आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेची झोप उडवणारे मूठभर ‘सत्याग्रही’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विकिलीक्स या सरकारी-गोपनीयताविरोधी वेबसाइटचा खंदा शिलेदार ब्रेडली मॅनिंग या 25 वर्षीय लष्करी अधिका-यास अमेरिकेतील लष्करी न्यायालयाने 35 वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. माहितीच्या अधिकारासाठी जगभर वेगवेगळ्या प्रकारे लढत असलेल्या संघटना आणि कार्यकर्त्यांना लक्ष्मण रेषा आखून देण्याच्या हेतूने हा निर्णय प्रेरित झालेला आहे यात शंका नाही. अलीकडच्या काळात अमेरिकेची क्रूर युद्धनीती, कपटी शिष्टाचार आणि मानवी अधिकारांचे सर्रास हनन करण्याची प्रवृत्ती चव्हाट्यावर आणण्यासाठी ज्युलियन असांज, ब्रेडली मॅनिंग आणि एडवर्ड स्नोडेन या युवकांनी अतुलनीय कार्य केले आहे. यासाठी त्यांनी आपल्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर येणा-या बंधनांची तमा बाळगली नाही की, त्यांच्या जिवास उत्पन्न धोक्याची काळजी केली नाही. अमेरिकेचा दुटप्पीपणा उघड करणारी ही त्रिमूर्ती अमेरिकी सरकारची क्रमांक एकची शत्रू झाली आहे. यापैकी असांज आज लंडनस्थित इक्वेडोर दूतावासात शरण गेला आहे, तर स्नोडेनला रशियाने एक वर्षापुरते तात्पुरता आश्रय दिला आहे. मॅनिंग मात्र आपल्या निष्काळजीपणाने अमेरिकी लष्कराच्या ताब्यात सापडला. मागील तीन वर्षांपासून तो तुरुंगात आहे. या काळात सुमारे नऊ महिने मॅनिंगला एकांतवासात ठेवण्यात आले होते, ज्यादरम्यान त्याचा अतोनात छळ करण्यात आला असावा, असा सर्वांचाच कयास आहे.


मॅनिंग अमेरिकी लष्करात ‘प्रायव्हेट फर्स्ट क्लास’ या पदावर हेरगिरीसंबंधित गोपनीय विभागात कामास होता. इराकमध्ये युद्ध काळात तो सेवारत होता. विकिलीक्सला सुमारे सात लाख अमेरिकी केबल्स आणि लष्करी कारवाईच्या गोपनीय चित्रफिती नियमांचा भंग करत पुरवल्याचा आरोप मॅनिंगवर ठेवण्यात आला होता. या संबंधात लष्कराने मॅनिंगवर 22 गुन्ह्यांचे आरोपपत्र सादर केले होते. यापैकी 10 आरोपांची कबुली खुद्द मॅनिंगने दिली होती, पण इतर 12 आरोप फेटाळले होते. लष्करी न्यायालयाने एकूण 17 आरोप प्रमाणित ठरवले, ज्यात हेरगिरी आणि चोरीचे गंभीर आरोप समाविष्ट आहेत. मात्र मॅनिंगने शत्रू पक्षास मदत केल्याचा आरोप न्यायालयाने मान्य केला नाही. अन्यथा त्याची शिक्षा 60 वर्षांपर्यंत वाढू शकली असती.


