आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंगडियांचा अव्यापारेषु व्यापार! ( अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्याच्या आधुनिक दुनियेत जे उद्योग कालबाह्य ठरले ते काळाच्या ओघात संपले, असे मानले जाते; परंतु जे जुने उद्योग लोकांना गरजेचे वाटले ते मात्र बदलत्या काळातही आपले अस्तित्व टिकवून आहेत. दुचाकी वा चारचाकी वाहने मोठ्या संख्येने बाजारात असली तरी आजही ग्रामीण भागात बैलगाड्या आपले अस्तित्व टिकवून आहेत. आधुनिक जगातील तंत्रज्ञानाचा विचार करताना पेजर बाजारात आल्यावर एका वर्षातच मोबाइलचा आवाज घुमू लागला आणि पेजर हे पूर्णत: कालबाह्य झाले.

स्पीड पोस्ट, खासगी कंपन्यांची कुरिअर सेवा व इंटरनेट बँकिंगद्वारे एका क्षणात पैसे हस्तांतरित करण्याची सुविधा सर्वत्र पोहोचली असतानाही आंगडिया ही कुरिअरसदृश सेवा मात्र अधिक विस्तारली आहे. चार दिवसांपूर्वी मुंबईत काही शेकडो कोटी रुपयांची रोकड व सोने-नाणे ट्रकने जात असताना पकडण्यात आले. नंतर ही सर्व धनदौलत आंगडियांमार्फत गुजरातेत जात असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणानंतर आंगडिया सेवा सर्वसामान्यांसाठी नव्याने प्रकाशझोतात आली. मुंबई-गुजरातमधील व्यापा-यांसाठी ही सेवा अर्थातच काही नवीन नाही. जुन्या पद्धतीने कुरिअर व पोस्टल सेवा असूनही सध्याच्या आधुनिक काळात ही सेवा आपले अस्तित्व टिकवून आहे, त्यावरून या सेवेत काही तरी जमेच्या बाजू आहेत, हे निश्चित! ही सेवा पूर्णत: विश्वासावर, कोणतीही चिठ्ठी-चपाटी न देता चालवली जाते.

करोडो रुपयांचे यात व्यवहार होत असतानाही यात कधी गैरव्यवहार झाल्याचे ऐकिवात नाही. किंवा गैरव्यवहार होत असले तरी इतक्या बिनबोभाटपणे होत असले पाहिजेत की त्यांची वाच्यता झाली नाही. परवा हे प्रकरण उजेडात आले याचाच अर्थ हा, की असे प्रकार चालूच होते- या वेळेस आंगडियाने जाणारी धनदौलत पकडली गेली इतकेच! अनेक व्यापा-यांना- प्रामुख्याने हिरे व्यापा-यांना ही सेवा आपलीशी वाटते. या सेवेद्वारे करोडो रुपयांचे हिरे केवळ विश्वासावर एका ठिकाणाहून दुसरीकडे पोहोचवले जातात. केवळ हिरेच नाही, तर कितीही रोख रक्कम वा कोणत्याही मौल्यवान वस्तंूची अशा प्रकारे पोहोचवणूक केली जाते. मुंबई- गुजरात या पट्ट्यात याचा जास्त व्यवहार होतो, कारण यामागे इतिहास आहे. आंगडिया सेवेचा जन्म हा ब्रिटिश काळातील. त्या काळी गुजरातमधील कापूस मुंबईमार्गे मँचेस्टरला निर्यात होत असे. निर्यातीच्या या व्यवहारातील पैसा मुंबईतच येई. हा पैसा गुजरातमधील शेतक-यांना पोहोचवण्यासाठी आंगडिया सेवा सुरू झाली.

