आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटमधील सर्व शिखरे सर!(अग्रलेख)

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विश्व क्रिकेटमधील वर्चस्वाची सारी दौलत धोनीच्या भारतीय संघाने देशात आणली. ट्वेंटी-20 क्रिकेटचे विश्वविजेतेपद जिंकणा-या धोनीने 28 वर्षांनंतर 2011मध्ये भारतात विश्वविजेतेपदाचा कप पुन्हा आणला. रविवारी आयसीसी चॅम्पियन्स करंडक जिंकून क्रिकेटमधील सार्वभौमत्वाची एकमेव उणीवही धोनीने दूर केली. धोनीच्या संघाने या स्पर्धेसाठी इंग्लंडमध्ये पाऊल टाकले तेव्हा त्यांच्यावर रोखलेल्या सर्व नजरा सहानुभूतीच्या होत्या.

आयपीएल स्पॉट फिक्सिंगनंतर उठलेल्या वादळात भारतीय क्रिकेटच उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होते. क्रिकेट या खेळाच्या विश्वासार्हतेला भारतात तडा जाण्याची चिन्हे दिसत होती. भारतीय क्रिकेट प्रशासन व्यवस्था खचली होती. अशा वेळी विजयाचा उतारा हवा होता. प्रतिकूल हवामान, खेळपट्ट्या आणि गतइतिहास यावर मात करून धोनीच्या धुरंधरांनी विजेतेपद पटकावले. सराव सामन्यांपासून अंतिम सामन्यापर्यंत भारतीय संघ विजेत्याच्या थाटात खेळला. जगातील आठ सर्वोत्तम संघांमधील ही स्पर्धा. चॅम्पियन्स संघांमधील स्पर्धा. आठ संघांपैकी कुणीही विजेता ठरू शकेल, अशी प्रत्येकाची ताकद. या विजेत्यांच्या कळपात भारतीय संघ तसा नवखाच होता. सचिन, द्रविड, सेहवाग, गंभीर, झहीर खान यांच्या अनुपस्थितीत खेळण्याचे प्रचंड दडपण होतेच. त्यापेक्षाही मोठे दडपण होते विश्वविजेतेपदाचे आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील अव्वल स्थानाची शान टिकवण्याचे.

अपेक्षांचे ओझे, दडपण मोठे असते. धोनीच्या संघावर 120 कोटी भारतीयांच्या अपेक्षांचे दडपण होतेच, त्यापेक्षाही अधिक दडपण भारतीय वंशाच्या इंग्लंडमध्ये स्थायिक झालेल्या लोकांचे. त्यात भर म्हणून की काय, अमेरिका, कॅनडा व अन्य देशांमधील भारतीयांनीही या स्पर्धेचे सामने पाहायला गर्दी केली होती. अंतिम सामन्यात भारताचा प्रतिस्पर्धी संघ यजमान ब्रिटनचा होता, याबाबतही शंका वाटत होती. कारण स्टेडियमवरील प्रेक्षकांमध्ये 90 टक्के लोक भारतीय होते. यजमान ब्रिटिश होते का, असा प्रश्न निर्माण होत होता. ब्रिटिशांचे हे आदरातिथ्य स्टँडपुरतेच मर्यादित नव्हते. या वेळी तो पाहुणचार चक्क मैदानात, खेळपट्टीपर्यंत येऊन पोहोचला होता. अंतिम सामन्यापर्यंतच्या सा-या खेळपट्ट्या ब्रिटनमधील नव्हे, तर भारतातील वाटत होत्या. अंतिम सामन्यात तर भारतातील खेळपट्ट्यांपेक्षा ‘एजबॅस्टन’वर चेंडू अधिक वळत होता. गोरे लोक भारतीय संघाबाबत एवढे आदरातिथ्यशील असतील, असे वाटले नव्हते. मात्र, या आदरातिथ्याचा अचूक लाभ घेणेही गरजेचे होते. भारतीय संघाने तो घेतला.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहाली कसोटीत एका रात्रीत प्रसिद्ध झालेला शिखर धवन या ग्रहावरचा फलंदाज वाटत नव्हता. इंग्लंडच्या हवामानात तो जे काही करायचा त्यात अचूकता होती. पुढे येऊन चेंडू ड्राइव्ह करताना तो फसला नाही. इतर फलंदाजांपेक्षा चेंडू तो उशिरा खेळायचा आणि खो-याने धावा काढायचा. धोनीने रवींद्र जाडेजाला ‘सर’ ही उपाधी लावल्यापासून सौराष्ट्राच्या क्रिकेटमध्ये मोठा झालेला खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एवढा यशस्वी ठरेल, हे खरे वाटत नाही. शिखर धवन आणि रवींद्र जाडेजा या दोन चमत्कारांनी भारताला या वेळी यश मिळवून दिले. या दोघांच्या खेळाची शैली, तंत्र आणि खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पाहिला की शास्त्रशुद्धतेच्या आधारावर उभे राहिलेले क्रिकेटचे उत्तुंग मनोरे आभास वाटायला लागतात. तंत्रशुद्धतेच्या पायाबाबत शंका वाटायला लागते. क्रिकेटच्या 22 यार्डाच्या व्यासपीठावर यशस्वी होण्यासाठी तंत्रशुद्धतेपेक्षाही धाडसाची अधिक गरज असल्याची जाणीव होते. कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी धवन, जाडेजाचे हेच धाडसी गुण भारताला उपयोगी पडले. या दोघांच्या धाडसांवर यशदेखील मेहेरबान झाले. त्या यशावरच भारताने विजेतेपदाचे शिखर सर केले. धोनीच्या धीरोदात्तपणालाही दाद द्यायला हवी.

