आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूरच्या राजकारणात दुसऱ्या डीडींचा उदय..!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूरच्या स्थानिक राजकारणाची जबाबदारी सांभाळत दिलीप देशमुखांनी विलासराव देशमुखांच्या राज्यस्तरीय राजकारणाला बळ दिले, त्याचप्रमाणे धीरज दुसरे डीडी बनून अमित देशमुखांच्या राजकारणाला बळ देण्याच्या प्रयत्नात आहेत. विशेष म्हणजे दिलीपरावांच्या राजकारणाची सुरुवात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापासूनच झाली होती. तोच योग ३० वर्षांनंतर जुळून येत असल्यामुळे ही संधी साधण्याचा प्रयत्न देशमुख कुटुंबीय करीत आहेत. दुसरीकडे देशमुखांच्या या प्रयत्नांना भाजपची वाढती ताकद रोखू पाहतेय. नव्याने पालकमंत्री झालेले संभाजी पाटील यांच्यावर पक्षाने मंत्रिपद देताना जिल्ह्यात भाजप वाढवण्याची जबाबदारी दिली आहे. 
 
विलासराव देशमुखांच्या राजकारणाची सुरुवात झाली ती ग्रामपंचायतीपासून. सरपंच, पुढे पंचायत समितीचे उपसभापती अाणि पुढे आमदार झाले. त्यानंतर राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री अन्  राज्याचे दोन वेळा मुख्यमंत्री. विलासरावांच्या राजकीय कारकीर्दीला बहर येत असतानाच १९९५ ला त्यांचा पराभव झाला होता. त्या वेळी विलासरावांचे लहान बंधू दिलीपराव देशमुख ऊर्फ डीडी यांनी स्थानिक राजकारण सांभाळण्यासाठी पुढाकार घेतला. दिलीपरावांनी स्थानिक सगळी जबाबदारी स्वीकारल्यामुळे विलासरावांना राज्याच्या राजकारणाचे क्षितिज काबीज करता आले. मतदारसंघाची चिंता करण्याचे काही कारण उरले नाही. पूर्णवेळ राज्याचे राजकारण करण्यासाठी त्यांना वेळ मिळाल्यामुळे विलासराव बिनधास्तपणे मुंबईत तळ ठोकून असायचे. त्याच कालावधीत त्यांनी राज्यभर आपल्या समर्थकांचे जाळे विणले. त्याचा फायदा त्यांना १९९९ मध्ये झाला आणि अनेक आमदारांनी विलासरावांना मुख्यमंत्री करण्यास पाठिंबा दिला. 

विलासरावांचे २०१२ ला निधन झाले. त्याच काळात त्यांचे लहान बंधू दिलीपराव देशमुख हेदेखील आजारपणामुळे सक्रिय राजकारणापासून दूर गेले. परिणामी सगळी जबाबदारी अमित देशमुखांवर येऊन पडली. महापालिका, जिल्हा परिषदेचा कारभार हाकला. मात्र एकाच वेळी मतदारसंघ, मुंबईतील व्यावसायिक व्याप सांभाळताना अमित देशमुखांची दमछाक व्हायची. त्यातच विलासरावांच्या राज्यभरातील समर्थकांनी त्यांना आपापल्या जिल्ह्यांत येण्याची निमंत्रणे धाडली. मात्र आपल्याच व्यापात गुंतल्यामुळे अमित देशमुखांना राज्यात नेतृत्व सिद्ध करण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही. तीन वर्षांपूर्वी अमित देशमुखांनी आपले लहान बंधू धीरज यांना पक्षाच्या युवक जिल्हाध्यक्षपदावर निवडून आणले. गेल्या विधानसभेला धीरज यांच्या नावाची ग्रामीण मतदारसंघातून चर्चा झाली. परंतु ऐनवेळी त्यांचे नाव स्पर्धेबाहेर गेले. या वेळेस जिल्हा परिषद खुल्या प्रवर्गासाठी सुटल्यामुळे धीरज यांनी आपल्या सक्रिय राजकारणाची सुरुवात तेथूनच करावी असा विचार पुढे आला. अमित देशमुख आणि त्यांचे काका दिलीपराव देशमुख यांनीही अध्यक्षपद मिळवण्याच्या उद्देशाने फील्डिंग लावत धीरज यांना एकुरगा या अत्यंत सुरक्षित मतदारसंघातून निवडणुकीत उतरवले आहे.
 
