आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धोक्याची घंटा(अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला एक आठवडा उलटून गेला आहे; पण पोलिसांनी याप्रकरणी अद्याप एकासही अटक केलेली नाही. गेल्या रविवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दाभोलकर यांचा खून पूर्वनियोजित कटाचा भाग असून पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले असल्याचे म्हटले होते. महात्मा गांधी यांची हत्या ज्या विचारसरणीच्या लोकांनी केली होती त्याच विचारसरणीच्या लोकांनी दाभोलकर यांची हत्या केल्याचे मुख्यमंत्र्यांनी याअगोदर म्हटले होते. दाभोलकर यांच्या हयातीत त्यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणावर विद्वेषी, विखारी प्रचार चालला होता. गेल्या काही महिन्यांत हा विरोध अगदी पराकोटीला जाऊन पोहोचला होता. त्यांना झेड सुरक्षा देण्याइतपत चर्चा झाली होती. तरीही सरकारने दाभोलकरांना होत असलेला विरोध फारसा गांभीर्याने घेतला नाही.

दाभोलकरांचा खून करावा, असा कट काही संघटनांमध्ये शिजत असतानाही आपल्या गुप्तचर खात्याला त्याची खबरबातही लागलेली नव्हती. या घटना निश्चितच राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने गंभीर आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात जादूटोणाविरोधी विधेयक सभागृहात मांडले जाणार होते. पण हे विधेयक समजा चर्चेला आले असते तर त्यानंतर समाजात निर्माण होणा-या प्रतिक्रिया कोणत्या स्वरूपाच्या असतील यावर आपल्या गृहखात्याने काहीच अभ्यास केलेला नव्हता हेही आता स्पष्टपणेच दिसून आले आहे.

दाभोलकरांच्या हत्येनंतर असेही जाणवू लागले आहे की, आपल्याकडील धर्मसुधारणा, सामाजिक सुधारणांच्या वाटेवर जागोजागी सुरुंग आहेत. हे सुरुंग इतके शक्तिशाली आहेत की, त्यांच्या स्फोटामुळे आपल्याकडील पुरोगामी, उदारमतवाद, लोकशाहीवाद, विवेकवाद, विज्ञाननिष्ठ आणि बुद्धिप्रामाण्यवादाच्या चौकटी खिळखिळ्या होऊ शकतात. एकदा या चौकटी कमकुवत झाल्या तर त्या पूर्वस्थितीत आणण्यासाठी बराच काळ जावा लागतो. महाराष्ट्रात गेल्या दोनशे वर्षांत धर्माला आव्हान देणारे, समाजसुधारणा करणारे जे प्रगत विचार रुजले होते त्या विचारांमुळेच महाराष्ट्राचा आर्थिक विकास देशातील इतर राज्यांच्या तुलनेत झपाट्याने झाला होता. धर्मातल्या उच्च-नीच परंपरा, कर्मकांडे, बुवाबाजी यांना एकदा मोडून काढले तर सामाजिक-धार्मिक बंधने सैल होऊन समाज मुक्त होतो व आर्थिक विकास वेगाने होतो, असे इतिहास सांगतो.

चीनमध्ये माओने सांस्कृतिक क्रांतीच्या माध्यमातून धर्मातील उतरंड मोडून अर्थकारणासाठी पोकळी निर्माण केली होती. महाराष्ट्रातही काहीसे तसेच झाले आहे. उद्यमशीलता हा महाराष्ट्राच्या विकासाचा एक अद्याहृत भाग झाला होता. कारण व्यक्तीच्या सार्वजनिक जीवनातून धर्माचे प्राबल्य व प्रभाव कमी झाले होते आणि समाज स्वत:चे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्नशील होता. महाराष्ट्र सर्व राज्यांत अग्रेसर असण्यामागे अशी पार्श्वभूमी होती. आता ही परिस्थिती राहिलेली नाही. पुण्यात दाभोलकरांचा झालेला खून हा 65 वर्षांपूर्वी फॅसिझमच्या पेरलेल्या एका सुरुंगाचा शक्तिशाली स्फोट होता. त्यामध्ये केवळ दाभोलकरांचा बळी गेलेला नाही, तर स्वत:ला पुरोगामी म्हणवणारे राज्यकर्तेही रक्तबंबाळ, घायाळ झाले आहेत.

