आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपली अ‍ॅम्बेसेडर जगातली सर्वोत्तम टॅक्सी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मारुती कंपनीने आपले पंख पसरण्यापूर्वी भारतामध्ये काही मोजक्या परदेशी चारचाकी गाड्यांचा अपवाद वगळता सगळीकडे प्रामुख्याने ‘हिंदुस्थान मोटर्स’ या कंपनीच्या गाड्याच दिसायच्या. कृष्णधवल चित्रपटांमध्ये या गाड्यांची दृश्ये मिळतात. रंगीत चित्रपटांच्या प्रारंभी या गाड्या ठळकपणे दिसतात. काही वर्षांपूर्वी नाना पाटेकर आणि जॉन अब्राहम यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या आणि ‘चेंजिंग लेन्स’ या हॉलीवूड चित्रपटावर आधारित असलेल्या ‘टॅक्सी नंबर 9 2 11’ या हिंदी चित्रपटातही अशीच टॅक्सी होती. याच कंपनीच्या ‘अ‍ॅम्बेसेडर’ गाडीला अलीकडे ‘टॉप गिअर’ नावाच्या कंपनीने आयोजित केलेल्या जागतिक पातळीवरच्या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम टॅक्सी असा मान मिळाला आहे. त्यामुळे या जुन्या आठवणींना नव्याने उजाळा मिळाला.

बिर्ला समूहाच्या ‘बिर्ला टेक्निकल सर्व्हिसेस’ या कंपनीचा भाग असलेली ‘हिंदुस्थान मोटर्स’ कंपनी गुजरातजवळच्या ओखा या बंदरानजीकच्या भागात 1942 मध्ये सुरू झाली. स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झालेल्या या कंपनीकडे तेव्हा अगदी कमी जागा होती. 1948 मध्ये तिने आपले स्थळ पश्चिम बंगाल राज्यातल्या उत्तरपारा इथे हलवले. त्या सुमाराला भारतात मोटारगाड्यांची निर्मिती करणार्‍या एकंदर तीन कंपन्या होत्या. 1956 मध्ये इंग्लंडमध्ये ‘मॉरिस ऑक्सफर्ड’ नावाची गाडी बाजारात आली. या गाडीवर आधारित असलेली गाडी भारतात तयार करण्याचा निर्णय हिंदुस्थान मोटर्स कंपनीने घेतला. भारतामधल्या या गाडीचे नाव ‘हिंदुस्थान लँडमास्टर’ असे ठेवायचे नक्की झाले. या गाडीच्या सुरुवातीच्या आवृत्त्या मॉरिस ऑक्सफर्ड गाडीच्या दुसर्‍या आवृत्तीवर आधारलेल्या होत्या. त्यानंतर बिर्ला कुटुंबीयांना मॉरिस ऑक्सफर्ड गाडीच्या नव्या तिसर्‍या आवृत्तीविषयी समजले. या आवृत्तीत गाडीच्या इंजिनाच्या स्थितीमध्ये आणि ठिकाणामध्ये सुधारणा करण्यात आल्यामुळे गाडीचा आतला भाग खूप मोठा आणि प्रशस्त झाला. साहजिकच ही गाडी अत्यंत लोकप्रिय झाली. हिंदुस्थान मोटर्स कंपनी ही गाडी ‘हिंदुस्थान 14’ या नावाने विकत असे. तिच्या इंजिनची क्षमता 1489 सीसी होती. 1957 मध्ये या गाडीचे नामकरण ‘अ‍ॅम्बेसेडर’ असे करण्यात आले आणि त्यानंतर अजूनपर्यंत ही गाडी याच नावाने ओळखली जाते.

पूर्वीच्या ‘लँडमास्टर’ गाडीपेक्षा नव्या ‘अ‍ॅम्बेसेडर’ गाडीमध्ये इतरही बर्‍याच सुधारणा करण्यात आल्या होत्या. एक तर गाडीचे रंगरूप आणखी आकर्षक तर करण्यात आलेच; पण शिवाय गाडीच्या स्टिअरिंग व्हीलमध्येही असलेल्या त्रुटी दूर करण्यात आल्या. नव्या अ‍ॅम्बेसेडर गाडीचे पुढचे दिवे इतर अनेक गाड्यांपेक्षा वेगळे असल्यामुळे ते चर्चेचा विषय ठरत. काही वर्षांनी या गाडीच्या नव्या आवृत्तीची लोकप्रियता वाढवण्यासाठी अशी एक गाडी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना भेट देण्यात आली. असे असूनही या गाडीविषयीची आणखी एक गंमत म्हणजे, ज्या बिर्लांच्या कारखान्यात ही गाडी तयार व्हायची त्या बिर्लांनी स्वत:च ही गाडी वापरण्याचा ‘धोका’ पत्करायला मात्र नकार दिला. म्हणजेच आपल्याकडे तयार होत असलेल्या गाडीवर स्वत: बिर्लांचा फारसा विश्वास नसावा, असे लोक म्हणत.

