आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Analysis By V V Karmarkar About Defeat In Bangladesh

बांगला जिंकले, की भारत हरला!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिंकणे अन् हरणे : या झटापटी निव्वळ कौशल्यांच्या व डावपेचांच्या थोड्याच असतात? तेव्हा कसोटी लागत असते पक्ष अन् प्रतिपक्ष यांच्या इच्छाशक्तींची, मनोबलांची, विजयाचा ध्यास घेण्याच्या ईर्षेची. हा निकष लावला, तर महेंद्रसिंग धोनीच्या भारतीय संघाचे बांगलादेशमधील अपयश समजू शकते.
केवळ गतलौकिकाच्या आधारावर वर्तमानकाळात जगणे, वावरणे साफ वेडेपणाचेच! गतलौकिक असा की, त्या दौऱ्याआधीच्या २९ झटपट कसोटीत, भारताची फत्ते २५ सामन्यांत, तर बांगलादेशची अवघ्या तीन झुंजीत. पण या दौऱ्यासाठी बांगलादेश तयार होता, तर भारत होता सुस्तीत. याची झलक बघायला मिळाली दौऱ्यातील सुरुवातीच्या पाचदिवसीय कसोटीत. पण त्यातून काही धडा घेण्याचे भान, संघ-संचालक रवी शास्त्री, कर्णधार विराट कोहली व धोनी यांना कुठे होते?
राजधानी ढाका येथे भारतीयांनी पाऊल ठेवले तेव्हापासून, त्यांना एकच भावना प्रकर्षाने जाणवली. विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत रोहित शर्माला संशयास्पद नो बॉलच्या आधारावर पंचांनी नाबाद ठरवले. हा साफ पक्षपात होता. बांगलादेशवर क्रिकेटमधील महासत्ता भारताकडून झालेला घोर अन्याय होता. त्याचा बदला घेण्याची वेळ आता आली आहे. या भावनेत कांगावा होता, तथ्यही होते. मुंबई, मँचेस्टर, मेलबर्न वा त्रिनिदाद येथील प्रेक्षकांत आता भारतीय बहुसंख्येने असतात. तो मोठा फायदा त्यांना ढाका-मिरपूरमध्ये मिळणार नाही. (एरवीही कोण भारतीय सध्या ढाक्यात जाण्यास उत्सुक होते?) आता स्टेडियममध्ये आवाज नसेल ‘गणपती बाप्पा मोरया’, आवाज असेल ‘जय बांगला.’ स्टेडियममध्ये नसतील तिरंगी झेंडे, असतील केवळ बांगलादेशचे झेंडे-पताका, हिरव्या चौकटीच्या मध्यभागी लाल गोळा असे झेंडे. हिरवा रंग सुबत्तेचा, शेतीप्रधान देशातील हरियालीचा व इस्लामचा. लाल गोळा प्रतीक सूर्याचा. तसेच पाकविरोधी स्वातंत्र्य लढ्यातील शहिदांच्या रक्ताचा!