दौ-यावर निघाल्यानंतर प्रसिद्धिमाध्यमांनी त्याच्या दुहेरी हेतूबाबत शंका उत्पन्न करून नवा वाद निर्माण केला. चेन्नई सुपरकिंग्ज व एन. श्रीनिवासन अडचणीत असताना धोनीच्या रोखाने टीकेच्या फैरी झाडल्या गेल्या. विंदू दारासिंगसोबत धोनीच्या पत्नीचे- साक्षीचे फोटो हेतुपुरस्सर प्रकाशित करण्यात आले. स्वगृहीच्या या शत्रूंचा सामना करतच धोनी इंग्लंडमधील क्रीडांगणावर लढत राहिला. त्याच्या नेतृत्वाविषयी काय बोलावे? राखेतून जन्म घेणा-या फिनिक्स पक्ष्यासारखा तो अपयशाच्या प्रत्येक राखेतून उभा राहिला. अंतिम सामन्यात मॉर्गन व बोपारा यांनी इंग्लंडचा विजय ‘16 चेंडूंत 20 धावा’ एवढा जवळ आणला होता. तरीही धोनी अविचल राहिला. शांत राहिला. इशांत शर्मावर अखेरपर्यंत विश्वास दाखवला. इशांतच्या षटकांमध्ये दहापेक्षा अधिक धावा फटकावल्या गेल्या. अखेर धोनीच्या विश्वासाला इशांतच्या अखेरच्या षटकात विजयाचे अंकुर फुटले. भारताच्या विजेतेपदानंतर त्या गोष्टींची फारशी चर्चा झाली नाही. त्या क्षणीदेखील धोनी तसाच होता. अपयशाने खचून न जाणारा धोनी विजेतेपदाच्या यशाने हुरळून गेला नाही. उन्मत्त झाला नाही. आता काय जिंकायचे राहिले आहे, यावर ‘यानंतरचा खेळला जाणारा प्रत्येक सामना’ असे विनम्र उत्तर त्याने दिले. रांचीसारख्या भारतातील एका छोट्या शहरामधून आलेला हा खेळाडू. क्रिकेटच्या तंत्रशुद्धतेपेक्षाही परिस्थितीतून मार्ग काढण्याची तुमची वृत्ती निर्णायक ठरते. तसाच धोनीचा विनम्रपणा, यशामुळे मस्तवाल न होण्याची वृत्तीही कायम भारतीय क्रिकेट इतिहासात नोंदविली जाईल. सर्व विजेतीपदे भारताच्या ‘शोकेस’मध्ये असताना आयसीसी चॅम्पियन्स करंडक मात्र भारताला गेली अनेक वर्षे हुलकावणी देत होता.

अखेरच्या करंडकावर अखेर भारताने हक्क प्रस्थापित केला. यापुढे आठ चॅम्पियन्स देशांमध्ये 50 मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी नव्हे, तर कसोटी क्रिकेटच्या विजेतेपदासाठी स्पर्धा होणार आहे. आयसीसीचा हा निर्णय आश्चर्यकारक आहे. अंतिम सामन्यासाठी राखीव दिवसाची जशी तरतूद न केल्यामुळे महत्त्वाचा सामना 20-20 षटकांमध्ये खेळवावा लागला. अशा अनेक अनाकलनीय गोष्टी करणा-या आयसीसीने किमान स्वत:च्या स्पर्धांसाठी कुणावरही अन्याय होतील असे निर्णय टाळण्याची गरज आहे. पुन्हा एकदा भारतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या अर्थकारणात आणि मैदानावरच्या खेळातही अग्रेसर असल्याचे सिद्ध झाले आहे. रथी-महारथी खेळाडूंच्या निवृत्तीनंतरही भारताच्या यशाचा आलेख खाली घसरू न देणा-या युवकांच्या जिद्दीला आणि धोनीच्या नेतृत्वाला पुन्हा एकदा सलाम. कोणत्याही अपेक्षा न केल्या गेलेल्या संघाने, स्पर्धेतील सराव सामन्यांसह प्रत्येक सामना जिंकून निर्विवाद यश मिळवले. प्रत्येक प्रतिस्पर्र्धी चॅम्पियन संघाला धूळ चारली. भारताकडे आता विश्वचषक आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेट क्रमवारीचे अव्वल स्थान आहे. जागतिक क्रिकेटच्या सर्व नाड्या भारताच्या हातात आहेत. क्रिकेटच्या जन्मदात्या इंग्लंडलाही अजून हे काही जमलेले नाही.