची फिल्म इंडस्ट्री राहिली आहे आणि जगातील एक मोठी फिल्म इंडस्ट्री म्हणूनही तिचे नाव आहे. जगात अन्य दोन मोठ्या फिल्म इंडस्ट्रीज आहेत त्या म्हणजे हाँगकाँग म्हणजे चिनी आणि हॉलीवूड. या सार्‍यांमध्ये एक स्टार सिस्टिम असते; पण बॉलीवूडमधली स्टार सिस्टिम खूप छोटी आहे. ती आहे चार किंवा पाच जणांची. म्हणजे ही पाच मंडळीच सिनेमाला यश मिळवून द्यायची हमी देतात किंवा त्यांचेच सिनेमे इतिहास घडवत असतात. या स्टार मंडळींचे सिनेमे दर शुक्रवारी ओपनिंगलाच हिट ठरतात. ही माणसे बॉलीवूडमध्ये खूप लोकप्रिय आहेत. त्यांच्याकडे खूप ताकद आहे अर्थात ही ताकद त्यांनी आपल्या गुणांवर कमावली आहे. अमिताभने आपल्या मुलाला कितीही प्रमोट करायचा प्रयत्न केला तरी तो काही यशस्वी होऊन खानांना टक्कर देऊ शकला नाही. कारण त्याला लोकांनी कधीच स्वीकारले नाही. त्या तुलनेत लोकांनी प्रचंड संख्येने सलमान, शाहरुख आणि आमिरला स्वीकारले आहे.

या ताकदीला एक अंतर्गत मितीदेखील आहे. बॉलीवूडमधले सगळे जण मग ते दिग्दर्शक असो, गायक असो, मेकअप करणारा व बॉडी डबल असो, ते कितीही कुशल असोत व नसोत, त्यांनी यातल्या एका स्टारबरोबर काम केलेलं असलंच पाहिजे किंवा छोटे-मोठे सिनेमे तरी करायलाच हवेत. अर्थात याला अपवाद आहेत. उदाहरणार्थ गुलजार किंवा अनुराग कश्यप यांच्यासारखी माणसे याला अपवाद म्हणता येतील. बर्‍याच स्टार्सची कक्षा ही बांडगुळासारखी परजीवी आहे आणि जोवर स्टार पॉवर तुमच्या मस्तकावर आहे तोवरच तुम्ही टिकू शकता. हे सारे खरं तर मुगल साम्राज्यासारखे आहे. जिथे राजावर पूर्ण आणि अविचलित निष्ठा आवश्यक असते.

इथे स्टार ठरवतो त्याच्याबरोबर कोणी काम करायचे ते आणि हे पुढे वाढत जाते. म्हणजे सलमानचे कुटुंब त्याच्या प्रत्येक सिनेमात शिरकाव करते, कारण तो फक्त सिनेमाचा हीरोच नसतो, तर तो म्हणजे साक्षात सिनेमा असतो. थोडक्यात सलमान खानचे आयुष्य म्हणजे एक सिनेमाच झाला आहे. काही वर्षांपूर्वी हिंदुस्तान टाइम्सची मुंबई आवृत्ती प्रसिद्ध होऊ लागली तेव्हा त्या आवृत्तीच्या पहिल्या दिवशीच्या अंकात त्यांनी सलमानचे ऐश्वर्याशी झालेले संभाषण छापलेले होते. सलमान आपले अंडरवर्ल्डशी असलेले संबंध वापरून तिला धमक्या देत होता हे त्यातून स्पष्ट होत होते. पोलिसांनी हे संभाषण टॅप केले; पण नंतर ते नाकारले.

प्रसिद्ध पत्रकार जे. डे यांनी ती बातमी दिली होती आणि नंतरच्या घटनांनी ती खरी असल्याचेच दिसले (जे. डे यांचा पुढे अजून एका स्वतंत्र प्रकरणात खून झाला.) आमच्या वृत्तपत्राने प्रीती झिंटाबद्दल सलमान वेडेवाकडे बोलतानाचे संभाषण छापले; पण तरीही प्रीतीने सलमानऐवजी आमच्यावरच खटला दाखल केला. सलमानला शिक्षा झाल्यावर ती आपल्या टीमचा बंगळुरूमधला सामना सोडून सलमानच्या घरी धावली. मला याचे आश्चर्य वाटत नाही. बॉलीवूडकडून सलमान किंवा संजय दत्तबद्दल संतुलित किंवा नि:पक्षपाती वागण्याची अपेक्षाच नको, कारण ती एक परजीवी इंडस्ट्री आहे.

आकार पटेल, ज्येष्ठ पत्रकार
बातम्या आणखी आहेत...