चित्रशैलीत रमणारे आनंद / चित्रशैलीत रमणारे आनंद सोनार

प्रियंका डहाळे

Nov 05,2011 05:21:51 AM IST

1960 च्या दशकात नाशिकला स्थायिक झाल्यानंतर आनंद सोनार यांना गोदामाईने रंगांचे वेड लावले अन् पुढे मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्टसमधून त्यांनी चित्रकलेचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या ‘आनंदरंगी सोनचित्रे’ या पुस्तकाला प्रकाशनापूर्वीच स्मिता पाटील पुरस्कारासारखे मानाचे पुरस्कार मिळाले. निसर्गातील साध्या क्षणचित्रांपासून स्त्री मनाचे, स्त्री सौंदर्याचे विविध पैलू उलगडवण्याचा प्रयत्न ते नेहमी करीत असतात. सिनेदिग्दर्शक स्व. बळीराम बीडकर प्रतिष्ठानतर्फे जीवनगौरव कलासाधना पुरस्कार, इंडिया फाइन आर्ट्स सोसायटीतर्फे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार पद्मभूषण ए. रामचंद्रन यांच्या हस्ते चित्रतपस्वी पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेत.
मॉडर्न आर्टचे प्रस्थ गेल्या काही वर्षांपासून वाढले आहे. त्यात पाश्चिमात्य शैलीच्या तरुण कलाकारांना अधिक आकर्षण आहे. मात्र, भारतीय चित्रशैलीदेखील आधुनिक शैलीशी मेळ खाणारी आहे, असे आनंद यांना वाटते. भारतीय चित्रशैलीत भारताच्या भौगोलिक वैविध्यतेनुसार अमाप वैविध्य आहे. त्यात कितीतरी सूक्ष्म, देखण्या बाबी दडलेल्या आहेत. प्रत्येक ऋतूत इथला निसर्ग वेगळा रंग परिधान करतो. मानवी स्वभावविशेषांमध्ये बदल व्हायला लागतात. एकप्रकारचे कवित्वच सारा निसर्ग ल्यायलेला असतो. याचे प्रतिबिंब चित्रात उमटणे खरे तर स्वाभाविक आहे. कारण कुंचल्यांच्या रंगांमधून कलाकार स्वत:बरोबरच आजूबाजूचा भवताल व्यक्त करीत असतो. हे आपलेपण कलाकाराला तो ज्या प्रदेशात राहतो, वाढतो तिथून मिळत असते. त्यामुळे भारतीय चित्रशैलीवर आनंद यांचे विशेष प्रेम आहे. जहांगीरमधील चित्रप्रदर्शनात त्यांनी भारतातील सहा ऋतूंची रेखाटन केलेली चित्रे लावली आहेत. रंगांची संयत उधळण, प्रगल्भ आविष्कार ही या चित्रांची खास वैशिष्ट्ये. यात निसर्गाची सगळी रूपे त्यांनी दाखवली आहेत. खरे तर निसर्गाचे विविध भाव हे मानवी स्वभावाशी साधर्म्य दाखवणारे. हा समान धागा त्यांनी अचूक पकडला आहे. स्त्री ही समजून घ्यायला अवघड. तिच्या विविध लहरी समजून घेणे तर अगदीच अनाकलनीय. अशा कळूनही न कळणाºया स्त्रीचे सोळा शृंगार त्यांनी आपल्या कुंचल्यांतून उलगडवू पाहिलेत. याही चित्रांचा समावेश या प्रदर्शनात करण्यात आला आहे. स्त्रियांची सजण्यातील नजाकतता त्यांनी या चित्रांतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रदर्शनाआधीही त्यांची जहांगीरमध्ये प्रदर्शने लागली आहेत. कधी एकल तर कधी ग्रुप प्रदर्शनात त्यांची चित्रे लागली आहेत. विशेष म्हणजे त्यांची चित्रे ही भारतीय प्रदर्शनांपुरतीच मर्यादित राहिलेली नाहीत. पॅरिस, लंडनसारख्या ठिकाणीदेखील त्यांच्या चित्रांनी प्रदर्शनात मानाचे स्थान मिळवले आहे. शिवाय त्यांची चित्रे अनेक देशांत विकली गेली आहेत.
आनंद यांना वॉटरकलर प्रकारात अधिक रस वाटतो. जलरंगातील चित्रे रेखाटणे त्यांचा अत्यंत आवडता छंद आहे. याशिवाय अ‍ॅक्रिलिकसारख्या रंगांचाही ते प्रयोग करतात.
भारतीय चित्रशैलीच्या प्रसारावर त्यांचा अधिक भर आहे. हा वारसा त्यांची मुलेदेखील त्यांच्या प्रेरणेने चालवीत आहेत. धुळ्यासारख्या ठिकाणी आपले बालपण घालवल्यानंतर व पुढे नाशिक येथे स्थायिक झाल्यानंतर त्यांनी कलेचा हा साधलेला प्रवास नक्कीच कौतुकास्पद आहे.X
COMMENT