कदाचित काही काळानंतर महाराष्ट्राच्या पुरोगामी राजकारणाला आयसीयूमध्ये दाखल करावे लागेल, अशीही चिंताजनक परिस्थिती आहे. दाभोलकरांचा खुनानंतर अजून एक बाब अधोरेखित होते की, आर्थिक उदारीकरण आणि त्या अनुषंगाने झालेली राजकीय घुसळण यांच्या संघर्षात फॅसिझमच्या चौकटीला फारसे तडे गेलेले नाहीत. उलट तिला तंत्रज्ञानाने अधिक बळ दिले आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाचा प्रसार आणि आर्थिक -उदारीकरणामुळे सामाजिक विषमता कमी झालेली नाही हे मान्य केले तरी जो गट ‘नाही रे’ वर्गातील आहे तो ‘आहे रे’ वर्गापेक्षा आक्रमक झालेला नाही. त्या वर्गाचे नव्या वर्गव्यवस्थेत शोषण सुरूच आहे. पण हा वर्ग मोठ्या संख्येने फॅसिझमच्या आहारी गेलेला नाही.

उलट ज्या मध्यमवर्गाने उदारीकरणाची फळे चाखली, जो वर्ग उदारीकरणापूर्वी चंगळवादाच्या नावाने खडे फोडत होता त्या वर्गानेच चंगळवादाला आपल्या जीवनशैलीत खुबीने बसवले. या वर्गाच्या इच्छा-आकांक्षा-अपेक्षा आर्थिक विकासाच्या वाढीबरोबर अधिक वाढल्या. हाच वर्ग भ्रष्टाचार, सुशासनाच्या मुद्द्यावर आक्रमक झाला व तो फॅसिझमचा बळी ठरला आहे. आता देशातील परिस्थिती अशी आहे की, सत्ताधा-यांच्या विरोधातील संताप-रागाचा, इच्छा-आकांक्षा-अपेक्षांचा गैरफायदा घेऊन फॅसिस्ट मंडळींनी आपला राजकीय अजेंडा राबवण्यास सुरुवात केली आहे आणि देश सेक्युलरवादी, उदारतमतवादी, पुरोगामी विरुद्ध सनातनवादी, धर्मांध असा दुभंगत चालला आहे. दाभोलकरांनी आपली लढाई विवेकवादाच्या मार्गाने, लोकशाहीच्या चौकटीत, बुद्धिप्रामाण्यवादाच्या कक्षेत लढली; पण दुर्दैवाने त्यांच्या या लढाईला हा धर्म विरुद्ध तो धर्म, ही जात विरुद्ध ती जात असे रूप देण्याचे प्रयत्न झाले. या देशातील हिंदूंचे प्रमाण 82 टक्के आहे. त्यामुळे हिंदू धर्मातील गरीब जनतेचे शोषण करत असलेली पूर्वापार कर्मकांडे मोडून काढल्यास हा धर्म अधिक सहिष्णू, विवेकवादी, विज्ञाननिष्ठ होईल असा त्यांचा आग्रह होता.

दाभोलकरांचा धर्मसंस्थेला विरोध नव्हता किंवा त्यांचा लोकांच्या श्रद्धास्थानांना विरोध नव्हता. त्यांची धडपड पुरोगामी समाज निर्माण करण्यासाठी होती. त्यांनी जात पंचायतींमधील अनिष्ट रुढींच्या विरोधात हाक दिली; पण त्यांच्याविरोधात जातीपातींमधील कडवे उभे राहिले. त्यांनी जादूटोणा, बुवाबाजीसारख्या धंद्याला आव्हान दिले, त्यांच्याही रोषाला ते बळी पडले. दाभोलकरांची धर्म-सामाजिक सुधारणेची ही व्यापक भूमिका विवेक हरवलेल्या सनातनवाद्यांना समजावून घ्यायची नव्हती. कर्मकांडाविरोधात दंड थोपटणारे दाभोलकर हे सनातनवाद्यांच्या दृष्टीने धर्मद्रोही, राष्ट्रद्रोहीच होते. आजही आपल्या पुरोगामी राज्यकर्त्यांना विवेकवाद हा फॅसिझमचा क्रमांक एकचा शत्रू असतो हे कळालेले नाही. त्यामुळेच दाभोलकरांचा खून करणारे आणि खुनाची सुपारी देणारे अजून सापडलेले नाहीत. ही समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे.