आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Alhad Godbole Editorial About Charlie Hebdo, Divya Marathi

‘चार्ली'ची अहिंसक दहशत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्रान्समधील ‘चार्ली' या प्रसिद्ध व्यंग-साप्ताहिकावर (मूळ फ्रेंच नाव ‘चार्ली हेब्दो'. हेब्दो म्हणजे आठवड्यातून एकदा प्रसिद्ध होणारे नियतकालिक) सैद आणि शरीफ कोवची या धर्मांध दहशतवाद्यांनी हल्ला चढवून ते संपवण्याचा घाट घातला, त्याला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त हा विशेष लेख.

‘गोळ्या घातल्याने माणूस मरेल, पण विचार संपत नाही' असेम्हणतात; पण मारेकऱ्यांना मारून पुरून टाकले तरी तेही जिवंत राहतातच, हे आपण विसरतो. अर्थात ते ‘माणूस' असल्याचे मान्य केले तर ! फ्रान्समधील ‘चार्ली' या प्रसिद्ध व्यंग-साप्ताहिकावर (मूळ फ्रेंच नाव ‘चार्ली हेब्दो'. हेब्दो म्हणजे आठवड्यातून एकदा प्रसिद्ध होणारे नियतकालिक) सैद आणि शरीफ कोवची या धर्मांध दहशतवाद्यांनी हल्ला चढवून ते संपवण्याचा घाट घातला, त्याला आज एक वर्ष होत आहे. जानेवारी २०१५ च्या या हल्ल्यात पाच व्यंगचित्रकार आणि दोन संपादकीय सहायक यांच्यासह बारा जण ठार आणि सतरा जण जखमी झाले होते. पोलिसांच्या कारवाईत कोवची बंधू मारले गेले. या घटनेनंतर चार्ली बंद पडता चालूच राहिले, पण दहशतवाद्यांच्या कारवायाही थांबल्या नाहीत.

पॅरिसमध्ये झालेल्या सर्वात भीषण दहशतवादी हल्ला-सत्राला तर अजून दोन महिनेही झालेले नाहीत. १३ नोव्हेंबरच्या या हल्ल्यात १३०हून अधिक फ्रेंच नागरिक मारले गेले आणि पावणेचारशे जखमी झाले. दहशतवाद्यांनी एकट्या बाताच्लन थिएटरमध्येच ८९ प्रेक्षकांना गोळ्या घालून मारले होते. या हल्ल्याची आठवण अजून ताजी असतानाच चार्लीवरील हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षपूर्तीनिमित्त चार्लीचा विशेषांक आज प्रकाशित होत आहे. त्याचे मुखपृष्ठ बोलके आणि त्याहून अधिक बोचरे आहे. "रिस' या लघुनामाने प्रसिद्ध असलेल्या लॉरेन सॉरेसा या व्यंगचित्रकाराने ते रेखाटले आहे. पाठीवर एके-४७ रायफल असलेला, रक्तरंजित हातांचा, देवतेच्या चेहऱ्याचा पळपुटा दहशतवादी या मुखपृष्ठावर काढला आहे आणि सोबत शब्द आहेत, ‘वर्ष उलटले, पण मारेकरी अजून आहेतच!' मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याची जखम उरी बाळगणाऱ्या आणि त्याचबरोबर असहिष्णुतेच्या आगीत तेल ओतून धार्मिक तेढ वाढवू इच्छिणाऱ्या भारतीयांनी, चार्लीवरील हल्ला आणि त्यांचा दहशतवादाविरुद्धचा बोचरा अहिंसक लढा, याची दखल सहवेदनेच्या भावनेतून घ्यायला हवी. चार्लीच्या तोडीचे एकही व्यंग-साप्ताहिक आपल्याकडे नाही, हा भाग निराळा. पण अशी लढाई आपण लढू शकू का आणि दहशतवादाला अहिंसक दहशतीचे उत्तर देण्याएवढी प्रगल्भता आपल्यात कधी येईल का, असे एखादे नियतकालिक लढा देत असल्यास सामान्य माणूस म्हणून त्याच्या पाठीशी उभे राहण्याचे धाडस तरी आपण दाखवू का, असा विचार यानिमित्ताने प्रत्येकाने करायला हरकत नाही. काही व्यंगचित्रकारांनी एकत्र येऊन १९७० मध्ये सुरू केलेल्या या साप्ताहिकाचा ४५ वर्षांचा इतिहास बराच मोठा आणि लक्षवेधी आहे. त्याची भूमिका अतिडावी, निरीश्वरवादी किंबहुना धर्मश्रद्धेची खिल्ली उडवण्याची आहे. त्यातूनच नोव्हेंबर २०११ मध्ये चार्लीच्या कार्यालयावर पहिला दहशतवादी हल्ला झाला होता. निमित्त होते, लिबियात शरियत लागू झाल्याच्या आणि ट्युनिशियात इस्लामवादी पक्ष विजयी झाल्याच्या घटनेवर चार्लीने केलेल्या व्यंगात्मक टीकेचे. त्यात "संपादक महंमदा'ने चार्लीचे "साप्ताहिक शरियत' असे नामांतर केले होते. दहशतवाद्यांना हल्ल्यासाठी तेवढे कारण पुरेसे होते!

मात्र, चार्लीचा कुंचला त्यानंतरही फटकारे काढतच राहिला. त्यातून जानेवारी २०१५चे हत्याकांड घडले. त्याआधी तब्बल दहाएक वर्षे चार्लीच्या संपादकांना आणि कर्मचाऱ्यांना धमक्या येत होत्याच आणि अजूनही येत आहेत. हल्ल्यानंतरच्या वर्षभरात सर्व कर्मचाऱ्यांना कायम संरक्षण दिले गेले, कार्यालय सुरक्षित जागी हलवून बंदोबस्त वाढवण्यात आला. पण आता त्यांना पडदे ओढून अंधारात काम करावे लागते. चार्ली चालूच राहिले, पण चार्ली आणि त्याचे कर्मचारी मोकळ्या हवेला पारखे झाले, पूर्वीचा राबता ओसरला. चार्लीचा व्यवस्थापकीय संपादक गेरार्ड बिअर्ड याच्या भाषेत सांगायचे तर, ‘आय डोंट थिंक एनिथिंग चेंज्ड सिन्स सेव्हन्थ जानेवारी, एक्सेप्ट एम्प्टीनेस वुई आर सफरिंग.'

चार्लीची जन्मकथा सुरस आहे. चार्लीचे बहुतेक व्यंगचित्रकार पूर्वी ‘हाराकिरी' नावाच्या नियतकालिकात काम करत होते. १९७० मध्ये माजी अध्यक्ष चार्ल्स गॉल यांच्या निधनाच्याच आसपास फ्रान्समधील कोलंबी नामक गावात नाइट क्लबला आग लागून १४६ जण मृत्युमुखी पडले होते. या दोन्ही घटना माध्यमांनी ज्या तऱ्हेने हाताळल्या, त्यावर हाराकिरीने "ट्रॅजिक बॉल अॅट कोलंबी, वन डेड' असे सचित्र भाष्य केले. पाठोपाठ फ्रेंच सरकारच्या रोषामुळे या नियतकालिकाला "हाराकिरी' पत्करावी लागली आणि हात शिवशिवत असलेल्या व्यंगचित्रकारांनी एकत्र येऊन नवे साप्ताहिक सुरू केले, ते चार्लला इकाराची जोड देऊन! जणू चार्ल्स गॉल यांना श्रद्धांजलीच! त्यानंतर चार्लीवर आजवर अनेक संकटे आली. १९८० मध्ये ते बंद पडले होते आणि तब्बल दहा वर्षांनी पुन्हा सुरूही झाले. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढत राहिलेल्या चार्लीला आर्थिक आणि व्यावसायिक पातळीवरही झगडावे लागले. चार्लीने हात धुऊन महंमदामागे लागू नये, असे किमान चाळीस टक्के फ्रेंच नागरिकांचे मत असल्याचा निष्कर्ष एका पाहणीतून निघाला होता, त्यामुळे असेल किंवा वाचकांनीही दहशतवाद्यांचा धसका घेतल्यामुळे असेल; पण चार्ली बंद पडणार आणि दहशतवाद्यांची इच्छा पूर्ण होणार, असे वाटू लागले होते.
ते अ-राजकीय असावे, अशा मताच्या सहकाऱ्यांनी साथ सोडल्यामुळे, मतभेदांमुळे किंवा गेल्या काही वर्षांत आर्थिक अडचणींत सापडल्यामुळे ते बंद पडण्याची पाळीही चार्लीवर ओढवली होती. पण त्यांची लढाई चालू राहिली. एकेकाळी अवघा तीस हजार खप असलेल्या चार्लीची मागणी गतवर्षीच्या हल्ल्यानंतर एक लाख ऐंशी हजारांवर गेली आणि वर्षपूर्तीनिमित्त प्रकाशित होत असलेल्या अंकाने तर कळसच गाठला. आज एकट्या फ्रान्समध्ये चार्लीचे दहा लाख अंक विक्रीसाठी येत आहेत आणि हजारो प्रती परदेशांत रवाना होत आहेत. पण मुद्दा खपाचा नाही. दहशतवादाविरुद्धची लढाई फक्त राजकीय किंवा सुरक्षा व्यवस्थेच्या पातळीवर लढवली जात नसते; लेखणी आणि कुंचलाही बंदुकीच्या गोळ्यांना तेवढेच चोख उत्तर देऊ शकतो आणि धर्मांधांना तसेच धर्माच्या नावावर रक्त सांडणाऱ्या अतिरेक्यांना ते दाखवून देता येते. याच बळावर चार्ली आणखी दहाच काय, शंभर वर्षेही टिकू शकतो. त्यानिमित्त काढल्या जाणाऱ्या विशेषांकावर मात्र असेच मोकाट मारेकऱ्यांचे व्यंगचित्र रेखाटण्याची पाळी तत्कालीन व्यंगचित्रकारांवर येऊ नये!
(alhadgodbole@gmail.com)