मुंबईत शिकलेल्या, वाढलेल्या धीरज यांनी अमेरिकेत एमबीए केलेय. त्यांच्यावर मुंबईतल्या काही उद्योगांच्या जबाबदाऱ्याही आहेत. मात्र अलीकडच्या काळात त्यांनी स्वत:ला ग्रामीण जीवनाशी जोडून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पोळ्याच्या दिवशी हजेरी लावून बैलांची पूजा करणे असो की बाभळगावातल्या शेतात सुरू केलेले नवे प्रयोग असाेत. दुसरीकडे युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यात संपर्क वाढवत नेलाय. आपली शहरी प्रतिमा पुसण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचे दिसून येतंय. ज्याप्रमाणे दिलीपरावांनी स्थानिक बाजू सांभाळत विलासरावांच्या राज्यस्तरीय राजकारणाला बळ दिले त्याचप्रमाणे धीरज दुसरे डीडी बनून अमित देशमुखांच्या राजकारणाला बळ देण्याच्या प्रयत्नात आहेत. विशेष म्हणजे दिलीपरावांच्या राजकारणाची सुरुवात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापासूनच झाली होती. तोच योग ३० वर्षांनंतर जुळून येत असल्यामुळे ही संधी साधण्याचा प्रयत्न देशमुख कुटुंबीय करीत आहेत. 

दुसरीकडे देशमुखांच्या या प्रयत्नांना भाजपची वाढती ताकद रोखू पाहतेय. नव्याने पालकमंत्री झालेले संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर पक्षाने मंत्रिपद देताना जिल्ह्यात भाजप वाढवण्याची जबाबदारी दिली आहे. कोणत्याही परिस्थितीत नगरपालिका, जिल्हा परिषद आणि लातूरची महापालिका ताब्यात घ्यायचीच, असा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे अंतर्गत  वाद बाजूला ठेवून संभाजी निलंगेकरांच्या नेतृत्वाखाली भाजपने सर्वच जागांवर ताकदीचे उमेदवार उभे केले आहेत. विशेष म्हणजे निलंगेकरांनी धीरज देशमुख मैदानात असलेल्या एकुरग्यामधूनच भाजपच्या जिल्ह्यातील प्रचाराचा प्रारंभ केला. काँग्रेस धीरज यांना अध्यक्ष म्हणून पुढे करीत असताना निलंगेकरांनी हातात नांगर धरण्याची क्षमता असलेल्या सामान्य घरातील व्यक्तीला अध्यक्षपदी बसवण्याचा निर्धार केला आहे. 
 
त्यामुळे या निवडणुकीत भलतीच चुरस निर्माण झाली आहे. दिलीपराव देशमुख यांनी पक्षातील सर्वच गटांची मोट बांधून सगळ्यांना कामाला लावले आहे. मात्र वातावरण नेहमीप्रमाणे एकतर्फी नाही याची जाणीव काँग्रेसजनांना झाली आहे. गेल्या निवडणुकीत लातूर जिल्ह्यात काँग्रेसची लढत राष्ट्रवादीसोबत होती. विशेष म्हणजे या निवडणुकीत दिलीपरावांनी राष्ट्रवादीलाही सोबत घेतले आहे. या निवडणुकीत विलासरावांची उणीव काँग्रेसला जाणवत अाहे. प्रचारात आघाडी घेत विरोधकांवर तुटून पडण्याचे आणि कार्यकर्ते माझ्या निवडणुकीत जिवाचे रान करतात, मग मी त्यांच्या निवडणुकीत मागे कसा राहीन, म्हणत मुरब्बी विलासराव अख्खी निवडणूक आपल्याभोवती फिरवत ठेवायचे. या वेळेस प्रचारात रंगत नसली तरी जिल्ह्याची नस माहीत असलेल्या दिलीपरावांनी चातुर्याने सगळ्यांना कामाला लावले आहे. भाजपचा वारू किती रोखला जातो, काँग्रेस त्याला किती लगाम घालू शकते यावरच विलासरावांचे चिरंजीव धीरज अध्यक्षपदी विराजमान होणार की नाही हे ठरणार आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...