मॅनिंगने विकिलीक्सला पुरवलेल्या एका चित्रफितीने अमेरिकी सरकार चांगलेच अडचणीत आले होते आणि इराक व अफगाणिस्तानात दररोज घडणा-या लष्करी हत्या जगजाहीर झाल्या होत्या. 12 जुलै 2007 रोजी अमेरिकेच्या हेलिकॉप्टरस्वार जवानांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेचा फोटोग्राफर, नमीर नूर एलदिन आणि त्याचा ड्रायव्हर यांची दुरून टिपून हत्या केली होती. एलदिनकडे असलेला 14 इंची कॅमेरा म्हणजे 4 फुटी स्वयंचलित क्षेपणास्त्र-प्रक्षेपण यंत्र असल्याचा साधा संशय हेलिकॉप्टरमधून निगराणी करणा-या जवानांना आला आणि त्यांनी आपल्या अधिका-यांची परवानगी मिळवत अचूक गोळीबार केला. यात एलदिन जखमी झाला आणि त्याचा ड्रायव्हर जागीच ठार झाला. जखमी एलदिनला अटक करण्याऐवजी त्याला पुन्हा गोळ्या मारून ठार करण्यात आले. जखमी एलदिनच्या मदतीस धावलेल्या एका नागरिकास त्याच्या वाहनात टिपण्यात आले आणि त्या नागरिकाची दोन मुले जखमी झाली. या सर्व प्रकारांची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे रॉयटर्स वृत्तसंस्थेचे आवाहन अमेरिकेने अमान्य केले आणि सशस्त्र लष्करी कारवाई योग्यच होती असा निर्वाळा दिला. या कारवाईचे व्हिडिओ चित्रीकरण जाहीर करण्याची मागणीसुद्धा साहजिकच मान्य करण्यात आली नाही. काही काळाने ब्रेडली मॅनिंगला आपल्या इराकमधील कार्यकाळात ही चित्रफीत बघण्यास मिळाली आणि त्यातील तथ्यांनी व जवानांच्या संवादांनी तो पार हादरून गेला. 12 जुलै 2007 चे न्यू बगदाद इथे घडलेले हत्याकांड ही दहशतवादविरोधी कारवाई नसून केवळ हेलिकॉप्टरस्वार लष्करी जवानांची काही मुडदे पाडण्याची हौस होती हे या चित्रफितीतून स्पष्ट झाले. मॅनिंगने ही चित्रफीत तसेच त्याला ‘एक्सेस’ असलेली इराक व अफगाणिस्तान युद्धासंबंधीचे अमेरिकी पत्रव्यवहार विकिलीक्सला सुपूर्द केलेत. ज्यामुळे विकिलीक्स केवळ वेबसाइट न राहता एक आंदोलन बनले. मॅनिंगचा अमेरिकी लष्कर आणि सरकारशी मोहभंग होण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्याचे समलैंगिक असणे. समलैंगिक अधिका-यांसाठी, ‘विचारू नये व सांगू नये’ हे अमेरिकी लष्कराचे अनधिकृत धोरण असले तरी सेवाकाळात मॅनिंगची चांगलीच घुसमट होत असणार आणि इतर सहका-यांकडून टिंगल होत असणार. यामुळे होणारा मानसिक जाच सहन न होऊन मॅनिंग विद्रोही बनला, असे त्याच्याच वकिलांनी त्याच्या बचावात म्हटले आहे. लष्करी न्यायालयाने 35 वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर दुस-याच दिवशी मॅनिंगने पुढील आयुष्य एक महिला म्हणून व्यथित करण्याचे जाहीर करत आपण चेल्सीया एलिझाबेथ मॅनिंग असे नामांतर करत असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे आता मॅनिंगला पुरुष तुरुंगात ठेवायचे की महिला तुरुंगात अथवा समलैंगिकांसाठी वेगळी कारागृहे असावीत असा नवा वाद अमेरिकेत रंगण्याची चिन्हे आहेत.
आपल्या समलैंगिकत्वाची प्रांजळ कबुली देणा-या मॅनिंगने तेवढ्याच प्रामाणिकपणे विकिलीक्सला दिलेल्या चित्रफितीबद्दल एका हॅकरला सांगितले होते. सन 2004 मध्ये या इंटरनेट हॅकरला न्यूयॉर्क टाइम्सची वेबसाइट भ्रष्ट केल्याबद्दल शिक्षा झाली होती. पण या वेळी मॅनिंगने दिलेली कबुली या हॅकरने पोलिसांना सांगितली आणि मॅनिंग अडकला. त्याच्यावर खटला दाखल करण्यात आल्यावरसुद्धा त्याने आपल्या कबुलीपासून माघार घेतली नाही. आपल्या मनाचा आवाज ऐकत तथ्ये जगापुढे मांडण्याचे काम आपण केले, असे त्याने सांगितले. जगाला आणि विशेषत: अमेरिकी जनतेला अमेरिकेच्या युद्धांची खरी किंमत कळावयास हवी यासाठी आपण हे पाऊल उचलल्याचे ठाम प्रतिपादन मॅनिंगने न्यायालयापुढे केले. कनिष्ठ लष्करी न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध पुढे दाद मागण्याचा मार्ग मॅनिंगपुढे उपलब्ध आहे. तसेच सात वर्षांनी म्हणजे तुरुंगवासाची एकूण 10 वर्षे पूर्ण झाल्यावर त्याला राष्‍ट्राध्यक्षांकडे पॅरोलसाठी अर्जसुद्धा करता येईल.


अमेरिकेने मॅनिंगवर चालवलेल्या खटल्याचे आंतरराष्‍ट्रीय कायद्यावरसुद्धा परिणाम होतील. द्वितीय महायुद्धानंतर नाझी अधिका-यांवर नुरेनबर्ग इथे चालवण्यात आलेल्या खटल्यांमधून एक महत्त्वपूर्ण सिद्धांत पुढे आला होता, जो जगभर मान्य करण्यात आला. वरिष्ठ अधिका-यांच्या आदेशांची आपण केवळ अंमलबजावणी केली हा कनिष्ठ अधिका-यांचा युक्तिवाद ग्राह्य मानण्यात येणार नाही हे नुरेनबर्ग चार्टरच्या पाचव्या तत्त्वात स्पष्ट करण्यात आले. विशेषत: मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्यास वरिष्ठांचे आदेश कनिष्ठ स्तरातील अधिका-यांनी नाकारावयास हवेत किंवा निदान आपला विरोध तरी नोंदवायला हवा, असे नुरेनबर्ग चार्टरमध्ये नमूद करण्यात आले आहे. मॅनिंगने विकिलीक्सला सोपवलेली तथ्ये या नियमाला अनुसरून आहेत, असे अनेक तज्ज्ञांचे आणि विकिलीक्स समर्थकांचे मत आहे. विकिलीक्सने जाहीर केलेल्या चित्रफितीनुसार 12 जुलै 2007 च्या हत्याकांडातील दोषी सैनिक व अधिका-यांवर कारवाई करण्याऐवजी संदेशवाहकाला दंडित करण्याचे कृत्य म्हणजे मांजरीने डोळे मिटून दूध पिण्याचा प्रकार आहे. आता मॅनिंगला दिलेल्या शिक्षेच्या प्रत्युत्तरात विकिलीक्स कोणती खळबळजनक तथ्ये पुढे आणते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.