कालांतराने या गाडीच्या दर्जात तसेच तिच्या रंगरूपात आणखी सुधारणा होत गेल्या. तसेच उच्च मध्यमवर्गीय लोकही ही गाडी खरेदी करायला लागले. गाडीच्या नव्या आवृत्त्यांना ‘मार्क-2’, ‘मार्क-3’ अशी नावे देण्यात आली. 1978 मध्ये या ‘मार्क-3’ गाडीच्या ‘डिलक्स’ आणि ‘स्टँडर्ड’ अशा दोन आवृत्त्या उपलब्ध झाल्या. आज आपल्याला हे वाचून कदाचित गंमत वाटेल; पण ‘स्टँडर्ड’ गाडीमध्ये फक्त गाडीचा वेग दाखवणारा स्पीडोमीटर असे, तर ‘डिलक्स’ आवृत्तीमध्ये मात्र आजच्या गाड्यांप्रमाणे इतरही मीटर्स असत. 1979 मध्ये अ‍ॅम्बेसेडर गाडीची डिझेलवर चालणारी आवृत्ती प्रथमच उपलब्ध झाली. याच सुमाराला संजय गांधींच्या प्रयत्नांमुळे मारुती उद्योग सुरू झाला आणि अ‍ॅम्बेसेडर गाडीसमोर मोठे आव्हान उभे राहिले. नंतरच्या काळात तर भारताने परकीय गुंतवणुकीला तसेच परदेशी उद्योगांना आपले दार खुले करून दिल्यामुळे सगळ्या कंपन्यांच्या गाड्या भारतात मिळू शकत. त्यामुळे अ‍ॅम्बेसेडर गाडी जुनाट तसेच बोजड आहे, अशा समजामुळे ती मागे पडत गेली. भारत सरकार तसेच टॅक्सी उद्योग यांनी मात्र नव्या गाड्यांच्या स्वीकृतीबरोबरच अ‍ॅम्बेसेडर गाडीवरचे आपले प्रेम टिकवून धरले. 1993 मध्ये ‘फुलबोर मार्क 10’ या नावाने अ‍ॅम्बेसेडर गाडी इंग्लंडमध्येही निर्यात करण्यात आली. पण हा व्यवहार फारसा यशस्वी ठरला नाही. तो लवकरच बंद पडला. 2004 मध्ये ‘अ‍ॅव्हिगो’ या नावाने अ‍ॅम्बेसेडर गाडी नव्याने सादर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तो फारसा यशस्वी ठरला नाही. दरम्यान, सर्वोच्च पदांवरच्या भारतीय नेत्यांनी मात्र अत्याधुनिक बीएमडब्ल्यू गाड्या न वापरता शक्यतो अ‍ॅम्बेसेडर गाडी वापरण्याचाच निर्णय घेतला. त्यामुळे प्रत्येकी 5 कोटी रुपये किंमत असलेल्या अनेक बीएमडब्ल्यू गाड्या पडून राहिल्या असल्याची बातमी 2004 मध्ये आली होती. यातून अ‍ॅम्बेसेडर गाडीविषयी असलेली ओढ तसेच तिच्याविषयी राष्ट्रपती तसेच पंतप्रधान यांच्यापासून अनेक नेत्यांपर्यंत असलेला विश्वास यांची चुणूक नव्याने आढळली.

या पार्श्वभूमीवर 2013 मध्ये अ‍ॅम्बेसेडर गाडीला जगातल्या सर्वोत्तम टॅक्सीचा बहुमान मिळावा ही भूषणास्पद गोष्ट तर आहेच; पण शिवाय या गाडीच्या दमदारपणाविषयी सर्वसामान्य लोकांना वाटत असलेला विश्वास तज्ज्ञांच्या पसंतीलाही उतरला असल्याचा हा पुरावा आहे. अनेकदा गाडी चालवत असलेल्या ड्रायव्हरने आपल्या अ‍ॅम्बेसेडर गाडीविषयी व्यक्त केलेले ‘कणखर’ मत खरे असल्याचे यातून सिद्ध झाले आहे. आपल्या गाडीची धडक बसली तर त्यातून निदान प्रवाशांच्या जिवाला धोका पोहोचू नये यासाठी अलीकडच्या काळात एअरबॅग, सुरक्षा पट्टे अशा अनेक सोयी असतात. अशा सोयी अ‍ॅम्बेसेडर गाडीत अगदी नावापुरत्याच असूनसुद्धा तिच्यामध्ये बसणार्‍या प्रवाशांना गाडीच्या दणकटपणाविषयी वाटत असलेला विश्वास हेच या गाडीचे अलिखित यश आहे. तिच्यावर या निवडीमुळे शिक्कामोर्तब झाले आहे. जवळपास 60 वर्षांहूनही अधिक काळ एखाद्या गाडीने काळानुरूप तंत्रज्ञानानुसार काही सुधारणा करण्याखेरीज इतर कुठल्याच सुधारणा न करताही आपले नाव अशा प्रकारे टिकवून ठेवावे आणि खप कमी होऊनसुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या इतर टॅक्सींना मागे टाकून पहिला क्रमांक मिळवावा, ही सुखद भावना ‘अ‍ॅम्बी’च्या जुन्या आठवणी ताज्या करणारी आहे!