योग्य डावपेच : बदल्याचे नारे बुलंद. प्रसिद्धिमाध्यमांचा हाइप प्रचंड. पण बांगलादेश क्रिकेटच्या धुरीणांना दाद द्यायला हवी, की त्यांचे पाय जमिनीवर होते. विश्वचषकात रोहित शर्माला तेव्हा बाद ठरवले गेले असते, तरीही उरलेला तळाचा अर्धा संघ भारताला किमान २८० पर्यंत नक्की नेऊ शकला असता. रोहितला बाद ठरवणे ही बांगलादेशच्या विजयाची हमी ठरू शकत नव्हती. एरवीही भारत आपल्यापेक्षा बराच सरस आहे, ही गोष्ट बांगलादेशचा कर्णधार व प्रशिक्षक, मायदेशीची झटपट मालिका २-० (मग २-१) जिंकल्यावरही मान्य करत होते. म्हणून त्यांचे डावपेच दुहेरी होते. एकमेव कसोटीत संपूर्ण बचावाचे, पण त्यानंतर झटपट मालिकेत आक्रमक पवित्रा घेण्याचे.
साहजिकच कसोटीसाठी खेळपट्टी पाटा, निर्जीव बनवली गेली. मुशरफे, तासकीन, रुबेल व जोपर्यंत अनामिक असलेला मुशफिझूर रेहमान यांना विश्रांती देऊन, झटपट मालिकेसाठी ताजेतवाने ठेवले गेले. मोसम पावसाळी. अंदाजानुसार पाऊस आलाच व पाच दिवसांत ४५० षटकांपैकी जेमतेम दोनशे षटकांचा खेळ झाला. तेवढ्यातही बांगलादेशवर फॉलो-ऑनची नामुष्की आलीच! संघ संचालक रवी शास्त्रींनी हरभजन व मुरली विजय या झटपट मालिकेसाठी न निवडलेल्यांना सन्मानाने निरोप दिला. तेव्हा फॉलोऑनची कमाई करणाऱ्या भारताची पाठ थोपटण्याची घाई त्यांना आवरता आली नाही. बांगलादेशला फॉलोऑन देण्यात काय मोठे तीर भारताने मारले होते? याउलट वास्तववादी बांगला, मनाजोगत्या अनिर्णीत सामन्यात संतुष्ट होता. निर्जीव खेळपट्टीने, बांगलादेशने हाती राखून ठेवलेल्या जलद चौकडीने आणि फॉलोऑनच्या कमाईने, भारतीय गोटातील आंतरिक उणिवा झाकलेल्या राहिल्या. त्या हेरल्या गेल्या नव्हत्या, हे भारतीय क्रिकेट धुरीणांचे मोठेच अपयश. अध्यक्ष दालमिया, चिटणीस अनुराग ठाकूर या जोडीचे पाठीराखे शरद पवार व त्यांचे विरोधक अरुण जेटली… तसेच संघ संचालक रवी शास्त्री, कोहली-धोनी हे कर्णधार-यांना हे आंतरिक कच्चे दुवे कसे जाणवले नाहीत?
ऑस्ट्रेलियन दौरा, विश्वचषक व अधाशी खिसे गच्च भरवणारे आयपीएल हा कार्यक्रम जवळपास सहा महिन्यांचा करोडो रुपयांच्या कमाईची ढेकरा देणारी तृप्ती, पण शारीरिक- मानसिक दमछाक यांमुळे खेळाडू थकले-भागलेले होते. त्यांना नितांत गरज होती महिनाभराच्या विश्रांतीची. बांगलादेश खेळाडूंवर एवढा बोजा पडलेला नव्हता. ते विजयासाठी हपापलेले होते. शारीरिकदृष्ट्या अधिक फिट होते. एक-दोन पराभवांनी भारताचे (किंवा खरं तर भारतीय खेळाडूंचे!) फारसे काही बिघडत नव्हते. पण एक-दोन विजय बांगलादेशला नवचैतन्य देणारे भासत होते.
भारतीय मंडळाचे अध्यक्ष जगमोहन दालमिया ऊर्फ डॉलरमिया. त्यांना त्यांच्या जवानीच्या दिवसांत, खेळाडूंची मानसिकता जाणवली असतीही; पण सत्तरीनंतर अधिकारपदी राहू नये हे केंद्रीय क्रीडा खात्याचे मार्गदर्शक तत्त्व धाब्यावर बसवणाऱ्या दालमियांचा आता बुद्धिभ्रंश झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पॅनलवरील न्या. लोढा यांनी त्यांची मुलाखत घेतली तेव्हा दालमियांचे बोलणे त्यांना साफ असंबद्ध वाटले. आपले चिरंजीव अभिषेक यांच्या सोबतीची त्यांची मागणी, न्यायमूर्तींना जगावेगळी वाटली, खटकली. विचारलेले प्रश्न दालमियांना समजत नव्हते. चिरंजीव अभिषेक दुभाष्याचे काम करत होते. ‘तीन महिन्यांपूर्वी त्यांना निवडून देणाऱ्या सदस्यांना, दालमियांच्या तब्येतीची कल्पना नव्हती का?’ न्यायमूर्तींनी सवाल केले, ‘अशा परिस्थितीत मंडळाचा कारभार बघतंय तरी कोण?’

भारतीय मंडळाने खास नेमलेल्या तेंडुलकर-गांगुली-लक्ष्मण या सल्लागारांच्या त्रिमूर्तीलाही, खेळाडूंची अवस्था जाणवली नाही. नाही म्हणायला, सुनील गावसकरांचाच अपवाद. विराट कोहलीने कसोटी सामना अवश्य खेळावा, मग झटपट मालिकेत त्याला विश्रांती द्यावी, असे त्यांनी उघडपणे सांगितले, लिहिले.

विश्वचषक संघातील बहुसंख्य खेळाडूंना विश्रांती देऊन, भारताने दुसऱ्या फळीतील बहुसंख्य खेळाडूंचा समावेश संघात करावयास हवा होता. जडेजाला तर वगळायलाच हवे होते. बांगलादेशने त्यावरून कुरकुर केली असती व भारत भेदरतोय असे टोमणे मारले असतेही. पण त्याकडे दुर्लक्ष करणारे कोणीही आर्य चाणक्य भारतीय मंडळात नाहीत का? का त्या चाणक्यांना हा विषय हलका वाटतो?

भारताला २-१ हरवणाऱ्या बांगलादेशचे मन:पूर्वक अभिनंदन. मुख्य म्हणजे त्यांचा संघ दोन-तीनखांबी तंबू नाही. शाकीब, रहीम, मुशरफे यांना साथ लाभलीय सोम्य सरकार, लिट्टन दास या दोघा हिंदूंची. तशीच महमदुल्ला, तासकीन, रुबेल, मुशफिझूर यांची. त्यांना खूप लांब पल्ला गाठायचाय. त्यासाठी शुभेच्छा.