आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...आणि महाराज हसले !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आटपाट नगर होते. शांत आणि संयमी. म्हणजे नागरिक शांत आणि संयमी. एके दिवशी नेहमीप्रमाणे सकाळीच स्फोट झाला. स्फोट झाल्यावर ते आले, त्यांनी पाहिले, दोन मिनिटे स्तब्ध उभे राहिले अन् ... ते हसले. तसे सारे आनंदाने चित्कारले, ‘ ते हसले, ते हसले... चमत्कार झाला!’ तसे गर्दीतून कोणीतरी ओरडले, ते नेहमीच तर हसतात ? त्यात काय चमत्कार ? तसे सारे जण एक एक करून काढता पाय घेऊ लागले. एक शिष्य मात्र घुटमळत होता, तसे त्याकडे बघून स्मितहास्य करीत महाराजांनी विचारले, ‘काय हवे तुला? तू का थांबला आहेस?’ शिष्याने चुळबुळ सुरू केली व धाडस करून म्हणाला, ‘महाराज , आपण हसलात ?’ तसे महाराज पुन्हा एकदा हसले. शांत, संयमी व सहनशीलतेचे दर्शन घडवत पुन्हा एकवार म्हणाले,‘ होय रे शिष्या, मी हसलो. हे माझ्या तपश्चर्येचे फळ आहे. तुला माहिती आहे, कितीतरी वर्षांची तपस्या केल्यावर ही सिद्धी मिळते. म्हणजे काहीही झाले, कितीही संकटे आली तरी हसायचे. डगमगायचे नाही, दु:खाकडे निर्विकारपणे बघायचे ..त्या दु:खाला आपल्या जीवनात प्रवेश करू द्यायचा नाही ..हे सर्व जग नाशवंत आहे. एक ना एक दिवस सर्व काही संपणार. आसवे कशाला गाळायची?’ ही अमृतवाणी ऐकून शिष्य भारावून गेला.

महाराजांबद्दल त्याच्या मनातील आदर अधिकच वाढला. तो नतमस्तक झाला व महाराजांना म्हणाला, ‘आशीर्वाद द्या.’ तसे महाराज पुटपुटले ‘शतायुषी हो, कुठल्याही संकटाला सामोरे जाण्याची तयारी ठेव बाळ , नेहमी हसत राहा.’
‘तुमच्यासारखे ना महाराज ?’ ‘ माझ्यासारखे? प्रयत्न कर, पण सोपे नाही हो.....!’ ‘का महाराज ?’ ‘अरे, सर्वांनाच कसे जमेल ते. एकाला जमत होते, पण तो पंचत्वात विलीन झाला. त्याचे दु:ख ? झाले ना, पण दु:ख पचवायचे. आघात पचवण्याची सवय लावून घेतली.’ ‘म्हणजे ..? आपण परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न नाही करायचा महाराज ?’ ‘शिष्या , आपण कोण परिस्थिती सुधारणारे ? आपण या विश्वातील लहानसा अंश. आपल्या हातात काही नाही वत्सा.’ ‘महाराज, एवढे दिव्यज्ञान कसे प्राप्त झाले आपल्याला ?’ ‘कठोर तपश्चर्या, एकांतवास, एकाच खुर्चीवर , आय मीन आसनावर बसून केवढे कठोर तप केले सर्व त्यागून ...’


‘सर्व त्यागून ? ते काय महाराज ? म्हणजे म्हणजे .....का महाराज ?’ ‘का म्हणजे ? अरे, असेच हेलिकॉप्टरने फिरत असताना फार दु:ख पाहिलं.. फार ..! माणूस जन्माला येतो, मोठा होतो, तरुण होतो, म्हातारा होतो, व्याधीने ग्रासला जातो आणि मग सारे संपते..आयुष्यात दु:खच दु:ख...’ ‘पण महाराज, हा तर निसर्गाचा नियम आहे .जो जन्माला येणार तो मरण पावणार.’ ‘तेच तर मीही म्हणतोय शिष्या. हा निसर्गाचा नियम आहे. अरे, पद, खुर्ची, वजन, अधिकार, सारे झूठ. सारे दु:ख देणारे. तेव्हा दु:खाकडे तटस्थपणे पाहा.’


‘महाराज, एक विचारू ?’ खुर्ची, सत्ता, राजयोग सारे दु:ख देणारे, त्रास देणारे. तर मग आपण त्याचा त्याग का नाही करीत भगवंताप्रमाणे ?’ ‘हो रे शिष्या, राग, लोभ, मोह, मत्सर या सर्व भावनांपासून मी मुक्त झालो आहे.’ ‘खरंच, पाहिले मी आत्ता महाराज..एवढी मोठी नैसर्गिक आपत्ती आली, हजारो लोकांनी जीव गमावला प्रलयात, तरी आपण निर्विकारपणे आलात, सर्वांना उपदेश दिला. एक स्माइल दिले, हो ना ?’


‘तर तू बघितलेस म्हणजे ?’ ‘हो महाराज. टीव्हीवर. चोवीस तास तुमची एकच एक बाइट दाखवत होते आणि मी पण ती चोवीस तास पाहत होतो.’ ‘खरे आहे. असे दु:खाचे प्रसंग नेहमीच येतात. तरी मी धीराने जातो, लोकांना हसत हसत दु:ख पचवायला सांगतो व स्वत:ही हसतो.’ ‘अद्भुत! केवढी प्रचंड आत्मिक शक्ती आहे ही महाराज.’ ‘खरे आहे वत्सा. हसण्यात फार सामर्थ्य आहे. दु:ख दूर करायचे तर हसायलाच हवे. सर्व रोगांवर औषध म्हणजेच हास्य. तेव्हा हसा, हसा, हसा आणि फक्त हसा. तुला तर तपश्चर्येचीसुद्धा गरज नाही.’ ‘नाही कसे महाराज? अहो, एवढ्या दुर्दैवी घटना पाहिल्यावर मी ही निगरगट्ट झालो आहे.आता काहीही झाले, कुठेही घातपात झाला, कोणीही दगावले तरी हसू येते.’ ‘शाब्बास वत्सा! तुला खरा जीवनाचा अर्थ कळला. जीवन क्षणभंगुर असते. फार मनाला लावून घेऊ नये. जे घडणार ते घडणारच.’ ‘खरंय महाराज. प्रणाम करतो.’ असे म्हणून शिष्य वाकतो तेवढ्यात महाराजांच्या मोबाइलची घंटी वाजते. दोन मिनिटं महाराज गंभीर होतात, पण क्षणार्धात स्मितहास्य करतात. तसे शिष्य आश्चर्याने पाहतो. महाराज पुन्हा खळाळून हसतात व म्हणतात, ‘वत्सा, काही नाही, कुठे तरी स्फोट झाला आहे म्हणे...’ तसे शिष्य व महाराज दोघेही स्मितहास्य करतात व ध्यानस्थ होतात .