आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Analysis: नाशिकच्या शांततेला नख ! (जयप्रकाश पवार)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकमध्ये वेगवेगळ्या समाजाचे वा समर्थकांचे भव्य मोर्चे टप्प्याटप्प्याने सुरू झाल्यापासूनच स्थानिक पातळीवर समाजस्वास्थ्य अत्यंत छुप्या पद्धतीने ढवळून निघू लागले होते. यामागचा उद्देश हा समाजाची एकजूट दाखविण्यासाठी अथवा विशिष्ट मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी म्हणून प्रथमदर्शनी दिसत असला तरी शक्तिप्रदर्शनाच्या या मार्गाआड जातीय अभिनिवेशाचीही जाड किनार त्याला होती. मग काय, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगावात एका पाच वर्षीय बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न झाल्याची वार्ता बाहेर येताच कोपर्डीच्या घटनेपासून खदखदत असलेल्या संतापाचा वणवा सर्वदूर पसरला. समोर येईल त्या नेत्याला झिडकारत, विशिष्ट ओळख दर्शविणाऱ्या वाहनांना तसेच सुरक्षेसाठी तैनात पोलिसांच्या वाहनांसह राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांना वेढत हा वणवा पंचक्रोशीत पोहोचला. तळेगावची घटना ही अतिशय घृणास्पद व निंदनीय अशीच आहे. त्या नराधमाला कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशीच भावना समाजातील प्रत्येक घटकाची असणार. याबद्दल कुणाचेही दुमत होऊ शकत नाही. पण कायदा हातात घेऊन घटनेला जातीय रंग दिला जाणे ही बाब तेवढीच निषेधार्ह आहे. या सगळ्या प्रकारामुळे नाशिकच्या शांततेला नख लागलेच, तसेच काही दशकांपासून नांदणाऱ्या जातीय सलोख्यावर, शांततेवर खोलवर ओरखडा ओढला गेला आहे.
कोपर्डीची घटना ही अतिशय वाईट आणि माणुसकीला काळिमा फासणारी आहे. त्यामुळे त्या घटनेच्या समर्थनार्थ कोणताच समाजघटक पुढे आल्याचे एकही उदाहरण शोधून सापडणार नाही. पण एक वास्तव आहे की, या घटनेच्या निमित्ताने केवळ नाशिकचेच नव्हे तर अवघ्या राज्याचे समाजस्वास्थ्य बिघडविण्याचा प्रयत्न पद्धतशीरपणे केला जातो आहे. याचे प्रमुख कारण असे की, याअगोदरही अशा निंदनीय घटना असंख्य घडल्या. त्या त्या वेळी लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलने करीत रोषही व्यक्त केला. घटना घडून गेल्यानंतर बराच काळ तो संशयित कोणत्या जातीचा वा धर्माचा की पंथाचा याबाबत वाच्यता होत नसे. परंतु अलीकडच्या काळात अन्याय-अत्याचाराची वा अतिप्रसंगाची घटना घडली की पहिला प्रश्न तो वा ती कोणत्या जातीची आहे याची विचारणा होते. त्यापाठोपाठ आंदोलनाची दिशा ठरवत एकूणच घटनाक्रमाला मग हिरवा, निळा, पिवळा वा भगवा असा रंग चढविण्याचा प्रयत्न केला जातो. हा पायंडा सुदृढ व सद््विचारी समाजस्वास्थ्यासाठी निश्चितच हानीकारक आहे. अशा नाजूक प्रसंगामध्ये वर्तमानपत्रांनी नारदाच्या भूमिकेपासून अलिप्त राहिले पाहिजे. वातावरण पेटण्यास वा पेटलेल्या वातावरणात तेल पडून आगीचा भडका अधिक होणार नाही यासाठी दक्ष राहणे कालसापेक्ष ठरते. वर्तमानपत्रांनी समाजभान सांभाळले पाहिजे. पण ‘जर्नालिझम ऑफ करेज’ असे ब्रीदवाक्य घेऊन मिरवणाऱ्या मुंबईस्थित इंग्रजी दैनिकाने पहिल्या पानावर ठळकपणे अतिप्रसंगाचा प्रयत्न करणारा संशयित व पीडित बालिका या दोहोंची जात स्पष्टपणे नमूद करण्याचा उद्योग केला. घटना नाशिकजवळच्या एका खेड्यातील असली तरी मुळात नाशिक-मुंबई अंतरही फारसे नाही. त्यामुळे पेटलेल्या वणव्याला हवा मिळण्यासाठी अशा प्रकारच्या बातम्या पूरक ठरू शकतात याचे भान बाळगणे गरजेचे आहे.
आरक्षण वाटा, ओबीसी नेत्यावर होणारा अन्याय ते अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्यापर्यंतच्या मागण्या या सगळ्या कालौघात न्याय्य आहेत. त्याबाबत सरकार दरबारी जरूर विचार झाला पाहिजे. परंतु आजवर मोठ्या भावाची भूमिका वठविणारा समाज जेव्हा रस्त्यावर उतरतो त्याच्याही आक्रंदनामागे मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवरील फडणवीस हेच लक्ष्य असल्याचे दिसते आहे. सत्तारूढ पक्ष हा आपल्या आवडीचा असो वा नसो, त्याला पदच्युत करण्यासाठी संविधानाने सर्वांनाच कालमर्यादा ठरवून दिली आहे. त्यासाठी काही काळ तरी कळ सोसावी लागेल. गेल्या वर्षभरातील एकूणच समाजातील उलथापालथींच्या घटनाक्रमाकडे नजर टाकली तरी इप्सित साध्य करण्यासाठी समाजस्वास्थ्यच बिघडविण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जातो आहे की काय अशी शंका येते. तळेगाव घटनेच्या निमित्ताने नाशिकला पेटवला गेलेला संतापाचा वणवा हा त्याचाच एक भाग म्हणता येईल. या संपूर्ण प्रकरणाला जातीय रंग देऊन त्याच्याआडून दलित-सवर्ण संघर्ष उभा करण्याचा कुटिल डाव खेळला जाताना दिसतो आहे. नाशिकच्या शांततेला नख लावण्याचा हा प्रयत्न नाशिकच्या सर्वच समाजधुरीणांनी वेळीच हाणून पाडला पाहिजे. येथील जातीय सलोखा, धार्मिक सौहार्दाचे वातावरण येणाऱ्या सणासुदीच्या काळात अबाधित ठेवले पाहिजे. दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांततेची पणती अव्याहतपणे तेवत ठेवूया !
- निवासी संपादक, नाशिक
बातम्या आणखी आहेत...