स्वातंत्र्यानंतर मुंबईच्या बरोबरीने अहमदाबाद, सुरत, वडोदरा या शहरांचे झपाट्याने औद्योगिकीकरण सुरू झाले. मुंबईत तयार झालेल्या कापडाचे प्रमुख व्यापारी होते गुजरातमध्ये. या व्यापा-यांचे मुंबई-अहमदाबाद-सुरत या टप्प्यात पैसे पोहोचवण्याचे काम आंगडियांच्या मार्फत केले जाई. त्या काळी बँकिंग, पोस्टाच्या सेवा उपलब्ध असतानाही आंगडियांच्या सेवेला मागणी होती. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, त्यांचा असलेला चोख व्यवहार, पैशाची वा वस्तूंची वेळेत देवाणघेवाण करण्यात त्यांची असलेली ख्याती आणि मालाविषयी गुप्तता पाळण्याचे त्यांचे कौशल्य यामुळे आंगडिया सेवेने व्यापा-यांची मने जिंकली आहेत. यातील बहुतेक रोख रक्कम ही काळ्या पैशातली असते आणि बँकेद्वारे पाठवणे शक्य नसते. आपल्यासारख्या देशात काळ्या पैशाची समांतर अर्थव्यवस्था असताना या पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी आंगडियांचा मोठा वापर होतो, या वस्तुस्थितीची कल्पना पोलिसांपासून गुप्तचर खात्याला असते आणि त्यांचा कारभार बिनबोभाटपणे सुरू असतो. 1992मध्ये अशाच एका आंगडियांचा ऐवज असलेला ट्रक भुलेश्वरला लुटल्यापासून पोलिसांचे संरक्षण त्यांना लाभले आहे. खरे तर या सेवेचे स्वरूप एखाद्या कुरिअर कंपनीसारखेच आहे. मात्र, या सेवेद्वारे ‘अधिकृत’ पार्सले जात असताना काळ्या पैशाचाही मुक्त व्यापार होतो. काळाच्या ओघात आपले स्वरूपही आंगडियांनी बदलले आहे. अधिकृत पार्सले म्हणून जे हिरे जातात, त्यांना विमा देण्यास सुरुवात केली.

आश्चर्याची बाब म्हणजे, हा विमा कोणत्याही विमा कंपनीमार्फत पुरवला जात नाही, तर आंगडियांच्या कंपनीमार्फतच दिला जातो. काही मोठे हिरे व्यापारी आंगडियांकडेच आपल्याकडील बरीच रक्कम कायमस्वरूपी ठेवतात. सुरतमध्ये हि-यांना पैलू पाडून ते हिरे मुंबईत आल्यावर या हि-यांचे पैसे आंगडियांच्या सुरत कार्यालयातून काही क्षणात पोहोचवण्याची व्यवस्था यातून केली जाते. इंटरनेटद्वारे तातडीने पैसे हस्तांतरित करण्याच्या आधुनिक सुविधेसारखीच ही सेवा आंगडिया पुरवतात. मुंबई सेंट्रलहून रोज रात्री निघणारी ‘गुजरात मेल’ ही ‘आंगडिया मेल’ म्हणूनच ओळखली जाते. यातील दोन डबे हे आंगडियांसाठी राखीव असल्यासारखेच असतात. ‘गुजरात मेल’मधून अशा प्रकारे दररोज करोडो रुपयांची किंवा हि-यांची ने-आण होते. सुमारे 200 आंगडिया सेवा देणा-या कंपन्यांकडे जवळपास सात हजार कर्मचारी कामाला आहेत. यातील बहुतांश कर्मचारी हे काठीवाड, जामनगर, जुनागढ, पोरबंदर या गुजरातच्या भागातील आहेत आणि पिढीजात त्यांचे हे काम सुरू आहे.

वर्षभरात तब्बल एक लाख कोटी रुपयांचे व्यवहार आंगडिया करतात, असा अंदाज आहे. सध्याच्या आधुनिक जगात मालाची ने-आण करण्यासाठी कितीही अत्याधुनिक सेवा सुरू झाल्या असल्या तरी आंगडियांनी आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. कधी कर चुकवण्यासाठी, तर कधी थेट काळे पैसे हस्तांतरित करण्यासाठी आंगडियांचा वापर होतो. पैशाला ‘काळे’ वा ‘पांढरे’ असे न मानता त्याला पार्सल मानणे, हे बेकायदेशीर असले तरी ते अव्याहतपणे आणि कार्यक्षमतेने आंगडियांनी केले आहे. गुजरातची ‘उद्यमशीलता’ आणि नरेंद्र मोदींची ‘प्रचारक्षमता’ याच प्रकारच्या व्यापारी वृत्तीवर चालू आहे. ‘आंगडियांचा’ हा ‘अव्यापारेषु व्यापार’ हासुद्धा भारतीय भांडवलशाहीचा एक पंचमस्तंभ आहे. आंगडिया सेवेची ही दुनियाच काही अजब आहे.